आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराजे. के. रोलिंग आणि सू टाउनसेन्ड या गेल्या तीन दशकांत ब्रिटनने इंग्रजी साहित्याच्या जगाला दिलेल्या दोन प्रतिभाशाली लेखिका. ललित लेखन करणे याव्यतिरिक्त दोघींच्या लेखनात तसं पाहता काहीही साम्य नाही. दोघींचा लेखनकाळ सारखा नाही - रोलिंगचा उदय होत होता तेव्हा टाउनसेन्ड प्रस्थापित होत्या. टाउनसेन्डच्या मृत्यूनंतर ट्विटरवर दिलेली एकोळी श्रद्धांजली वगळता रोलिंगने त्यांचा कधी उल्लेखही केलेला नाही. पण तरीही, या दोघींच्या लेखनप्रवासात विलक्षण साम्यस्थळे आहेत. दोघींनीही कुमारवयीन मुलांचं (टीनएजर्सचं) भावविश्व लेखनातून चितारलं. दोघींच्या लेखनात भोवतालच्या परिस्थितीवर केलेला सूक्ष्म, पण टोकदार विनोद सापडतो. दोघींनीही उमेदीची वर्षं गरिबीत घालवली. दोघींनाही मध्यमवयात अभूतपूर्व प्रसिद्धी आणि आर्थिक स्थैर्य मिळालं. समृद्ध देशांतील गरिबीकडे किंचित हेटाळणीच्या भावाने पाहिलं जातं. पण, जे त्यातून जातात त्यांना चटके बसायचे काही राहत नाहीत. टाउनसेन्डचा जन्म निम्न मध्यमवर्गातील कुटुंबात झाला. शालेय वयात फारशी चमक त्यांनी दाखवली नाही, आणि वयाच्या चौदाव्या वर्षी शाळा सोडून त्यांनी विविध प्रकारच्या नोकऱ्या करून अर्थार्जन केलं. वयाच्या अठराव्या वर्षीच त्यांनी एका कामगाराशी लग्न केलं, ते पाच वर्षांत मोडलं, पण तोवर त्यांना तीन मुलं झाली होती. आर्थिक अस्थैर्य येणं अपरिहार्य होतं. सरकारकडून मिळणाऱ्या मदतीला मर्यादा होत्या. त्या काळात अक्षरशः पैशापैशासाठी त्यांना झगडा करायला लागला. मुलांनाही गरिबीच्या झळा बसल्याच. त्या वेळेपर्यंत टीनएजर झालेल्या त्यांच्या थोरल्या मुलाने एक दिवस त्यांना, ‘रविवारी आपलं कुटुंब इतर कुटुंबांसारखं प्राणिसंग्रहालयात जाऊन मनोरंजन का करत नाही?’ असं विचारलं. (खरं उत्तर अर्थात ‘त्यासाठी पैसे लागतात, जे आपल्याकडे कमी आहेत’ हे होतं. बहुधा टाउनसेन्ड ते देऊ शकल्या नसाव्यात.) पण, टाउनसेन्डना टीन एजर मुलांच्या भावविश्वात रस वाटायला ही घटना कारणीभूत ठरली. वयाच्या तिशीत टाउनसेन्डने पहिली एकांकिका लिहिली. ती त्यांच्या गावातल्या नाट्यसंस्थेने मंचावर आणली आणि तिथून त्यांचा लेखनप्रवास सुरू झाला. टीनएजर मुलगा नायक असलेल्या दोन लघुकथा एका हितचिंतकाने बीबीसी रेडिओच्या निर्मात्याला पाठवल्या आणि त्यांनी त्यावर बेतलेली श्रुतिका प्रक्षेपित केली. एकाएकी टाउनसेन्डना राष्ट्रीय मंच मिळाला, आणि त्यांचा लोकप्रिय लेखक होण्याचा प्रवास सुरू झाला. या टीनएजर मुलाचं नाव एड्रियन मोल. मालिकेच्या