आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

रसिक स्पेशल:नवे "पोस्टर बॉईज'...

अभिजीत पानसेएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

जेव्हा जेव्हा भारतीय टीमला अपमान, खिल्ली, पक्षपातपणा, मैदानात अंपायरची बेईमानी सहन करावी लागली तेव्हा भारतीय टीमने जोरदार मुसंडी मारल्याचा आजवरचा इतिहास आहे. अॅडिलेडमध्ये छत्तीसवर आऊट झाल्यावर भारतीय संघाची अवहेलना झाल्यावर, वर्णद्वेषी टीकेनंतर मेलबर्नमध्ये, नंतर सिडनीत व शेवटी ब्रिस्बेनमध्ये अंतिम वार केला... कसोटीमधील महाविजय मिळवला. संपूर्ण सिरीज बघताना एक गाणं भारतीय टीमसाठी सुसंगत वाटतं... कंधों से मिलते हैं कंधे, क़दमों से कदम मिलते हैं हम चलते हैं जब ऐसे तो दिल दुश्मन के हिलते हैं…

१९७१च्या लोंगेवला सीमेवर झालेल्या भारत-पाकिस्तान युद्धावर आधारित "बॉर्डर' सिनेमात अकस्मात हल्ला झाल्यावर मेजर आपल्या कंपनीला विचारतो की आपल्याला पोस्ट सोडायला सांगितली आहे, मला तुमचं मत हवंय. तेव्हा एकजण म्हणतं, कोई पोस्ट छोड के नही जायेगा..चिडीयों को मैं बाज लढाऊ.."

... तुलना नाही पण ऑस्ट्रेलिया दौऱ्यावरील कसोटी मालिकेतील भारतीय टीमचा जजबा, झुंझार वृत्ती बघताना हेच आठवलं. पहिल्या सामन्यात संघ ३६ धावांमध्ये बाद झाल्यावर सगळ्यांनी भारतीय टीम "ढ' आहे ते ४-० ने हरणार असं भविष्य वर्तवलं. ऑस्ट्रेलिया भारताला व्हाईट वॉश देणार, क्रिकेट जगतातून याच प्रकारच्या प्रतिक्रिया आल्या. इंग्लंडचा मायकेल व्हॉन वर्षभरापासूनच भारतीय टीमचं ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर हसं होणार म्हणत होता. भारतीय संघाने मात्र हार न पत्करता न भूतो न भविष्यती पराक्रम केला. ऑस्ट्रेलियात अद्भुत खेळ करत कसोटी मालिका जिंकली. हा विजय अफाट आहे, अद्भुत आहे. भारतीय क्रिकेट इतिहासातीलच नव्हे तर क्रिकेटच्या इतिहासातील पहिल्या तीनमध्ये येणारा विजय आहे.

जेव्हा जेव्हा भारतीय टीमला अपमान, खिल्ली, पक्षपातपणा, मैदानात अंपायरची बेईमानी सहन करावी लागली तेव्हा भारतीय टीमने जोरदार मुसंडी मारल्याचा आजवरचा इतिहास आहे. २००८ च्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यामध्ये सिडनी कसोटीत उघडउघड ऑस्ट्रेलियाच्या संघातील प्रमुख खेळाडूंनी क्रिकेटशी बेईमानी करत सोबतीला पंचांच्या पक्षपातीपणाचा फायदा घेत सिडनी कसोटीत भारताला हरवले होते. तेव्हा "मंकी गेट' प्रकरणात भारतीय खेळाडूंना झळ सोसावी लागली शिवाय प्रेक्षकांच्या वर्णद्वेषी टिप्पण्यांच्या डागण्या सोबतीला होत्याच. सिडनी कसोटीनंतर पुढची कसोटी होती जगातील सगळ्यात वेगवान मानल्या जाणाऱ्या पर्थच्या अजिंक्य किल्ल्यावर... उसळी घेणाऱ्या खेळपट्टीवर! पण सिडनी कसोटीमधील सर्व अपमान, अवहेलनेनंतर भारताने अनिल कुंबळेच्या कप्तानीत ऑस्ट्रेलियाला त्यांच्याच कम्फर्ट झोनमध्ये हरवलं. तोही एक अफाट पराक्रम होता. नुकत्याच झालेल्या सिडनी कसोटीमध्ये ऑस्ट्रेलियाचा कॅप्टन टीम पेन बॅटिंग करणाऱ्या आर अश्विनला म्हणाला की, ""गाबावर तुला लवकर खेळताना बघायची इच्छा आहे. तू तिथे ये''! हा माज होता कारण ब्रिस्बेनची गाबा खेळपट्टी वेगवान बॉलरला मदत करते. २००८ मध्येही सिडनीतील प्रकारानंतर होणाऱ्या पर्थच्या वाका खेळपट्टीवर भारतीय संघाची अवस्था आणखी वाईट होईल असा ऑस्ट्रेलियाच्या व क्रिकेट पंडितांचा सूर होता. पण वाकामध्ये ऑस्ट्रेलियाला वाकवले होते. यावेळी अॅडिलेडमध्ये छत्तीसवर आऊट झाल्यावर भारतीय संघाची अवहेलना झाल्यावर, वर्णद्वेषी टीकेनंतर मेलबर्नमध्ये, नंतर सिडनीत व शेवटी ब्रिस्बेनमध्ये अंतिम वार केला... कसोटीमधील महाविजय मिळवला.

