आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आठवणींच्या गावा:सुखद आठवणींचा अनमोल खजिना...

प्रसाद साडेकर5 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

बालपणीच्या आठवणींनी मन सुखावून जाते, मन अलगद ५०/५५ वर्ष मागे जाते. आमच्या लहानपणी एक वही गृहपाठ आणि एक वही वर्गपाठाची असे. मोठ्या बहिणीचे किंवा भावाचे पुस्तक आपण पुढच्या वर्गात गेलो की, वापरण्यात काहीच गैर वाटत नसे. घरामध्ये तीन-चार सख्खी-चुलत भावंडं असायची. एका कपड्याच्या ताग्यात, एकाच रंगात सगळ्या भावडांचे कपडे होत असत. वर्षातून केवळ दोनदाच, एक वाढदिवसाला आणि दुसरा दिवाळीला असे नवीन कपडे मिळायचे. आतासारखा सहज पैसा दिसत नसे, पण त्याची कोणाला चिंता नसे. कोणी पाहुणे आले आणि घरात साखर संपली असली, तरी शेजारून पुन्हा परतीच्या बोलीने मागण्यात काहीच गैर वाटत नसे. वाड्यात रेडिओ दोन जणांकडेच होता. बुधवारी रात्री आठ वाजता धडपडत त्यांच्या घरी जाऊन बिनाका गीतमाला ऐकत होतो. मराठी शाळेतच सगळे जात होतो. श्रीमंतांचीच मुलं फक्त कॉन्व्हेन्टमध्ये जात असत. मला वाढदिवसाला अॅल्युमिनियमची शाळेची छोटी पेटी मिळाली होती तर आनंद गगनात मावला नव्हता. माझा एक मित्र होता. तो त्या काळतील श्रीमंत माणूस होता. तो फ्रिजबद्दल सांगत असे.. दूध ठेवले की आईस्क्रीम होते, अंडे आठ दिवस राहतात, भाज्या पाच- सहा दिवस खराब होत नाहीत, तेव्हा माझे डोळे आश्चर्याने विस्फारत. मी त्या उघडलेल्या फ्रिजकडे पाहत असे आणि मनात ठरवत असे, की मी पण एक दिवस फ्रीज घेऊन आईला रोज वेगवेगळे आईसक्रीम करायला सांगत जाईन. हळूहळू काळ बदलला, काळ्या रंगाचा फोन घरी आला. नोकरी लागली. १५० रुपये महिना. मग ब्लॅक अँड व्हाईट टी. व्ही. आला. कालांतराने हप्त्यावर गोष्टी मिळू लागल्या, अनेकांना अवैधरीत्या पैसा कमावण्याची सवय लागली. संगणक आले, महागडे मोबाइल आले. फेसबुक, इन्स्टाग्राम, व्हॉट्स ॲप, शेकडों चॅनल्स आले. तुम्ही कसे राहा, काय खा, काय प्या, तुमच्या आरोग्याला हेच छान आहे, असे सल्ले टेलिव्हिजनवर सकाळपासून तुम्हाला सलमान, रविना टंडन सारखी मंडळी द्यायला लागली. हा खूप छान बदल झाला. पण, माणसांमधली माणुसकी जपणारी माणसे लुप्त झाली. जाती-जातीमध्ये दुरावा निर्माण झाला, भिंती निर्माण केल्या गेल्या, तिरस्कार तर दारूगोळ्यासारखा भरलाय. सायकली गेल्या लुना आली, मोटरसायकलची जागा कारने घेतली. आर्थिक परिस्थितीने बाळसे धरले, आपलेपणा शून्य झाला. माझ्याकडे पैसा आहे, मला कोणाची गरज नाही ही भावना बळावू लागली. पूर्वीच्या खटल्याच्या घरांच्या जागी आता एक मुलगा किंवा मुलगी, आई-वडील असे त्रिकोणी कुटुंब झाले. हीच जर सुखाची कल्पना असेल तर नको हे सगळं, आम्हाला आमचे आई-बाबा, काका-काकू, मामा-मामी, बहिणी, परत दे परमेश्वरा. नको आम्हाला हे सुख...

बातम्या आणखी आहेत...