आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नेटस्ट्रीम:जगणं बदलणाऱ्या आत्मशोधाची कथा

छत्रपती संभाजीनगर2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

टॉ म हँक्स हा हॉलीवूडमधला असामान्य प्रतिभेचा धनी असणारा दिग्गज अभिनेता. अनेक अर्थांनी तो मिस्टर परफेक्शनिस्ट आहे. ‘अ मॅन कॉल्ड ओट्टो’ हा त्याचा नवा चित्रपट ओटीटीवर रिलीज झालाय. ओट्टो अँडरसन हा एक हुशार अभियंता असतो. त्याच्या वाढत्या वयामुळे आणि पत्नी सोनियाच्या मृत्यूच्या काही महिन्यांनंतर त्याला निवृत्त होण्यास भाग पाडले जाते. ओट्टो नियमांवर बोट ठेवून काम करणारा माणूस. जे नियमांचे पालन करत नाहीत, त्यांना तो महत्त्व देत नाही. त्याचं रागीट वृद्धासारखं वागणं अनेकांना आवडत नसतं. तो मोठ्या मनाचा माणूस आहे, हेही कित्येकांना ठाऊक नसते! सुरुवातीला चित्रपटाची गती संथ असली, तरी हळूहळू तो मनावर पकड घेतो. फ्रेड्रिक बॅकमन यांच्या ‘एन मॅन सोम हेटर ओव्ह’ अर्थात ‘अ मॅन कॉल्ड ओव्ह’ या स्वीडिश कादंबरीवर हा सिनेमा बेतला आहे. याच पुस्तकावरून २०१५ मध्ये स्वीडिश चित्रपटाची निर्मिती झाली आणि त्याला समीक्षकांनी खूप गौरवलेही. आताची हॉलीवूडची पुनरावृत्ती स्वीडिश आवृत्तीशी जुळत नसली, तरी प्रेम, विनाश आणि आत्मशोधाची एक आकर्षक कथा यात आहे. ‘अ मॅन कॉल्ड ओट्टो’ हे निःसंशयपणे कादंबरीचं देखणं रूपांतर आहे. यामध्ये कथेची मांडणी आणि पात्रांमध्ये काही किरकोळ बदल करण्यात आले आहेत. महत्त्वाचे म्हणजे, टॉम हँक्सने साकारलेली ओट्टोची व्यक्तिरेखा स्वीडिश चित्रपटातील रॉल्फ लासगार्डची कार्बन कॉपी नाही. हँक्सने सूक्ष्मपणे लेसगार्डच्या विरोधाभासी, परंतु पात्राचे केवळ सार न मांडता एका वेगळ्याच स्तरावरची अदाकारी पेश केलीय. एखाद्या व्यक्तीने मृत्यूनंतर जगण्याचा आपला उद्देश गमावला आहे किंवा त्याच्या महत्त्वाच्या व्यक्तीचा मृत्यू होऊ शकतो, ही कल्पना अलीकडच्या काळात लोकप्रिय झाली आहे. ‘आफ्टर लाइफ’ या मालिकेतील रिकी गेर्वाईसचे टोनी आणि ‘द लास्ट ऑफ अस’मधील निक ऑफरमनचे बिल हे पात्र ही अलीकडची काही उदाहरणे आहेत. सोनियाच्या पश्चात ओट्टो स्वतःच्या मर्जीने आपले जीवन संपवण्याचा निर्धार करतो, अकारण जगण्यामध्ये त्याला स्वारस्य नसते. त्याच्या चौकटबद्ध परिघात नियमांची अंमलबजावणी करत जगण्यात त्याला आनंद मिळत असला, तरी सोनियाशिवाय आपले जीवन अपूर्ण आहे, या जाणिवेतूनच तो राजीनामा देतो. नवीन शेजारी मॅरिसोल, टॉमी आणि त्यांच्या दोन मुलींशी अनवधानाने झालेल्या जवळिकीमुळे त्याच्या आत्महत्येच्या योजनांमध्ये व्यत्यय येतो. त्याची आत्महत्या अत्यंत रंजक पद्धतीने लांबणीवर पडत जाते. मॅरिसोल (मारियाना ट्रेव्हिनो) ही ओट्टोनंतरची चित्रपटातली सर्वात महत्त्वाची व्यक्तिरेखा आहे. तिची तल्लख बुद्धी आणि जादुई व्यक्तिमत्त्व, ओट्टोची निंदकवृत्ती आणि त्याच्या चिडखोर वर्तन यावर योग्य उतारा ठरतात. तिच्यापासून अंतर राखण्याचे लाख प्रयत्न करूनही मॅरिसोलच्या नजरेत ओट्टोला पित्याचे स्थान लाभते. यातून त्यांची जडणघडण होत राहते. विविध मार्गांनी मॅरिसोल ओट्टोच्या जीवनात बदल घडवणारा कॅटॅलिस्ट बनते. याच साखळीतून त्या दोघांच्या आयुष्यात बदल घडत राहतात, त्यातलाच एक बदल ओट्टोचं जीवन बदलून जातो. त्याला जगण्याचा मार्ग सापडतो. यातून तो अंतर्बाह्य बदलतो. जगापासून स्वतःला वेगळं करण्याची दृष्टी देणारी, आत्मशोधाची ही कथा आहे. ओट्टोचे जीवन फ्लॅशबॅकच्या सिरीजमधून समोर येत राहते. सोनियासोबतची त्याची प्रेमकथा निकोलस स्पार्क्सच्या कादंबरीसारखी आहे. मात्र, स्पार्क्सच्या कादंबरीमधल्या परीकथेसारखी आताच्या ओट्टोची कथा नाही. एक विशाल औद्योगिक आस्थापना आपलं क्षेत्र वाढवण्यासाठी शेजारच्या शहरावर आपली वाईट नजर ठेवून असते. याच दरम्यान सोनियाचा मृत्यू होतो. तिच्या जाण्याने ओट्टोचं जीवन नीरस होतं. तो गतकाळातल्या स्मृतीत जगू लागतो. मात्र, त्याच्यातली समयसूचकता ऐनवेळी जागृत होते आणि तो नव्याने उभारी घेतो! मॅक बायडाचा माल्कम, जुआनिटा जेनिंग्जची अनिता ही पात्रे कथेत रंगत आणतात. ‘माइंड हंटर’मधील एड केम्परच्या विलक्षण भूमिकेमुळे प्रसिद्ध झालेला अभिनेता कॅमेरॉन ब्रिटन याने साकारलेली जिमीची भूमिका दाद देण्याजोगी आहे. ओट्टोची बाल्यावस्थेतली भूमिका टॉम हँक्सचा मुलगा ट्रुमन हँक्सने साकारलीय. सोनियाची भूमिका ‘लीजन’, ‘फार्गो’ या सिनेमांची स्टार अभिनेत्री रेचेल केलरने केलीय. ‘अ मॅन कॉल्ड ओट्टो’ हा चित्रपट मूळ स्वीडिश सिनेमासारखा नसला, तरी रंगत आणतो तो त्यातल्या तगड्या स्टारकास्टमुळे! ओट्टो अँडरसन म्हणून टॉम हँक्सने सराईतपणे उत्कृष्ट भूमिका केली असली तरीही मॅरिसोलची भूमिका करणाऱ्या मारियाना ट्रेव्हिनो हिने सर्वाधिक भाव खाल्ला आहे. टॉम हँक्सचा लीड रोल असूनही त्याच्यावर कुरघोडी करणे ही साधी बाब नव्हे!

समीर गायकवाड sameerbapu@gmail.com संपर्क : 9766833283