अनेक वर्षापर्यंत ह्या कसोटी मालिकेची चर्चा होईल. उदाहरण दिले जातील. राखेतून पुन्हा झेप घेणारा फिनिक्स पक्षी असतो असं म्हणतात; ते सत्य, दंतकथा, रूपक आहे का माहीत नाही, पण अपयशाच्या राखेतून यशाच्या शिखराकडे झेपावलेली टीम इंडिया हे अंतिम सत्य आहे.

पहिल्या कसोटीनंतर विराट कोहलीसारखा हुकमी एक्का ऑस्ट्रेलियातून देशात परतला, धीरोदात्त अजिंक्य रहाणेने किंचितही न डगमगता टीमची कमान स्वतःच्या हाती घेतली. भरीव नेतृत्व केलं, सगळ्या खेळाडूंना विश्वास दिला, त्यांच्या मनातील असुरक्षितता दूर केली आणि प्रत्येकाने त्यानंतर पराक्रमाची शर्थ केली. "चिडीयों से मैं बाज लडाऊं.."

मेलबर्न कसोटीत कॅप्टन अजिंक्य रहाणेने केलेलं शतक अफाट होतं. त्याची रविंद्र जडेजासोबतची महत्त्वाची भागीदारी त्या कसोटीतील सगळ्यात महत्त्वाची ठरली. जेव्हा कॅप्टन विराट कोहली भारतात परतला तेव्हा कॅप्टन म्हणून अजिंक्य रहाणे उत्तम आहे याची जाणीव त्याला क्वचित कॅप्टन्सी करण्याची संधी मिळाली असता त्याने दाखवलेली चुणूक, टीम मॅनेजमेंट, संघ निवड यांतून झाली होतीच. पण खरी अडचण होती एक बॅट्समन म्हणून विराट कोहलीची उणीव तो कशी भरून काढणार. मेलबर्न कसोटीत कॅप्टन अजिंक्य रहाणेने कठीण परिस्थितीत शतक ठोकलं.

तो मैदानात देहबोलीतून अतिउत्साह, आक्रमकता दाखवत नाही, त्यामुळे त्याच्याकडे स्टारडम नाही. तो "पोस्टर बॉय' नाही. त्यापूर्वीही अनेक आधारहीन कारणं देऊन त्याला सुरवातीला संघातून बाहेर ठेवलं होतं. तो तत्कालीन कर्णधारांच्या विशेष आवडत्या खेळाडूंमध्ये नसल्याने इतरांप्रमाणे त्याला विशेष प्राधान्य मिळत नसे. तरीही त्याला संधी मिळेल तशी तो त्याचं सोनं करत राहिला. पुढे भारतीय टीमचा उपकर्णधार झाला पण तरीही त्याला टीम मॅनेजमेंटद्वारे वगळण्याची मालिका सुरूच राहिली. स्टारडम नसल्याने क्रिकेटपेक्षा क्रिकेटरचे फॅन असलेल्या क्रिकेटरप्रेमींना अजिंक्य रहाणेबद्दल फारसं वाईट वाटलं नाही. या वर्षांत अजिंक्य रहाणेला पाठिंबा देणाऱ्या क्रिकेटप्रेमींमध्येही त्याच्या क्षमतेबद्दल साशंकता निर्माण झाली होती. पण या मालिकेत अजिंक्य रहाणेने जे नेतृत्व केले ते हृदय जिंकणारं होतं. त्याच्या नेतृत्वाखाली संपूर्ण संघ मोकळ्या मनाने खेळताना, वावरताना दिसला. संघात दोन खेळाडू कसोटी कारकिर्दीची सुरवात करणारे होते, त्यांना कॅप्टन राहणेने सांभाळून घेतलं. सतत डीआरएससाठी विचारणा करणाऱ्या उत्साही मोहम्मद सिराजला त्याने स्लिपमध्ये उभं राहून नीट हाताळलं. शिवाय पहिल्या दिवशी कसोटी क्रिकेटमध्ये आगमन करणाऱ्या मोहम्मद सिराजने अव्वल दर्जाची बॉलिंग केल्यावर पहिल्या दिवसाचा खेळ संपल्यावर कॅप्टन रहाणेने त्याला पुढे करून त्याच्या मागून सर्व संघ मैदानाबाहेर गेला. या छोट्या गोष्टीमुळे सिराजचा आत्मविश्वास तर वाढलाच शिवाय ऑस्ट्रेलियाच्या मिडीयाने देखील कॅप्टन राहणेच्या या कृतीचे कौतुक केले. संपूर्ण संघ अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वाखाली एकजूट होऊन खेळला आणि सामना जिंकला.

