आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
भांडवली अर्थव्यवस्थतील वर्गसंघर्षाने या खाप पंचायतींना आता अगदी वेगळ्या आणि अनोख्या वळणावर आणून सोडले आहे. कॉर्पोरेट भांडवलाशी आणि त्याच्या केंद्रीय सत्तेशी यांचा असा सरळ आणि विशाल आमना-सामना आजपर्यंतच्या इतिहासात पहिल्यांदा होतोय. त्यामुळे खाप पंचायतींचे उच्चजातीय वर्चस्ववादी स्वरूप काही प्रमाणात सैल होईल का? त्या सर्वसमावेशक होतील का? जाट आणि त्यांच्या खाप पंचायतीं बाल्मीकी (मेहतर), चमार, धानक, सांसी, कुम्हार, लुहार बागडी इत्यादी अंगमेहनतीवर जगणाऱ्या निम्न जाती समुदायांशी इथून पुढे कसे वागतील? खाप पंचायतीत या निम्नजातींना स्थान आणि सन्मान मिळेल का? खाप पंचायती सर्वसमावेशक बनतील का?
किसान आंदोलनाच्या संदर्भात आपण ‘खाप पंचायत’ हा शब्द अनेक वेळा ऐकतोय. उत्तरेकडे शेतकऱ्यांच्या महापंचायती होत आहेत. लाखोंच्या संख्येने शेतकरी त्याला जमत आहेत. या घडामोडींमागे अनेक शतकांचा इतिहास असलेल्या खाप पंचायती आहेत. खाप पंचायत म्हणजे काय? असा प्रश्न आपल्या मनात उभा राहतो.
दहा वर्षांपूर्वी खाप पंचायत हा शब्द अचानक खूप चर्चेत आला होता. पण तो वेगळ्या कारणांसाठी. कारण हरियाणा, पश्चिम उत्तरप्रदेशात त्या काळात ‘ऑनर किलिंग’च्या अनेक घटना घडत होत्या. आंतरजातीय, आंतरधर्मीय, सगोत्र विवाह करणाऱ्या काही जोडप्यांना ठार मारण्यात आले किंवा त्यांना जीव वाचविण्यासाठी गाव सोडून पळून जावे लागले. या जोडप्यांचे जगणे मुश्किल करणाऱ्या या होत्या खाप पंचायती. त्यातून हत्येचे आणि अपहरण करण्याचे फर्मान सुटायचे. या खाप पंचायतीं ‘पंच परमेश्वर’ बनून रानटी पद्धतीने न्याय करत सुटल्या होत्या. त्या काळात एकीकडे भारत हायटेक बनत असल्याचे बोलले जात होते. देश महाशक्ती बनेल असे दावे राज्यकर्त्यांकडून केले जात होते. दुसरीकडे देशाच्या राजधानीपासून केवळ काही किलोमीटर अंतरावर खाप पंचायतीच्या नावाने चालणाऱ्या या संस्था राज्यघटनेतील तत्त्वे व देशाचे कायदे पायदळी तुडवीत होत्या. प्रेमविवाह करणाऱ्या जोडप्यांच्या हत्या करण्याचे फर्मान सोडत होत्या. त्यांचे आदेश न पाळणाऱ्या जोडप्यांच्या लहान बाळांना हिसकावून घेऊन दुसरीकडे ही मुले विकून टाकली जात होती. एखाद्या तरुण मुला-मुलीने पळून जाऊन प्रेमविवाह केला, तर त्या तरुणाच्या आईवर सामूहिक बलात्कार करण्याच्या शिक्षा सुनावल्या जात होत्या. काही प्रसंगी अशा महिलांना ठार मारले गेलेले होते. तसेच महिलांनी केवळ मुलगाच जन्माला घातला पाहिजे, अशी विघातक मूल्ये ही संस्था समाजात पेरत होत्या.
खूप जुना नाहीये, अगदी नजीकचा काळ आहे हा. पण तो आता भूतकाळ झाला आहे असे म्हणता येईल. कारण आता खाप पंचायती त्या पद्धतीने क्रूर आणि कायद्याविरोधी वागत असल्याच्या घटना ऐकिवात नाहीत. उलट आता खाप पंचायती एका नव्या रूपात जगासमोर आल्या आहेत. सध्याच्या शेतकरी आंदोलनाला सगळ्यात मोठे पाठबळ या पंचायती पुरवीत आहेत. शेतकरी आंदोलन त्यांच्या न्याय्य मागण्यांसाठी गेल्या दोन महिन्यांपेक्षा जास्त काळ दिल्लीच्या सीमेवर ठाण मांडून आहे. या आंदोलनाने केवळ भारतीय जनतेचेच नाही, तर जगभरच्या लोकांचे लक्ष वेधून घेतलेले आहे.
