आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराभारतीय इतिहासात एकोणिसावे शतक स्त्री सुधारणेचे शतक म्हणून ओळखले जाते. महिलांच्या संदर्भातील विविध सामाजिक कुप्रथांना विरोध करून, त्याविरोधी जनजागृती करत कायदेनिर्मितीचे प्रयत्न सामाजिक सुधारकांकडून केले गेले. परिणामी एकोणिसाव्या शतकात स्त्री शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवली गेली. या सर्व सामाजिक सुधारणा हाती घेण्याचे एक प्रमुख कारण म्हणजे, आधुनिक, शिक्षित व्हिक्टोरियन स्त्रीचा दाखला देत ब्रिटिशांकडून तत्कालीन समाजातील स्त्रियांच्या मागास स्थितीच्या आधारे भारतीय पुरुष कसे मागास, असंस्कृत आणि रानटी आहेत, हे अधोरेखित केले गेले. या मागास समाजाला सुधारणे, त्यांना सुसंस्कृत करणे यासाठी देवानेच आमच्या खांद्यावर हे ओझे टाकले आहे, भारतावरील आमचे राज्य हे भारतीयांच्या हिताचे आहे, असा वासाहतिक वर्चस्वाचा उफराटा सैद्धांतिक तर्क ब्रिटिशांकडून मांडला गेला. मागास व रानटीपणाच्या वर्मी टीकेमुळे भारतातील उच्चशिक्षित तरुण पुरुषवर्गाला समाजसुधारणा आणि विशेषत: स्त्री सुधारणेचा मुद्दा हाती घेणे अपरिहार्य होते. उच्चशिक्षित नोकरदार वर्गाला समारंभामध्ये ब्रिटिश अधिकाऱ्यांच्या बायकांसमोर आपल्या अल्पवयीन, अशिक्षित बायकांची ओळख करून देताना संकोच वाटे. त्यामुळे स्त्रियांना शिक्षित केले तर त्या अधिक चांगल्या पद्धतीने मुलांवर संस्कार करू शकतील, कुटुंब सांभाळू शकतील, पतीसोबत अनुरूप सहचारिणीप्रमाणे संवाद साधू शकतील, व्यवहार करू शकतील, असे मानले गेले. स्त्रियांना कोणत्या प्रकारचे शिक्षण द्यायचे, या मुद्द्यावर अनेक समाजसुधारकांनी, स्त्री-पुरुषांना एकसारखे शिक्षण देण्याएवजी स्त्रियांच्या कुटुंब आणि बाल संगोपनाच्या जैविक कार्याला उपयुक्त शिक्षण, त्यांना देण्यात यावे, असे मत मांडले. अशाप्रकारे कुटुंब आणि राष्ट्रघडणीत उपयुक्त आदर्श माता व आदर्श सहचारिणी घडवण्याच्या मुशीत भारतीय स्त्री सुधारणा चळवळीचा प्रारंभ दिसतो.
महात्मा फुलेंनी १८४८ मध्ये स्त्रियांसाठीची पहिली शाळा सुरू करून आधुनिक विवेकी, ज्ञानी, चिकित्सक भारतीय स्त्रीत्वाचे बीज रोवले. स्वातंत्र्यप्राप्तीनंतर भारतीय राज्यघटनत नमूद कायदेशीर समानता व आता ब्रिटिशांचे राज्य जावून भारतीयांचेच राज्य आल्यामुळे समानता प्रस्थापित होईल आणि सर्वांना समान पद्धतीने स्वातंत्र्याची फळे चाखायला मिळतील, हा आशावाद बळकट होता. परिणामी स्वातंत्र्याच्या सुरूवातीच्या वर्षांमध्ये स्त्री चळवळीचा संघर्ष शिथिल झालेला दिसतो. मात्र, १९६० च्या दशकात स्वातंत्र्यासमयीचा आशावाद फोल ठरून सर्वत्र एक असंतोष आणि संघर्ष पेटलेला दिसतो. १९७४ मध्ये प्रकाशित “समानतेच्या दिशेने’ या अहवालानेही स्वातंत्र्यासमयीच्या वरील उद्दिष्ट आणि आशावादाला फोल ठरवले. कारण समानतेच्या दिशेने या अहवालात शिक्षण, राजकारण, रोजगार, प्रशासन, प्रसारमाध्यमे अशा सर्व क्षेत्रांतील स्त्रियांचा अभ्यास करून सप्रमाण दाखवून दिले, की सर्व क्षेत्रांतील स्त्रियांचे प्रमाण घटत असून, स्त्रियांवरील हिंसाचार, हुंडाबळी यात सातत्याने मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे आणि म्हणून खऱ्या अर्थाने स्त्रियांची