चौथ्या कसोटीमध्ये पहिल्या सत्रापर्यंत भारतीय संघ गनिमी काव्यांनी लढला. ते उघडउघड युद्ध नव्हतं... हल्ला नव्हता. पस्तीस षटकांच्या पहिल्या सत्रात भारताने एकोणनव्वदच धावा केल्या होत्या. शुभमन गिल व पुजारा दोन्ही बाजू सांभाळून व संधी मिळताच धावा काढत होते. भारतीय संघाच्या मनात नक्की काय सुरू आहे, टीमचा प्लॅन काय आहे, ते सामना अनिर्णित राखण्यासाठी खेळत आहेत की जिंकण्याचा प्रयत्न करत आहेत हे ऑस्ट्रेलिया संघाला, हिंदीतील व इंग्रजीतील समालोचकांना, मैदानातील व भारतातील टीव्ही, मोबाईलसमोर बसलेल्या प्रेक्षकांनाही कळलं नव्हतं. दुसऱ्या सत्रात शुभमन गिल आऊट झाल्यावर अजिंक्य रहाणे आला आणि त्याने आक्रमक पवित्रा घेत चौकार आणि नॅथन लायनला अप्रतिम षटकार मारून भारतीय संघाचं उद्दिष्ट उघड केलं. त्याची ती चोवीस धावांची खेळी ही युद्ध उघडरित्या सुरू झाल्याचा शंखनाद होता. आता गनिमी कावा नाही उघडपणे मैदानात लढाईचा संदेश होता. सामन्याला कलाटणी देणारी ही खेळी होती कारण त्यात दोन्ही संघाला स्पष्ट संदेश दिला गेला. तोवर भारतीय टीमचे मनसुबे गुलदस्त्यात होते. कॅप्टनच सरळ आक्रमक पवित्रा घेत जिंकण्यासाठी खेळतोय त्यामुळे संघातील मधल्या फळीला प्रेरणा मिळाली.

रवी अश्विन हा काही वर्षांपासून कोहली शास्त्री यांच्याकडून, टीम मॅनेजमेंटद्वारे नीट हाताळल्या न गेलेला, गुदमरणारा खेळाडू आहे. तो अत्यंत हुशार आहे, त्याला आपल्या गोष्टी नीट मांडता येतात, हजरजबाबीपणा त्याच्याकडे आहे. या कारणांनीच टीममध्ये त्याला डावलण्यात येतं यावर सुनील गावस्करांनीही कटाक्ष टाकला आहे. तो मेलबर्न कसोटीमध्ये अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वाखाली मोकळेपणाने खेळताना दिसला. त्याच्या बॉलिंगमध्ये तो शार्पनेस तर जाणवलाच शिवाय कसोटीमध्ये तो "एक्सप्रेसिव्ह' दिसला. जसप्रीत बुमराहला पहिल्या इनिंगमध्ये एकदा सलग तीन मोठे शॉट्स लगावल्यावर रवी अश्विन त्याला समजावताना दिसला. असं चित्र या आधी कधी दिसलं का! सिडनी कसोटीत सर्वांगावर बॉलचा अंगार शरीरावर झेलतानाही त्याचा हजरजबाबीपणा शाबूत होता. टीम पेनने गाबामध्ये खेळायला येण्याची गोष्ट करताच अश्विनने पेनला "शाब्दिक पेन' दिले.

