आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

ढाई आखर प्रेम का...:"व्हॅलेंटाईन डे'... गुलजारच्या नजरेतून!

अलीम रंगरेज21 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

कवी गुलजार यांची गीतं प्रतिमा-प्रतिकांचे वेगवेगळे रंग घेऊन येतात. पण गोष्ट जेव्हा इश्काची, प्रेमाची असते तेव्हा उमगतं, की गुलजार नावाचा हा कवी आपल्या गाण्यांच्या आत, खोलखोल कितीतरी अनोखी गुपितं दडवून ठेवतो... गुलजार मुळातच निसर्गप्रेमी कवी. त्यामुळं ते जे प्रेम उलगडून समोर ठेवतात तेसुद्धा निसर्गसारखंच सहजसच्चं, अनोखं बनून जातं. हे गुलजारी तत्त्वज्ञान मोठाच अद्भुत अनुभव देणारं... फेब्रुवारीच्या या प्रेमरंगी महिन्यात गुलजार यांच्या नजरेतून प्रेम नेमकं काय आहे हे समजून घेतलं पाहिजे....

कवी गुलजार यांची गीतं प्रतिमा-प्रतिकांचे वेगवेगळे रंग घेऊन येतात. पण गोष्ट जेव्हा इश्काची, प्रेमाची असते तेव्हा उमगतं, की गुलजार नावाचा हा कवी आपल्या गाण्यांच्या आत, खोलखोल कितीतरी अनोखी गुपितं दडवून ठेवतो... गुलजार मुळातच निसर्गप्रेमी कवी. त्यामुळं ते जे प्रेम उलगडून समोर ठेवतात तेसुद्धा निसर्गसारखंच सहजसच्चं, अनोखं बनून जातं. हे गुलजारी तत्त्वज्ञान मोठाच अद्भुत अनुभव देणारं... या फेब्रुवारीच्या प्रेमरंगी महिन्यात गुलजार यांच्या नजरेतून प्रेम नेमकं काय आहे हे समजून घेतलं पाहिजे. कदाचित या तीन गाण्यांमधून तुम्हाला तुमच्या प्रेमाला समजण्याचा, त्याला जरा सजवत त्याला नव्यानं न्याहाळण्याचाही एक नजरिया मिळून जाईल.

“हमने देखी है उन आँखों की महकती ख़ुशबू,

हाथ से छू के इसे रिश्तों का इल्ज़ाम न दो

सिर्फ़ एहसास है ये रूह से महसूस करो,

प्यार को प्यार ही रहने दो कोई नाम न दो

हे एक नाजूकसं गीत... असं गीत, जे प्रेमाचं भव्य,उदात्त रूप दाखवतं. असं होतं कधीकधी, की कुण्या दोघांना एकमेकांची ओढ लागते, दोन्ही मनात एकमेकांबद्दल संवेदना आणि प्रेम जागतं. डोळे बोलत असतात सगळं, साधी नजरानजर झाली तरी हवेत खुशबू दरवळायला लागते. एक उत्कटता असते ओसंडून वाहणारी पण नात्याला नाव तर कुठलंच नसतं. आणि समाजात तर आपण हरेक नात्याला एक नाव किंवा लेबल म्हणा हवं तर, लावत राहतो. त्या लेबलनुसारच त्या व्यक्तीनं वागावं अशी अपेक्षा करायला लागतो. एक जपानी म्हण आहे, 'मालकीहक्क गाजवण्याची वृत्ती कुणालाही गमावण्याचं पाहिलं कारण ठरते. अर्थात इथं गोष्ट कुणाला गमावण्याची नसून त्या नात्याची निरागसता, प्रवाहीपण हरवण्याची आहे.

गुलजार म्हणतात, की कुठल्याही नात्याला लेबल न लावणं हेच सर्वात चांगलं. यातूनच प्रेम नितळ आणि अविचल राहू शकतं. अध्यात्मिक अंगानं बघावं तर "अहसास' हा शब्द अख्ख्या ब्रह्मांडासोबतची एकता दाखवू पाहतो. या 'अहसास' होण्याच्या अवस्थेत माणसाला सर्व सजीव-निर्जीवांविषयी प्रेम वाटायला लागतं. ऐकलं असेल तुम्ही, रांझा हीरच्या प्रेमात इतका बुडाला होता, की तिच्या मोहल्ल्यातून बाहेर पडणाऱ्या कुत्र्याच्या पायाचंही प्रेमानं चुंबन घ्यायचा तो. या अशा मनोवस्थेचं वर्णन करायला कुठून आणणार तुम्ही लेबल...?

हा दरवळण्याचा, मोहरण्याचा, बहरण्याच्या आणि प्रेमाला साक्षात जगण्याचा अनुभव. जणू कुणी मदमस्त अवलिया आपल्याच एकांताच्या नशेत चूर असावा असा हा अनुभव. कुठलाच शब्द, कुठलीच संकल्पना या अनुभवाला नाही धरू शकत चिमटीत.

म्हणून मग गुलजार म्हणतात, हा अनुभव घ्यायचा असेल तर तुमचा आत्मा जागवा. ही अनुभूती त्यांच्यासाठी नाहीच जे नात्याला फक्त शरीर पातळीवर जोखत त्याचे अर्थ लावतात. हे गीत वास्तवातल्या प्रेम आणि भौतिकवादातला फरक उलगडतं. हे गीत सांगतं, की प्रेम ही खरंतर एक यात्रा आहे अखंड. हे गीत त्या नात्याचं सौंदर्य उजळतं जे नातं समाज नजरेनुसार नैतिक किंवा अनैतिक ठरवत बसतो. काय माहीत, अशा किती प्रेमकहाण्या बंद ओठांआड मिटून राहिल्यात... पण तो 'अहसास' मात्र जागता ठेवलाय त्यांनी.

