आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Opinion
  • Advice To US: Talk Less About Ukraine, Do More | Article By Thomas L. Freedman

दृष्टिकोन:अमेरिकेला सल्ला : युक्रेनवर कमी बोला, कृती जास्त करा

औरंगाबाद9 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

एनएचएल टीम नॉर्थ स्टार्सचे स्पोर्ट््स कास्टर एल. शेव्हर यांनी मला आयुष्यातील पहिला धोरणात्मक धडा शिकवला. ते म्हणायचे, आपण हरतो तेव्हा कमी बोलावे. आणि जिंकत असताना बोलण्याची गरजच काय आहे? स्कोअरकार्डच सत्य सांगेल. राष्ट्राध्यक्ष बायडेन आणि त्यांच्या टीमने या बुद्धिमत्तेचा काही फायदा घेतला तर बरे होईल.

गेल्या आठवड्यात पोलंडमधील युक्रेनियन सीमेजवळ अमेरिकेचे संरक्षण सचिव लॉयड ऑस्टिन यांनी माझे लक्ष वेधून घेतले. व्लादिमीर पुतीन यांच्या नजरेतूनही ते लपून राहणार नाहीत. लॉयड म्हणाले, अमेरिकेचा उद्देश केवळ युक्रेनला मदत करणे नाही, तर रशियाला कमकुवत करणेसुद्धा आहे, जेणेकरून भविष्यात ते पुन्हा कोणत्याही देशावर हल्ला करण्याचे धाडस करू शकणार नाही. लॉयड इथेच थांबले नाहीत. ते पुढे म्हणाले, रशियाने आधीच आपल्या लष्करी क्षमतेचा मोठा भाग गमावला आहे आणि तो ते लवकर भरून काढू शकणार नाही, हे दिसतेच आहे.

कृपया मला सांगा की, हे विधान राष्ट्राध्यक्षांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या राष्ट्रीय सुरक्षा परिषदेच्या बैठकीचे फलित होते का? त्यांनी सर्व संभाव्य परिणामांचा गांभीर्याने विचार करून असे विधान करायचे की नाही आणि ते आपल्या हिताचे आहे का, याचा निर्णय घेतला का? पुतीन यांचा अपमान करणे म्हणजे अमेरिकेवर अण्वस्त्र हल्ल्याच्या धोक्याला आमंत्रण आहे, असे वाटले होते का? मला चुकीचे समजू नका, मला फक्त आशा आहे की, युद्ध संपेपर्यंत रशियाचे सैन्य संपलेले व पुतीन यांची सत्ता गेलेली असेल. परंतु, मी कोणत्याही देशाचा नेता असेन तरीही मी हे कधीच जाहीरपणे बोलणार नाही. कारण मला त्यातून काहीही मिळणार नाही, तथापि यामुळे नुकसान नक्कीच होऊ शकते.

भ्रामक गोष्टींमुळे चांगला चाललेला खेळ बिघडतो, असे म्हणतात. बायडेन यांच्या टीमच्या वतीने आवश्यकतेपेक्षा जास्त दिशाभूल करणाऱ्या गोष्टी बोलल्या जात आहेत. उदा. लॉयड यांच्या वरील विधानानंतर काही काळाने राष्ट्रीय सुरक्षा परिषदेच्या प्रवक्त्याने सीएनएनच्या हवाल्याने म्हटले की, अमेरिकेच्या संरक्षणमंत्र्यांच्या विधानाने अमेरिकेची उद्दिष्टेच सादर केली आणि ती म्हणजे युक्रेनवरील हल्ल्याला रशियाचे धोरणात्मक अपयश बनवणे. चांगला प्रयत्न आहे. पण, याला लॉयड यांच्या विधानावर सारवासारव मानले जाईल. रशियाला युक्रेन सोडण्यास भाग पाडणे ही वेगळी आणि आम्हाला ते कमकुवत झालेले पाहायचे आहे, असे उघडपणे जाहीर करणे ही वेगळी गोष्ट आहे. अशी उद्दिष्टे डोळ्यासमोर ठेवून कोणताही संघर्ष होत नाही. कारण हे ध्येय आपण कधी गाठणार आहोत? आणि ही आधीच सुरू असलेली प्रक्रिया आहे का?

मार्चमध्ये पोलंडमध्ये केलेल्या भाषणात बायडेन म्हणाले की, पुतीन हे हुकूमशहा आहेत आणि ते साम्राज्य पुन्हा उभारण्याचा प्रयत्न करत आहेत. आमचे अध्यक्ष महोदय पुढे म्हणाले, हा माणूस सत्तेत राहू शकत नाही. यानंतर व्हाइट हाऊसला पुन्हा स्पष्टीकरण द्यावे लागले की, बायडेन हे रशियामधील सत्ता बदलाबद्दल बोलत नव्हते, ते फक्त पुतीन यांना त्यांच्या शेजाऱ्यांवर ताकद वापरण्याची परवानगी देऊ शकत नाही, हे दर्शवत होते.

आणखी एक सारवासारव. आणि हे सिद्ध करते की, राष्ट्रीय सुरक्षा परिषदेच्या बैठकीत अमेरिका कोणत्या सीमेवर युक्रेनला मदत सुरू करते आणि संपवते यावर कोणतीही चर्चा झाली नाही. ज्या प्रकारची विधाने येत आहेत, ते पाहून असे वाटते की, ज्याच्या मनाला येत आहे, ते बोलत आहेत, ही काही चांगली गोष्ट नाही.

आमचे ध्येय सोपे आहे आणि ते तसेच राहिले पाहिजे. त्यांच्यात प्रतिकाराची भावना आहे तोपर्यंत आम्हाला या युद्धात युक्रेनियन लोकांना मदत करायची आहे. योग्य वेळ असेल तेव्हा त्यांना रशियाशी संवाद साधण्यात मदत करायची आहे, जेणेकरून ते सार्वभौमत्व परत मिळवू शकतील. कोणताही मोठा देश आपल्या जवळच्या लहान देशाला गिळंकृत करू शकत नाही, या तत्त्वाचे आम्ही समर्थन करतो. यापेक्षा जास्त बोललात तर स्वतःसाठीच संकटांना आमंत्रण द्याल. रशियामध्ये जे काही घडते त्याला अमेरिका जबाबदार असावी, असे आम्हाला वाटत नाही, कारण पुतीन यांच्या जागी त्यांच्यापेक्षा वाईट कोणी तरी येण्याची शक्यता आहे. अरबस्तानमध्ये आपण पाहिलं की, लोकशाहीत हुकूमशाही संपत नाही, तर ती अराजकातही संपू शकते. आणि ६ हजार अण्वस्त्रे असलेल्या देशात अराजकाचे अस्तित्व संपूर्ण जगासाठी धोक्याचे आहे. (ही लेखकाची वैयक्तिक मते आहेत.)

थॉमस एल. फ्रीडमन तीन वेळचे पुलित्झर अवॉर्ड विजेते व ‘द न्यूयॉर्क टाइम्स’चे स्तंभलेखक

बातम्या आणखी आहेत...