आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रसिक स्पेशल:सामाजिक अभिव्यक्तीचा उत्सव

जयश्री बोकील10 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

उदगीरमध्ये भरलेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे सूप वाजले आणि लगोलग पुण्यात सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या प्रांगणात ‘मराठी सोशल मीडिया संमेलन‘ रंगले. ‘डिमीप्रेमी’ अर्थात डिजिटल मीडियाप्रेमी युवा फळीच्या मंडळींनी एकत्रितपणे या आगळ्यावेगळ्या संमेलनाचा घाट घातला आणि उत्तम संकल्पनाधारित कार्यक्रमांनी संमेलनाचे वेगळेपण अधोरेखित केले. या संमेलनातील विधायक उपक्रम, आशयघन चर्चा यांचा घेतलेला हा वेध...

‘सोशल मीडिया’ हा अलीकडच्या काळाचा परवलीचा शब्द मानला जातो. मराठी भाषेत आपण त्याचा उल्लेख ‘समाज माध्यमे’ असा करतो. गेल्या दहा वर्षांच्या काळात समाज माध्यमांनी आपला वैयक्तिक आणि सामूहिक अवकाश बराचसा व्यापला आहे. विशेषत: युवा पिढी तर अभिव्यक्तीसाठी बहुतांश वेळा समाज माध्यमांवर अवलंबून असल्याचे चित्र आजूबाजूला दिसते आहे. या पार्श्वभूमीवर, सोशल मीडिया संमेलनाच्या आयोजनामागील भूमिका समजून घेणं अगत्याचं आहे.

मराठी सोशल मीडिया संमेलनाची ओळख आणि भूमिका जाणून घेताना काही गोष्टी पुढे आल्या. सोशल मीडिया संमेलन हा माध्यमांच्या लोकशाहीकरणाचा, समाजाला सजीव ठेवणाऱ्या चळवळींचा, सृजनाचा आणि सर्जनशीलतेचा उत्सव आहे. तो संवादोत्सुक असलेल्या सर्वांचा आहे. संमेलन कोणासाठी आहे, असा प्रश्न उपस्थित केला, तर ते सोशल मीडियावर व्यक्त होणाऱ्या, होऊ पाहणाऱ्यांसाठी आहे. आपल्या व्यक्त होण्यातून मोठा प्रभाव निर्माण केलेल्यांसाठी आहे. साहित्यिक, कलाकार, समाजोपयोगी चळवळ चालवणाऱ्यांसाठी आणि त्या चळवळी ज्यांच्यासाठी आहेत अशा सर्वांसाठी आहे. समाजकारण, राजकारण, अर्थकारणाचे ज्ञान असलेल्यांसाठी, त्यात रुची असलेल्यांसाठीही आहे. पारंपरिक माध्यमांसाठीसुद्धा तो आहे. राज्यकर्ते, धोरणकर्ते, प्रशासन, नेते आदींसह मराठी भाषा आणि महाराष्ट्राच्या संस्कृतीवर प्रेम असणाऱ्या सर्वांसाठी तो आहे. तरुण, नवतरुण, मध्यमवयीन, ज्येष्ठ नागरिकांसाठीही आहे. थोडक्यात, हा उत्सव जगातील १५ कोटी मराठी भाषिकांसाठी आहे, ही भूमिका आयोजकांच्या मनात होती.