"हज़ार राहें, मुड़ के देखीं, कहीं से कोई सदा ना आई

बड़ी वफ़ा से, निभाई तुमने, हमारी थोड़ी सी बेवफ़ाई

मगैरसमज नात्याला उद्ध्वस्त करतो आणि आतला अहंकार मनभेद सांधायला पुढाकार घेऊ देत नाही. हे गीत याच सामाजिक ताण्याबाण्यांनी विणलेलं द्वंद्व सांगू पाहतं. अनेकदा असं होतं, की आपण आतल्याआत विचार करत बसतो. "मीच का पुढाकार घ्यायचा? समोरच्यानं माघार घेतली पाहिजे...' आणि याच वाट बघण्यात गुंतागुंत मात्र वाढते. पाहिलं असेल तुम्ही, माणसं एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करतात. म्हणतात, "तू माझ्याजागी असतास ना तर काय सहन करावं लागलं हे कळालं असतं...' आपण नेहमीच इतरांच्या अडचणींना लहान आणि स्वत:च्या त्रासांना मोठं म्हणत राहतो.

आपल्या भारतात अशी कितीतरी नाती आहेत आपल्याच आसपास, जी अगदी लहानसहान कुरबुरींनी कायमची दुरावलीत. लोक विभक्त होतात. अशा कठीण काळात मग या सगळ्यासाठी नेमकं कोण जबाबदार, कळत नाही. नक्की कोण बरोबर, कोण चूक, नाहीच उमगत कुणाला नीटसं... समोरच्या माणसानंच आपल्याला एकदा हाक मारावी, त्यानंच माघार घ्यावी, अशा निरर्थक अट्टाहासांमुळं प्रेम कोमेजतं, नाती विस्कळीत होतात. मागं उरतो तो पश्चाताप... कितीही तळमळलं तरी मग ती व्यक्ती काही सोबत उरत नसते. कोणत्याही नात्यात विश्वास लाखमोलाचा असतो, हेच खरं.

"नाम गुम जायेगा, चेहरा ये बदल जायेगा

मेरी आवाज़ ही, पहचान है, गर याद रहे...

आपण ज्या कुणावर प्रेम करतो, ज्या कुणात गुंतलेले राहतो त्या व्यक्तीचा चेहरा, नाव सगळं पुढंपुढं नाममात्र राहतं. रम्य संध्याकाळ निस्तेज होत जावी तसे चेहरेही वाढत्या वयासोबत सुरकुतत जातात. मात्र आवाज आणि संवेदनाच सोबत करतात चिरतरूण राहत. एखाद्या माणसानं व्यावहारिक पातळीवर तुमच्यासाठी काय केलं हे एका काळानंतर विस्मरणात जातं, मात्र त्या माणसाचे शब्द, आश्वासक आवाज मनात घुमत राहतो. जिव्हाळ शब्द आणि प्रेमळ आवाज हीच खरंतर आपली ओळख बनवली पाहिजे हरेकानं. कटू शब्द चिघळलेल्या जखमेसारखे दुखत राहतात आत. माणसाचं वय वाढतं, नात्यांचं रूप बदलतं पण आवाज तोच, तसाच राहतो. इथं आवाज या शब्दाचा अर्थ खूप व्यापक आहे. हा अर्थ जोडलेला आहे ह्रद्यासोबत, अभिव्यक्तीसोबत. हा आवाज तो आहे, जो एका मनातून उमटेल आणि दुसरं मन तो बरोब्बर ऐकेल. एखाद्याचं व्यक्त होणं तुमच्या मनाला स्पर्शून गेलं तर तुम्हे ते विसरू नाही शकणार कधी. मात्र एखाद्याचं बोलणं उथळ असेल तर ते नाहीच लक्षात राहत.

आयुष्य काळ पुढे सरकतो तसं बदलत जातं. आपण एखाद्याला भेटतो, सोबत राहतो, पुढं काळच आपल्याला विभक्तही करतो. आपण कुठंही उरत नाही तसं पाहिल्यास. मात्र काळवेळेच्या पलिकडं, हे सगळं ओलांडत आपण भेटलोच, तर तुम्ही मला ओळखाल. अर्थात, माझ्या आवाजात तुम्हाला काही खास बात जाणवली असेल पूर्वी... तरच!

भूतकाळात जे झालं, तो भूतकाळ झाला. हे काय आयुष्यभर असंच नव्हतं. पण एखादी रोमांचक हळवी रात्र, एखादं अद्भुत स्वप्न... भूतकाळातल्या एखाद्या छोट्याशा अवकाशानंतर भविष्यात एखादी खूण सापडलीच, तर ओळखू शकाल नक्कीच तुम्ही माझा आवाज!

कितीतरी गोष्टी, घटना असतील अशा, ज्या स्मृतींना परत ताजं करतात. बऱ्याचदा अस्वस्थही करतात काही नकोशा स्मृती. पण माझा आवाज ओळखता आला, तर नक्कीच बाहेर पडता येईल त्या नकोशा स्मृतींच्या डोहातूनही... aleem.letters@gmail.com

शब्दांकन - शर्मिष्ठा भोसले

बातम्या आणखी आहेत...