आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कर्तव्यपथावरचा प्रजासत्ताक...:स्त्रियांना आत्मसन्मानाची जाणीव देणारा प्रजासत्ताक

औरंगाबाद5 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

सर्वसामान्यांच्या जीवनात आमूलाग्र बदल घडून आणणारा प्रजासत्ताक दिन सर्वांसाठी अतिशय महत्त्वाचा आहे. याच दिवशी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी देशाला कायद्याची चौकट दिली. संविधान देशाला सुसंस्कृत बनवते, पण त्यापेक्षा अधिक म्हणजे सामान्य नागरिकांना त्यांचे हक्क अन् अधिकार संविधानामुळ‌े मिळतात. २६ जानेवारीला आपल्याला हे हक्क मिळाले म्हणून प्रजासत्ताक दिनाचं विशेष महत्त्व आहे. स्त्रियांसाठी तर प्रजासत्ताक दिन पुरूषांपेक्षा खूपच विशेष वाटतो. स्त्रियांना हजारो वर्ष ज्ञान, स्वातंत्र्य, संपत्तीपासून वंचित ठेवले होते. स्त्रिया रूढी-परंपरांच्या जोखडात खितपत पडलेल्या होत्या. पण, महात्मा ज्योतिराव फुले, सावित्रीबाई फुले, गोपाळ गणेश आगरकर, महर्षी धोंडो केशव कर्वे, राजाराम मोहन राय, र. धों. कर्वे यांच्या सामाजिक सुधारणावादी चळवळीने स्त्रियांच्या हक्काची मुद्दा ऐरणीवर आला. समाजसुधारकांनी पाहिलेल्या स्वप्नांना डॉ. आंबेडकरांनी प्रत्यक्षात आणले. त्यांनी स्त्री-शिक्षणाला कायद्याच्या चौकटीत बसवले. महिलांना समानतेचा अधिकार घटनेने बहाल केला. दुकाने, उपहारगृहे, चित्रपटगृहे, तलाव, विहिरी, मंदिरे, स्नानघाट, रस्ते इ. कोणत्याही सार्वजनिक ठिकाणी कुठल्याही महिलेला लिंग, वर्ण-जात, भाषेच्या आधारावर भेदभाव करून प्रवेश नाकारता येणार नाही, याची तरतुद संविधानाने केली. याचा अर्थ स्त्रियांना सन्मानाने, स्वाभिमानाने जगण्याचा अधिकार संविधानाने दिला. प्रसूती रजा, कामाचे नियंत्रित तास, साप्ताहिक सुटी, रात्री उशिरापर्यंत स्त्रियांना सक्तीने कामाच्या ठिकाणी ठेवता येणार नाही, लिंगाधारित वेतन तफावतीला विरोध, स्त्रियांना वारसा संपत्तीत समान हक्क यांसारख्या अनेक गोष्टींंची तरतूद यात करण्यात आली. संविधानाने स्त्री शिक्षणाचे अधिकार दिले नसते, तर देशाच्या प्रधानमंत्रिपदी इंदिरा गांधी आणि राष्ट्रपतिपदी प्रतिभाताई पाटील विराजमान झाल्या नसत्या. इंग्लंड सारख्या प्रगत देशाच्याही आधी भारताने स्त्रियांना मतदानाचा अधिकार दिला. माझ्यासह सर्व शोषित, पीडित, वंचित, उपेक्षित स्त्रियांच्या जीवनात प्रजासत्ताक दिनाचं विशेष महत्त्व आहे. नव्हे, प्रत्येक महिलेला आत्मसन्मानाचं भान देणाऱ्या या दिवसाचं महत्त्व वाटायलाच हवं...

अनिता देवळे (मुक्त पत्रकार)

बातम्या आणखी आहेत...