आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कशासाठी ? फोटोसाठी..!:जगण्याची उमेद देणारं हसू...

औरंगाबाद14 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

गावापासून दूर अशा शेतात दगड-मातीने बांधलेल्या घराजवळून जात असताना जरा थांबले. सावली शोधत असतानाच घराला लागून झाडाच्या सावलीत नातवाला घेऊन बसलेली आजी दिसली. मी तिच्याजवळ जाऊन बसले. अंगणात कोंबड्या इकडून तिकडे फिरत होत्या. बाजूलाच जनावरांचा गोठा होता. त्यात पोट खपाटीला गेलेली दोन-तीन जनावरे काहीतरी चघळत होती. त्यांच्याच बाजूला शेतीची अवजारे पडलेली होती. दुष्काळी भागातील शेतकरी कसा जगतो हे समोर पाहताच जाणवले. मन अस्वस्थ झाले. मी आजीला विचारले, ‘काय म्हणतोय पाऊस पाणी?’ लगेचच ती म्हणाली, ‘त्याचं नाव नको काढू ! तो आमच्या पाचवीलाच पुजलाय. नाहीतर गाव सोडून ऐराणात कशाला राहायला आलो असतो, आम्हाला काय हौस आहे का?’ एकतर पाणी नाही, थोडंफार विहिरीला पाणी असतं त्यावर जमेल तसं पीक घेतो. मग गावात राहिलो तर पदरात कसं पडणार? दिवस-रात्र एक करावी लागते. हातातोंडाशी आलेले पीक जोपर्यंत पदरात पडत नाही तोपर्यंत काही भरवसा नाही. कधी होत्याचं नव्हतं होईल ते सांगता येत नाही! लेकरांबरोबरच जनावरांनाही कसं जगवावं हे समजत नाही. जनावरांच्या मूठभर चाऱ्यासाठी वणवण भटकावं लागतं.’ तिने नातवाच्या गालावर हात फिरवला. मी पोट खपाटीला गेलेल्या जनावरांकडे पाहत होते. कणभर अन्न, घोटभर पाणी अन् मूठभर चारा मिळावा म्हणून तर गाव सोडून शेतात राहावं लागतंय. मी नि:शब्द झाले. काय उत्तर द्यावं सुचेना. तिच्या पायाला हात लावला आणि तुझ्यामुळेच मी जिवंत आहे. एवढंच म्हणाले.

निघताना तीची परवानगी घेऊन तिचा फोटो काढला. ती तोंडावर हात ठेवून मोकळं हसली. तिच्या चेहऱ्यावर कष्टाच्या सुरकुत्या दिसत होत्या, पण हसताना रात्रंदिवस शेतात रापलेले हात आणि आयुष्यभर केलेले कष्ट तिने जाणवू दिले नाही. गाव ओसाड पडला होता, पण तिच्या चेहऱ्यावरचं हसू मात्र मला माझ्या जगण्याची उमेद देत होतं.

प्रियंका सातपुते -संपर्क : ७३८५३७८८५६

बातम्या आणखी आहेत...