आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रसिक स्‍पेशल:एक पुढाकार ‘त्यांच्या’ उदरनिर्वाहासाठी...

औरंगाबाद18 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

स्त्री -पुरुष यांच्याव्यतिरिक्त समाजातला एक घटक म्हणजे ‘तृतीयपंथी’. हा एक असा घटक आहे, ज्यांच्या जगण्याबद्दल, त्यांच्या मूलभूत गरजांबाबत फार कमी लोक विचार करतात. तृतीयपंथी असला तरी तो माणूसच आहे. माणसाला असणाऱ्या सर्वच गरजा त्यालाही अाहेत. अशा व्यक्तींनाही जगण्याचे धार्मिक, सामाजिक आणि कायदेशीर अधिकार आहेत ही बाब अजूनही समाजाच्या पचनी पडलेली नाही. परिणामी हा समुदाय कायम टिंगलटवाळीचा विषय बनलेला दिसून येतो. अन्न, वस्त्र आणि निवारा या माणसांच्या तीन मूलभूत गरजांव्यतिरिक्त हीसुद्धा माणसाची मूलभूत गरज आहे. परंतु शिक्षणासाठी पैसा आणि पैशासाठी रोजगार ही महत्त्वाची बाब आहे. एकंदरीतच रोजगार मिळाला की पैसा येताे आणि पैसा आला की अन्न, वस्त्र, निवारा आणि शिक्षण येतेच. म्हणून पैसा आणि रोजगार या दोन गोष्टीसुद्धा आधुनिक युगात माणसाच्या मूलभूत गरजा आहेत. सर्वसामान्य माणसालासुद्धा या गोष्टींसाठी झगडावे लागते तिथे तृतीयपंथीयांचा विचार कोण करणार? रस्त्यावर टाळ्या वाजवून पैसे मिळवणे या उदरनिर्वाहाच्या एकाच साधनावर ते वर्षानुवर्षे जगत आले आहेत. समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी या लोकांना उदरनिर्वाहाचा वेगळा पर्याय उपलब्ध करून देणे ही गोष्ट समाजाच्या हातात नक्कीच आहे. हेच सामाजिक उत्तरदायित्व लक्षात घेत प्रसिद्ध शेफ विष्णू मनोहर यांनी तृतीयपंथीयांसाठी राज्यभर पाककला स्पर्धेचं आयोजन केलंय. अशा प्रकारची स्पर्धा भारतात पहिल्यांदाच होते आहे. या स्पर्धेत विजयी ठरणाऱ्यांना विष्णू मनोहरांसोबत काम करण्याची संधी मिळणार आहे.

तृतीयपंथी समाजानेही मुख्य प्रवाहात यावे असे विष्णू मनोहर यांना नेहमी वाटत असे. यासाठी काय करता येईल याचा विचार सुरू असतानाच एक घटना घडली. त्या घटनेने विष्णू मनोहर यांना वेगळा पायंडा पाडणाऱ्या स्पर्धेची संकल्पना सुचली. त्याबद्दल सांगताना ते म्हणतात, पुण्याला नळस्टॉप येथे ट्रॅफिकमध्ये थांबलो असताना समोर काही तृतीयपंथी पैसे मागत होते. माझ्यासमोर एक गृहस्थ बाइकवर होता. त्याच्यासमोर त्याची बॅग, मागे त्याची पत्नी, तिच्या कडेवर मूल व काही सामान अशा बिकट अवस्थेत तो चौकात उभा हाेता. त्याच्या मनात असूनसुद्धा ताे तृतीयपंथी व्यक्तीला पैसे देऊ शकला नाही. त्याची अडचण ओळखून ती व्यक्तीसुद्धा त्याच्याकडून पैसे न घेता मुलाला आशीर्वाद देऊन निघून गेली. आमच्या गाडीसमोर आल्यानंतर मला त्या तृतीयपंथी व्यक्तीची वर्तणूक बघून पैसे द्यावेसे वाटले. त्या कारणाने मी गाडीची काच खाली केल्याबरोबर ती व्यक्ती गोड हसून म्हणाली, ‘तुम्ही विष्णू मनोहर ना?’ मला हे ऐकून आश्चर्याचा धक्का बसला! कारण ती म्हणाली, ‘आम्ही तुमचे सर्व कार्यक्रम बघतो आणि पदार्थसुद्धा करतो. आम्हाला तुमच्याबरोबर एक सेल्फी हवी आहे.’ हे ऐकून माझ्या आनंदाला पारावार उरला नाही. त्या वेळी मी निर्णय घेतला की अशा समाजासाठीसुद्धा आपण काम करायला हवं, जेणेकरून त्यांना रोजगार मिळेल. समाजाच्या मुख्य प्रवाहात त्यांना आणता येईल. याची पहिली पायरी म्हणून अशा लोकांसाठी नागपूर, पुणे, मुंबई, औरंगाबाद, नाशिक, कोल्हापूर, जळगाव या शहरात पाककला स्पर्धा घेण्याचे ठरवल्याचे विष्णू मनोहर सांगतात. या शहरांमध्ये प्राथमिक फेरी होणार असून अंतिम फेरी नागपूर येथे होणार अाहे.

