आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराको विडचा काळ मार्च २० पासून सुरू झाला. १ मार्चला महाराष्ट्रात पहिला रुग्ण आढळला. महाराष्ट्रातील शहरे मात्र त्यापुढे गेली. भीतीचे साम्राज्य पसरले. ते मुख्यत्वे शहरांमध्ये. मात्र या पहिल्या पर्वात गावं सुरक्षित होती. कारणांची मीमांसा करण्याची वेळ नव्हती. मात्र, गावांमधील कोविड बाधितांची संख्या अत्यल्प होती. तीच अवस्था महाराष्ट्र आणि गुजरातच्या सीमेवर असलेल्या ‘सुरगाणा’ तालुक्याची होती. शुद्ध हवा, ताजे अन्न, व्यायाम ही आरोग्याची त्रिसूत्री. त्या बरोबर वनस्पतीजन्य औषधं ही तिथली बलस्थानं. पुढं सर्वत्र कोविडचा जोर ओसरल्यासारखा वाटला. पण, अशातच कोविडच्या दुसऱ्या लाटेाची चाहूल लागली. तीही जलदगतीने. संसर्गाची व्याप्ती तर वाढलीच, पण मृत्यूचे प्रमाणही वाढले. अाता या विळख्यात गावं अडकायला सुरूवात झाली होती. सुरगाणा तालुका त्याला अपवाद नव्हता. या तालुक्याच्या गावांमधील बाधितांना सरकारी रुग्णालयापर्यंत आणणे कष्टप्रद ठरु लागले होते. मृत्यूचे प्रमाणही वाढू लागले. सुरगाण्यातील आमदार नितीन पवार यांच्या पत्नी जयश्री पवार जिल्हा परिषदेच्या सदस्य असताना आम्ही त्र्यंबकेश्वरमधील गावरीवाडी येथे कुपोषण निर्मूलनाचा प्रकल्प घेतला होता. सरकारी आरोग्य यंत्रणेच्या चिकित्सेसोबत आयुर्वेदाच्या माध्यमातून हे गाव कुपोषणमुक्त केले होते. आ. पवार यांना त्याची आठवण झाली आणि आमचे कोविडच्या पहिल्या लाटेतील कार्य पाहून त्यांनी आमची भेट घेतली. मग सुरगाणा तालुक्यातील जवळपास सर्व मुख्य गावांतील ग्रामस्थांशी संवाद साधला आणि काही मुद्दे ठळक मांडले. सुरगाण्यातील लोक सरकारी रुग्णालयाकडे पाठ फिरवू लागले होते. निश्चित आणि नेमक्या औषधांचा अभाव, कमी झालेली प्रतिकारक्षमता ही कारणे मुख्यत्वेकरुन समोर आली. हे शिवधनुष्य पेलायचे आम्ही ठरवले. उपचारांसंदर्भात ‘आयुष’ आणि आरोग्य मंत्रालयाने आखून दिलेल्या चौकटी पाळणं महत्त्वाचं होतं. सुरगाण्याला प्रत्यक्ष भेट दिली आणि परिस्थितीचा अभ्यास केला. पहिल्या भेटीत दोन कोविडबाधितांंना औषधं दिली. पीएचसीच्या डॉक्टरांना काही सूचना दिल्या. फलश्रुती अशी, की हे रुग्ण ६ दिवसांत ठणठणीत बरे झाले. इतर रुग्णंाच्या तुलनेने कोणताही त्रास झाला नाही, बाधा वाढली नाही. हे आमच्यासाठी मोठे बळ देणारे होते. तिथून हा उपचारांचा उपक्रम संपूर्ण सुरगाणा तालुक्यात घ्यायचा, हे निश्चित झाले. ही आयुर्वेदिक औषधे घ्यायला आदिवासी लोक तयार झाले, हे विशेष. सर्व केंद्रात जवळपास ९० टक्के आयुर्वेद पदवीधर असल्यामुळे त्यांच्यासोबत झूमवरून प्रशिक्षण झाले, चर्चा झाली. सर्वांना औषध आणि शास्त्र परिचित असल्याने काम सोपं गेलं. रुग्णांची फुफ्फुसांची प्रतिकारशक्ती