आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सिनेविश्व:प्रेमाचे आगळे रूप – ‘द ब्लू  काफतान’

औरंगाबाद2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

बर्बर, अरब आणि युरोपियन मिश्र संस्कृतीची पायवाट असणाऱ्या मोरोक्कोमध्ये समलिंगी संबंधांना गुन्हा मानले जाते. अशा संबंधांत असणाऱ्यांना कडक शिक्षा दिली जाऊ शकते. अशा देशातल्या मरयम तुझानी या दिग्दर्शिकेने ‘द ब्लू काफतान’ ही पारंपरिक धर्म-रुढींच्या अन्यायी व्यवस्थेत दडपल्या गेलेल्या इच्छांचे दर्शन घडवणारी, उत्तम निर्मितीमूल्ये असणारी कलाकृती निर्माण करावी हे तिचे आगळेपण आहे. ही प्रेमकथा खरे तर हलीम -युसेफ यांच्यामधल्या नात्याची, पण ती हलीम-मीनाभोवती, त्यातही मीनाभोवती केंद्रित होते. धर्मनिष्ठा, पत्नीधर्म मनीमानसी रुजलेली मीना त्यांचे समलिंगी संबंध जाणल्यानंतर त्या असूयेतून बाहेर येत, भेदभेदांच्या भिंती पाडून टाकून त्यांना स्वीकारणारी सर्वंात मोठी माणूस ठरते. एक खेडूत, अडाणी स्त्री त्यांचे वास्तव स्वीकारून तिघांच्या जगावेगळ्या पालकत्वाच्या नात्यांचा मनोज्ञ गोफ विणत; सुशिक्षित, प्रगत म्हणवणारे तुम्ही-आम्ही हे वास्तव का नाही स्वीकारु शकत, हा खडा सवाल आपल्याला करते. कुठल्याशा जुन्या पुराण्या गावठाणात राहणारा मालेम (ड्रेसमेकर) हलीम (सालाह बाकरी), त्याची पत्नी मीना (लुबना अझाबल) आणि नव्याने आलेला अॅप्रेंटिस युसेफ (अय्यूब मेस्युई ) या माणसांची ही प्रेमकहाणी. खानदानात पिढ्यानपिढ्या शिवण-भरतकामाची कला असल्याने गावातल्या आयाबाया हलीमकडे मोठ्या विश्वासाने पारंपरिक जरीकाम असलेला काफतान शिवून घ्यायला येतात. दुकान आणि घर दोन्हीकडे मीना मालकीणबाई ; या कष्टाळू बाईत दडलेला स्त्रीसुलभ मृदुपणा, तिचे नवऱ्याशी कधी तोऱ्याने, प्रसंगी बरोबरीने, कधी त्याला मोठेपणा देणे भावते. पण दुकानातल्या आयाबायांशी चतुरपणे बोलणाऱ्या या बाईच्या अंतरंगात कुठेतरी दुःखाचे तरंग आहेत असेही वाटत प्रेक्षक तिच्याशी जोडला जातो. हलीमचे मीनावर निरातिशय प्रेम आहे, पण त्याच्यामधली समलिंगी वृत्ती त्याने आजवर दडवून ठेवलेली आहे त्यामुळे त्यांच्या नात्यात एक फसवणुकीची छटा आहे. सिनेमॅटोग्राफर व्हर्जनी सरदेजचा कॅमेरा गावातल्या दगडी फरशांच्या रस्त्यावरुन हलीमच्या दुकानात घेऊन जात, हाताने शिवण्या-भरतकामाचे सौंदर्य दर्शवत, काळाच्या ओघात पारंपरिक कला लुप्त होतात पण बुरसटलेल्या रुढी टिकून राहतात हा विरोधाभास अधोरेखित करत जातो. मीना-हलीमच्या आयुष्यात झालेले युसेफचे आगमन हे मीनाच्या स्थिर वैवाहिक अवकाशात अनेक नाट्यमय तणाव घेऊन येते. आपल्या दोघांमध्ये कुणीतरी परके आले आहे याची जाणीव मीनाला आतूनच होते तर हलीमचे डोळे एकीकडे त्याची पारंपरिक कलेवरची श्रद्धा, लुप्त होत चाललेली कला टिकवण्याची धडपड आणि दुसरीकडे समलिंगी इच्छा व्यक्त करण्याची आस दर्शवत जातात. या तीनही व्यक्तिरेखा इतक्या सहानुभावाने लिहिल्या, चित्रित केल्या आहेत की हलीम-युसेफमधले नाते आकाराला येताना प्रेक्षक मीनाबद्दल विचार करत राहतो. कथा जसजशी पुढे सरकते तसतसे तिच्याबद्दलचे ममत्व वाढत जाते; तिचा मत्सर, आजार, दुःखाचे मूळ समजते तेव्हा ते फक्त तिचे राहत नाही ते प्रेक्षकांचे होते आणि चित्रपट मीनाचा बनत जातो. मीना बिछान्याला खिळते आणि बाहेर हे दोघे निळ्या सिल्कवर एकेक टाका घालत राहतात. मीनाची सेवाशुश्रूषा करताना हलीमच्या डोळ्यांतून झरणारा जिव्हाळा, अंतिम ताटातुटीची व्याकुळता आणि तिच्या असाध्य आजाराचे स्वरूप जाणल्याने उन्मळलेल्या युसेफने हलीमला मूकपणे आधाराचा टेकू देत तिची सेवा करण्यात गुंतणे या व्यक्तिरेखांचे माणूसपण वेगळ्या उंचीवर घेऊन जाते. हलीमच्या अभिव्यक्ती आणि स्वीकृतीच्या प्रवासाचे स्तर जोडताना दुसरीकडे ते दोघे शिवत असलेले निळे काफतान त्या तिघांच्या प्रेममय नातेसंबंधांचे महावस्त्र बनत जाते. हलीम, मीनाच्या कफन लपेटलेल्या देहाजवळ बसतो तेव्हा गावातली बाई म्हणते, “स्पर्श करू नकोस, ती ‘शुद्ध’ झालीये,’ पण घराचा दरवाजा उघडतो तेव्हा हलीम आणि युसेफ निळ्या काफतानात लपेटलेल्या मीनाचा जनाजा खांद्यावर घेऊन बाहेर येताना दिसतात. घरात जमलेल्या सग्यासोयऱ्यांपैकी त्यांच्यासोबत कुणीच नसते. अनंताच्या प्रवासाला निघालेल्या मीनाला निळे महावस्त्र नेसवून ते दोघे सगळ्या धर्म-समाज-रुढी परंपरांना ठोकर मारून तिला गावाबाहेरच्या कब्रस्थानाकडे घेऊन जातात. मीना अंतिम ताटातुटीच्या क्षणी त्यांच्या बंडखोरीला एल्गार मिळवून देत त्यांच्या मुक्तीचा मार्ग बनते. समलिंगी संबंध, घटस्फोटिता, अविवाहित माता, अनौरस संतती यांना जिथे चिरडले जाते, त्या देशातली एक फाटकी बाई प्रेम मानवी अस्तित्वाची रक्तवाहिनी आहे हे आपल्या जगण्यामरण्यातून पुन्हा प्रस्थापित करते.

यशोधरा काटकर संपर्क : lekhikaat12a@gmail.com

बातम्या आणखी आहेत...