आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मधुरिमा विशेष:आश्वासक अन् उमेद देणारा रॅम्पवॉक...

औरंगाबाद2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

एका आगळ्या वेगळ्या रॅम्पवॉकविषयी नुकतंच वाचण्यात आलं. झारखंडची राजधानी रांची इथे झालेल्या या अनोख्या रॅम्पवॉकमध्ये मॉडेल अलिशा ओराव हिने आपल्या तान्हुल्याला कडेवर घेऊन रॅम्पवॉक केला. हा व्हिडिओ पाहून माझ्या मनात मात्र विचारांचं काहूर माजलंय. असंख्य प्रश्नांनी मला भंडावून सोडलंय. २१ व्या शतकात स्त्रियांनी पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून प्रत्येक क्षेत्रात विजय पताका रोवलीय, अशी कितीतरी विधान जाता येता सहजच ऐकायला मिळतात. पण खरंच ‘चूल आणि मूल’ या जबाबदारीतून स्त्रियांची सुटका झालीय का? आपल्या आवडत्या क्षेत्रात काम करताना ती मुक्तपणे वावरतीय का? वावरू शकतेय का? अनेकींना आवडत्या क्षेत्रात काम करण्याची संधी मिळाली तर “घर की करिअर’? असा यक्ष प्रश्न जेव्हा तिच्यासमोर उभा राहतो तेव्हा किती जणी खंबीरपणे करिअरचा पर्याय निवडतात. खरंच किती जणींना करिअर करताना घरातून सकारात्मक पाठिंबा मिळतो? सगळ्यात महत्त्वाचा आणि कळीचा प्रश्न म्हणजे आपल्यापैकी मुळात किती जणींना आपलं करिअर हे घरापेक्षा, घरातल्या जबाबदाऱ्यांपेक्षा महत्त्वाचं वाटतं?

करिअर की घर यापैकी तुम्ही कोणता पर्याय निवडणार असं महिलांना विचारलं तर आपल्यापैकी सगळ्याच जणी डोळे झाकून घर, घरच्या जबाबदाऱ्या हाच पर्याय निवडणार या शंका नाही किंवा असं क्षेत्र निवडणार जिथे दोन्हींचा मेळ घालणं आपल्याला शक्य होईल. आता तुम्ही सांगा जिथे महिलांनाच त्यांचं करिअर दुय्यम वाटत असेल तिथे इतरांनी तिच्या सुखाचा, आनदंाचा, स्वप्नांचा विचार करावा अशी अपेक्षा करणं कितपत योग्य आहे. सासरच्या सर्व कौटुंबिक जबाबदारीचे ओझे एकटा त्या स्त्रीच्या खांद्यावर लादण्यात केवळ तिच्या सासरचे लोक जबाबदार असतात असं नाही तर माहेरच्यांचा, तिच्या आई-वडिलांचा, इतर नातवेाईकांचा देखील तितकाच महत्त्वाचा हात यात आहे. मुलीच्या जन्मापासनूच तिला केवळ कौटुंबिक जबाबदाऱ्या ठामपणे पार पाडण्यासाठी तयार केले जाते. तिच्या मनावर हेच बिंबवलं जातं की, तू बाहेर कितीही झेंडे लावलेस तरी घरी आल्यानंतर मात्र घरातल्या सगळ्यांची काळजी घेणे, त्यांना हवं नको बघणे, पाहुणे रावळ्यांची उस्तवार करणे, ही तुझीच जबाबदारी आहे आणि यात अलीकडच्या काळात मोलाचा वाटा निभावत आहेत ती म्हणजे प्रसारमाध्यमं, चित्रपट, मालिका, जाहिरातींमध्ये स्त्रियांवर होणाऱ्या अन्यायाचं उदात्तीकरण केल्या जाते. मुलगा कसाही वागत असला तरी घरातील सून मात्र गरीब गाय, सगळे अन्याय अगदी मुकाट्याने सहन करणारी, हसतमुख, आनंदाने अगदी मोलकरणीचा सुद्धा कौतुक करणारी असते. त्यामुळे पाहणाऱ्यांच्याही अपेक्षा वाढतात. आपल्या सूनेनेही सगळ्या गोष्टी अगदी हसतमुख राहून कराव्यात, असे वाटते. अहो पण त्या नायिकेला असे सगळे खोटे खोटे करण्यासाठी लाखो रुपये िमळतात तुम्ही तुमच्या सुनेला कधी कौतुकाचे चार शब्द तरी ऐकवता का? आज तुला महत्त्वाची मिटींग आहे, प्रेझेंटेशन आहे ना तुझं? तू जा असं म्हणणारे लाइफ पार्टनर किती आहेत समाजात? अगदी नगण्यचं. अशा सगळ्या वातावरणात जेव्हा ती सगळ्या आघाड्यांवर लढा देते आणि यशाचं एक एक शिखर पादक्रांत करत जाते तेव्हा उर्वरित. पान ४

तिच्या यशाला किनार असते ती, तिच्या दु:खाची, सल असतो तो तिला घरातून मिळणाऱ्या वागणुकीचा, यश मिळवण्यासाठी तिने प्रत्येक टप्प्यावर दिलेल्या अग्निपरीक्षेचा आणि तिच्याच कुटुंबातील सदस्यांनी तिला केलेल्या भावनिक ब्लॅकमेलिंगचा...