खाप पंचायती खुप मोठा काळ एकजातीय संकुचित परिघात कार्यरत राहिल्या आहेत. त्यांची मुळं इथल्या समाजजीवनात खूप खोलवर रुजलेली आहेत. हरियाणाच्या निवडणूक निकालांवर यांचा मोठा प्रभाव असतो. खाप म्हणजे वंश किंवा गोत्र. या खाप पंचायतींचे अस्तित्व शेकडो वर्षांपासून आहे. त्या त्या भागातील भूप्रदेश, गाव किंवा गोत्रांच्या नावाने या खाप पंचायती चालविल्या जातात. या पंचायती जाटांच्या सामाजिक व सांस्कृतिक विषयांचे नियमन व नियंत्रण करतात. पूर्वी त्यांच्या स्वत:च्या सेनासुद्धा असत. खाप पंचायतीचे अस्तित्व एकेका भूभागावर असते. त्या भूभागातील गावे पारंपरिकरीत्या त्यांच्या आधिपत्याखाली असतात. उत्तर भारतात अशा अनेक खाप पंचायती आहेत. त्यांचा कारभार परंपरेने चालत आलेल्या रीतिरिवाजांप्रमाणे चालतो. या परंपरा अतिशय कठोर, बुरसटलेल्या व अत्यंत मागासलेल्या आहेत. जवळपास ३०० खाप पंचायती हरियाणा, पंजाब, पश्चिम उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश व राजस्थान या राज्यांत कार्यरत आहेत. या सगळ्या पंचायतींची सर्वोच्च पंचायत म्हणजे ‘सर्वखाप पंचायत’. सुमारे २५००० गावे या पंचायतीच्या आधिपत्याखाली आहेत. एका विशिष्ट प्रदेशात आपले अस्तित्व आणि अंमल खाप पंचायतींनी अनेक शतके टिकवून ठेवलेला आहे. भांडवली अर्थव्यवस्थतील वर्गसंघर्षाने या खाप पंचायतींना आता अगदी वेगळ्या आणि अनोख्या वळणावर आणून सोडले आहे. कॉर्पोरेट भांडवलाशी आणि त्याच्या केंद्रीय सत्तेशी यांचा असा सरळ आणि विशाल आमना-सामना आजपर्यंतच्या इतिहासात पहिल्यांदा होतोय. त्यामुळे खाप पंचायतींचे उच्चजातीय वर्चस्ववादी स्वरूप काही प्रमाणात सैल होईल का? त्या सर्वसमावेशक होतील का? निम्न जातींच्या बाबतीत त्या कठोर राहणार नाहीत का? हे प्रश्न उभे राहतात. कारण त्यांना आता एका मोठ्या शक्तीशी लढायचे आहे. दिल्लीच्या सीमांवर आणि हरियाणा पंजाबच्या अंतर्गत भागात जनसागर आज उचंबळून वाहतोय, त्यातून काही वेगळे घडेल का? खापचे प्रतिगामी स्वरूप बदलेल का? भाकीत आताच करता येणार नाही पण आशावाद बाळगायला हरकत नाही.
२०१३ साली झालेल्या मुजफ्फरनगर दंगलीत टिकैत परिवार आणि त्या भागातील खाप पंचायतींवर गंभीर आरोप झाले होते. जाट आणि मुस्लीम समुदायात मोठी दरी पडली होती. आता शेतकरी म्हणून ते परत एकत्र येत आहेत. अविश्वासाची भावना हळू हळू कमी होतेय. स्वतः राकेश टिकैत यांनी या भागातील मुस्लिमांची माफी मागितली असून, त्यांना या आंदोलनात सोबत येण्याचे आवाहन केले आहे. या पार्श्वभूमिवर हरियाणा-पश्चिमी उत्तर प्रदेशात किसान-मजदूर एकोपा अधिक विस्तारित आणि वृद्धिंगत होईल असे चित्र आहे. खाप पंचायती जाटांच्या आहेत. जाट हा जमिनींची सगळ्यात जास्त मालकी असलेला, आर्थिक दृष्टीने संपन्न, सामाजिक दृष्टीने वर्चस्ववादी समुदाय आहे. भाजपाने यात जनआधार निर्माण केला. कॉँग्रेसच्या राजवटीला कंटाळलेले लोक मोठ्या प्रमाणात भाजपाकडे गेले. एकेकाळी ज्या खाप पंचायती भाजपाला मतदान करण्याचे आवाहन करीत होत्या, त्याच आज भाजपाच्या राजवटीविरुद्ध दंड थोपटून उभ्या राहिल्या आहेत. त्यामुळे इथल्या सामाजिक जीवनात प्रचंड उलथापालथी होत आहेत. जाटांची संपन्नता इथल्या शेतीवर अवलंबून आहे. इतर जातीसमुदाय शेतीशी संबंधित मजुरी किंवा इतर कामातून उपजीविका