आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रासंगिक:अक्कणमाती... चिक्कणमाती...

औरंगाबाद8 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

भुलाबाईची सांगता कोजागरी पौर्णिमेला होते. ३२ प्रकारचा खाऊ, नैवेद्य भुलाबाईला दाखवला जातो. शीतल चंद्रप्रकाशात दूध आटवून, गाणी-गप्पा-गोष्टींच्या वातावरणात भुलाबाईची सांगता होते. भुलाबाई उत्सव साजरा करताना जाती-धर्माच्या सीमारेषा गळून पडतात. सारा भेद विसरून भुलाबाईची गाणी मंगलमय वातावरणात म्हटली जातात. सर्वांनी एकत्रित व्हावं, एकोप्याने राहावं हा या उत्सवामागचा संदेश आहे.

भाद्रपद पौर्णिमा ते कोजागरी पौर्णिमा असणारा भुलाबाई उत्सव. आजकाल अनेक संघटना भुलाबाई महोत्सवाचं, भुलाबाई गीतांच्या स्पर्धांचं आयोजन करतात. सामाजिक संदेश, लोकठेवा-लोकपरंपरा जतन, सामाजिक प्रश्नांबद्दल जनजागृती अशी विविधांगी जोडही या उत्सवाला दिली जातेय.

श्रा वणातील मंगळागौर, हरतालिका झाल्यानंतर भाद्रपदाची चाहूल लागते. लाडक्या गणरायाच्या विसर्जनानंतर वेध लागतात ते भुलाबाईचे. महाराष्ट्रात भुलाबाई उत्सव भोंडला, हादगा, गुलाबाई अशा नावांनी ओळखला जातो. नवीन आलेल्या धान्यपूजनाच्या स्वागतासाठी हा सण हर्षोल्हासात साजरा होतो. भाद्रपद महिन्याच्या पौर्णिमेपासून सुरू होणारा हा उत्सव कोजागरी पौर्णिमेपर्यंत असतो. भुलाबाई म्हणजे माहेरवाशीण. ती एका महिन्यासाठी माहेरी येते. तिचाच हा सण. भुलाबाईसोबत भुलोजी आणि त्यांची लेकरं म्हणजेच लहानगा गणेशसुद्धा असतात. सखी पार्वतीचा हा उत्सव लोकसंस्कृतीचा आणि लोकपरंपरेचा अमूल्य ठेवा आहे. देवी पार्वती सारीपाट खेळत असता रुसून निघून जातात आणि भगवान शंकर आदिवासी भिल्लाच्या रूपात पार्वतीकडे येतात, अशी अाख्यायिका आहे. आपल्या संस्कृतीत प्रत्येक प्रसंगाला अनुसरून गीतं आहेत. जात्यावरच्या ओव्या, लग्नाची, बारशाची, मंगळागौर गीतं, डोहाळे गीतं...तशीच भुलाबाईचीही गीतं आहेत.

पूर्वी मोठमोठे वाडे होते. गल्ल्या-गल्ल्यांमधून टिपऱ्यांचा आवाज सायंकाळ झाली की कानावर पडायचा. रंगीबेरंगी फ्रॉक घातलेल्या लहान मुली मोठ्या ठेक्यात भुलाबाईची गाणी गात. भुलाबाईच्या पूजेसाठी सकाळी उठून आम्ही वेगवेगळी फुले गोळा करून आणत असू. भुलाबाईला हार, मोत्यांची माळ घालून तिची सजावट करण्यात भारी मौज वाटायची. रोज आईच्या मागे खाऊसाठी तगादा लावत असू. “अस्सा खाऊ कर की कुणी ओळखायला नको’ असं म्हणून आज जिच्याकडे खाऊ भारी असायचा तिची फुशारकीच निराळी असायची. बंद डब्यातला खाऊ ओळखणं हा सोहळा असायचा बालपणी. लहान मुली, किशोरवयीन, मध्यमवयीन अशा प्रत्येक वयोगटातल्या स्त्रीचं भुलाबाईशी भावविश्व जोडलेलं असतं. नाचणाऱ्यांना ठेका धरायला लावणारी, चेष्टामस्करींची, रुसव्या-फुगव्याची, नात्यातला गोडवा जपणारी, स्त्रीचं भावविश्व उलगडणारी भुलाबाईची गाणी विशिष्ट ठेक्यातली, चालीतली आणि लयीतली आणि निसर्गाशी नातं सांगणारी असायची. आता हेच बघा ना, “कारल्याचा वेल’, “कोथिंबिरी बाई गं’, “एक लिंबू झेलू बाई’, “सा बाई सु बेलाच्या झाडाखाली महादेवा तू ‘ ह्या गाण्यांत हारात गुंफलेल्या सगळ्या फुलांचा सुगंध येतो. भुलाबाईच्या गाण्यात सासू-सासरे, दीर-जाऊ, नणंद-भावजय या सगळ्यांचा उल्लेख येतो.

“अक्कण माती चिक्कण माती’, “शिंक्यावरचं लोणचं लोणी खाल्लं कुणी’, यात दादा तुझी बायको चोरटी असं म्हणणारी, चेष्टामस्करी करत असताना भावजयीला अलगद घरच्या लक्ष्मीचा मान देते, रुसून माहेरी गेलेल्या भुलाबाईला घरातील सगळे घ्यायला जातात. पण पतीच्या आगमनाची वाट पाहणारी, पतीच्या प्रेमासाठी आसुसलेली भुलाबाई पती आल्यावरच सासरी जायला निघते. कारल्याचा वेल लाव गं सुनबाई मग जा, आपल्या माहेरा’ या गीतातून सुरुवातीला कजाग वाटणारी सासू, कारल्याला कारलं येईपर्यंत आपल्या भावनांना मुरड घालणारी सून, असं त्यांचं गोड नातं दिसून येतं. नंतर हीच कजाग वाटणारी सासू प्रेमळ होते, दुधावरची साय होते, तिची माय होते आणि मग “आणा फणी घाला वेणी जाऊ द्या राणीला माहेरा’असं म्हणून सुनेला माहेरी पाठवते. सासर-माहेराला जोडणारी ही गीते ,चेष्टामस्करीतून मनातल्या भावना उलगडतात. ही गीते जुन्या नव्याची सांगड घालूनदेखील आता म्हटली जातात. गीतांतून स्वच्छतेचा, पर्यावरणाचा, हुंडाबळीविरोधाचा संदेश दिला जातो. भुलाबाईची सांगता कोजागरी पौर्णिमेला होते. कोजागरी पौर्णिमेला ३२ प्रकारचा खाऊ, नैवेद्य भुलाबाईला दाखवला जातो. शीतल चंद्राच्या प्रकाशात दूध आटवतात. गाणी-गप्पा-गोष्टींच्या वातावरणात भुलाबाईची सांगता होते. भुलाबाई उत्सव साजरा करताना जाती-धर्माच्या सीमारेषा गळून पडतात. चमचाभर खाऊमध्ये तृप्तीचा, समाधानाचा आनंद मिळतो. सर्वांनी एकत्रित व्हावं, एकोप्याने राहावं हा या उत्सवामागचा संदेश आहे. या उत्सवातून संस्कृती, संस्कार पुढच्या पिढीत संक्रमित केले जातात. दैनंदिन धकाधकीच्या जीवनात तणावरहित जीवनशैलीमध्ये अशा सणांची नितांत गरज आहे. ही संस्कृती जपणं आपलं कर्तव्य आहे.

वैदेही नाखरे संपर्क : 9326186779

बातम्या आणखी आहेत...