आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराइ तर बायकांप्रमाणेच मोलकरीण हा राधिकाच्याही जिव्हाळ्याचा विषय होता. याच मोलकरणीच्या भरवशावर राधिकाने घरी पार्टी ठेवली आणि तिचा खोळंबा झाला. नेमकं पार्टीच्या दिवशी मोलकरीण येणार नसल्याचा निरोप आला आणि राधिकाच्या घरातलं वातावरण बदललं. कारण सगळी कामं तशीच पडून होती. शी बाई! आता मी घर आवरत बसू की पार्टीचा मेनू बनवू. मदतीला पण कुणी नाही. कुणाच्याही भरवशावर काम करणे, अवलंबून असणे हे आपल्यालाच किती त्रासदायक होते हे या प्रसंगावरून तिच्या लक्षात आले. मोलकरणीने यावं म्हणून राधिकाने तिला फोन केला. मोलकरणीच्या मुलीने फोन उचलला आणि म्हणाली, आमच्या घरी दोन दिवसांपासून भांडण चालू आहे म्हणून आई आज येणार नाही आणि तिने फोन बंद केला. इकडून राधिकानेही रागाच्या भरात फोन कट केला आणि ती स्वयंपाकघरात शिरली. दुसऱ्या दिवशी मोलकरीण आल्या-आल्या तिला कामावर न येण्याचं कारण विचारायचं सोडून राधिकाच्या तोंडाचा पट्टा सुरू झाला. तुझ्यामुळे काल माझी किती फजिती झाली. तू हो म्हणाली होतीस म्हणून मी पार्टी ठेवली होती. आदल्या दिवशी तरी फोन करायचा ना ! मी पार्टी नंतर केली असती. खूप फजिती केलीस तू माझी. राधिकाला मध्येच थांबवत मोलकरीण म्हणाली, मॅडम, मी दोन दिवस किती टेन्शनमध्ये होते माहितीय का तुम्हाला? आणि तुम्हाला इथं तुमच्या पार्टीचं येऊन पडलंय. राधिका म्हणाली, तुला टेन्शन म्हणजे नवऱ्याने दारू पिऊन गोंधळ घातला असेल किंवा पैशासाठी तुला मारले असेल, दुसरं काय? अशा परिस्थितीतही ती मोलकरीण शांतपणे बोलली. मॅडम, माझा नवरा दारू पीतच नाही. भांडणाचं कारण दुसरंच आहे.
राधिकाच्या मनात पाल चुकचुकली. मोलकरीण खाली बसली आणि मोठा श्वास घेऊन बोलायला लागली. मॅडम, माझा नवरा दारू पीत नाही आणि कामही मनात आलं तर करतो. नाही तर घरीच बसून राहतो. आम्हाला एक मुलगा आणि एक मुलगी आहे. दोघेही शाळेत जातात. मी मुद्दामहून जास्तीची कामे करते आणि पैसे जमा करते. मला एका आजोबांनी बँकेत खाते उघडून दिले. मी जी एक-दोन घरांची जास्तीचे कामे करते त्याविषयी घरात माहीत नाही. ते पैसे आजोबाकडून मी बँकेत जमा करून घेते. आता ते माझ्या नवऱ्याला कळले. त्याचंच भांडवल करून, माझ्याशी खोटं बोलून वेगळे पैसे जमा करते. म्हणून माझ्या साऱ्या नातेवाइकांना बोलवून धिंगाणा घातला. राधिका आता शांत झाली होती. ह्यात भांडणासारखे काय आहे? मी पण यांना न सांगता माझे पैसे वेगळे जमा करते. अडीअडचणीला तेच पैसे आम्हाला उपयोगी पडतात. पण अशा वेळेस माझ्याकडे इतके पैसे कुठून आले म्हणून माझा नवरा भांडत नाही. उलट “तू चांगलं केलंस, पैसे बाजूला जमा केलेत. ते आज आपल्याला अडचणीत कामाला आले’ असं म्हणतात. तू पण असेच घरासाठी जमवलेले पैसे वापरतेस ना? मोलकरीण म्हणाली, अहो मॅडम, त्यांना दुकानावर माल भरण्यासाठी, मुलांसाठी किंवा आजारपणासाठी दुसऱ्याकडून पैसे उसने आणले, असे सांगून त्यांनाच देते ! मला माहेरून मदतीचा हात नाही. मग म्या काय करावं. तुम्हीच सांगा, माझं काही चुकत असेल तर ते सांगा. मी माझ्यासाठी पैसा खर्च करत असेल तर ते सांगा. म्हणून मॅडम माझे टेन्शन वेगळे आहे तुमच्यापेक्षा.
राधिकाच्या डोळ्यात पाणी आले. ती विचार करू लागली, मी उगीचच तिच्यावर ओरडले. तिला शांतपणे न येण्याचं कारण विचारलं असतं तर तिलाही आधार मिळाला असता. मोलकरीण जे करत होती ते मी पण करत होते. पैसे जमा राहिले तर आपल्यालाच संकटात कामाला येतात, हे मोलकरणीच्या नवऱ्याला उमगले नाही,त्याचा अहंपणा आडवा आला यात मोलकरणीची काय चूक? राधिकाने मोलकरणीला ओळखीच्या घरी जास्तीचे काम मिळवून दिले. तिचा पगार वाढवला. वेगळ्या बँकेत खाते उघडून त्यात हे जास्तीच्या कामाचे पैसे भरू लागली आणि पासबुक राधिकाने स्वतःजवळ ठेवले. मोलकरणीवरच्या आपल्या रागाची राधिकाने अशा प्रकारे परतफेड केली होती...
डॉ. रंजना पाटीदार संपर्क : ९८९०९५९४५०
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.