आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लघुकथा:एक ठसठसणारी खोल जखम

औरंगाबाद24 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

शून्यात नजर हरवून बसलेली ती. भयाण एकटेपणाची जाणीव जीवघेणी होती. कसे होते अन् काय झाले? आपण एवढे मूर्ख कसे काय निघालो? ज्या आयुष्याच्या जोडीदारावर देवापेक्षाही जास्त विश्वास ठेवला त्यानेच असा जीवघेणा वार वर्मी करावा? प्रश्न अन् प्रश्न. डोके भणभणून जात होते.

आयुष्याची संध्याकाळ जवळ आलेली. अपूर्ण राहिलेली स्वप्ने, इच्छा जोडीदारासमवेत पूर्ण करायची कामना इतर सर्वांसारखी तिचीही होती. जगाला अन् तिलाही वाटत होते की किती मायाळू व काळजी करणारा नवरा आपल्याला मिळाला आहे. कारण त्याचे वागणेही तसेच प्रेमळ व काळजी घेणारे होते. संसार म्हटला की नवरा-बायकोची भांडणे ही होणारच. तशी त्यांचीही भरपूर व्हायची. पण याचे एवढे भांडवल नवरा करेल, तेही तिच्या चोरीछिपे हे तिच्या गावीही नव्हते. चांगला संसार चालला होता त्यांचा. मुलगी लग्न होऊन परदेशात स्थिरावलेली. मुलगा न्यायव्यवस्थेत स्थिरावू लागलेला. पण आईबद्दल त्याला कधी ओढ, काळजी वाटली नाही. सारखा दातात धरायचा आईला. हा असा का वागतो? याबद्दल ती अनेकदा विचार करत असे. या प्रश्नाचे उत्तर पण तिला आता मिळाले. बापानेच आईबद्दल भरपूर विष त्याच्या मनात भरवलेले. त्यानेही बापाच्या हातात सगळा घरचा-दारचा कारभार आहे म्हणून सोयीस्कररीत्या ते स्वीकारलेले. कारण आता दोघे मिळून सर्व व्यवहार बघत होते.

ज्या वयात वानप्रस्थाकडे वाटचाल करायची, नातवंडाबरोबर रमायचे त्या वयात तिचा जोडीदार एका ओळखीच्या बाईत गुंतला आहे हे तिला समजले. पायाखालची जमीन सरकणे म्हणजे काय याचा अनुभव तिला आला. एवढेच नाही तर गेली सोळा वर्षांपासून त्यांचे संबंध असल्याचा पुरावा तिला मिळाला. पार पार कोलमडून गेली ती. सगळे भावविश्व उद्ध्वस्त होऊन गेले तिचे. सांगणार तरी कोणाला? या वयात माहेर तरी कुठे असते? साता समुद्रापारची लेक धीर देण्याशिवाय काही करू शकत नव्हती. नवऱ्याला तिने जाब विचारला, पण त्याने सगळी उडवाउडवीची उत्तरे दिली.

निदान अशा प्रसंगात तरी मुलगा आईची बाजू घेईल असे तिला वाटत होते. तिला त्या दिवशीचा प्रसंग आठवला. मोठ्या आशेने तिने मुलाला नवऱ्याच्या बाहेरख्यालीपणाबद्दल सांगितले. त्या बाईवर उधळलेल्या पैशांबद्दल सांगितले, वस्तुस्थितीची कल्पना दिली. तसा हात उगारत मुलगा हिच्याच अंगावर रागाने धावून आला. “काय पुरावा आहे तुझ्याकडे बाबांनी त्या बाईवर पैसे उधळल्याचा?’ त्याने जोरात विचारले. अनैतिक संबंधातील व्यवहारात कुणी पुरावे ठेवते का? हा तिचा प्रश्न तिने विचारायच्या आधीच मुलगा लगेच म्हणाला “ए बाई, आधी पुरावा दाखव मग बोल.’ हे शब्द तिच्या कानात तप्त रसासारखे शिरले. आईची ती बाई झाली होती. नवऱ्यापाठोपाठ पोटाच्या लेकानेही जिव्हारी लागणारा घाव देऊन तिच्या मनावर आणखी एक खोल जखम केली होती. वकील झालेल्या मुलानं अविश्वास दाखवत आईलाच आरोपीच्या पिंजऱ्यात उभं केलं होतं...

डॉ. छाया कुलकर्णी संपर्क : 9011832109

बातम्या आणखी आहेत...