दुसरा मुद्दा म्हणजे, समाज माध्यमांवर कोणत्या गोष्टी मांडल्या जातात? तर समाजकारणावर, अर्थकारणावर मोठा प्रभाव असलेले विषय, मानसिकतेवर परिणाम करणारे विषय, सृजनाची मानसिकता आणि सर्जनशीलता वृद्धिंगत होण्यासाठीचे विचार, उपाय तसेच काय चांगलं होतंय आणि आणखी काय झालं पाहिजे, काय होऊ शकतं याची उदाहरणे शोधणे, ती शेअर करत सोशल मीडियाच्या भविष्याचा अंदाज घेण्यापर्यंत साऱ्या विषयांचे आकाश समाज माध्यमांनी कवेत घेतले आहे, याची जाणीव ठळक करणे. पुढचा मुद्दा म्हणजे या संमेलनाने प्रेक्षक, श्रोत्यांना काय दिले? तर आपल्या आवडत्या सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर्सना (प्रभाव घटक) प्रत्यक्ष भेटण्याची संधी दिली. वैयक्तिकरीत्या या व्हर्च्युअल व्यासपीठावर वावरणाऱ्यांना प्रोत्साहन देण्याचं, व्यक्त होण्याचं, संवादी होण्याचं भान दिलं. चांगली साहित्य आणि कलानिर्मिती करण्याची, व्यापक होण्याची, उत्क्रांत होण्याची अनुभूती दिली. आपण फरक पाडू शकतो, परिणाम घडवू शकतो, ही भावना जागवली.

दुसऱ्या बाजूने या व्यासपीठावर जे इन्फ्लुएन्सर्स आले त्यांनाही काही मिळालं, असं त्यांच्याशी संवाद साधताना जाणवलं. आपल्या आभासी फॉलोअर्सना प्रत्यक्ष भेटण्याची संधी मिळाली. आपल्या कामाची दखल घेतली जाते याचा आनंद झाला. नवा दृष्टिकोन आणि आपण इन्फ्लुएन्सर या नात्याने काय करायला हवं याची नव्याने जाणीव झाली. काहींना नव्या व्यावसायिक संधी गवसल्या. यासोबतच सोशल मीडिया आणि त्यावर असलेल्या मराठी भाषिकांकडून महाराष्ट्राचं समाजकारण आणि अर्थकारण यावर सकारात्मक परिणाम घडवून आणता येईल, असा विश्वास आणि ते करण्यासाठीचा मार्ग काय असू शकतो याचाही काहीसा अंदाज संबंधितांना आला असावा.

या संमेलनाची एक सकारात्मक बाजू म्हणजे कुणीही अध्यक्ष, स्वागताध्यक्ष नसल्याने इतर संमेलनात त्यामुळे होणारे मानापमान, संशयकल्लोळ आदी प्रयोग झाले नाहीत. सोशल मीडिया संमेलनाचा हेतू सुस्पष्ट असल्याने त्याला विरोध करणारे सूर अजिबातच उमटले नाहीत. एरवी आक्रमक भाषा करणारी मंडळीही स्वत: समाज माध्यमांचा वापर करत असल्याने आपली भूमिका म्यान करून या संमेलनाला आली होती. परिणामी संमेलन शांततेत (निषेध, विरोध, घोषणाबाजी न होता) पार पडलं. समाज माध्यमांचे संमेलन समाज माध्यमांवरच करावं, ऑफलाइन कशाला, असा किरकोळ सूर मंद आवाजात उमटला. पण, तो पुरेसा प्रभावी नव्हता. शिवाय, हे संमेलन ऑनलाइनदेखील सुरू होतंच. सोशल मीडिया संमेलनात चर्चिले गेलेले विषय आयोजकांच्या कल्पकतेची चुणूक दाखवणारे होते. काही शीर्षकांची उदाहरणे पाहिली, तरी हे लक्षात यावं. ‘माझं एक्स्प्रेशन माझं इम्प्रेशन’, ‘कंटेंट कडक्क होण्यासाठी..’, ‘शेकडो बदामवाली कविता’, ‘टेम्प्लेंटच्या अलीकडले आणि पलीकडले’, ‘व्हिडिओ कंटेंटचा किडा’, ‘रील लाइफ’, ‘कंटेंटचं सीमोल्लंघन’... ही काही शीर्षके नुसती वाचली तरी ऐकायची, पाहायची उत्सुकता वाटावी. सोशल मीडियाविषयी अनुकूल आणि प्रतिकूल, दोन्ही बाजूंनी हिरिरीनं बाजू मांडणारी मंडळी आहेत. सोशल मीडिया वरवरचा, तरंगस्वरूप आहे, थिल्लर आहे, त्यावरचा मजकूर, मते, टिप्पणी गांभीर्याने घेण्याची गरज नाही, असेही म्हटले जाते आणि याच्या उलट बाजू मांडणारेही तितक्याच ताकदीने सोशल मीडियाचे समर्थन करताना दिसतात. संमेलनाने मात्र समाज माध्यमांची सकारात्मक बाजू लावून धरली, हे स्वागतार्ह आहे.