पण हेही तितकंच खरं आहे की प्रवाह विरुद्ध पोहून जेव्हा आपण पैलतीर गाठतो तेव्हाचा तो आनंद म्हणजे अवर्णनीय असतो. अलिशा ओराव या मॉडेल आईने बाळाला कवटाळून केलेला रॅम्पवॉक ही घटना मॉडेलिंग क्षेत्रात एक ऐतिहासिक घटना म्हटली पाहिजे. एका मॉडलेचं आयुष्यं, तिचं व्यावसायिक आयुष्यं हे फार फार तर तिच्या लग्नापर्यंत किंवा तिने बाळाला जन्म देण्यापर्यंतच असतं असं समजलं जातं. अशा वेळी अलिशाने आपल्या तान्हुल्याला उराशी कवटाळून रॅम्पवॉक करणं हा प्रसिद्धीचा एक फंडाही वाटू शकतो. मात्र, या क्षेत्रात काम करणाऱ्या आणि करू पाहणाऱ्या तरुणींसाठी ही एक खूप मोठी आश्वासक घटना आहे आणि मुख्य म्हणजे आपलं करिअर संपलं असं म्हणून स्वत:ला निराशेच्या अंधाऱ्या गर्दीत झोकून देणाऱ्या मॉडेल्सना आणि या विचारसरणीला मारलेली एक सणसणीत चपराक आहे. स्त्रियांच्या प्रगतीच्या मार्गातील खरे अडथळे जर काही असतील तर ते म्हणजे स्त्रियांची स्वत:ची विचारसरणी आणि त्यांचा स्वत:वर नसलेला विश्वास असे मला वाटते. एकदा का या अडचणींना स्त्रियांनी पार केलं तर इतर अडचणी क्षुल्लक ठरतील. मुळात अनेक महिलांनाच अशी इच्छा नसते की, कुटुंबाच्या सुरक्षित कवचातून बाहेर पडून काहीतरी वेगळं करून दाखवावं. याचा अर्थ असा नाही की प्रत्येकीनेच मुलाला कडेवर घेऊन रॅम्पवर चालावे, पण आपल्या आवडीच्या क्षेत्रात यशाच्या दिशेने किमान वाटचाल सुरू करायला काय हरकत आहे? यश मिळेल न मिळेल हा पुढचा भाग झाला मात्र प्रयत्नच न करणे म्हणजे हार मान्य करणेच नव्हे काय? कौटुंबिक जबाबदाऱ्या या आहेत आणि असतीलच. कारण स्वत:च्या स्वप्नांमागे धावणाऱ्या प्रत्येकाला शेवटी एका उबदार घरट्याची आवश्यकता असतेच. ते घरटं आपण नाकारलं तर आपलं जीवन आणि कुटुंबसंस्था पाश्चात्यांसारखी उद्ध्वस्त होईल. मानसिक विकार बळावतील, दिशाहीन समाज निर्माण होईल. मग नक्की करायचं काय तर “कुटुंब की करिअर’ या प्रश्नाचे उत्तर प्रत्येकीने आपापल्या परीने शोधावे. शोध घ्यावा स्वत:मधील क्षमतांचा, उत्तुंगतेचा आणि लक्षात ठेवावं प्रत्येक यश हे त्याची किंमत मागत असते, तेव्हा एखादी गोष्ट मिळवताना आपल्याला काही ना काही गमवावं लागणार हे तर नक्की आहे, पण आपण कमावलेले यश आणि त्यासाठी मोजलेली किंमत या दोन तराजूच्या पारड्यात यशाचं पारडं नेहमीच कसं भारी ठरेल हेच पाहावं आणि ते भारी ठरणार याची १% जरी खात्री असेल तर ९९ % नकारात्मक गोष्टींकडे दुर्लक्ष करून येईल त्या अडथळ्यांना पार करत मार्गक्रमण करायला हवे. जी असं करू शकते तीच होते यशाची मानकरी, तीच ठरते आयकॉन तिच्या क्षेत्रातली आलिशा ओराव सारखी...

विनया कुलकर्णी संपर्क - ९४२०२६५२१२

बातम्या आणखी आहेत...