कमवितात. नव्या कायद्यांच्या अंमलबजावणीनंतर शेतीसंबंधामध्ये खूप मूलभूत बदल होतील. त्याचा परिणाम शेतकऱ्यांसह इतरांना सुद्धा भोगावा लागेल. त्यामुळे लढ्यात सर्वांना सामील करून घेणे आता भाग आहे. जातीव्यवस्थेच्या उतरंडीत ज्यांच्याशी कायम दुरावा राहिला त्यांना आता सोबत घ्यावे लागणार आहे. ही बदलती परिस्थिती खूपच विशेष आहे. जाट आणि त्यांच्या खाप पंचायतीं बाल्मीकी (मेहतर), चमार, धानक, सांसी, कुम्हार, लुहार बागडी इत्यादी अंगमेहनतीवर जगणाऱ्या निम्न जाती समुदायांशी इथून पुढे कसे वागतील? खाप पंचायतीत या निम्नजातींना स्थान आणि सन्मान मिळेल का? खाप पंचायती सर्वसमावेशक बनतील का? हरियाणवी समाजात हुक्का हे अत्यंत मानाचे असे प्रकरण आहे. घराघरात हुक्का असतोच. चार माणसं जमली की हुक्का मधोमध असतो. त्याची नळी फिरत असते, अन लोकं नळी समोर आली की त्यावर मूठ ठेऊन, त्या मुठीवर तोंड टेकवून हुक्का गुडगुडतात आणि नळी दुसऱ्याकडे सरकवतात. मग तो गुडगुड गुडगुड करून नळी पुढच्याकडे सरकवतो. घरात, अंगणात, शेतात झाडाखाली, चावडीवर असे समूह बोलत बसलेले असतात. सध्याच्या आंदोलनात देखील हुक्का त्यांच्या सोबत आहेच. ते जिथे असतील, सोबत हुक्का असणारच. ही सामाजिक प्रथा आहे. इथे एखाद्यावर सामाजिक बहिष्कार घालायचा तर त्याचा ‘हुक्काबंद’ केला जातो. पंचांनी जर हुक्काबंदी लादली तर माणसाची पायाखालची जमीन सरकते. कारण त्यानंतर त्याचे भाऊबंदात उठणे बसणे बंद केले जाते. कोणत्याही माणसाला ही शिक्षा अत्यंत भयंकर वाटते. निम्न जाती तर पिढ्यानपिढ्या गावकुसाबाहेर राहिल्या आहेत. अमानुष व्यवहार सहन करत राहिल्या. अभावग्रस्त जीवन जगत राहिल्या आहेत. प्रत्येक जातीपातींचे आपापले हुक्के आहेत. ज्याची त्याची आपल्या हुक्क्याभोवती बैठक असते. प्रत्येक जातीच्या सीमा ठरलेल्या असतात.
आज खाप पंचायती इतक्या मोठ्या लढ्यात उतरलेल्या आहेत. या अत्यंत अटीतटीच्या लढ्यात या खाप पंचायती सगळ्या जाती समुदायांना सोबत घेणार आहेत का? त्यांना हुक्का बैठकीत सोबत बसवणार आहेत का? कारण आज त्यांचा जो शेती व्यवसाय संकटात सापडला आहे, त्या शेतीला सुजलाम-सुफलाम करण्यासाठी या निम्न जातीतील मजुरांनीच रक्त आटवलेले आहे. खाप पंचायतीचे पितृसत्ताक आणि प्रतिगामी स्वरूप या लढ्याच्या अनुभवातून कितपत बदलेल हा आता खूप कळीचा मुद्दा येणाऱ्या काळात बनणार आहे. एकीकडे कॉर्पोरेटस सोबत लढता लढता सरंजामी मूल्यव्यवस्थेविरुद्ध जनतेच्या जाणिवा जर विकसित झाल्या तर गायपट्ट्यात एका मोठ्या बदलाची सुरुवात झाली असे म्हणता येईल. भांडवलशाही आणि सरंजामशाहीविरुद्ध जनतेला एकत्रित लढावे लागेल, तरच नवा भारत घडू शकेल. त्या दृष्टीने विचार करता हे आंदोलन अजून खूप मागे आहे. सैद्धांतिक आणि व्यावहारिक पातळीवर त्याला अजून खुप मोठा पल्ला गाठायचा आहे.
एकच हुक्का गोल गोल फिरतोय अन त्या भोवती बसलेले जाट, गुज्जर, धानुक, सांसी, चमार, बाल्मीकी त्यातून दम मारतायत, धूर सोडत सोडत गप्पा मारतायत, चर्चा करतायत, आंदोलनाची आखणी करतायत असे दृश्य गावोगावी दिसल्यास इथल्या समाजात मग खऱ्या अर्थाने भाई-चारा (भावकी) निर्माण झाला असे ठामपणे म्हणता येईल. amarlok2011@gmail.com
सौजन्य : द वायर,मराठी
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.