आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

फॅमिली गप्पा:सहल पाहावी करून!

अभिजीत पेंढारकर2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

स रकारनं एसटीच्या भाड्यात महिलांसाठी ५० टक्के सवलत जाहीर केल्यापासून मला कुठेतरी फिरायला जायचंच होतं. आता मायबाप सरकार आपल्यासाठी एवढं करत असेल, तर आपण त्याचा लाभ न घेणं हे सरकारच्या भावनांचा अपमान केल्यासारखंच आहे. छे छे! मान राखला गेला नाही तर सरकार कोसळण्यापर्यंत काहीही घडू शकतं आणि मी एसटीनं प्रवास न करण्यावरून कुठलं सरकार पडावं, असं मला वाटत नव्हतं. या एसटीच्या सवलतीवरून एक जुनी गोष्ट आठवली. पहिल्यांदा हनिमूनला गेले तेव्हा... सॉरी.. “पहिल्यांदा’ शब्दाची गरज नाही. हनिमूनला गेलो तेव्हा मी थोडीशी अडाणीच होते. मला फारसं काही कळत नव्हतं. मग यांनीच सांभाळून घेतलं. मला काय हवंय, नकोय बघत माझ्या मनाप्रमाणे सगळं निभावून नेलं. अगं बाई..! काय लिहून बसले मी हे? कुणी वाचलं तर भलताच अर्थ निघायचा.. मी एसटीच्या प्रवासाबद्दल लिहिलंय हे. एसटी प्रवासातलं मला काही कळत नव्हतं. म्हणजे कुठली एसटी कुठे जाते, किती वाजता सुटते, कुठे कुठे थांबते वगैरे वगैरे.. तर त्या प्रवासात यांनीच मला सांभाळून घेतलं. त्या प्रवासात “भाडं निम्मं असतं तर जास्तीत जास्त बायकांनी प्रवास केला असता,’ असं मी म्हणून गेले. सरकारनं त्याची एवढ्या वर्षांनी दखल घेतली. तर ते असो. आता सवलत जाहीर झाल्यावर “एसटी’नं जायचं माझं ठरलं असलं, तरी “एकटी’नं जायचं काही ठरत नव्हतं. म्हणजे हल्लीच्या काळात तशी वेळ आली नव्हती. बरोबर नेणार कुणाला? स्वातीची परीक्षा संपली, तरी ती एसटीनं माझ्याबरोबर येईल, अशी काही शक्यता नव्हती. रोहन तर सध्या आवाक्याबाहेरच गेलेला. उन्हाळी सुट्यांमध्ये त्याचे मित्र, त्याच्या मॅचेस, भटकंती आणि आणखी बरंच काही.. मग विचार आला, सोसायटीतल्या बायकांनाच विचारावं. त्याच संध्याकाळी महिला मंडळासमोर विषय काढला. एसटीनं जायचं. यावर पाच-सहा जणींचं दोन मिनिटांत एकमत झालं. मात्र, कुठं जायचं हे ठरवायला पुढचे दोन तास चर्चा (म्हणजे भांडणंच!) झाली. “आई, तू आठ दिवस मस्त कुठेतरी फिरून ये..’ - आमचे ज्येष्ठ चिरंजीव रोहन. “फॉरेन ट्रिपच कर ना!’ - धाकटी स्वाती. एसटी फॉरेनला जात असती तर कशाला हवं होतं? शेवटी हो-नाही करता करता दोन दिवसांची तीन जणींची ट्रिप नक्की झाली. फक्त दोन दिवस उरले होते. नेमकी एका संध्याकाळी यांनी खालूनच हाक मारली. म्हणाले, ‘लवकर ये..’ मी गेले आणि बघितलं तर सोसायटीच्या आवारात एक नवी कोरी, चकचकीत कार उभी होती. वाढदिवसाचं गिफ्ट म्हणून यांनी नवीन कार आणली की काय, असं एकदा वाटून गेलं. पण, अशी सरप्राइज मिळायला आपण काही कुणी राजकन्या नव्हे, हेही पटकन आठवलं. यांनी नवीन नव्हे, आमची जुनीच कार नव्यासारखी करून आणली होती. आतून-बाहेरून एकदम चकाचक! आता गाडी नव्यासारखी झालीय तर फिरायला जाऊया, असं म्हणाले. सोसायटीतल्या दोन मैत्रिणींबरोबरचा बेत बारगळतो की काय, असं वाटायला लागलं. पण, नेमकं त्यांचंही येणं रद्दच झालं होतं, असं त्याच दिवशी समजलं. तरीही मी हट्ट सोडला नाही. एसटीनं जायचं ठरवलं होतं, त्याप्रमाणे दुसरीकडे कुठे नाही, तर माहेरी गेले आणि यांना दोन दिवसांनी कार घेऊन तिकडे बोलावून घेतलं. दोन्ही गोष्टी साध्य झाल्या आणि मी स्वतःच्या हुशारीवर खुश झाले! {संपर्क : ९८८१०९८०७०