आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विचार:माणसाची पारख

अर्चना पाटील19 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

‘का य हो, एवढी काय साधी साडी नेसल्या? आज मीटिंग होती ना. चांगली कॉटनची साडी नेसायची होती की? पगार कमी वगैरे आहे की काय तुम्हाला?’ प्रांजलला तिच्या ऑफिसमधली सहकारी सहजच बोलून गेली. पण, या एका वाक्याने प्रांजलचा पूर्ण दिवसच खराब गेला. ‘हे काय ब्लाऊज घातलेस या साडीवर? मॅचिंगदेखील होत नाही. प्रत्येक साडीवर साडीतलच ब्लाऊज घातलं पाहिजे. तुझं पण रश्मीसारखंच दिसतंय. कोणत्याही साडीवर कोणतेही ब्लाऊज..’ नीता बोलून गेली आणि नेहा हसायला लागली. एका ट्रेनिंगमध्ये एक कर्मचारी रोज एकच ड्रेस घालून येत होता. त्यावेळी लेडीज ग्रुपमध्ये रोज त्याची खिल्ली उडवली जात होती. पण, खिल्ली उडवणाऱ्यांपैकी एकालाही त्या व्यक्तीच्या परिस्थितीचा विचार करावासा वाटला नाही. सतत व्यक्तीच्या कपड्यांवरून समोरच्याची पारख करणारे लोक आणि त्यांच्या बुद्धिमत्तेची कीव करावी वाटते. कोण्या श्रीमंताची बायको एकदा घातलेली चप्पल, सँडल परत पुन्हा घालत नाही, असं एका ठिकाणी वाचलं होतं. आता या श्रीमंत बाईचं अनुकरण सर्वसामान्य स्त्रियांना करावंसं वाटलं, तर घराचं दिवाळं निघायला वेळ लागणार नाही.

माणसातील गुण बाजूला सारून त्याचे कपडे आणि सौंदर्य या गोष्टी वरचढ झाल्या आहेत. गबाळं राहणीमान बुद्धिमत्तेला साथ देत नाही म्हणून उच्च राहणीमान स्वीकारलं पाहिजे, असं वाटणं स्वाभाविक असलं, तरी ते चुकीचं आहे हेदेखील तितकंच खरं. कोरोनाकाळात कपाटातल्या साड्या पाहून, कपडे पाहून आता या कपड्यांचं करायचं काय, असा प्रश्न कित्येकांना पडला. याचं कारण म्हणजे दोन ड्रेसवर कोरोनाचं दीड वर्ष कुठं निघून गेलं ते कळलंही नाही. तरीही आपले डोळे उघडलेले नाहीत. खरेदीवर वचक राहिला नाही. मुळात कपड्यांवरून कोणी कोणावर टीका करू नये. खिल्ली उडवू नये. कपडे ही माणसाचं बाह्यरूप ठरवणारी गोष्ट आहे. माणसाचं अंतरंग घडवणाऱ्या गोष्टी पाहिल्या पाहिजेत. आपल्यासमोर उभ्या असलेल्या माणसाचे शिक्षण, पद, कौटुंबिक संबंध, चालण्या-बोलण्याची पद्धत या गोष्टी पाहिल्या पाहिजेत. पण, आपण मात्र नेमके उलटेच करतो. अमुक एका माणसाने कोणते कपडे घातलेत, त्याच्याकडे कोणती फोर व्हीलर आहे, त्याचा मोबाइल किती हजारांचा आहे यावरून आपण त्याला पारखतो. पण, माणसाला पारखण्याची ही पद्धत घातक आहे, हे वेळीच समजलं पाहिजे. { संपर्क : archup412@gmail.com

बातम्या आणखी आहेत...