पहिल्या सत्रात दैवता पाटील आणि नितीन वैद्य यांनी ‘समाज माध्यमांची दिशा आणि दिशांतरे’ या विषयावर मांडणी केली. ‘सायबर क्राइम : रिपोर्ट करा, कायदा आहे,” हे चर्चासत्र अतिशय माहितीपूर्ण झाले. सोनाली पाटणकर, रश्मी करंदीकर आणि वैशाली भागवत यांनी मुद्देसूद, पण आटोपशीर मते मांडली. ‘राजकारणातला सोशल मीडिया’ हे सत्र अपेक्षेप्रमाणे रंगले. रोहित पवार, अदिती तटकरे, सिद्धार्थ शिरोळे, योगेश कदम, देवेंद्र भोईर अशा महाराष्ट्रातील राजकारण्यांचा वारसा सांगणाऱ्या आणि काही पूर्णपणे नव्या अशा राजकीय क्षेत्रातील युवा मंडळींनी मोकळेपणाने सोशल मीडियाचा प्रभाव मान्य करत, या आभासी व्यासपीठाच्या उपयुक्ततेवर शिक्कामोर्तब केले. भोईर यांची वऱ्हाडी बोली ऐकायला फारच गोड वाटली.

संमेलनाच्या दुसऱ्या दिवशी प्रसिद्ध लेखक अरविंद जगताप यांनी, ‘व्यक्त होण्यापूर्वी आणि होताना’ हा विषय त्यांच्या खुमासदार शैलीत मांडला. काही मत मांडतानाच्या आधीची विचार प्रक्रिया आणि त्याविषयीचं भान यावर त्यांनी भर दिला. डॉ. संजय रानडे यांनी सर्जनशील बाजू भक्कम होण्यासाठी विचारांची खोली कशी वाढवावी याचे मार्गदर्शन केले. भाषेच्या संदर्भातील प्रमाण भाषा, बोलीभाषा, प्रांतिक लहेजा या अनुषंगाने डॉ. विश्राम ढोले यांनी केलेले विवेचन महत्त्वाचे होते. सॅबी परेरा यांनी, ‘हजारो लाइक्स, कमेंट्स : कसं काय?’ हा जिव्हाळ्याचा विषय बेधडक शैलीत अत्यंत आकर्षक, पण वस्तुनिष्ठ पद्धतीने मांडला. त्यांची मांडणी इतकी प्रभावी होती, की त्यासाठीही सर्वाधिक लाइक्स- कमेंट्स आल्या असाव्यात, असे वाटले. संगीतकार डॉ. सलील कुलकर्णी यांनी मोजक्या वेळात ‘सकारात्मक ट्रॅक्शनचा ट्रॅक’ हा अभिनव मार्ग सोशल मीडियाच्या माध्यमातून कसा यशस्वी झाला याची माहिती सोदाहरण दिली. ‘शेकडो बदमावाली कविता’ ही असेच लाइक्स मिळवून गेली. ‘स्टोरीचा फोटो आणि हजार लाइक्सची फ्रेम’ हा विषय छायाचित्रकार अभय कानविंदे यांनी मांडला. ‘मीम्स’विषयी आशिष शिंदे आणि शशांक प्रतापवार यांचा संवाद उद्बोधक ठरला. ‘व्हिडिओ कंटेंटचा किडा’मधील सहभागी अगदीच युवा पिढीतील होते. त्यामुळे मूलभूत मुद्द्यांची मांडणी न होता, प्रत्यक्ष प्रतिसादापुरतीच बोलणी झाली. ‘रील लाइफ’मधूनही काही मुद्दे समजले. ‘कंटेंटचं सीमोल्लंघन’विषयी अधिक उत्सुकता होती. कोरोनाकाळात पुढे आलेला आणि लोकप्रिय झालेला हा प्लॅटफॉर्म असल्याने जयंती वाघधरे यांनी केलेले अभ्यासपूर्ण विवेचन लक्षणीय ठरले.

