आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Opinion
  • A Creative Battle Of Interactive Sisterhood... | Article By Dr. Nirmala Jadhav

फोर्थ डायमेन्शन:संवादी भगिनीभावाची कृतिशील  लढाई...

औरंगाबादएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

बंधुभाव (Brotherhood) हे आधुनिकता, सुसंस्कृतता, प्रेम, मैत्री, शांतता आणि व्यापक सुहृदयतेचे प्रतिकमूल्य म्हणून पुरस्कृत करण्यात आले आहे. फ्रेंच राज्यक्रांतीने ‘स्वातंत्र्य, समता आणि बंधुता’ ही त्रिसूत्री जगाला दिली. अर्थात पितृसत्ताक भाषिक संकल्पना वापराच्या स्वाभाविकतेमुळे बंधुभाव ही संकल्पना केवळ पुरुषांशी सबंधित बाब समजली जात नाही, तर ती व्यापक सार्वत्रिक मानवी मूल्याचे प्रातिनिधिक प्रतीक ठरते. या उलट भगिनीभाव हे अकल्पनीय, आशय आणि अस्तित्वहीन संकल्पना मूल्य ठरते. स्त्रिया-स्त्रियांमध्ये मैत्री, सहकार्य अशक्य कोटीची बाब असून, स्त्रिया सदैव एकमेकींकडे द्वेष, मत्सर, हेवा आणि स्पर्धेतूनच पाहतात, असे मानले जाते. पुरुषसत्तेतील स्त्रियांच्या शोषणासंदर्भात बहुतांश वेळेस पुरुषांकडून उपस्थित केला जाणारा प्रश्न म्हणजे, ‘अहो, इथे स्त्रियाच स्त्रियांच्या शत्रू असतात. सुनेचा छळ करणारी सासूच असते, मुलीवर नियंत्रण ठेवणारी, तिच्यावर बंधन लादणारी, पितृसत्तेचे संस्कार रुजवणारी आईच असते. मग पुरुषाला का विनाकारण दोषी धरले जाते?’

स्त्रिया-स्त्रियांमधील तथाकथित द्वेषभाव आणि मत्सराकडे जैविक वास्तव म्हणून बघण्याऐवजी पुरुषसत्तेविरोधातील स्त्रियांचे बळ हिरावून घेणारी पितृसत्तेने लढवलेली सर्वोत्कृष्ट राजकीय खेळी म्हणून बघितले पाहिजे. वस्तुतः स्त्रियांचे विचारविश्व आणि अस्तित्व पुरुषकेंद्री ठेवून स्त्रियांमध्ये सत्तेचे थोडेफार वानगीदाखल तुकडे फेकून त्यांना आपसात लढवले जाते. उदा. मूल असणारी स्त्री मूल नसणाऱ्या तथाकथित वांझोट्या स्त्रीचा द्वेष करून स्वतःला श्रेष्ठ समजते. नवरा असणाऱ्या स्त्रीला विधवा स्त्रीविरोधात उभे केले जाते, सासू-सून, पतिव्रता-देहविक्रयातील स्त्री, देवी-राक्षसी, विवाहित-अविवाहित, फक्त मुली असणारी विरुद्ध मुलगे असणारी इ. अशा अनेक द्वैतांमध्ये स्त्रियांना शत्रुभावी गटात विभागून त्यांना आपापसांत लढवले जाते. विशेष म्हणजे, या लढाईत अंतिम विजय किंवा हितसंबंध हे पुरुषी वर्चस्वाचेच जोपासले जातात.

१९६० च्या दशकात जहाल अर्थात मूलतत्त्ववादी स्त्रीवाद्यांनी पितृसत्तेची मूलगामी चिकित्सा केली. पितृसत्ता हे वैश्विक सत्य असून, जगभरातील सर्व स्त्रियांचे पितृसत्ता शोषण करते. कुटुंब, विवाह, मातृत्व, सौंदर्य कल्पना, लैंगिकता, प्रजनन इत्यादी स्त्रियांना शोषित-अंकित ठेवण्याची पितृसत्ताक आयुधे आहेत. स्त्रियांना परस्परांपासून दूर लोटणाऱ्या नीतीमुळे स्त्रिया स्वतःवरील अन्याय व शोषणाविषयी देखील एकमेकींसोबत संवाद साधत नाहीत आणि स्त्रियांमधील या पराकोटीच्या घुसमटीचे प्रत्यंतर पाश्चात्य देशात ‘हिस्टेरिया’मध्ये, तर भारतीय परिभाषेत अंगात येणे, देवी येणे, झपाटणे यांसारख्या प्रकारात होताना दिसते. या अबोला आणि घुसमटीतून स्त्रियांना बोलते करण्यासाठी १९६० च्या दशकात खूप मोठ्या प्रमाणात उद‌्बोधन शिबिरांचे आयोजन केले गेले. यात स्त्रिया बोलू लागल्या तेव्हा त्यांच्या लक्षात आले की, कारणे वेगवेगळी असली, तरी नवऱ्याकडून होणारी मारहाण, कौटुंबिक छळवणूक, अवहेलना हा बहुतांश स्त्रियांचा सामाईक अनुभव आहे. याचाच अर्थ स्त्रियांच्या वैयक्तिक गुण-दोष, कर्म अथवा वर्तणूक हे त्यांच्या वाट्याला आलेल्या या छळवणुकीचे कारण नसून पुरुषी वर्चस्वाच्या व्यवस्थेतून हे सर्व घडत असते आणि या व्यवस्थेच्या चलाखीच्या परिणामाबाबत स्त्रिया बोलत नाहीत. म्हणूनच सर्व स्त्रियांनी पुरुषसत्तेविरोधात लढले पाहिजे, त्यासाठी जगभरातील सर्व स्त्रियांनी एकत्र आले पाहिजेे, असा आग्रह धरत वैश्विक भगिनीभावाच्या संकल्पनेची मांडणी मूलतत्त्ववादी स्त्रियांनी केली.

