आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Opinion
  • After The Fall Of Al Qaeda, New Equations Will Emerge In Asia | Article By Dr. Vedpratap Vaidik

दृष्टिकोन:अल-कायदाच्या पतनानंतर आशियात उदयाला येतील नवीन समीकरणे

औरंगाबाद15 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

अल -कायदाचा म्होरक्या जवाहिरी त्याचा उस्ताद ओसामाप्रमाणेच मारला गेला. ओसामा पाकिस्तानात, तर जवाहिरी अफगाणिस्तानात मारला गेला. ओसामा सौदी अरेबियाचा, तर जवाहिरी इजिप्तचा होता. दोघेही आपापले देश सोडून तिथेच स्थायिक झाले आणि तिथेच दहशतवादाचे अड्डे केले होते. पण, आता अल-कायदाचे काय होणार आणि या घटनेचा अफगाणिस्तान, पाकिस्तान, भारतावर काय परिणाम होईल, याचा आपण विचार करायला हवा.

अल-कायदामध्ये आता जवाहिरीचा उत्तराधिकारी शोधला जाईल. ओसामाच्या काळात जशी होती तशी अल-कायदा आता राहिली नाही. ती अधिकाधिक कमकुवत होत गेली आहे. तिच्या अनेक तुकड्यांनी आपापल्या संघटना निर्माण केल्या आहेत. ‘इस्लामिक स्टेट ऑफ खोरासन प्रोव्हिन्स’ (आयएसकेपी) नावाची दहशतवादी संघटना आता पश्चिम आणि दक्षिण आशियातील देशांमध्ये पसरत आहे. जवाहिरीची जागा घेण्यासाठी तीन-चार नावे पुढे येत आहेत, पण त्यांना माहीत आहे की, सध्या अफगाणिस्तान आणि पाकिस्तानची स्थिती इतकी वाईट आहे की ते पूर्वीप्रमाणे अल-कायदा, इस्लामिक स्टेट, अन्सार-अल-इस्लाम आणि दक्षिण आशियाई अल-कायदा सारख्या संघटनांना मदत करू शकत नाही.

परंतु, अफगाणिस्तानच्या तालिबान सरकारच्या मदतीशिवाय जवाहिरी काबूलच्या शेरपूरसारख्या चांगल्या परिसरात राहू शकत होता का? तो ज्या फ्लॅटमध्ये राहत होता तोही एका तालिबानी नेत्याच्या नातेवाइकाचा असल्याचे सांगण्यात येत आहे. एकीकडे तालिबान दहशतवादाला विरोध करण्याची भाषा करतात, तर दुसरीकडे जवाहिरीसारख्या कितीतरी दहशतवाद्यांना काबूल, कंदहार आणि जलालाबादमध्ये आश्रय दिला जातो. अमेरिकन सरकारने तालिबान सरकारवर २०२० च्या दोहा कराराचे उल्लंघन केल्याचा आरोप केला आहे. त्यात तालिबानने अफगाणिस्तानच्या भूमीवर कधीही दहशतवाद वाढू देणार नाही, असे वचन दिले होते. या मुद्द्यावर तोंड लपवण्याऐवजी तालिबान सरकारने अमेरिकेवर टीका केली आहे. संकटात सापडलेल्या अफगाणी जनतेला मदत करण्याचा प्रयत्न करणारे देशही आता या घटनेने चक्रावून जातील.

मात्र, चीनने अमेरिकेवर अफगाणिस्तानच्या सार्वभौमत्वाचा भंग केल्याचा ठपका ठेवला आहे. याचे मूळ कारण पॅसिफिक आणि पश्चिम आशिया प्रदेशात चीनविरोधी आघाडी उभारण्याचे अमेरिकेचे धोरण आहे. याशिवाय अफगाणिस्तानातील खनिज पदार्थांच्या खाणींवर आपली मक्तेदारी असावी, अशी चीनची इच्छा आहे. चीनप्रमाणे भारताने कधीही अफगाणिस्तानचे शोषण करण्याचा प्रयत्न केला नाही. भारत सरकारने अफगाणिस्तानमध्ये इतर कोणत्याही देशापेक्षा अधिक निःस्वार्थ बांधकामे केली आहेत. काबूलमध्ये पाकिस्तान समर्थक तालिबान सरकार स्थापन होऊनही भारताने अफगाण लोकांसाठी हजारो टन अन्नधान्य आणि औषधे पाठवली. मात्र, तालिबान सरकारशी संबंध कसे टिकवायचे याचाही विचार भारताला करावा लागणार आहे. हक्कानी गट तालिबानमधील प्रबळ गट आहे आणि त्यांचे अल-कायदाशी जवळचे संबंध आहेत. भारताने काबूलमधील आपला दूतावास पुन्हा सक्रिय केला आहे, परंतु तालिबान सरकारच्या तरुण घटकांवर दहशतवादाला प्रोत्साहन देऊ नये किंवा कोणत्याही राष्ट्राचा मोहरा बनण्याचा प्रयत्न करू नये, यासाठी दबाव ठेवावा लागेल. या वेळी भारताची भूमिका एकाच वेळी थंड आणि गरम अशी आवश्यक आहे. यामध्ये पाकिस्तानची अवस्था फार विचित्र झाली आहे. ओसामावर अमेरिकेचा हल्ला पाकिस्तानच्या मदतीशिवाय झाला असता का? पाकिस्तानच्या बळावर उड्या मारणाऱ्या ओसामा आणि जवाहिरीचाही पाकिस्तानच्या मदतीनेच खात्मा करण्यात आला यात नवल नाही. पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाने आपल्या वक्तव्यात जवाहिरीचे नाव घेतले नाही किंवा अमेरिकेचा निषेधही केला नाही. पाकिस्तानची ही वृत्ती म्हणजे एखाद्या लबाड आणि अंधानुकरणी राष्ट्राचे अपरिहार्य नशीब आहे. (ही लेखकाची वैयक्तिक मते आहेत.)

डॉ. वेदप्रताप वैदिक भारतीय परराष्ट्र धोरण परिषदेचे अध्यक्ष dr.vaidik@gmail.com

बातम्या आणखी आहेत...