आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चीनचे अंतरंग:अंतर्गत असंतोषाचं घोंघावणारं वादळ...

औरंगाबादएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

गेले २-३ महिने आपण चीनच्या कलासंस्कृतीच्या अंतरंगावर लक्ष केंद्रित करून आहोत. त्यामुळे सध्या चीनमधे काय घडतंय, हे थोडंसं मागेच पडलं आहे. गेल्या २-३ महिन्यांत चीनमधे खूप काही घडून गेले आहे. राजकीय सामाजिक आणि भौगोलिक क्षेत्रात बऱ्याच घडामोडी घडल्या आहेत. आज चीनला, शिनचियांगमधील चीनच्या कथित मानवाधिकार उल्लंघनाबाबत पाश्चात्त्य सरकारांसोबतचा तणाव, हाँगकाँगमधील नागरी समाजावरील कारवाई आणि थायवानच्या सीमेवर केलेलं मिलिटरी शक्तिप्रदर्शन, त्याच्या जोडीला देशांतर्गत आर्थिक मंदीपासून जागतिक प्रतिष्ठेत लक्षणीय घट येण्यापर्यंत, अशा अनेक आव्हानांचा सामना करावा लागत आहे.

२०२२ च्या ऑक्टोबरमध्ये चिनी कम्युनिस्ट पक्षाची (CCP) विसावी राष्ट्रीय पक्ष काँग्रेस नियोजित आहे. चिनी राजकारणातील, सर्वात वरच्या फळीला यामुळे धक्का बसण्याची शक्यता आहे. या वर्षी सर्वोच्च नेतृत्वाच्या संस्थात्मक संक्रमणासाठी, दोन टोकाच्या परिस्थिती आहेत : एक तर शी जिन-पिंग तिसऱ्या मुदतीसाठी परत निवडून येतील, (२०१८ साली त्यांनी; ते हयात असे तोपर्यंत तेच चीनचे आणि पक्षाचे सर्वोच्च पद भूषवतील, अशी सोय करून ठेवली आहे), किंवा अंतर्गत CCP गटांतली काही सर्वोच्च मंडळी, त्याआधी त्यांची राजकीय शक्ती कमी करण्याचा प्रयत्न करून त्यांना काढून टाकतील, ही संभावना पण नाकारता येत नाही. चीन मधील लोकांमधे आणि CCP पक्षाच्या अंतर्गत वर्तुळात पण शी चिन-प्फिंगविरोधी वादळ तयार होत आहे. त्यांच्या अनेक धोरणांविषयी, मुख्यतः “zero-covid” धोरण आणि चीनची आर्थिक परिस्थिती याविषयी लोकांच्या मनात असंतोष आणि नाराजी आहे. शी जिन-पिंगना बहुधा याचा अंदाज असावा, त्यामुळे ते आपली फळी नाना तऱ्हेने बळकट करण्याचा प्रयत्न करत आहेत. राष्ट्रवाद हे मुख्य हत्यार त्यांनी वापरायला सुरुवात केली आहे. नुकतीच त्यांनी हाँगकाँगला दिलेली भेट, थायवानच्या विरोधात केलेले शक्तिप्रदर्शन, आफ्रिका आणि श्रीलंकेच्या किनाऱ्यांवर तैनात ठेवलेला नौसेनेचा ताफा आणि आर्थिक सुधारणा, ज्या सामान्य माणसाला कशा पोषक आहेत हे पटवून देण्याचे काम, अशा अनेक गोष्टींनी ते आपली बाजू मजबूत करायचा प्रयत्न करत आहेत. राष्ट्रीय कायापालटाचा एक भाग म्हणून नुकतेच त्यांनी, कम्युनिस्ट पक्षाला हाँगकाँग, मकाओ आणि थायवानमधील लोकांची मने आणि हृदय जिंकण्याचे आवाहन केले आहे. शी ह्यांना देशात आणि परदेशातही स्वतःसाठी पाठिंबा गोळा करायचा आहे, ज्यायोगे त्यांचा पुढचा राजकीय प्रवास सोयीस्कर होऊ शकेल. तसा पाहायचं झाला, तर थायवान हा चीनचा भाग असा कधीच नव्हता. चहुबाजूंनी समुद्राने वेढलेल्या या सुंदर बेटावर प्रामुख्याने, तिथल्या आदिवासी आणि आजूबाजूच्या समुद्रावर हुकूमत गाजवणाऱ्या समुद्री डाकूंची वस्ती असे. पुढे पोर्तुगीज आणि डचांनी त्यावर राज्य केले. दक्षिण चीनमधल्या फु-चियेन भागातल्या च्छिंग राजवटीने इथे काही काळ राज्य केले आणि नंतर हा प्रदेश जपान्यांच्या हातात गेला. १९४०-४५ दरम्यान चीनमधील कुओ-मिन-तांग पक्षाला जेव्हा चीनमधून हाकलले गेले, तेव्हा त्यांनी या बेटावर आसरा घेतला आणि राज्य सुरू केले. १९५० सालानंतरसुद्धा चीनने कधीच या बेटावर शासन केले नाही, त्यामुळे इथे एक स्वतंत्र स्वशासित लोकशाही राज्य तयार झाले. परंतु आता मात्र चिनी राज्यकर्त्यांना राष्ट्रवादाची हुक्की आली आणि थायवान चीनचाच एकभाग आहे, असे धोरण त्यांनी अवलंबिले आहे.

हाँगकाँग आणि मकाओवर ब्रिटिशांनी राज्य केले. १९९७ साली हाँगकाँग आणि मकाओ, एक देश दोन व्यवस्था, या तत्त्वावर, चीनची अधिकृत राज्ये झाली. तीन वर्षांपूर्वी चीनने हाँगकाँगमध्ये आपली धोरणे आणि शासन लागू करायचा प्रयत्न केला. हाँगकाँगच्या रहिवाशांनी त्याच्या विरोधात मोठ्या प्रमाणवर लोकशाही समर्थक निदर्शने केली, जी चीनने हाणून पाडली आणि अनेकांना जेलमध्ये डांबले. आणि अशातच तिथे निवडणुका घेतल्या, ज्यात प्रति-लोकशाही लोकांना तुरुंगात तरी टाकले गेले. एकूणच, चीन आणि विशेष म्हणजे शी जिन-पिंग यांच्याविषयी लोकांच्या मनात विखार आहे. म्हणूनच राष्ट्रवादाची जोड देऊन, आपली बाजू सशक्त करण्याच्या प्रयत्नात शी जिन-पिंग आहेत. त्यांचे म्हणणे, परदेशात राहणाऱ्या चिनी लोकांची मने जिंकणे पण गरजेचे आहे. देशांतर्गत सामान्यता आणि विविधता यांच्यातील योग्य संतुलन साधा आणि हाँगकाँग, मकाओ आणि थायवान तसेच परदेशी चिनी लोकांची मने आणि हृदय जिंका, असे आवाहन ते करतात. हा राष्ट्रवाद त्यांच्या उपयोगी येतो किंवा नाही, हे ऑक्टोबरमध्ये होणाऱ्या चिनी कम्युनिस्ट पक्षाच्या (CCP) नियोजित विसाव्या राष्ट्रीय पक्ष काँग्रेसमधेच कळेल.

सुवर्णा साधू संपर्क : suvarna_sadhu@yahoo.com

बातम्या आणखी आहेत...