आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विचार:मनोरंजनाचा ओव्हर डोस

औरंगाबाद24 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

आठवडाभरापूर्वी टीव्हीच्या छत्रीचं रिचार्ज केलं आणि त्या कंपनीतून सतत फोन सुरू झाले. आग्रह कशाचा.. तर एक कोणतं तरी नवीन चॅनल सुरू झालंय. ते तुमच्या पॅकेजमध्ये सुरू करा. आधीच याच्यासोबत ते चॅनल, अमुक एक हवं असेल तर हा ग्रुपच ॲक्टिवेट करावा लागेल, अशा अटींमुळे त्या पॅकेजमध्ये चारशे -पाचशे वेगवेगळे चॅनल्स झालेत. त्यात या नव्या चॅनलचा आग्रह. बरं एवढे चॅनल्स आहेत, त्यातले आपण नियमित किती पाहतो…? प्रत्येक चॅनल दररोज तासभर पाहायचं म्हटलं तरीही महिनाभर सगळ्यांनाच आपापल्या कामातून सुटी घ्यावी लागेल. आज चोहोबाजूंनी मनोरंजनाचा नुसता भडिमार सुरू आहे. टीव्ही, ओटीटी प्लॅटफॉर्म, सोशल मीडियावरच्या शॉर्ट रिल्स, त्याशिवाय यूट्यूबचा अखंड सुरू असलेला मनोरंजन स्रोत आहेच. महत्त्वाचा मुद्दा असा की, एवढ्या मनोरंजनाची आपल्याला खरंच गरज आहे का? औषधांचा ओव्हरडोस झाल्याने जसा शरीराला त्रास होतो तसंच मनोरंजनाच्या ओव्हरडोसमुळे मनाला किंवा मेंदूला त्रास होत नसेल का? फार नाही, तीस वर्षांपूर्वीपर्यंत मनोरंजन हा आपल्या आयुष्यातला एक भाग होता. त्यापूर्वी तर चित्रपट किंवा नाट्यगृहं, रेडिओ आणि कॅसेट प्लेयर हीच काय ती मनोरंजनाची ठिकाणं होती. आठवडाभराच्या कामातून विरंगुळा म्हणून शनिवारी एखादा चित्रपट, रविवारी मित्रमंडळी किंवा नातेवाइकांच्या गाठीभेटी, कधीतरी चवबदल म्हणून हॉटेलमध्ये नाष्टा, वर्षातून एखादी सहल… आपल्या पूर्वीच्या पिढ्या एवढ्याच मनोरंजनावर भरपूर जगून गेल्या. साधारण पंचवीस-सव्वीस वर्षांपूर्वी टीव्हीचे वेगवेगळे चॅनल्स सुरू झाले आणि हळूहळू आपल्या मनोरंजनाचं स्वरूपच बदलून गेलं. साप्ताहिक स्वरूपातून डेली सोप अवतारात सुरू झालेल्या टीव्हीवरच्या मालिका, रात्री बंद होणारा रेडिओ, महिन्यातून एखादा चित्रपट याशिवाय मोजक्या प्रमाणात असलेली गाणी वाजवण्याची काही यंत्रं…अशा मर्यादित स्वरूपात असलेलं हे मनोरंजन गेल्या काही वर्षांपासून आपलं आयुष्य गिळंकृत करायला बघतंय. चोवीस तास चालणारे टीव्ही, त्यावर चित्रपटांची किंवा गाण्यांचे भरमसाट चॅनल्स, रटाळ आणि काहीही कथानक नसलेल्या भरकटणाऱ्या मालिकांचा रतीब, शिवाय व्हॉट्सॲप आणि फेसबुकवर चॅटिंग, स्टेटस चेक आणि रिल्स आहेतच. हे सगळं कमी होतं म्हणून की काय… त्यात आता ओटीटी प्लॅटफॉर्मची भर पडली आहे. ठरावीक पैसे भरून या प्लॅटफॉर्मचं मेंबर व्हायचं आणि दिलेले पैसे वसूल करायला रात्रंदिवस वेबसिरीज किंवा चित्रपट पाहत सुटायचं. त्यातल्या बहुतांश वेबसिरीजची कथानकं, भाषा आणि पडद्यावर दिसणारी दृश्यं.. या सगळ्यांबाबत न बोललेलंच बरं. शिवाय सातत्याने होणारी जागरणं आणि त्याचा कामावर होणारा परिणाम याचा साधा विचारही या प्रेक्षकांच्या मनात येत नसेल का..? दिवसाचे किमान १७/१८ तास या मनोरंजनाच्या आभासी दुनियेत वावरताना, खऱ्याखुऱ्या जगाकडे आपण डोळेझाक करतोय हेही जाणवत नसेल का..? रात्री डोळे मिटेपर्यंत हातात असलेला मोबाइल सकाळी डोळे उघडताक्षणी आपोआपच हातात येतो आणि सोशल मीडियावरचे अपडेट्स घ्यायला सुरुवात होते. आपल्या कालच्या पोस्टला पडलेले लाइक्स आणि कमेंट्स वाचून होतात, काही जणांचे स्टेटस पाहून त्यावर प्रतिक्रिया दिल्या जातात आणि एका क्षणी शॉर्ट रिल्सचा न संपणारा