समाजातील स्थिती जाणून घेण्यासाठी स्त्रियांसंबंधीचे अभ्यास झाले पाहिजेत, माहिती पुढे आली पाहिजे आणि त्यासाठी महाविद्यालये व विद्यापीठ स्तरावर स्त्री अभ्यास केंद्रांची स्थापना केली पाहिजे, अशी शिफारस या अहवालात करण्यात आली. तत्कालीन सक्रिय असणाऱ्या स्त्री कार्यकर्त्यांचा सहभाग स्त्री अभ्यास केंद्रांमध्ये होता. तसेच स्त्री चळवळ ज्या प्रश्नांना घेऊन लढा उभा करत होती, त्यांंचा अभ्यास करून उपयुक्त संदर्भीय माहिती आणि संशोधन करण्याचे कार्य स्त्री अभ्यासक करत होते. त्यामुळेच स्त्री अभ्यासाला महिला चळवळीचे अकादमिक अंग मानले जाते. सुरूवातीच्या टप्प्यावर उच्च शिक्षणात संशोधन हे प्रमुख उद्दिष्ट मानून स्थापन झालेल्या स्त्री अभ्यास या विषयाने पुढे संशोधन, अध्यापन, वाचनसाहित्य निर्मिती, विस्तारकार्य या क्षेत्रात मूलभूत योगदान दिले. स्त्री अभ्यास विषयाचे वैशिष्ट्य म्हणजे हा अभ्यास समाजातील स्त्री-पुरुष विषमता आणि स्त्रियांचे दुय्यमत्व यांची व्यवस्थात्मक चिकित्सा करतो. अकादमिक आणि संशोधनाच्या क्षेत्रामध्ये स्त्रियांच्या अनुभव तसेच योगदानाला नेहमीच अदृश्य व दुर्लक्षित ठेवण्यात आलेे आहे. स्त्रियांच्या ज्ञानाच्या क्षेत्रातील वगळलेपणाला अधोरेखित करून ज्ञानाच्या क्षेत्राला समावेशक बनवण्यासाठी लिंगभावी दृष्टिकोनातून ज्ञानाच्या क्षेत्राची पुनर्रचना करण्याचे आणि आंतरज्ञानशाखीयतेच्या संकल्पनेची मांडणी करून ज्ञान आणि स्त्रीप्रश्नाचे आंतरछेदीय स्वरूप उकलण्याचे कार्यही स्त्री अभ्यास करतो आहे.
आज ‘मधुरिमा’च्या फोर्थ डायमेन्शन सदरातील संपन्नतेचे शब्द लिहिताना स्त्री शिक्षण ते स्त्री अभ्यास हा पट डोळ्यांसमोर उभा राहण्याचे कारण एकीकडे वर्षानुवर्षाच्या गुलामीला या काळात तडे देऊन मुक्तीची, अभिमानाची नवीन वाट आखली गेली, तर एकविसाव्या शतकात स्त्रियांनी शिक्षण आणि प्रगतीचा विस्मयकारक आलेख गाठलेला दिसतो. मात्र, याचा अर्थ आज समाजातील स्त्री प्रश्नांनी गुणात्मक कूस बदलली आहे, असे नाही. एकोणिसाव्या शतकातील बहुतांश प्रश्न आजही “आ’ वासून उभे आहेत. सोबतीला जागतिकीकरण आणि जातीय पितृसत्ताक व्यवस्था स्त्रीचे ओंगळ भांडवली वस्तुकरण वेगाने करताना दिसते आहे. बुद्ध, आनंद, बौद्ध थेरी, सीता, द्रौपदी, गार्गी-मैत्रेयी, मध्ययुगीन स्त्री संत ते एकोणिसाव्या शतकात सुरू झालेली परिवर्तन आणि बदलाची आधुनिक स्त्री-मुक्तीची मोहीम पारंपरिकतेच्या गर्तेत अडकून अवरूद्ध होण्याच्या सदर कारणांचा उहापोह करण्याचा प्रयत्न वर्षभर चाललेल्या या लेखमालेतून केला गेला. स्त्रीवादी ऑड्रे लुर्द यांच्या म्हणण्याप्रमाणे, मालकाच्याच हत्याराने मालकाच्याच घराचा पाडाव करता येत नाही, त्यासाठी नवे विचार, नव्या वाटा, नव्या पद्धती, नव्या परंपरा, नवा वारसा, नवा इतिहास निर्माण करत राहावे लागते. या नव्या वाटा दर्शवण्याचे काम स्त्री अभ्यास, परिवर्तनाच्या चळवळी आणि चिकित्सक परिदृष्टी करत असतात. म्हणून त्या बळकट आणि सार्वत्रिक होत राहणे क्रमप्राप्त ठरते. याच हेतूने गतिमान ठेवलेल्या या लेखमालेतील चिंतनाला आपण जैविक मानले, या आनंदअभिलाषेतील विरामपूर्ती...
संपर्क : nirmalajadhav@gmail.com
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.