आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आठवणी:...अन् मी पुन्हा शाळा बुडवली नाही

औरंगाबाद8 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

शाळा बुडवणे तुझ्यासारख्या होतकरू मुलाला शोभत नाही. शिक्षणामुळे खऱ्या अर्थाने तू तुझ्या घरची हलाखीची परिस्थिती बदलू शकतो अन् आयुष्याचं मातेरं होण्यापासून वाचवू शकतो.

गावात जिल्हा परिषदेच्या शाळेत शिकत असताना आपले गाव, गुरुजी व पोरंही गावातले असल्यामुळे शाळेचा लळा लागला होता. पण आता आठवीला नव्या शाळेत प्रवेश घ्यायचा अन् शाळा ही गावापासून पाच किलोमीटर दूर दुसऱ्या गावात असल्याने थोडं टेन्शन आलं होतं. पण दुसरा पर्याय नव्हता म्हणून मी माझ्या गावातील वर्गमित्रासोबत आठवीच्या वर्गात प्रवेश घेतला.

मी आठवीला गेलो तेव्हा मोठा भाऊ त्याच शाळेत दहावीच्या वर्गात होता. साधारण फेब्रुवारी महिन्यात दहावीच्या सराव परीक्षा होऊन त्या मुलांना बोर्डाच्या परीक्षेच्या अभ्यासासाठी सुट्या दिल्या म्हणून भाऊ घरी राहून अभ्यास करू लागला. मग मलाही शाळेत जाण्याचे जिवावर आले. माझ्या दोन वर्गमित्रांची गत यापेक्षा वेगळी नव्हती. म्हणून आम्ही तिघांनीही फेब्रुवारीपासून शाळेत जाणे बंद केले. शाळा परगावी असल्यामुळं गुरुजी माझ्या गावात येऊन मार देण्याची शक्यता नव्हती म्हणून आम्ही निर्धास्त होतो. शाळेत न जाण्याचं मी वडिलांना खोटं कारणही सांगितलं होतं. पण एक दिवस गल्लीतील नववीत शिकणाऱ्या मुलाच्या हस्ते आम्हा तिघांच्या घरी मुख्याध्यापकांनी पालकांना तुमचे पाल्य गैरहजर असल्यामुळे त्यांना शाळेतून काढून टाकण्यात येत असल्याची नोटीस पाठवली अन् वडिलांना मी खोटं बोलल्याचं समजलं. वडील रागावले, पण त्यांनी मारलं नाही. दुसऱ्या दिवशी वडिलांच्या सांगण्यावरून शाळेत गेलो. शाळेत तासाला मराठीच्या शिक्षकांनी महिनाभर शाळेला दांडी मारल्यामुळे संपूर्ण तासभर वाकून स्वत:च्या पायाचा अंगठा धरून आणि पाठीवर दगड ठेवण्याची शिक्षा दिली. थोडी हालचाल केली की दगड पडत असे व दगड पडला की मग छड्याची शिक्षा. आता तासभर ही जीवघेणी शिक्षा भोगल्याशिवाय सुटका नाही हा मनाचा पक्का निर्धार झाला होता. पण दहा मिनिटेच झाली अन् सरांचे नातेवाईक आल्यामुळे सर त्यांना स्वत:च्या घरी घेऊन गेले. जाताना वर्गातल्या इतर मुलांना आमच्यावर कडक लक्ष ठेवण्याबद्दल बजावून गेले.

गुरुजी घरी गेल्यानंतर वर्गातील सर्व मुलांनी आम्हाला विश्वास दिला की तुम्ही आता निवांत बसा.. गुरुजी येताना दिसले की पुन्हा घोडा करून तुमच्या पाठीवर दगड ठेवून देऊ..अन् त्याप्रमाणे गुरुजी अर्ध्या-पाऊण तासाने परत येताना दिसले. आम्ही पुन्हा ते वर्गात येण्याच्या आत घोडा झालो. सर आल्यानंतर आमचा आज्ञाधारकपणा पाहून आम्हाला शिक्षेतून मुक्त केले. आता फक्त शाळा सुटण्यास एक तास वेळ होता म्हणून हिंदीचे सर तासांवर आले अन् त्यांनी आम्हा तिघांना पाहिले असता उभे केले व छडी हातात घेऊन माझ्या दोन्ही वर्गमित्रांना झोडपून काढले.आता माझा नंबर होता. सर माझ्या जवळ आले. मी भीतीने थरथर कापत होतो. सर जवळ येऊन म्हणाले, तुला सहामाहीच्या परीक्षेत सर्वात जास्त मार्क मिळाले.म्हणून तुझी ही चूक माफ. अशी शाळा बुडवणे तुझ्यासारख्या होतकरू मुलाला शोभत नाही. शिक्षणाने खऱ्या अर्थाने तू तुझ्या घरची हलाखीची परिस्थिती बदलू शकतो.आयुष्याचं मातेरं होण्यापासून वाचवू शकतो .मी आशा करतो की तू इथून पुढे रोज शाळेत येशील....अन् त्यानंतर मी आयुष्यात कधीही शाळा बुडवली नाही.

ज्ञानेश्वर गायके संपर्क : ९४०३३८४८८९

बातम्या आणखी आहेत...