आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रसिक स्पेशल:तंत्रात रंगलेल्या नाटकाला मंत्रही सापडेल!

औरंगाबाद2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

राज्य नाट्य स्पर्धेच्या पहिल्या फेरीचे निकाल नुकतेच लागले. अनेकदा सहभागाचा परिपाठ मोडायचा नाही म्हणून या स्पर्धेत नाटक सादर होते. मग ते चांगले जमले नाही तरी चालेल. याचा परिणाम असा होतो की, प्रेक्षक पाठ फिरवतात. यंदा सगळीकडे प्रेक्षक गर्दी करत होते. पण, तीन-चार वर्षांपूर्वी नाट्यगृहात १०-१५ च्या वर प्रेक्षक नसायचे, हे अनेकांना आठवत असेल. त्यामुळे आता प्रेक्षकांचा हा उत्साह वाढता ठेवत नाट्य चळवळ समृद्ध होण्यासाठी नाटकांचे खेळ रंगवणे, पुढे नेणे आणि किमान सुविधा तयार करणे ही सर्वच संबंधितांची जबाबदारी आहे.

म राठी राज्य नाट्य स्पर्धेचे हे ६० वे वर्ष. पहिल्या फेरीतील स्पर्धा संपून निकाल लागले आहेत. या वेळी कोरोनाच्या सावलीतून बाहेर पडता पडता स्पर्धा लागल्याने खूप उत्साह होता. प्रेक्षकांनीही गर्दी केली होती. ‘राज्य नाट्य’ हा रंगकर्मींच्या आशा-आकांक्षा फुलवणारा जिवंत झरा.. अनेक कलाकारांनी त्यांचे पहिले मोठे पाऊल राज्य नाट्यच्या मंचावर टाकले आहे. अनेक लेखक लिहिते झाले, दिग्दर्शक घडले, नट-नट्या पुढे आल्या. नाटकाच्या सर्व अंगांचा परिपोष या स्पर्धेमुळे होत गेला. महाराष्ट्र सरकारने नाटकवेड्या प्रजेसाठी सरकारी शैलीत हा मांडव इतकी वर्षे टाकला. टीकेचे सर्व मुद्दे एका पारड्यात टाकले, तरी स्पर्धेने जे दिले त्याचे दुसऱ्या पारड्यातले वजन नक्कीच जास्त आहे.

‘दिव्य मराठी’ने नाशिक, औरंगाबाद, जळगाव, सोलापूर, अकोला-अमरावती या केंद्रांवर सादर होणाऱ्या स्पर्धेतील नाटकाच्या परीक्षणासोबत तारांकित मूल्यांकनाचा तक्ता देण्याचा उपक्रम सुरू केला. तीन जाणकारांचे मंडळ त्यासाठी नेमले. मराठीत नाट्य परीक्षण करण्याची चांगली परंपरा आहे. अलीकडे ती काहीशी क्षीण झाली. अमुक एक नाटक सादर झाले, असे म्हणून श्रेयनामावली छापण्यात नाट्यकलेचा काही फायदा नव्हता. दिग्दर्शक, रंगभूषा, नेपथ्य, प्रकाश योजनाकार यांच्याप्रमाणेच परीक्षणकर्ताही नाटक खुलवण्यासाठीच असतो. फक्त त्याचे काम प्रयोग संपल्यावर पार पडते. हौशी कलावंतांचे कौतुक तसेच त्याच्या चुका दाखवून अधिक चांगले करण्याचे सूचन गरजेचे असते. तुटपुंज्या साधनसामग्रीत नाटक उभे करणे जिकिरीचेच. परंतु, आपण नटराजाला वंदन करून रंगमंचावर पाऊल ठेवतो तेव्हा हौशी शब्दाच्या आड न लपता उत्तमच देण्याची तयारी केली पाहिजे. रसिक हा मायबाप असतो. परीक्षक आधी रसिक आणि नंतर थोडा अधिक जाणता असतो. त्याने कौतुक केले तर उत्तमच; पण नाही केले तर तो कलेचा, कलावंतांचा वैरी नाही. नाटक अधिक चांगले व्हावे या हेतूने त्याने दिलेला अभिप्राय स्वीकारला पाहिजे. तो पोस्टमॉर्टेम नाही करत. कारण नाटकात जिवंत अस्तित्व असते हे भान देण्यात ‘दिव्य मराठी’चा हा उपक्रम चांगला यशस्वी ठरला. अनेक जुन्या-नव्या रंगकर्मींनी तसे बोलूनही दाखवले. काहींनी ‘आम्ही हौशी असल्याने दोष नका दाखवू’ अशी अपेक्षा व्यक्त केली. ‘दिव्य मराठी”ने घेतलेला हा पुढाकार पुढे नेण्यासाठी ठिकठिकाणी काय दिसले, अधिक-उणे काय करता येईल, याचा धांडोळा घेण्यासाठी या लेखाचा प्रपंच.

