आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कशासाठी ? फोटोसाठी..!:दाट सावलीचं ‘मोठं झाड’...

औरंगाबाद2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

झा ड जितकं मोठं तितकं ते सावली देतं. जे जास्त झुकलेलं ते अधिक नम्र असतं हे तमाम मानवजातीलाही लागू पडतं आणि ते खरं आहे. हे नाकारून चालणार नाही. कारण आयुष्यभर इतरांना सावली देणारं म्हातारपणही फार वेगळं नसतं. असं माझ्या मनात आलं. त्याला कारणही तसचं होतं. माझा जन्म जरी शहरात झाला असला तरी मी ग्रामीण भागाशी अपरिचित नाही. त्यामुळं काही कार्यक्रमानिमित्त खेड्यात जाणं-येणं असतंच. खेड्यातील एका भल्या मोठ्या झाडाच्या सावलीला पारावर काही समवयस्क मंडळी गप्पा मारताना दिसली. त्यांच्या आजूबाजूला काही लहान मुलं खेळत होती. त्याच्यातील काहींची ती नातवंडं असावीत. ती सर्वजण भूतकाळातील गप्पात रंगून गेली होती. तेवढ्यात पारापासून दूर अंतरावर एक आजोबा दिसले. मी फोटो क्लिक केला आणि त्यांच्याजवळ जाऊन बसले. उत्सुकता म्हणून विचारलं, ‘काय बाबा, बरं नाही का?’ तर ते म्हणाले, ‘तसं काही नाही, घर भरलेलं आहे. मुलं, सुना, नातवंड आहेत. थोडीफार शेती आहे, मुलं पाहतात, जनावर असल्याने घरात दूधदुभतं आहे. खाण्यापिण्याची आबाळ नाही. बरं चाललंय. मुलं, सुना शेतावर जातात. नातवंडं शाळेत जातात. आता काही तक्रार नाही. त्यामुळे बसतो जुन्या मित्रात गप्पा मारत. दिवसही चांगला जातो. बरं वाटतं.’ मग मी विचारलं, ‘एकटेच का बसले?’ माझ्या प्रश्नाचं उत्तर म्हणून ते थोडे हसले व म्हणाले, ‘आता वय झालंय, सगळं आयुष्य उन्हातान्हात कष्ट करण्यात गेलं. आता शरीर साथ देत नाही,’ असं म्हणून हसतमुख चेहऱ्याने त्यांनी माझ्याकडे पाहिलं. मला शहरातील वृद्धाश्रम आठवला. शहरातील मुलांची कामानिमित्त धावपळ, मर्यादित जागा, गप्पा मारण्यासाठी समवयस्क माणसं नसतात. त्यामुळे आमचा खूप कोंडमारा होतो असं म्हणणारी वृद्धाश्रमातील माणसं मी पाहिली आहेत. परंतु खेड्यात आजही मोकळं वातावरण आहे. घरं छोटीच आहेत, पण मोकळीक असणारी आहेत. म्हणून वय झालं तरीही बाबांच्या चेहऱ्यावर समाधान दिसत होतं.

प्रियंका सातपुते संपर्क : ७३८५३७८८५६

बातम्या आणखी आहेत...