आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रासंगिक:मला खरंच अभिमान आहे?

औरंगाबाद23 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

या वेळच्या शिक्षक दिनाने देशाच्या प्रतिज्ञेतील ‘माझ्या देशातल्या समृद्ध आणि विविधतेने नटलेल्या परंपरांचा मला अभिमान आहे. त्या परंपरांचा पाईक होण्याची पात्रता माझ्या अंगी यावी म्हणून मी सदैव प्रयत्न करीन..’ या ओळींनी माझे लक्ष वेधले. विद्यार्थ्यांच्या पाठ्यपुस्तकात असलेली ही प्रतिज्ञा विद्यार्थी रोज म्हणतात. शिक्षक ही प्रतिज्ञा विद्यार्थ्यांना देतात, परंतु खरोखर माझ्या देशातील विविध जाती-धर्मांमध्ये असलेल्या समृद्ध, कालसुसंगत आणि मानवी जीवनाला उदात्त करणाऱ्या, वैज्ञानिक दृष्टिकोन असलेल्या, काहीतरी विशिष्ट प्रयोजन - वैविध्य असलेल्या या परंपरांचा शिक्षक म्हणून मला खरोखर अभिमान आहे का, त्या परंपरा विद्यार्थ्यांमध्ये रुजवण्यासाठी काही ठोस प्रयत्न मी करतो का, असं शिक्षक म्हणून या शिक्षक दिनानिमित्ताने स्वतःत डोकावून पाहूयात. ‘आडात नाही तर पोहऱ्यात कुठून..? या परंपरांविषयी शिक्षक म्हणून मी जर उदासीन असेल, अनादर करत असेल, दुर्लक्ष करत असेल, त्या परंपरांविषयीच्या माझ्या चुकीच्या धारणा असतील, तर विद्यार्थ्यांमध्ये चांगला दृष्टिकोन कसा रुजणार?

अलीकडच्या काळात कुठलाही सण, समारंभ, उत्सव परंपरा असली की समाजमाध्यमांमधून अशा परंपरांची टिंगलटवाळी करणारे संदेश फिरतात. आपणही कळत-नकळत अशा संदेशांना पुढे पाठवतो. असा टिंगलटवाळीचा संदेश पुढे जाण्याबरोबरच आपला दृष्टिकोनही पुढे जात असतो हे आपल्या लक्षात येते का? खिल्ली उडवणारे, चुकीच्या धारणा असलेले असे संदेश विद्यार्थी वाचतात, समाजमाध्यमं या विद्यार्थ्यांचाही असा एकसुरी दृष्टिकोन तयार करण्याला मदत करतात. असे संदेश विश्वासार्ह नसतात हे विद्यार्थ्यांना कोण समजावणार? एकमेकांच्या समूहातील चांगल्या परंपरांचा आदर आपण ठेवायला शिकलो तर समता आणि बंधुता ही मूल्ये अंगीकारू शकू. विद्यार्थ्यांच्या मनामध्ये विविध मूल्ये, कौशल्ये व गुण संक्रमित करण्यासाठी, रुजवण्यासाठी आपली प्रतिज्ञा हा खूप मोठा स्रोत आहे. आधार आहे. हे शिक्षक म्हणून आपण लक्षात घ्यायला हवे. शिक्षक म्हणून आपण चांगल्या परंपरांचा आदर राखण्यासाठी विविध उपक्रम शोधायला हवेत. कल्पकतेने असे उपक्रम अमलात आणायला हवेत. आचरण, वागणं ही मूल्यांची खरी कसोटी असते हे मुलांमध्ये बिंबवायला हवे. म्हणूनच विद्यार्थ्यांना अशा चांगल्या परंपरांचा परिचय करून देऊन त्या परंपरांचा संबंध आपल्या चांगल्या वर्तनाशी, कृतीशी जोडायचा आहे याचं भान शिक्षकांनी विद्यार्थ्यांना वेळोवेळी द्यायला हवे. अशा परंपरांविषयी आपण विद्यार्थ्यांशी सुसंवाद साधतो का? पालक म्हणूनही आणि शिक्षक म्हणूनही या सगळ्या परंपरांना वैज्ञानिक दृष्टिकोन आणि कालसुसंगतता या दोन बाबींची कसोटी आपल्याला लावता येत असेल तर अशा चांगल्या परंपरा विद्यार्थ्यांना चांगला नागरिक कशा बनवणार? आणि असे झाले नाही तर विद्यार्थी सांस्कृतिक वारसांची जपणूक कशी करतील? या वैविध्याने नटलेल्या परंपरांमधून सर्वधर्मसहिष्णुता, ऐक्यभाव आणि समाजजीवनात एकोपा नांदण्यासाठी या परंपरा आवश्यक आहेत. ‘न रुचणारा विचार खोडा, पण माणूस शाबूत ठेवा’ असं विनोबा म्हणत. आपल्या धर्माप्रमाणे दुसऱ्याच्या धर्माविषयी समभाव दाखवणे हे माणुसकीचे लक्षण आहे हे विद्यार्थ्यांना शिकवावं लागेल. भारतीय राज्यघटनेने सर्वांना आपापल्या धर्माप्रमाणे विचार आणि आचाराबाबत स्वातंत्र्य दिलेले आहे हे विद्यार्थ्यांना सांगून सहजीवन आणि सामंजस्याने वागले पाहिजे-राहिले पाहिजे हा संस्कार शिक्षकांनी विद्यार्थ्यांवर करणे आवश्यक आहे. साने गुरुजी म्हणत, ‘प्रत्येक जाती-धर्माची विशिष्ट संस्कृती असते आणि सर्वांची मिळून राष्ट्रीय संस्कृती होत असते. प्रत्येक चालीरीतीत, परंपरेमध्ये संस्कृतीचा सुगंध भरलेला आहे. संस्कृतीचे संवर्धन करणाऱ्या चालीरीती मरू देता कामा नये.’ शिक्षक म्हणून आपल्यामध्ये आणि विद्यार्थ्यांमध्ये चांगल्या परंपरांविषयी संवेदनशीलता रुजायला हवी. आपल्या परंपरांविषयी टोकाचा अभिनिवेश नको आणि इतरांच्या परंपरांचा टोकाचा तिटकारा नको. वसंत बापट नेहमी म्हणत - वेदना जाणवायला जागवू संवेदना.. आज बोथट होत चाललेल्या काळात आणि समाजमाध्यमांचे प्रस्थ वाढत चाललेल्या काळात अशी संवेदना जागवण्याची खरी गरज आहे. यासाठी शिक्षकांनी विविध परंपरांतील चांगल्या विचारांची ओळख करून द्यायला हवी.. तरच शिक्षक म्हणून आपण उद्याच्या सुजाण नागरिकत्वाची निर्मिती करू शकूत. या परंपरा आपल्याला स्वतःतील क्षमता ओळखायला शिकवतात, पर्यावरणीय भान देतात अहंकारांवर मात करायला शिकवतात, आरोग्याबद्दलचा सकारात्मक दृष्टिकोन रुजवतात, बांधीलचा गुण जोपासायला लावतात, संयम शिकवतात, इच्छाशक्तीला साद घालतात, सहिष्णुता पेरतात. दातृत्वशीलता, शांती प्रदान करतात. सत्त्वशुद्धी करतात. परंपरांविषयी असा चांगुलपणा आपण शोधत गेलो तरच आपल्याला आणि विद्यार्थ्यांना अशा उदात्त परंपरांचा पाईक होता येईल.

डॉ. नागेश अंकुश संपर्क : 9404288766

बातम्या आणखी आहेत...