आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मॅनेजमेंट फंडा:भविष्य ‘हरित’ करण्यासाठी पूर्वजांची जीवनशैली अंगीकारा

औरंगाबादएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

माझे मित्र दिवंगत राजकुमार केसवानी यांच्या घरी नेहमी सोलर कुकरमध्येच भात शिजवला जात असे. ऊर्जा संकटाची बातमीही नसायची तेव्हा हे घडायचे. मी त्यांच्या घरी गेलो की त्यांची बायको कुकर उन्हात ठेवायची. माझी केसवानी भाईंशी (मी त्यांना असेच संबोधत असे) चर्चा संपेपर्यंत जेवण शिजलेले असे. केसवानी भाई बॉलीवूडच्या सुंदर कथा लिहिण्यासाठी ओळखले जात होते व ते शेवटच्या श्वासापर्यंत तेच करत असत. अलीकडच्या काळात माझ्या माहितीनुसार, उत्तर भारतात सौरऊर्जा वापरणारे त्यांचेच कुटुंब होते. त्यांच्या बागेत व अंगणात लोणचे किंवा पापड कडक उन्हात सुकायचे आणि कुकरमध्ये काही शिजत राहायचे. त्यात डाळीचाही समावेश होता. माझ्यासाठी केसवानी भाईंचे घर नेहमीच ग्रीन हाऊस होते. जगाने आधुनिक ऊर्जा वापरणारी गॅजेट्स दाखवायला सुरुवात केली तेव्हा त्यांनी ‘जुन्या पद्धतीने जगण्याच्या आपल्या मार्गा’बद्दल अभिमानाने सांगितले.

मी ऊर्जा संकटाच्या बातम्या वाचतो तेव्हा मला त्यांचे घर आठवते. जगाला याचा सामना करावा लागत आहे आणि विकसित देश युक्रेनविरुद्ध युद्ध पुकारणाऱ्या व्लादिमीर पुतीन यांना दोष देत आहेत. पण, केवळ पुतीनच दोषी नाहीत. आपण ऊर्जेच्या सध्याच्या मागणीबद्दल बोलतो, तर भारतासारख्या देशांच्या भविष्यातील मागणीबद्दल बोलत नाहीत, हेही संकटाचे एक कारण आहे. ऑक्टोबरमध्ये इंटरनॅशनल एनर्जी एजन्सीने एनर्जी आउटलूक २०२२ जारी केले, त्यानुसार भारताची ऊर्जेची मागणी २०२१ ते २०३० पर्यंत वार्षिक ३% वाढेल, ती जगातील सर्वाधिक आहे. या मागणीचे दोन पैलू आहेत. पहिला, आपली आर्थिक वृद्धी आणि दुसरा प्रत्येक कुटुंबाची ऊर्जेची मागणी आपण कशी पूर्ण करणार हा मूक प्रश्न आहे. कार्बन फुटप्रिंट कमी करण्यासाठी सरकार स्वच्छ ऊर्जा निर्मितीवर भर देत असताना मला वाटते, सौरऊर्जेचा वापर करण्याबाबत लोकांना जागरूक करण्याची गरज आहे, जेणेकरून भारताला या हिवाळ्यात ब्रिटनसारखा दबाव सहन करावा लागणार नाही. अत्यंत थंडीत हीटर्स कसे चालवायचे, असा विचार ब्रिटनचे रहिवासी करत आहेत.

त्यामुळे आज नाही तर आठ वर्षांनी आपल्याला ऊर्जा संकटाला सामोरे जावे लागेल हे विसरू नका. तुमच्या मुलांचे पर्यायी साधनांद्वारे जीवन सुसह्य व्हावे, असे वाटत असेल तर त्यांना त्यांच्या पूर्वजांचे जीवन जगण्याचे मार्ग सांगा. पूर्वजांनी कधीही इस्त्रीसाठी चादर दिली नाही, ते ती मोठ्या ट्रंकखाली ठेवत असत. वाया जाऊ नये म्हणून त्यांनी ग्लासात अर्धे पाणी कधीही सोडले नाही. लक्षात ठेवा, आज तेच पाणी नळांमध्ये आणण्यासाठी आणि नंतर आरओ मशीनने स्वच्छ करण्यासाठी ऊर्जा लागते. पूर्वजांनी अन्न फ्रिजमध्ये काही आठवडे ठेवून, नंतर गरम करून खाल्ले नाही. ते कमी स्वयंपाक करत, कमी खात आणि डॉक्टरांकडे कमी जात असत. कमी खाणे आणि वाया न घालवणे हे गरिबीचे लक्षण नाही, तसेच ताटात अन्न टाकणे हे श्रीमंतीचे लक्षण नाही. आजकाल ‘माझा सिलिंडर तर फक्त दहा दिवस चालतो’ असे म्हणण्याची प्रथा आहे. मुलांच्या भल्यासाठी या विचारातून बाहेर पडायला हवं. सरकार ऊर्जेचे दर कमी ठेवण्यासाठी आणि उत्पादनासाठी काय करत आहे याबद्दल जास्त काळजी करू नका, असा माझा सल्ला आहे. या वेळी जे प्रयत्न केले जातील, त्यामुळे हरित ऊर्जेकडे वेगाने वाटचाल होण्यास मदत होईल.

फंडा असा ः आपल्या वेगळ्या मार्गाचा विचार करा, आपल्या पूर्वजांच्या जीवनातून कल्पना शोधा आणि ऊर्जेचा वापर किमान करण्याचा प्रयत्न करा.

एन. रघुरामन, मॅनेजमेंट गुरू [raghu@dbcorp.in]

बातम्या आणखी आहेत...