या स्पर्धेत भाग घेतलेल्या अनेक तृतीयपंथीयांना स्पर्धेत सहभागी झाल्याचा, त्यांच्यासाठी स्पर्धा आयोजित करण्यात आल्याचा खूप आनंद झाला होता. औरंगाबादची धनू शेख म्हणते, ‘पाककला स्पर्धेचा अनुभव खूप चांगला होता. समाजाने आम्हाला वंचित ठेवले आहे. यात अशा कार्यक्रमामुळे बदल होईल अशी अपेक्षा वाटते. आम्हाला चांगली वागणूक मिळावी अशी इच्छा असते.’

श्रावणी कोमल शेख हिच्याही भावना यापेक्षा वेगळ्या नाहीत. ‘लोकांनी आमची खूप काळजी घेतली. आदरातिथ्य केले, जे आतापर्यंत कुठंही झालं नव्हतं. इतर कामाची संधी मिळाली तर आम्ही नक्कीच करू,’ असे श्रावणी म्हणते. तृतीयपंथीयांना स्वावलंबी करण्यासह त्यांना मानाने जगता यावं यासाठी विष्णू मनोहर यांचा हा छोटासा प्रयत्न आहे. तृतीयपंथीय घटकाची कायम उपेक्षा झाली आहे. नाचगाणे करून, टाळ्या वाजवून मिळेल त्या पैशात ते उदरनिर्वाह करतात. त्यांचं हे थांबवण्याची जबाबदारी समाजाची आहे. कोणताही बदल एकदम होत नसतो. बदल हळूहळू होईल, पण त्याच्यासाठी प्रयत्न करावे लागतील. कारण हे तृतीयपंथी समोर येताच लोक त्यांना पाहून तोंड फिरवतात. हा मानवी स्वभाव आहे. या स्पर्धेच्या निमित्ताने विष्णू मनोहर यांनी तृतीयपंथीयांच्या काही गुरूंची भेट घेतली. त्यांना स्पर्धेची संकल्पना मनोहर यांनी सांगितली. सुरुवातीला कुणाचाच यावर विश्वास बसेना. त्यांच्यात भीती होती. ती भीती घालवण्यासाठी त्यांच्यासोबत अाधी गप्पा मारल्या, मग नंतर ते मनमोकळे बोलू लागले. आणि मग स्पर्धेमध्ये सहभागी होण्याबद्दल सहमती दर्शवल्याचं विष्णू सांगतात. तृतीयपंथीयांच्या समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठीचा विष्णू यांचा हा प्रयत्न नक्कीच स्तुत्य म्हणावा लागेल. मात्र इतर स्पर्धांना प्रेक्षकांचा जसा प्रतिसाद मिळतो तसा प्रतिसाद या स्पर्धेला मिळाला नसल्याची खंत ते व्यक्त करतात. एका नव्या पायंड्याच्या निमित्ताने भविष्यात तरी अशा प्रयत्नांना समाजाचा चांगला प्रतिसाद मिळेल अशी आशा करायला वाव आहे...

उषा बोर्डे संपर्क : ९३४००६१६४६

बातम्या आणखी आहेत...