आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Opinion
  • An Anthology Of Poetry Covering The World Of Education | Article By Ashish Ningurkar

वाचावे असे काही:शिक्षणविश्व कवेत घेणारा काव्यसंग्रह

औरंगाबाद4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

मोबाइलमधील क्रूर खेळांमुळे मुलांमधील हिंस्रपणा वाढतोय. अशा परिस्थितीत शिक्षकांच्या वाढलेल्या जबाबदारीची रास्त जाणीव एक तर शिक्षकाला, एखाद्या पालकाला किंवा एखाद्या कविमनाच्या माणसाला असू शकते. संवेदनशील लेखन करणाऱे, उपक्रमशील मातृहृदयी शिक्षक आणि उत्तम कवी असणाऱ्या उमेश घेवरीकर यांचा ‘शिक्षणाच्या कविता’ हा संग्रह ग्रंथालीने नुकताच प्रकाशित केलाय. पुस्तकातल्या अवघ्या ३६ कविता संपूर्ण शिक्षणविश्व आपल्या कवेत घेतात.

मला शिकवायला हवे त्यांना अधिक जबाबदारीने, नेटाने आणि निष्ठेने मला जागे राहायलाच हवे

आजच्या शिक्षण प्रक्रियेत शिक्षक एक यंत्र बनलाय. तो सराईतपणे वर्गात जातो. प्रथेप्रमाणे तास संपवतो. विद्यार्थी वर्षाअखेर ‘उत्तीर्ण’ शेरा मिळण्याच्या अपेक्षेने शिक्षकांची बडबड ऐकतात. शिक्षणप्रक्रियेच्या गतिमानतेमध्ये विद्यार्थ्यांमध्ये सवयीने निरर्थक बडबडीचा प्रतिकार करण्याची क्षमता तयार झाली आहे. तरीही शिक्षक पाट्या टाकण्याचे काम करतोच आहे, कारण ‘सवाल माझ्या रोजीरोटीचा आहे’ हे त्याला त्याच्यापुरते सापडलेले उत्तर आहे. जीवनात प्रत्यक्षात उपयोगी पडणारा शहाणपणा हासुद्धा शिक्षणातला महत्त्वाचा बिंदू आहे, हे नव्या शिक्षकाच्या ध्यानातही नसते. कारण शिक्षणाचा उपयोग शेवटी जीवन जगताना करायचा असतो. याचे उत्तम उदाहरण या कवितासंग्रहातून दिसून येते. कवी उमेश हे स्वतः शिक्षक असल्याने त्यांनी अनेक गोष्टी बारकाईने टिपल्यामुळेच ‘शिक्षणाच्या कविता’ काळजाचा ठाव घेतात. शाळेची इमारत म्हणजे सिमेंट, गिट्टी आणि वाळूचा पद्धतशीरपणे रचलेला निर्जीव ढिगारा. पण कवीच्या संवेदनशील मनाला हे मान्य नाही. शाळा माणसाच्या जीवनाला कशी व्यापून उरते हे सांगताना कवी म्हणतो,

सुटते जरी ही शाळा मनामनांत पुन्हा भरते जीवननौका वादळातही या शाळेमुळेच तरते

शिक्षण क्षेत्रातले सर्व शिक्षा अभियान, समग्र शिक्षा अभियान, ज्ञानरचनावाद, अध्ययनक्षमता हे सगळे शब्दांचे बुडबुडे आहेत, याची कवीला जाणीव आहे. औषधांची केवळ नावे बदलून मूळ आजार दूर होत नाही, हे कडवट वास्तव नाकारण्यात काहीच अर्थ नाही. शाळेत शिकत असताना राम आणि रहीम, मेरी आणि मीरा, किसन आणि हसन, गौतम आणि कृष्ण, संता आणि संतोष, लीला आणि लिली एकदिलाने राहतात, गुण्यागोविंदाने शिकतात. नंतर,

शाळा सुटते पाटी फुटते राम आणि रहीम यांच्यात भिंत का उभी राहते?

असा रोकडा सवाल कवीने उपस्थित केलाय. ह्या कविता म्हणजे जसे व्यवस्थेतील दोषदिग्दर्शन आहे, तसेच कवीने एक शिक्षक म्हणून अंतर्मुख होऊन केलेले आत्मपरीक्षणही आहे. एकीकडे झोपडीत भरणाऱ्या सरकारी शाळा आणि दुसरीकडे धनदांडग्यांचे चकचकीत एज्युकेशन मॉल यातील विषमता आणि विसंगती कवीने ‘अँटिव्हायरस’ ह्या कवितेत टिपली आहे.

गायक-वादक जसे नियमित रियाज करतात, तसा शिक्षकानेही वर्ग नावाची आपली मैफल सजवण्यासाठी नियमित अभ्यासाचा रियाज करावा, हे सांगायला कवी विसरत नाही. या संग्रहातील कवितांची संख्या कमी असली, तरी ह्या कवितेचा आवाका दांडगा आहे. आजचा काळ हा डिजिटल तंत्रज्ञानाचा काळ आहे. शिक्षण क्षेत्रात नव्यानं होणारे बदल लक्षात घेऊन शिक्षकांना अध्यापन कार्याबरोबरच डिजिटल स्वरूपाचं शैक्षणिक लेखन करावं लागेल. समोर असणारा प्रत्येक विद्यार्थी हा विचार, बुद्धी, ज्ञान व क्षमता याबाबतीत वेगळा असणार आहे, याची जाणीव ठेवून अध्यापन कार्यात ‘विद्यार्थी फोकस’ करता आला पाहिजे. शिक्षकाला विद्यार्थ्यांबरोबर समाज व समाजपरिस्थितीही वाचता येणं आवश्यक आहे. आजूबाजूला कितीही आव्हानात्मक परिस्थिती असली तरी ‘सारेच दीप कसे मंदावले आता’ असं न म्हणता नवे प्रकाशकिरण दाखवण्याचं महत्त्वपूर्ण कार्यही शिक्षकालाच करावं लागेल, हे निश्चित. ‘झटकून टाक जीवा दुबळेपणा मनाचा’ ही भूमिका इथं दिशादर्शक ठरेल. उमेश यांचा “शिक्षणाच्या कविता’ हा कवितासंग्रह विचार करायला लावणारा व जख्खड झालेल्या मनाला विचाररूपी थप्पड देणारा आहे...

{ काव्यसंग्रहाचे नाव : शिक्षणाच्या कविता { कवी : उमेश घेवरीकर { प्रकाशन : ग्रंथाली { पृष्ठसंख्या : ५६ { किंमत : ८० रुपये

आशिष निनगुरकर संपर्क : ९०२२८७९९०४

बातम्या आणखी आहेत...