चेतन पुजाराने षटकांमागून षटके खेळत एक बाजू पक्की सांभाळत पडझड होऊ न देता त्याने सातत्याने संघाचा पायवा मजबूत केला. चौथ्या कसोटीत त्याने बॉडीलाईन बॉलिंग सहन करताना हेल्मेटवर, दंडावर, छातीवर बोटावर वार झेलले. संपूर्ण सिरीजमध्ये पुजारा ज्या बॉलवर आऊट झाला ते सर्व अनप्लेयेबल बॉल होते. ऑस्ट्रेलियन मीडियाने देखील पुजाराचे अत्यंत कौतुक केलं आहे. बुमराहच्या अनुपस्थित मोहम्मद सिराजने जबाबदारी घेत अफाट बॉलिंग करत पाच विकेट घेतल्या. शार्दूल ठाकूर व वॉशिंग्टन सुंदर यांनी मने जिंकली. ब्रिस्बेनमध्ये दोघांनी केलेल्या भागीदारीमुळेच ऑस्ट्रेलियाला मोठी आघाडी घेता आली नाही. सिडनी कसोटीत दुसऱ्या इनिंगमध्ये फ्रॅक्चर अंगठ्याला बँडेज करून पेन किलर घेऊन हातात बॅट घेऊन बॅटिंगला येण्याच्या तयारीत असलेला रवींद्र जडेजाचा फोटो हा बॉर्डर-गावस्कर २०२०-२०२१ कसोटी मालिकेची राजमुद्रा म्हणता येईल. कसोटी मालिका सुरू होण्यापूर्वी दिवसरात्र कसोटी सामन्यात रिषभ पंतने सहजरीत्या फटकेबाजी करत शतक ठोकले होते. इतकी सहजता असलेला खेळाडू स्वतःला न्याय देत नाही म्हणून त्याच्यावर टीका होते. आपल्या टीकाकारांना आपल्या हेटर्सना आपल्या संयमाने, पराक्रमाद्वारे, सकारात्मकतेने उत्तर द्ययाचं. तेही आपला आदर करतील कौतुकाने माना डोलवतील. हा रिषभ पंतने दिलेला अफाट धडा आहे. त्याने केलेली सिडनी व ब्रिस्बेन येथील खेळी पिढ्यानपिढ्या लोक लक्षात ठेवतील.

या मालिकेने कसोटी क्रिकेटचं सौंदर्य नवीन पिढीला दाखवून दिलं. भारतीय संघाने अंगावर वार झेलले, कोणाची मनगटं तुटली, अंगठे मोडले, हॅमस्ट्रिंग फाटली. कोणी छातीच्या बरगड्यावर पाठीवर जवळपास दीडशे किमी प्रति तास वेगवान बॉलची आग झेलली. एक फळी आपलं काम करून जायची दुसरी फळी त्यांची जागा घ्यायची. ते शर्थ करायचे. जखमी अनफिट प्रमुख खेळाडूंची दुसरी अकरा जणांची एक संपूर्ण टीम बाहेर बसली असताना त्यांच्या जागी नवोदित अननुभवी भारतीय टीमने जिगर दाखवत संपूर्णपणे सांघिक खेळ दाखवत, वंशिक शेरेबाजी झेलत, बॉलने जखमी होत सिरीज जिंकून दिली. हे अदभूत आहे. ब्रिस्बेन 'गाबा' जो ऑस्ट्रेलियाचा अभेद्य किल्ला होता, त्याला सगळ्यांनी एकत्र मिळून भगदाड ..खिंडार पाडलं. किल्ला सर केला. संपूर्ण सिरीज बघताना एक गाणं भारतीय टीमसाठी सुसंगत वाटतं...

कंधों से मिलते हैं कंधे, क़दमों से कदम मिलते हैं हम चलते हैं जब ऐसे तो दिल दुश्मन के हिलते हैं… वर्षानुवर्षे ऑस्ट्रेलियातील लोक आपल्या पुढील पिढ्यांना सांगतील, एक भारतीय टीम आली होती जिने इतिहास घडवला. महेंद्रसिंग धोनीचा २०११ वर्ल्डकपचा विजयी षटकार, २००७ ट्वेन्टी ट्वेन्टी वर्ल्डकप फायनलमधील श्रीशांतने मिसबहचा घेतलेला कॅच, १९८३ मधील शेवटची विकेट हे क्षण जसे भारतीय इतिहासात महत्व बाळगतात तसाच १९ जानेवारी २०२१ ला गाबावर रिषभ पंतने मारलेला विजयी चौकार अजरामर असेल. ह्या मालिकेतील संघ वर्ल्डकप जिंकलेल्या इतर संघाप्रमाणे इतिहासात सुवर्ण अक्षरांत कोरल्या गेला आहे. हा विजय संघात मोठी नावे नसलेल्या पोस्टर बॉईजशिवाय मिळवलेला महाविजय आहे.

abhijeetpanse.1@gmail.com

बातम्या आणखी आहेत...