आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Opinion
  • AAP Made The Game More Exciting In Gujarat Elections | Article By Rajdeep Sardesai

दृष्टिकोन:गुजरात निवडणुकीत ‘आप’ने खेळ आणखी रोमांचक केला

औरंगाबाद2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

गुजरात निवडणुकीची कहाणी अनोखी आहे. तेथे विजेता जवळपास निश्चित आहे, परंतु खरी लढत दुसऱ्या स्थानासाठी आहे. ‘आप’ रिंगणात उतरण्यापूर्वी ही निवडणूक गेल्या २५ वर्षांच्या परिचित पद्धतीनुसार होणार होती, म्हणजेच भाजपने काँग्रेसला सहज पराभूत केले आणि त्याच्यापेक्षा आठ ते दहा टक्के जास्त मताधिक्य मिळवले. पण, आज गुजरातमधील नव्या राजकीय चर्चेने भाजप-काँग्रेस या समीकरणात ‘आप’ कितपत चुरस निर्माण करू शकते, यावर लक्ष केंद्रित केले आहे. राज्यातील तुलनेने गरीब प्रदेश असलेल्या सौराष्ट्र आणि दक्षिण गुजरातच्या छोट्या गावांत गेल्यास तुम्हाला भगव्या लाटा, अधूनमधून काँग्रेसचा झेंडा, पण झाडूही दिसतील. अरविंद केजरीवाल यांनी भारतीय राजकारणात झपाट्याने प्रगती केली आहे, परंतु मिशन गुजरात हा त्यांचा सर्वात धाडसी प्रयत्न आहे. २०१४ च्या सार्वत्रिक निवडणुकीत त्यांची थेट नरेंद्र मोदींशी लढत झाली. वाराणसीमध्ये त्यांना दारुण पराभवाला सामोरे जावे लागले. आठ वर्षांनी चित्र बदलले असून पंजाबमधील विजयाने उत्साही झालेली आप पुन्हा एकदा निवडणुकीच्या रिंगणात उतरली आहे. गुजरातमध्ये बदल हवा असलेल्या मतदारांकडून त्यांना आशा आहे. पण, गुजरात हा पंजाब नाही, जिथे सत्ता काँग्रेस आणि अकाली यांच्यात बदलत राहिली. हे असे राज्य आहे जिथे भाजपने गेल्या २५ वर्षांत पराभवाची चव चाखलेली नाही - अगदी महापालिका निवडणुकीतही नाही. बंगालमधील डाव्यांच्या ३४ वर्षांच्या प्रदीर्घ सत्तेनंतर राज्यातील पूर्ण राजकीय वर्चस्वाचे हे दुसरे सर्वात मोठे उदाहरण आहे. गुजरात ही केवळ भाजपच्या हिंदुत्वाच्या विचारसरणीची मूलभूत प्रयोगशाळा नाही, तर ते असे राज्य आहे जिथे राजकारण, धर्म आणि नागरी समाज एकत्र येऊन मिनी हिंदू राष्ट्र निर्माण केले आहे आणि पंतप्रधान मोदी हे त्यांचे खरे पुत्र म्हणून प्रक्षेपित केले जातात. असे असतानाही गुजरातमध्ये विरोधकांसाठीही जागा आहे. त्यामुळे काँग्रेसला येथे सतत ४० टक्के मते मिळत आहेत. उत्तर भारतात किंवा महाराष्ट्रात ज्या प्रकारे काँग्रेसची मते कमी झाली आहेत, तशी गुजरातमध्ये झालेली नाहीत. १९८५ मध्ये ५५ टक्के मतांसह १८२ पैकी विक्रमी १४९ जागा जिंकून काँग्रेस गुजरातमध्ये सत्तेवर आली. मात्र, पाच वर्षांनी १९९० मध्ये ३० टक्के मतांसह केवळ ३३ जागा कमी झाल्या. काँग्रेस पक्षाच्या आत्मघातकी राजकीय घोडचुकांचे हे केवळ लक्षण आहे. फरक एवढाच की, तेव्हापासून आजतागायत गुजरातमधील एकाही पक्षाने पहिल्या क्रमांकाचा विरोधी पक्ष म्हणून काँग्रेसच्या स्थितीला आव्हान दिलेले नाही. या परिप्रेक्ष्यातून गुजरातमधील ‘आप’च्या पॉवरप्लेकडे लक्ष द्यायला हवे. तिथे आप केवळ भाजपची नव-मध्यमवर्गीय व्होट बँक जिंकत नाही, तर सुरतचे मुस्लिम आणि डांगच्या आदिवासींसारख्या काँग्रेसच्या पारंपरिक व्होट बँकांमध्येही प्रवेश करत आहे. ‘आप’ची रणनीती धोकादायक आहे. गुजरातींच्या हिंदू भावनेला आवाहन करून आणि चलनावर लक्ष्मी व गणेशाच्या प्रतिमा छापण्याची मागणी करून तो भाजपच्या भगव्या राजकारणाची तुलनेने सौम्य आवृत्ती मांडत आहे. २००२ च्या दंगलीच्या जखमा पुन्हा चिघळू नयेत म्हणून बिल्किस बानो प्रकरणापासूनही त्याने जाणीवपूर्वक अंतर ठेवले आहे. दुसरीकडे विशेषत: तरुण मतदारांच्या असंतोषाचा फायदा घ्यायचा आहे आणि बेरोजगारी भत्त्यापासून मोफत वीज देण्यापर्यंतची आश्वासने देत आहेत. गुजरात मॉडेलचे लाभार्थी नसलेल्या लोकांची मते मिळवणे हा त्याचा उद्देश आहे. असे असूनही त्याच्यासमोर खडतर आव्हान आहे. २०१७ मध्ये सर्व २९ उमेदवारांचे डिपॉझिट जप्त झाले होते. दुसरीकडे काँग्रेस कितीही कमकुवत झाली तरी तिची एक मजबूत ब्रँड प्रतिमा आहे, ती एका रात्रीत नाहीशी होणार नाही. खरे तर २०१७ मध्ये काँग्रेसने ग्रामीण भागात भाजपवर बाजी मारली होती, परंतु शहरी आणि निमशहरी भागात भाजपची मजबूत पकड असल्याने त्यांना पराभवाचा सामना करावा लागला होता. सध्या सौराष्ट्र आणि दक्षिण गुजरातमध्ये ‘आप’चे अस्तित्व दिसून येत असले तरी मध्य आणि उत्तर गुजरातमध्ये त्याचा प्रभाव तुलनेने मर्यादित आहे. (ही लेखकाची वैयक्तिक मते आहेत.)

राजदीप सरदेसाई ज्येष्ठ पत्रकार rajdeepsardesai52@gmail.com

बातम्या आणखी आहेत...