सर्व ठिकाणी जाणवली ती प्रयोगक्षम, चांगल्या संहितांची वानवा. स्पर्धेत नाटक करायचे म्हणून ऐनवेळी नाटक लिहून घेतले जाते. नाटक म्हणजे जिलबी नव्हे. पण, थोडीबहुत लेखनकामाठी अंगी असणारे पैशापेक्षा प्रसिद्धीच्या लोभाने हे हंगामी काम स्वीकारतात. नाटक पाहताना ही ‘पाडलेली’ संहिता आहे हे लगेच लक्षात येते. नाटकाचे तंत्र-मंत्र जाणणारा दिग्दर्शक क्वचित अशा संहितांचे सोने करतो. ज्यांचे नाव झाले आहे अशा लेखकांकडून लिहून घेण्याकडे कल जास्त असतो. स्टेज कळत असले तरी अनेक मोहापायी लेखक संहितेत माती पसरून ठेवतो. अति काव्यप्रचुर संवाद, भूमिका घेण्याची हौस, पात्रनिर्मितीत प्रमाणबद्धता नसणे, स्टेजवर कसरती करण्याला वाव देणे यांसारखे काही दोष सतत समोर येत गेले.. नाटक शब्दबंबाळ नसावे, तसे तत्त्वबंबाळही नसावे. गडकऱ्यांची नाटके, त्यावरची टीका किती लेखकांनी वाचलेली असते? एलकुंचवारांनी अलीकडेच कालिदासाबद्दल जे म्हटले ते कितींनी समजून घेतले? नाटकाने भूमिका जरूर घ्यावी, पण त्यासाठी विचारप्रणाली, त्यांचे चालचलन आदींचे समकालीन भान हवे. ते सहसा नसतेच. सध्या मोदींचा बोलबाला असेल, तर विषयाचा ओघ सोडून धक्का देऊन पळून जायचे म्हणजे भूमिका घेणे नव्हे. एखादी प्रणाली काकडीसारखी चोचून ठेवा की! उगीचच चमकोगिरी कशाला? नाटक मी लिहितो, दिग्दर्शनही करतो, प्रमुख भूमिका माझीच, झालेच तर प्रकाशयोजनाही करतो, मग प्रेक्षकही तूच हो ना दादा! चांगले नाटकच लेखक घडवते. हे प्रतिभा आणि परिश्रमाचे काम होय. क्षमता असलेले लेखक हेरून त्यांना घडवले पाहिजे. आपण ‘थिएटर’मधला अंतिम शब्द झालो आहोत, असा समज झालेल्यांनी घेतलेल्या कार्यशाळांत लेखक किंवा कोणताच रंगकर्मी घडत नसतो. या स्पर्धेत नाटक नवे असेल तर गुण असतात ही खरे तर उत्साह वाढवणारी गोष्ट आहे. मोजक्या का होईना, तरुण नाटककारांनी चुणूक दाखवली. त्यांनी स्वत:वर काम करायला हवे. ‘पोहोचलो’ या गंडात सापडता कामा नये. जळगावात बोलीभाषेचा प्रयोग करून ब्लॅक कॉमेडी किंवा प्रयोगात नवा प्रयत्न करणारे एक नाटक दिसले. या आशादायी गोष्टी होत. औरंगाबादेत एकेकाळी जुनी नाटके निवडण्यावर भर असे. तेथे यंदा नवे आशय शोधणाऱ्या नव्या संहिता अधिक दिसल्या. त्यातही मनोविश्लेषणात्मक अधिक होत्या. सादरीकरणामागेही सफाईदारपणाचा प्रयत्न जाणवला. तंत्रस्फोटाने सध्या विषयांची रेलचेल असली तरी मानवी मनाची तंत्राशी घुसळण होऊन वर येणारे नवनीत अजून लेखक अलगदपणे बाजूला काढू शकलेले नाहीत.

