आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराया वर्षी प्रथमच महिलांसाठी महाराष्ट्र केसरी स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं. शांत आणि संयमी खेळी करत मुंबईच्या वैष्णवी पाटीलला २ मिनिटे ४२ सेकंदांत अस्मान दाखवत प्रतीक्षा बागडीने मानाची गदा पटकावली. कुस्तीगीर असलेल्या रामदास बागडी यांच्या कुटुंबीयांचे नाव यामुळे महाराष्ट्राच्या क्रीडा क्षेत्रात कोरले गेले. महाराष्ट्र केसरीच्या पुरुष स्पर्धेतील पहिला मानकरी मल्ल दिनकर दहियारी आणि महिला स्पर्धेतील पहिली मानकरी प्रतीक्षा हे दोघेही सांगलीचेच असल्यामुळे सांगलीच्याही शिरपेचात मानाचा तुरा खोवला गेला. सांगलीजवळील तुंग गावात बागडी कुटुंबीयांचे वास्तव्य आहे. प्रतीक्षाचे वडील रामदास हे पोलिस दलात हवालदार म्हणून कार्यरत आहेत. तेही काही काळ कुस्तीगीर म्हणून खेळत होते. वयाच्या तेराव्या वर्षी तिलाही भाऊ आणि वडिलांप्रमाणे कुस्तीगीर व्हावे असे वाटू लागले. २०१५ पासून तिने कुस्तीचे धडे गिरवण्यास सुरुवात केली. सांगलीच्या वसंतदादा क्रीडा संकुलात कुस्तीचे प्राथमिक डाव शिकल्यानंतर तिने कोल्हापूर, पुणे इथल्या व्यायामशाळांत प्रशिक्षण घेतले. नंतर हरियाणातील हिस्सार इथे कुस्तीचे डाव आणि अधिकची मेहनत तिने घेतली. त्यानंतरच ती विविध स्पर्धेत सहभागी होऊ लागली.
प्रतीक्षाच्या कुस्तीच्या कारकीर्दीतली पहिली स्पर्धा हरिपूर येथे झाली. या स्पर्धेत तिने तिच्यापेक्षाही अधिक वजनी आणि अनेक स्पर्धा गाजवलेल्या महिला कुस्तीगिरांना चितपट करून पहिली स्पर्धा जिंकली. त्यानंतर आंध्र प्रदेशातील विशाखापट्टणम येथे २०२२ मध्ये वरिष्ठ राष्ट्रीय रजत पदक मिळवून राष्ट्रीय स्पर्धेतही लौकिक मिळवला.
प्रतीक्षा सध्या इस्लामपूर येथे कला शाखेच्या प्रथम वर्षात शिकते आहे. या शिक्षणाबरोबरच ती दिवसातील चार तास आखाड्यातही मेहनत घेत आहे. ‘सांगली शहरात कुस्तीचा सराव करताना कुस्तीगीर मुलींची उणीव जाणवते. त्यामुळे मी सध्या मुलांबरोबर सराव करून माझा खेळ उंचावण्याचा प्रयत्न करीत आहे. कुस्तीतील ढाक, लपेट या डावावर अधिक वर्चस्व प्राप्त करण्यासाठी मी प्रयत्नशील आहे. आंतरराष्ट्रीय स्पर्धेत ६० किलो वजनी गटातही भारताला पदक मिळवून देण्यासाठी जिवाची पराकाष्ठा करण्यात मी कमी पडणार नाही,’ असा आशावादही ती व्यक्त करते.
{संपर्क : 9372100500
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.