आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करागुजरातेतील निवडणूक प्रचाराच्या सुरुवातीच्या काळात आम आदमी पक्षाने आपले अस्तित्व दाखवायला सुरुवात केली होती, तेव्हा मी भाकीत केले होते की, भाजप निवडणुकीत दणदणीत विजयाकडे वाटचाल करत आहे आणि कदाचित त्याचा राज्यातील सर्वात मोठा विजय असेल. लोकांच्या मनात भाजपबद्दल अतोनात आत्मीयता होती किंवा गेल्या पाच वर्षांत भाजपच्या सरकारने केलेल्या कामांवर ते खुश होते असे नाही. याचे कारण आम आदमी पक्षासोबत तिरंगी लढत होऊन भाजपविरोधी मतांमध्ये फूट पडली. पण, भाजपविरोधी मतांच्या विभाजनाचा भाजपला किरकोळ फायदा झाला आहे, त्याच्या एकतर्फी विजयाची अनेक कारणे आहेत, हे निवडणूक निकालावरून दिसून येत आहे. ती म्हणजे मोदी फॅक्टर, गुजराती अस्मितेचा मुद्दा, सरकारच्या कामाबद्दल समाधान आणि चांगल्या पर्यायाचा अभाव. गुजरातमध्ये भाजपचा विजय झालाच असता, पण त्यांच्या या विजयात सर्वात मोठा वाटा नरेंद्र मोदींचा आहे. या राज्याच्या निवडणुका असल्या, तरी पंतप्रधान मोदींनी भाजपच्या निवडणूक प्रचाराची धुरा वाहिली. त्यांनी चार डझनहून अधिक सभांना संबोधित केले आणि सुमारे १०० किलोमीटरचे रोड शो केले. इतकेच नाही, तर गेल्या सहा महिन्यांत त्यांनी अनेक वेळा त्यांच्या गृहराज्याला भेट दिली होती. उत्तर प्रदेशच्या विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतरच त्याची सुरुवात झाली. पंतप्रधान हे अतिशय लोकप्रिय राजकारणी असून त्यांना गुजरातचा गौरव मानले जाते. मोदींना हे माहीत आहे आणि त्याचा फायदा त्यांनी गुजरात निवडणुकीत घेतला. काँग्रेसच्या नेत्यांनी त्यांच्यावर वैयक्तिक हल्लेही केले. यापूर्वीही काँग्रेस नेत्यांनी आपला अपमान केला होता, याची आठवण त्यांनी गुजरातच्या मतदारांना करून दिली. या बहाण्याने त्यांनी मतदारांच्या गुजराती अस्मितेला साद घातली आणि त्यांनी भाजपला मोठ्या प्रमाणात मतदान केले. गुजरातमध्ये २७ वर्षांपासून भाजपची सत्ता आहे, त्यामुळे राज्यात त्याच्या विरोधात अँटी इन्कम्बन्सी असेल, असे तुम्हाला वाटले असेल. पण, वास्तवात असे काहीही दिसले नाही. अँटी इन्कम्बन्सी किंवा प्रो-इन्कम्बन्सी दिसली नाही. २०१७ च्या निवडणुकीच्या तुलनेत मतदानाचे प्रमाणही कमी होते. भाजप सरकारच्या कामगिरीबद्दल मतदारांच्या मनात संमिश्र भावना असल्यामुळेच कदाचित असे घडले असावे. महागाई, बेरोजगारी आणि भ्रष्टाचारामुळे लोक चिंतेत असताना सरकारने केलेल्या कामांबाबत सर्वसामान्यांचा दृष्टिकोन सकारात्मक होता. गुजरातींच्या एका मोठ्या वर्गाचे मत होते की, सुशासनात सरकारची एकूण कामगिरी चांगली आहे. पिण्याचे पाणी, रस्ते, वीजपुरवठा, सरकारी शाळा, रुग्णालयांची स्थिती गेल्या पाच वर्षांत सुधारल्याचे मतदारांनी मान्य केले. राज्य सरकारच्या तुलनेत केंद्र सरकारची कामगिरी आणखी चांगली मानली गेली. भाजपच्या डबल इंजिन सरकारच्या सिद्धांताला जनतेने पूर्ण पाठिंबा दिला. इतर राज्यांमध्येही हा सिद्धांत भाजपसाठी प्रभावी ठरत आहे. सुशासनासाठी चांगले रेटिंग मिळाल्याने भाजपचे पारंपरिक मतदारही टिकले आणि २०१७ च्या निवडणुकीत नाराज झालेल्या पाटीदारांची मतेही या वेळी मिळवण्यात यश आले. त्या वेळी हार्दिक पटेल यांच्या नेतृत्वाखाली पाटीदार सरकारविरोधात निदर्शने करत होते. मात्र, निवडणुकीच्या काही महिन्यांपूर्वी हार्दिक पटेल यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आणि जोरदार प्रचार केला. यासह भाजपची मते २०१७ मधील ४८ टक्क्यांवरून २०२२ मध्ये ५३ टक्क्यांवर आली आहेत. दुसरीकडे आम आदमी पक्ष अपेक्षेप्रमाणे कामगिरी करू शकला नाही, परंतु त्याने प्रभाव मात्र निश्चितच पाडला. हिमाचलमध्ये काँग्रेस जिंकली असली तरी तिने गुजरातमध्ये काळजी करायला हवी. दुसरीकडे भाजपनेही आम आदमी पार्टीकडे दुर्लक्ष करू नये. आज नाही तरी २०२७ च्या निवडणुकीत ती भाजपला आव्हान देण्याच्या स्थितीत नक्कीच येऊ शकते. (ही लेखकाची वैयक्तिक मते आहेत.)
संजय कुमार प्राध्यापक, राजकीय भाष्यकार sanjay@csds.in
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.