संमेलनाच्या अखेरच्या दिवशी ‘सांस्कृतिक वारसा, आपण आणि सोशल मीडिया’ हा परिसंवाद हेमंत राजोपाध्ये, अर्चना देशमुख आणि सचिन पवार यांच्या संशोधकीय मांडणीने रंगला. योगेश बोराटे यांनी या मंडळींशी संवाद साधला. चळवळींचा दीर्घ इतिहास असणाऱ्या आपल्या राज्यातील ‘चळवळींचा मीडिया’ असीम सरोदे, परिणिता दांडेकर, शमिभा पाटील आणि दीक्षा दिंडे यांनी समोर आणला. ही सर्व मंडळी समाजाच्या वेगवेगळ्या क्षेत्रातील चळवळींशी जोडलेली असल्याने एक व्यापक पट उलगडत गेला. कोरोनाकाळात पुणे हॉटस्पॉट ठरले होते. त्यामुळे पुण्याचे माजी महापौर मुरलीधर मोहोळ यांची ‘आपत्ती व्यवस्थापनासाठीचा मीडिया’ या विषयावरील मुलाखत उपयुक्त ठरली. ‘पत्रकारिता आणि सोशल मीडिया’ या विषयावरील चर्चेची उत्सुकता होती. ज्येष्ठ पत्रकार राजदीप सरदेसाई, प्रसन्न जोशी, आशिष दीक्षित आणि अभिजित कांबळे असे पत्रकार यात सहभागी झाले होते. परंंतु, या मंडळींनी आपापल्या विशिष्ट माध्यमांची स्वत:ची भूमिकाच (प्रसंगी वरच्या पट्टीत, आक्रमकपणे) लावून धरल्याने चर्चेचा गाभा बाजूला राहिला, असे श्रोत्यांशी बोलताना जाणवले. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचा संमेलनातील ऑनलाइन सहभाग लक्षणीय ठरला.

आयोजक या नात्याने समीर आठल्ये, प्राची रेगे, मंगेश वाघ, अदिती खरे, प्रदीप शिरगावकर आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी विषयांची निवड, वक्ते ही बाजू उत्तम सांभाळली. तरीही या संमेलनात तरुणाईचा अपेक्षित सहभाग दिसला नाही. विद्यापीठासारखे तरुणाईने सळसळणारे संमेलनस्थळ असूनही युवा वर्ग मोजक्या संख्येने दिसला. काही विषयांची निवड उत्तम असूनही वक्ते फारच अननुभवी, वरवर मते मांडणारे असल्याचेही जाणवले. त्यामुळेच वैयक्तिक संवादात कदाचित या गोष्टी समजून घेता येतील, पण सार्वजनिकरीत्या संमेलनासारखा गंभीर उपक्रम करताना वक्तेही पुरेशा गांभीर्याने मांडणी करणारे असावेत, असा सूर उमटला. माध्यम सर्वांना खुले असले तरी त्यांचा वापर गांभीर्याने केला पाहिजे हा संदेश देण्याचा प्रयत्न स्तुत्य होता. पुढच्या संमेलनात या मुद्द्यांचा विचार होईल, अशी आशा करायला हरकत नाही.

बातम्या आणखी आहेत...