आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘ती’च्या गोष्टी:उदबत्त्या विकणाऱ्या आज्जीबाई

औरंगाबाद22 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

रोज संध्याकाळी जॉगिंगला जाण्याचा माझा शिरस्ता बरीच वर्षं चालू आहे. मी धावायच्या मार्गावरील चौकात बऱ्याच दुकानांचा एक क्लस्टर लागतो. संध्याकाळी बरेचदा हा परिसर गर्दीने फुलून गेलेला असतो. एके दिवशी तिथे खरेदी करत असताना मध्येच म्हातारा आवाज कानावर आला. रस्त्याच्या कडेला असलेल्या एका चौथऱ्यावर बसलेल्या आज्जीबाईंनी मला हाक मारली होती. ‘ये रे बाळा, घे ना उदबत्त्या. तेवढीच म्हातारीला मदत.’

त्या सत्तरीच्या मागेपुढे असाव्यात. गोलसर सुरकुतलेला चेहरा. गहूवर्ण. थकलेल्या, दमलेल्या. काहीतरी कारण असणार, त्याशिवाय या वयात आज्जी तिथे उदबत्त्या विकायला बसल्या नसाव्यात, असं मला वाटून गेलं. मी थांबलो आणि फुटपाथवर मांडलेल्या उदबत्त्यांची पाकिटं पाहिली. तसा त्यांनी माझा हात धरला. खरखरीत होता तो स्पर्श. त्या कळवळून म्हणाल्या, ‘बाळा, घेतोस का एखादं पाकीट? मोगरा, चंदन, केवडा सगळ्या प्रकारचा सुगंध आहे.’ मी म्हणालो, ‘हो, आज्जी. पाहतो जरा.’ मी द्विधा मनःस्थितीत गेलो. मी उदबत्त्यांचं घेऊन करणार काय होतो? मी देवाचं काही करत नाही किंवा अगदी माझ्या ओळखीतले बरेच जणही फार काही करणारे नाहीत. आता आज्जींना नाही म्हणवणं शक्य नव्हतं आणि उदबत्त्या घेतल्या तर त्याचं करायचं काय, असा प्रश्न होता.

मी म्हणालो, ‘ही मांजर तुमची का?’ आज्जी म्हणाल्या, ‘खरं तर इथे मी बसू लागले तेव्हा लागला तिचा मला आणि मला तिचा लळा. एके दिवशी खायला दिलं तिला, मग येऊ लागली. म्हातारीला तेवढाच आधार.’ ‘अच्छा, वा, छान,’ असं म्हणून काय करायचं याचा विचार करू लागलो. आज्जीबाई म्हणाल्या, ‘कोणतं पाकीट देऊ?’ मी म्हणालो, ‘आज्जीबाई खरं तर मी उदबत्त्या वापरत नाही. पण तुम्हाला पैसे हवे असतील तर...’ त्या तत्काळ उत्तरल्या, ‘नाही, मला असेच पैसे नको. नाही तर भीक मागितली नसती का बाळा? जा तू, नको असतील तुला उदबत्त्या तर ठीक आहे.’

मी खजील झालो. म्हणालो, ‘नाही हो, मी घेतो पाकीट एक. मग पाहतो काय करता येईल ते.’ असं म्हणून चंदनी उदबत्तीचं एक मोठं पाकीट मी घेतलं. आज्जीबाईंनी सांगितलेली किंमत चुकती करून निघालो. थोडा पुढे गेलो तोच तिथल्याच एका फळविक्रेत्याने मला गाठून आजीबाईंची कर्मकहाणी सांगितली.

आज्जीबाईंच्या हाताला भारी चव. म्हणून त्यांनी नवऱ्याच्या मृत्यूनंतर नोकरी करणाऱ्यांना डबे द्यायला सुरुवात केली. त्यावर मुलाला मोठं केलं. नंतर मुलाच्या मदतीने छोटीशी खानावळही सुरू केली. मग हळूहळू तिथे न्याहारीचे पदार्थ द्यायला सुरुवात केली. मग उकडीचे मोदक, खोबऱ्याच्या वड्या, असे पॅकबंद ताजे व सकस जिन्नसही ठेवले. त्यांच्या सुगरणपणा आणि मुलाची व्यवसाय करण्याची हातोटी यांच्या जोरावर त्यांचा हा धंदा चांगला चालू लागला. मोदक, गुलाबजाम, खरवस अशा ऑर्डर्स वाढल्या. मुलाचं लग्न झालं. आज्जींना नातूही झाला. आज्जीबाई आणि सून किचन सांभाळायच्या आणि मुलगा गल्ला, व्यावसायिक वाढ इत्यादी बघायचा. ‘सगळं छान चाललेलं असताना नियतीने घात केला बघा सर,’ तो विक्रेता म्हणाला. ‘आज्जींच्या मुलाच्या अख्ख्या परिवाराचा अॅक्सिडेंटमध्ये मृत्यू झाला. कोकणात कुठेतरी जात होते फिरायला म्हणे. आज्जी तेवढ्या राहिल्या मागे. नातेवाइकांनी काय केलं माहिती नाही, पण त्यांची खानावळ ताब्यात घेतली हो अख्खी, आणि यांना सोडलं असंच वाऱ्यावर. आज्जींना व्यवहार वगैरे काही समजत नाही. मुलगाच ते पाहायचा. आता विकतात हे असलं काहीतरी किडूकमिडूक...’