सुरुवातीला तो सव्वातेरा वर्षांचा असतो आणि त्या वयातल्या मुलांप्रमाणे तो असुरक्षित, किरकिरा, स्वतःबद्दल अवाजवी मतं बाळगणारा असतो. मालिकेत एकूण नऊ पुस्तकं लिहिली गेली. पहिल्या पुस्तकाचा काळ १९८२ आहे आणि तो तसा असणे, हेही लोकप्रियतेचं एक कारण आहे. मार्गारेट थॅचर ब्रिटनच्या पंतप्रधान असण्याचा तो काळ होता. त्यांच्या काळात राबवलेल्या आर्थिक आणि सामाजिक धोरणांना ‘थॅचरिझम’ अशी संज्ञा आहे. दुसऱ्या महायुद्धानंतर राबवलेल्या समाजवादी धोरणांना चाप लावायचं काम या काळात झालं. प्रचंड मोठ्या प्रमाणात खासगीकरण करण्यात आलं, उद्योगांवरचे सरकारी निर्बंध कमी केले आणि करकपात करण्यात आली. यामुळे अर्थव्यवस्थेत ‘विकास’ झालेला दिसला, तरी गरीब-श्रीमंतांतली दरी आणखी मोठी होत गेली. खासगीकरण केल्याने कामगारकपात झाली आणि असंतोषात भर पडली. काही निर्णयांमुळे थॅचरना राक्षसिणीची उपमा देण्यात आली. शाळेत दूध फुकट देण्याची पद्धत बंद केली म्हणून ‘दूधचोर’ या उपाधीने त्यांना ‘गौरवण्यात’ आलं. दुर्बलांचं अधिक खच्चीकरण होण्याचा तो काळ होता, पण दुसऱ्या बाजूला सबळांची ताकद आणखी वाढत गेली. तुमच्याकडे बाजारात विकण्यासारखं काही असेल - बुद्धी, सौंदर्य, सत्ता, किंवा मत्ता - तर थॅचरकाळात (आणि नंतर) तुमच्या विकासाचा वारू कोणी अडवू शकत नव्हतं. एड्रियन मोल पुस्तकांना ही पार्श्वभूमी आहे. टाउनसेन्डमधला कुशल लेखक दोन विरुद्ध टोकांची पात्रं एकमेकांसमोर ठेवतो आणि त्यांच्या आयुष्यातल्या घटना त्या काळावर प्रकाशझोत टाकतात. उत्तरायुष्यात प्रसिद्धी आणि संपत्ती लाभली असली, तरी टाउनसेन्ड आपल्या समाजवादी तत्त्वांना कायम चिकटून राहिल्या. युनायटेड किंगडम हे लोककल्याणकारी राज्य (वेल्फेअर स्टेट) असावं, अशी भूमिका त्यांनी कायमच मांडली. त्यांच्या इतर पुस्तकांतूनही ती दिसली. ‘क्वीन अँड आय’ या पुस्तकात ब्रिटिश राजघराण्याला पदच्युत करून गरिबांना देण्यात येणाऱ्या ‘काैन्सिल हाऊस’मध्ये स्थलांतरित करण्यात आलं आहे, अशी कल्पना त्या करतात. पुढे घडणाऱ्या धमाल घटनांत श्रीमंती आणि गरिबीवर केलेल्या मार्मिक टिप्पणीचा मोठा रोचक भाग येतो. ‘द क्राउन’ या मालिकेमुळे ब्रिटिश राजघराण्याच्या ‘प्रेमात’ पडलेल्या लोकांनी आवर्जून वाचावं असं हे पुस्तक आहे. टाउनसेन्ड यांचा २०१४ मध्ये मृत्यू झाला. ज्यांच्यावर काहीच लिहिलं गेलं नाही, त्यांच्यावर त्या कायमच लिहीत राहिल्या. माझ्या मते, त्यांना एवढी श्रद्धांजलीही पुरेशी आहे. आदूबाळ aadubaal@gmail.com
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.