चकवा सुरू होतो. घड्याळाने आठवण करून दिल्यावरच मोबाइल बाजूला ठेवून आपण जॉगिंगला निघतो. पण बूट घालण्याआधी कानाला हेडफोन्स लावून ते मोबाइलला जोडतो. गाणी ऐकता ऐकता व्यायाम आटोपला की घरी पोहोचून, झटपट आन्हिकं उरकून आपण ऑफिससाठी बाहेर पडतो. पण त्यापूर्वी कानात ब्ल्यूटूथचे इअरबड्स घालून मोबाइलवर प्लेलिस्ट सुरू करायला आपण विसरत नाही. गाडी चालवता चालवता गाणी ऐकतच आपण ऑफिसला पोहोचतो. ऑफिससाठी अपडाऊन करावं लागत असेल तर मग गाणी हवीतच. शेजारी बसलेल्या सहप्रवाशाशी चकार शब्दही न बोलता आपण मस्त गाणी ऐकत ऑफिसात शिरतो. तिथेही काम करताना कानात गाणी सुरू असतातच. शिवाय रात्री झोप अनावर झाल्यानं अर्धवट राहिलेला वेबसिरीजचा एखादा भाग पटकन पाहून घेतला जातो. सोबतचा सहकारीही त्यात डोकावला तर एका कानातलं यंत्र त्याच्या कानात खोचलं जातं. कामाचे तास भरले की घरी परत येतानाही कानात गुणगुण सुरूच असते. घरी पोहोचताच एकीकडे इअरबड्स चार्जिंगला टाकायचे आणि टीव्ही सुरू करायचा. मालिका, बातम्या किंवा समोर जे दिसेल ते पाहत पाहत जेवण उरकायचं आणि मग ओटीटीवर वेबसिरीजचा पुढचा भाग सुरू करायचा. कसलं भारी ना…मनोरंजनात आजिबातच खंड पडायला नको. मनोरंजनाच्या या राक्षसी स्वरूपाने आपल्यापासून काय काय हिरावून घेतलंय याची यादी करायला बसलो तर ती संपता संपणार नाही. नातेवाइकांच्या सहज होणाऱ्या गाठीभेटी तर आता कालबाह्य झाल्या आहेत.शुभकार्य किंवा दु:खद प्रसंगाव्यतिरिक्त नातेवाइकांच्या भेटींवर जणू बंदीच आली आहे. मित्रांच्या भेटीसुद्धा प्रासंगिकच होऊ लागल्या आहेत. कारण हे लोक सोशल मीडियावर सदैव ऑनलाइन असतात. तिथेच त्यांच्याशी GM, GN, TC, HBD, अशा आणि कधी कधी अगदीच अगम्य असलेल्या भाषेत आणि इमोजींच्या स्वरूपात चॅटिंग केलं जातं. वेबसिरीजला देण्यासाठी आपल्याकडे दररोज भरपूर वेळ असतो, पण नातेवाइकांना किंवा मित्रांना प्रत्यक्ष भेटायला आपल्याला आणि त्यांनाही आपापल्या बिझी शेड्यूलमधून वेळच काढता येत नसतो. मनोरंजनाच्या या विळख्यापासून लहान मुलंही वाचू शकलेली नाहीत. अगदी दोन /तीन/चार वर्षांची बाळंही आईबाबांच्या मोबाइलवर किंवा लॅपटॉपवर यूट्यूबवरचे व्हिडिओ किंवा गाणी हट्ट करून पाहतात. बरेचदा तर आईवडील स्वत:च बाळांना जेवू घालताना असे व्हिडिओ लावून देतात. लहानपणापासूनच ही मुलं मनोरंजनाच्या या फेऱ्यात अडकल्यामुळे गाण्याच्या भेंड्या, कॅरम, बैठे खेळ किंवा लपाछपी, विषामृत, डबा ऐसपैससारखे खेळ नामशेष होत आहेत. गोष्टीची पुस्तकंसुद्धा हातातून निघून मोबाइलमध्ये जाऊन बसली आहेत. ‘आजीकडून गोष्ट ऐकणारी नातवंड’ हे दृश्य तर ‘उंबराचं फूल’ पाहण्याइतकं दुर्मिळ झालं आहे. आजीच्या मांडीवर डोकं ठेवून गोष्ट ऐकताना बरेचदा झोप लागायची, मग तीच गोष्ट दुसऱ्या दिवशी पुन्हा ऐकायची. बहुतांश गोष्टींच्या शेवटी काहीतरी कथासार असायचा, बोध असायचा. आज वेबसिरीजमधून काय बोध घेणार..? सगळ्याच वेबसिरीज वाईट नसणार, पण त्यांचं व्यसन लागणं हे तर वाईटच. आजीने सांगितलेल्याच भस्मासुराच्या गोष्टीची इथे प्रकर्षाने आठवण होते. शंकराकडून वर मिळाल्याने उन्मत्त झालेला भस्मासुर शंकरावरच उलटतो. तसाच आपणच तयार केलेला मनोरंजनाचा हा भस्मासुर आता आपल्यावर उलटतो आहे. त्याच्यापासून आपला आणि पुढच्या पिढीचाही बचाव करायचा असेल तर वेळीच सावध व्हायला हवं.

हर्षवर्धन दीक्षित संपर्क : ९८८१२२३६७५

बातम्या आणखी आहेत...