त्यानंतर मी आज्जींकडून बरेचदा उदबत्त्या घेऊ लागलो आणि जवळच असलेल्या मंदिराला देऊन टाकू लागलो. आमची बऱ्यापैकी ओळख झाली. एकदा मी त्यांना विचारलं, ‘आज्जी तुमच्याकडे पाहून मला असं वाटलं की तुम्ही उकडीचे मोदक भारी करत असाल. मला द्याल का करून? शिधा देईन मी.’ काय उजळला त्यांचा चेहरा! लागलीच ‘हो बाळा, अरे हल्ली पारी किती जाड करतात रे. चिवट होतात त्याने. मैदा घालत असणार नक्की. काय करायचं माहितेय का...’ असं म्हणून उकड मऊसूत होण्यासाठी काय करायचं हे त्या सांगू लागल्या. मग म्हणाल्या, ‘माझ्या रवीला, सोनुल्याला फार आवडायचे मोदक. संकष्टीला ठरलेले असायचे रे. पण आता...’ त्यांच्या म्लान झालेल्या डोळ्यांमधून पाणी गळू लागलं. त्या मुला-नातवाबद्दल बोलत होत्या. मला गलबलून आलं. मी विचारलं, ‘सांगा, काय आणून देऊ?’

आज्जी म्हणाल्या, ‘मी करून आणते रे. तू काही नको देऊस!’ ‘आज्जी तुम्ही करा सगळं. पण मी पैसे देणार त्याचे बाजारभावाप्रमाणे. असं समजा की मी ऑर्डर दिलीय तुम्हाला.’ त्या म्हणाल्या, ‘माझा रवी गेल्यावर मी सोडलं रे स्वयंपाक करणं. तुझ्यात मला तो दिसला कुठेतरी म्हणून करतेय. या मांजरीशी एक नातं तयार झालं, तसंच आता तुझ्याशी. पैशाचा विषय नको काढूस. शनिवारी आणते करून. चालेल?’ मला यावर काही बोलता आलं नाही. गळा नुसता दाटून येत होता. मी म्हणालो, ‘मग आता तुम्हाला आमच्या घरी यावं लागेल मोदक घेऊन. माझी मुलगी, बायको सगळ्यांना भेटायला याल ना?’ ‘हो रे हो, येईन की,’ त्या पाणावलेल्या डोळ्यांनी म्हणाल्या. ..आणि पुढच्या दोन दिवसांत लॉकडाऊन लागला! पहिल्यांदा पंधरा दिवसांचा वाटलेला हा काळ वाढतच गेला. घरात बसण्यावाचून पर्याय नव्हता. मला राहून राहून आज्जींचं काय झालं असेल हेच मनात येत होतं. मी त्यांचा किंवा त्या फळविक्रेत्याचा नंबर का नाही घेऊन ठेवला, याचं वाईट वाटत होतं. अखेरीस काही महिन्यांनी जेव्हा थोडंफार बाहेर फिरता यायला लागलं, तेव्हा मी आज्जी बसायच्या त्या ठिकाणी गेलो. तिथे आज्जी नव्हत्या. रोज मी वेगवेगळ्या वेळांना जाऊन पाहिलं, तरी त्या दिसल्या नाहीत. मग एके दिवशी तिथे असलेल्या दुसऱ्या फळ-विक्रेत्याने मला विचारलं, ‘आज्जींना शोधताय का सर?’ ‘हो. तुम्हाला माहितेय?’ ‘खरंखोटं मालूम नाही, पण त्यांना म्हणे कोरोना झाला. गेल्या त्या.’ मी सुन्न झालो. मला काय बोलावं हे सुचेना. तोच त्याच्या मागून सोनेरी ठिबक्यांचं मांजर आलं. माझ्या पायाशी घुटमळू लागलं, अंग घासू लागलं. मी त्याला उचललं, त्याचे लाड केले आणि घरी घेऊन आलो!

प्रणव सखदेव संपर्क : 7620881463

बातम्या आणखी आहेत...