आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराकार्लोटा गाल, ऑलेक्झांडर चुबको बेलारूस- युक्रेनच्या सीमेवरून गेल्या वर्षी नतालिया झोर्निक यांच्या किशोरवयीन मुलाला रशियन सैनिकांनी जबरदस्तीने शाळेतून नेले होते. तेव्हापासून नतालिया यांना मुलाबाबत काहीही कळले नाही. त्यानंतर एक फोन आला. दुसऱ्या बाजूला त्यांचा १५ वर्षांचा मुलगा आर्टेम होता. त्याला आईचा फोन नंबर पाठ होता. त्याने शाळा संचालकांच्या मोबाइलवरून फोन केला होता. आर्टेम आणि त्याच्या डझनभर शाळामित्रांना सैनिकांनी रशियाच्या ताब्यातील युक्रेनियन झोनमधील शाळेत नेले. युद्धाच्या वेळी मुलाला परत आणणे नतालिया यांच्यासाठी सोपे नव्हते. युक्रेन व रशियाच्या ताब्यातील प्रदेश यांच्यातील सीमा बंद करण्यात आली होती. अनेक महिन्यांनी त्यांच्या शेजाऱ्याने नतालिया यांच्या मुलाच्या शाळेतील मित्राला परत आणले. त्यांना कळले की, एक धर्मादाय संस्था मुले असलेल्या मातांना घरी परत आणण्यासाठी मदत करत आहे. युक्रेनमधील लष्करात काम करण्याच्या वयाच्या पुरुषांना देश सोडण्याची परवानगी नाही. त्यामुळे सेव्ह युक्रेन संस्थेच्या मदतीने नतालिया व महिलांच्या एका गटाने पोलंड, बेलारूस व रशियात ३,००० किमीचा खडतर प्रवास केला. त्यानंतर त्या आर्टेम आणि इतर १५ मुलांची सुटका करण्यासाठी पूर्व युक्रेन व क्रिमियाच्या रशियन-व्याप्त प्रदेशात गेल्या. त्यांना परतण्यासाठीही खूप लांबचा प्रवास करावा लागला. आंतरराष्ट्रीय गुन्हेगारी न्यायालयाने वॉरंट जारी केल्यानंतर रशियाच्या मानवाधिकार आयुक्त मारिया लोवावा यांनी सांगितले की, नातेवाईक येऊन आपल्या मुलांना घेऊन जाऊ शकतात. काही पालकांनी रशियन सैन्याच्या दबावाखाली आपल्या मुलांना क्रिमियाला पाठवले आहे. शिबिरात दोन आठवडे घालवल्यानंतर मुले परत येतील, असे त्यांना सांगण्यात आले, मात्र मुले परतली नाहीत. आर्टेमला रशियन सैनिकांनी गेल्या वर्षी ७ सप्टेंबरला कुपियान्स्क येथील शाळेतून पकडले होते. आई नतालियाने आर्टेमचा सर्वत्र शोध घेतला. आर्टेम तीन आठवडे घरी परतला नाही तेव्हा त्याला बेपत्ता मानले. मग आर्टेमचा फोन आला. त्याने सांगितले की, त्याला आणि त्याच्या शाळा सोबत्यांना पूर्व युक्रेनमधील पेरेव्हल्स्क या रशियन-व्याप्त शहरातील बोर्डिंग स्कूलमध्ये सोडले आहे. नतालिया यांनी सेव्ह युक्रेन ग्रुपशी संपर्क साधला. २०१४ मध्ये क्रिमियावर रशियाच्या आक्रमणानंतर मुले आणि त्यांच्या कुटुंबीयांना युद्धग्रस्त भागातून सुरक्षित ठिकाणी हलवण्यासाठी या गटाची स्थापना करण्यात आली होती. सेव्ह युक्रेन आणि मातांचे मुलांना वाचवण्याचे मिशन अत्यंत कठीण होते. अनेक सीमांवरील चौक्यांवर त्यांना कडक तपासणीतून जावे लागले. ते बेलारूसहून मॉस्कोला गेले. इमिग्रेशन अधिकाऱ्यांनी विमानतळावर त्यांची नऊ तास चौकशी केली. ते सर्व मॉस्कोपासून रस्त्याने १५०० किलोमीटर अंतरावर असलेल्या क्रिमियाला आले. मग संपूर्ण गट बेलारूस मार्गे युक्रेनला परतला. रशियन सैनिक मुलांना वाटेल तेव्हा शिक्षा करायचे. त्यांना रशियाचे राष्ट्रगीत म्हणावे लागत होते.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.