आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Opinion
  • A Story Of Two Different Women Who Work For A Living |Article By Neeraj Kaushal

विश्लेषण:उदरनिर्वाहासाठी काम करणाऱ्या दोन भिन्न महिलांची कहाणी

औरंगाबाद6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

भारतीय महिलांचा कार्यबलातील सहभाग जगात सर्वात कमी आहे. त्याच्या संभाव्य कारणांवर बरेच शैक्षणिक साहित्य लिहिले गेले आहे. पण, या स्तंभात दोन वेगवेगळ्या खंडांवर अतिशय भिन्न जीवन जगणाऱ्या दोन नोकरदार महिलांच्या माध्यमातून हा प्रश्न मांडण्याचा प्रयत्न केला आहे. त्यापैकी एक नुकतीच कामाला लागली आहे, तर दुसरी निवृत्तीच्या जवळ आहे. एकीला असे वाटते की, परिस्थितीने उदरनिर्वाहासाठी त्यांना काम करण्यास भाग पाडले आहे, तर आरोग्याच्या समस्यांमुळे आपल्याला कामाचे तास कमी करावे लागतात की काय, अशी दुसरीला काळजी वाटते. त्यापैकी एक स्त्रियांना त्यांच्या पतीच्या कर्तृत्वाच्या आधारावर न्याय दिला जातो अशा जगात, तर दुसरी स्त्रियांना त्यांच्या स्वतःच्या कर्तृत्वाच्या आधारावर न्याय दिला जातो, अशा जगात राहते.

पहिलीचे नाव आहे शाहिदा. ती २१ वर्षांची आहे आणि पूर्व उत्तर प्रदेशात ई-रिक्षा चालवते. बांधकामाच्या ठिकाणी विटा वाहून नेणे हे तिचे पहिले काम होते. यामध्ये तिला पगारही कमी मिळाला आणि कामही मेहनतीचे होते. एकेदिवशी तिने एका महिलेला ई-रिक्षा चालवताना पाहिले आणि ठरवले की, आपण हे करायचे. एका एनजीओच्या मदतीने तिने ई-रिक्षा चालवण्याचे आणि त्याचे टायर बदलण्याचे प्रशिक्षण घेतले. आज ती निर्दोषपणे ई-रिक्षा चालवते आणि दररोज शेकडो लोकांना एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी घेऊन जाते. ती दरमहा १२ हजार रुपये कमावते, ही रक्कम तिच्या आधीच्या कामापेक्षा ४० टक्के जास्त आहे.

दुसऱ्या आहेत आॅरा. त्या कर्करोगातून सावरल्या आहेत. कोलंबियाहून त्या न्यूयॉर्कमध्ये राहायला आल्या होत्या. आठवडाभर त्या एका शैक्षणिक संस्थेत क्लिनरचे काम करतात व आठवड्याच्या शेवटी खासगी घरांमध्ये. त्या ६२ वर्षांच्या आहेत आणि त्यांना ऑस्टिओपोरोसिसचे निदान झाले आहे, त्यामुळे त्यांच्या कर्करोगाच्या उपचारांवरही परिणाम होईल. मी त्यांना नोकरी सोडणार का, असे विचारल्यावर त्या म्हणाल्या, मला काम करायचे आहे. तीन वर्षांनी त्या पूर्णवेळ नोकरीतून निवृत्त होणार आहेत, परंतु आठवडाअखेरचे फ्री-लान्स काम त्यांना सुरू ठेवायचे आहे. १२ वर्षांपूर्वी त्यांना कॅन्सर झाल्याचे निदान झाले तेव्हा त्यांचा नवरा त्यांचा विश्वासघात करत असल्याचेही त्यांना आढळून आले. त्यांनी त्याला घटस्फोट दिला. कॅन्सरच्या उपचाराच्या कठीण काळाचा सामना त्यांनी एकटीने केला. एका एनजीओच्या प्रमुखाकडून मला शाहिदाची माहिती मिळाली. मी कल्पना केली की, ती एक उत्साही तरुण मुलगी असेल आणि पुरुषांच्या जगात एक स्वतंत्र स्त्री म्हणून अभिमानाने जगत असेल. पण, मी तिला भेटले तेव्हा ती हताश, थकलेली आणि फासात अडकलेल्यासारखी दिसत होती. वयाच्या १३ व्या वर्षी तिच्या पालकांनी तिचे लग्न लावले होते. ती १८ वर्षांची होईपर्यंत तिला दोन मुले झाली. तिचा नवरा आजारी पडला तेव्हा शाहिदाला काम शोधणे भाग पडले. मी तिला विचारले की ई-रिक्षा चालवताना धोका तर वाटत नाही ना? ग्राहक वाईट वागतात का? तिने उत्तर दिले, नाही, सर्व खूप चांगले आहेत आणि माझ्या कामाचे कौतुक करतात. ती आपल्या आजूबाजूच्या मुलींसाठी आदर्श आहे का? होय. तिच्या बहिणींनाही ई-रिक्षा चालवायची आहे, पण शाहिदा म्हणते, त्यांना काय गरज आहे? त्यांचे पती नोकरी करतात. माझ्याकडे दुसरा पर्याय नसल्याने मला काम करावे लागत आहे.

आॅरा व शाहिदा यांच्या त्यांच्या कामाकडे बघण्याच्या दृष्टिकोनात खूप फरक आहे. ऑरा यांच्या जगात काम करायचे की नाही हे स्त्री स्वतः ठरवते. शाहिदाच्या जगात हा निर्णय तिचा नवरा किंवा कुटुंबीय घेतात. ऑरा यांच्या जगात प्रत्येकाला नोकरी आहे, पण शाहिदाच्या जगात बहुतांश महिला नोकरी करत नाहीत. तिची आई किंवा बहिणीने कधीही पैसे कमावण्यासाठी काम केले नाही. त्या घरकाम आणि मुलांचे संगोपन करतात.

या दोन जगांमागील घटक मोठे गुंतागुंतीचे आहेत. नोकऱ्यांमध्ये आरक्षणाची किंवा करसवलतीची जादूची कांडी फिरवून सरकार ही दरी भरून काढेल, अशी अपेक्षा करू नका. समस्या यापेक्षाही मोठी आहे आणि त्यासाठी लिंग पद्धतींमध्ये बदल करणे आवश्यक आहे, जेणेकरुन महिलांना त्यांच्या जीवनाचा लगाम स्वतःच्या हातात घेता येईल. (ही लेखिकेची वैयक्तिक मते आहेत.) नीरज कौशल कोलंबिया विद्यापीठात प्राध्यापक nk464@columbia.edu

बातम्या आणखी आहेत...