दिग्दर्शक हा संघनायक असतो. तो आणि नट हे लेखकाबरोबर नाटकाचे सहलेखनच करत असतात. मात्र, यांची जबाबदारी अधिक. आंगिक, वाचिक अभिनयाचे भक्कम भांडवल यांना लागते. सर्वांचे सूर जुळावे लागतात. नेपथ्य, प्रकाश यांच्याशी एकजीव व्हावे लागते. स्पर्धेत अपवाद वगळता प्रत्येकाचे गाव वेगळे दिसले. पात्र निवड चुकल्यावर नाटक हातून जाणारच. पाठांतर ही किमान गरज असली तरी केवळ ते चोख असून भागत नाही. प्रसंगात नटाने कायावाचामने उतरावे लागते. तो उतरतोय हे पाहण्याची जबाबदारी दिग्दर्शकाची. अंगात लोखंडी सळ्या टाकल्यासारखे ताठ वावरणारे नट जास्त दिसत होते. हौशी आहेत, पहिलेच नाटक आहे म्हणून चालणार नाही. ज्याला पैसे पडत नाहीत अशा गोष्टी काही वेळा समजून घेऊन कष्टाने साधता येतात. ज्यांना खरेच नाटक करायचे आहे ते कष्टाला तयार होतात. याही क्षेत्रात आता मेंटॉरिंग कमी होत चालले आहे. शिकू इच्छिणारे आहेत, पण शिकवणारे नाहीत. औरंगाबाद हे तर नाट्य शिक्षणाचे जुने केंद्र. अनेक लेखक, दिग्दर्शक, नट या नगराने दिले. तो प्रवाह आजही खळाळता आहे याचे दर्शन स्पर्धेने घडवले. जळगावात नाटक गंभीरपणे घेतले होते. नाशकात हुकमाचे पत्तेच खेळले. एक संहिता सरस होती. दिग्दर्शन, अभिनय उत्तम होता, पण तंत्रात कमी पडले. एकात स्टेज कळणेच स्वार झाले. तिसरे दिग्दर्शकाने ताब्यात घेऊन आहार्य अभिनयाने नटवून देखणे केले. नाटक देखणे होणे आणि रंगणे यातला फरक थोड्यांनाच कळतो. देखणे करायला दमड्याही मोजाव्या लागतात. ज्यांच्याकडे आंगिक, वाचिक बाजू चांगली असते, पण आहार्यला दमड्या नसतात, ते थोडे हिरमुसतात. खर्चावर बंधन घालण्याचा विचार करून पाहायला हरकत नाही. सुविधा ही रंगकर्मींची प्रामाणिक अडचण सर्वत्र दिसते. तालमीला जागा मिळवणे जिकिरीचे होते. नाशकात एका हॉलमध्ये दिवसाला चार संघांच्या तालमी झाल्या. शाळा-कॉलेजेस जागा द्याला खळखळ करतात. इमारतींच्या टेरेसवर तालमी होतात. स्थानिक प्रशासनाने यात लक्ष घालायला हवे. संघाला सरकार सहा हजार रुपये देते. अर्थातच त्यात भागत नाही. प्रत्येक नाटकामागे सरासरी किमान १५ ते २० हजार खर्च झालेला दिसत होता. काही पौराणिक, ऐतिहासिक नाटकांनी जास्तही खर्च केला.

विविध ठिकाणच्या नाट्य संस्था ही स्वतंत्र बेटे असतात. श्रेष्ठत्वाचा अहंकार असलेले काही जण तेथे राज्य करतात. नव्या रंगकर्मींना ते बाकी काय शिकवतात ठाऊक नाही, पण अहंकाराचा संस्कार पक्का करतात. साहित्याप्रमाणे येथेही टोळ्या आहेत. एकांकिका, नाटके बसवून दिली जातात. एकच दिग्दर्शक तीन-चार नाटके बसवतो. बसवतो एक अन् नाव दुसऱ्याचे असते. कोणत्या इराद्याने नाटक उतरवले जाते हेही महत्त्वाचे. नाटकबाह्य हेतू बाळगून सहभाग घेतला जातो. सारे काही एकाच माणसावर केंद्रित असते. चमकोगिरी करायला अन्य क्षेत्रे आहेत की! सहभागाचा परिपाठ मोडायचा नाही म्हणून नाटक होते. मग ते चांगले जमले नाही तरी चालेल. याचा परिणाम असा होतो की, प्रेक्षक पाठ फिरवतात. यंदा सगळीकडे प्रेक्षक गर्दी करत होते. पण, ३-४ वर्षांपूर्वी नाट्यगृहात १०-१५ च्या वर प्रेक्षक नसायचे हे अनेकांना आठवत असेल. नाटक शहरांची मिरासदारी असू नये, पण ती तशी असते. सोलापूरला आजूबाजूच्या गावातून नाटके आली हा चांगला संकेत होय.
भरतवाक्य : नाटकाचा खेळ रंगवणे, पुढे नेणे, या वेडाचे वारसा हस्तांतरण, किमान सुविधा असणे हे सर्व स्टेक होल्डर्सवर अवलंबून आहे. माध्यमे त्यातील एक. परीक्षक मंडळ नेमून गुणांकन, परीक्षणे देणे हेही नटराजाला वंदनच. वाचकांनी त्याबाबत खुलेपणाने अभिप्राय द्यायला हवा.

अनंत येवलेकर ananty@gmail.com

संपर्क : ९४२२९४३३६६

बातम्या आणखी आहेत...