वाढवणे, मानसिक स्थिती ठीक करणे, कफाची लक्षणे कमी करणे, शक्ती वाढवणे, उपद्रव टाळणे हा मुख्य हेतू समोर होता. त्यात आयुर्वेदशास्त्राने वेळोवेळी प्राणवह स्त्रोत, फुफ्फुसांचे विकार याविषयी वर्णन केलेल्या औषधांची सूची केली. शृंग, भस्म, भर्स्मविषास रस, श्वासकुठार रस, गुळवेल वटी, तुळशी वटी, आयुष ६४, अश्वगंधा वटी, शतावरी, सर्वगंधा वटी, जटामांसी वटी (भीती कमी करुन, मन शांत करणे हा हेतू), द्राक्षासव, सूक्ष्म त्रिफाळा, अमृतारिष्ट, च्यवनप्राश, सीतोपलादी चूर्ण, ताकीसादी चूर्ण, गंधर्व कृमी विकार काढा, अभ्यंग तेल, सुंठ, मिरे चूर्ण यांचा उपयोग व्यक्ती, त्याची प्रकृती, व्याधी, चिकित्सा त्यांच्या अवस्थेप्रमाणे केला. रुग्णांना प्रथमच ठिकठिकाणच्या सेंटरमधील डॉक्टरांच्या मदतीने व्हिडिओ कॉन्फरन्सवरुन, दृकश्राव्य पद्धतीने पाहून औषधे ठरवत गेलो. कधी कधी नेटवर्कच्या अनुपलब्धतेमुळे अगदी डोंगरावर डॉक्टरांना आणून रुग्णांशी चर्चा केली. टेलिमेडिसीनद्वारे सामाजिक आरोग्याचा पहिला अव्यावसायिक प्रयोग यशस्वी होत होता. त्यामुळे दिवसांतील ४-५ तास प्रत्यक्ष आणि फोनवरुन ६ ते ८ तास रुग्णांविषयी माहिती घेणे हा क्रम सुरू झाला. आठवड्याभरानंतर रुग्णांचे स्वास्थ्य सुधारू लागले. उपचारांवरचा विश्वास वाढला, तसे सुरगाण्यातील अनेक लोक फोन, व्हिडिओवरुन सल्ला घेऊ लागले. रुग्ण बरे होऊ लागले. आयुर्वेदावरील, चिकित्सेवरील विश्वास आणि अवलंबित्व वाढले. प्रसार माध्यमांतून या प्रकल्पाविषयीचा माहिती प्रसारित झाली. या औषधांमुळे सुरगाणा तालुक्यातील रुग्ण बरे झाले. कोरोनाग्रस्तांची संख्या शून्यावर आली. हे श्रेय गावकऱ्यांचं होतं, सरकारी यंत्रणेचं होतं. सर्व डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांचं होतं. आमदारांचं, गावातील कार्यकर्त्यांंचं होतं. ज्यांनी औषधांसाठी मदत केली, त्या कंपन्यांचंही होतं. तसंच त्या रनरचंही होतं, जो पावसात देखील सुरगाण्यापासून ५० किमीवर असणाऱ्या खेडेगावात औषधं पोहोचवत होता. त्यातून एखाद्या प्रगत शहरात घडेल, असा ‘टेलिमेडिसीनद्वारे उपचार’ हा प्रयोग यशस्वी झाला. आणि मुख्य म्हणजे तो महाराष्ट्रातील खेड्यात झाला, ही अभिमानाची बाब आहे. भविष्यात गरज पडेल तेव्हा या पॅटर्नचा उपयोग जगाला होईल, हे नक्की. अशा चिकित्सा पद्धतीची चर्चा होईल तेव्हा सुरगाण्याचे नाव पहिल्या क्रमांकावर असेल. गोव्यात नुकत्याच झालेल्या जागतिक आयुर्वेद काँग्रेसमध्ये कोविडवरील उपचाराचा हा ‘सुरगाणा पॅटर्न’ तज्ज्ञ, अभ्यासकांसमोर सादर करण्याची संधी प्राप्त झाली. भविष्यात त्यावर व्यापक चर्चा होऊन सार्वजनिक आरोग्य आणखी सुरक्षित करता येईल.
वैद्य विक्रांत जाधव संपर्क : 9545428800
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.