डोली में जाने का अर्थी में वापस आने का, लग्नानंतर सासर हेच स्त्रीचे खरे घर असते, सासरी कितीही त्रास झाला तरी याची वाच्यता स्त्रीने माहेरी करू नये, वाडवडिलांच्या संपत्तीत मुलीचा काही अधिकार नसतो, मुलीच्या घरच्यांनी तिच्या संसारात हस्तक्षेप करू नये... या पुरुषसत्ताक सांस्कृतिक आणि भौतिक अवधारणांमुळे स्त्रियांची सपोर्ट सिस्टीमच हिरावून घेतली जाते. अशी आधारहीन व्यक्ती शोषण, अन्याय आणि हिंसाचाराची सहज व स्वाभाविक बळी ठरते. आर्थिक परावलंबन, मानसिक आधार आणि संवादाच्या अभावी येणाऱ्या हतबलतेतून अनेक स्त्रिया आत्महत्येचा मार्ग स्वीकारतात. खासगीपणाच्या आवरणाखाली अदृश्य कौटुंबिक शोषण केले जाते. म्हणूनच मूलतत्त्ववादी स्त्रियांनी ‘जे जे खासगी ते ते राजकीय’चा नारा देत या कौटुंबिक सत्तावर्चस्वाचे बिंग उघडे पाडून भगिनीभावाचा नारा बुलंद केला.

मूलतत्त्ववादी स्त्रियांनी अराजकीय, खासगी, कौटुंबिक म्हणवल्या गेलेल्या गोष्टीकडे संशयाने बघण्याची दृष्टी खुली केली, पण पुरुषसत्तेतून होणाऱ्या शोषणाला इतरही अनेक सत्ताव्यवस्थांचे कंगोरे असतात, त्याकडे दुर्लक्ष केले. म्हणूनच, ‘मातृत्वाचं कौतुक होणाऱ्या समाजात माझ्या तेरा लेकरांना माझ्याच डोळ्यासमक्ष काळे गुलाम म्हणून विकलं जातं, स्त्रिया नाजूक आणि अशक्त समजल्या जाणाऱ्या समाजात मी पुरुषांसारख्या भाकऱ्याही खाते आणि जनावरासारखं शेतात आणि घरातही राबते, पण ढोर मेहनतीने दमलेल्या माझ्यासारख्या स्त्रियांना स्त्री दाक्षिण्य म्हणून एखादा पुरुष बसमध्येसुद्धा बसायला जागा देत नाही, याचा अर्थ मी बाई नाही का?’ हा स्त्री चळवळीच्या डोळ्यात अंजन घालणारा जळजळीत प्रश्न काळी गुलाम सोजोरनॉर ट्रूथ विचारते, तर आमच्या स्त्रियांना उघड्यावर बाळंत व्हावे लागते. मातृत्व आणि बाळंतणीचे कोण कोड-कौतुक होणाऱ्या समाजात आमच्या स्त्रियांना मात्र बाळंत होताना साधं डोक्यावर छप्पर का मिळू नये, हा ऐतिहासिक सवाल महात्मा फुलेंच्या शाळेतील चिमुरडी मुक्ता उपस्थित करते. कौटुंबिक हिंसाचार, बलात्कार, हुंडाबळीच्या प्रश्नाविषयी बोलणाऱ्या, लढणाऱ्या स्त्री चळवळीच्या अजेंड्यावर भटक्या विमुक्त, कनिष्ठ जातीय, अपंग स्त्रियांचे प्रश्न प्राधान्याने का येत नाहीत, असा सवाल विविध स्त्रियांच्या गटांकडून उपस्थित केला गेला. आज बाईपणाच्या अस्तित्वाला व्यापलेल्या जात, धर्म, वंश, वर्ग, भाषा, प्रदेश इत्यादीच्या कुंपणाला पार करून सर्वव्यापी भगिनीभावाचा विस्तार करावा लागेल. वरील सर्व संवादी सूर भगिनीभावाचा नारा बुलंद करत असताना तो व्यापक आणि सर्वसमावेशक असला पाहिजे.

डॉ. निर्मला जाधव संपर्क : nirmala jadhav@gmail.com

बातम्या आणखी आहेत...