आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Opinion
  • Anshuman Tiwari | Divya Marathi Arthrat Sadar, Why Are The Banks In The United States Finally Sinking

अर्थात:अखेर का बुडत आहेत अमेरिकेतील बँका?

​​​​​​​अंशुमान तिवारी20 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

जुन्या काळातील गोष्टी आता नाहीशा झाल्या आहेत. आज अमेरिकेतील कोणतीही बँक बुडाली की, त्यामुळे सारे जग अडचणीत येते.

विनाशाची एक पूर्ण लाट
अमेरिकेतील बँकिंग संकटे विनाशाच्या लाटा आणतात, कारण बँकांचे व्यवसाय एकमेकांशी जोडलेले असतात. १९८० ते १९९५ या काळात २९०० बँका बँकिंग व बचत कर्जाच्या संकटात बुडाल्या आणि २००७ ते २०१४ या काळात लेहमन संकटाने ५६४ बँका गिळंकृत केल्या. सिलिकॉन व्हॅली, फर्स्ट रिपब्लिक, सिग्नेचरनंतर आणखी तीन बँका अडचणीत आहेत. बँकांमधून ठेवी काढण्याची स्पर्धा लागली आहे.

आज विन्स्टन चर्चिल हयात असते तर ते तोंडावर पडले असते. ते म्हणाले होते की, काहीही झाले, अनेक चुका झाल्या तरी अमेरिका योग्य निर्णय घेईल याची खात्री बाळगा. म्हणजे उशिराचे शहाणपण. प्रदीर्घ विलंबानंतर अमेरिकेला दुसऱ्या महायुद्धात अडकवण्यात चर्चिल यांना यश आले होते. अमेरिकन हस्तक्षेपानंतरच हिटलरची दहशत संपली. तथापि, अमेरिका नेहमीच परिपूर्ण राहू शकला नाही. प्रत्येक देशाला स्वतःच्या शिकवणीतून न शिकण्याचा खूप रोमांचक इतिहास आहे. अमेरिकेत बँकांच्या अपयशाचा सर्वात मोठा आणि भयानक इतिहास आहे, तिथे १९८० ते २०२३ पर्यंत सुमारे ३५०० बँका बुडाल्या आहेत. आपण १९३० पासून मोजले तर बुडालेल्या बँकांची संख्या ५००० पेक्षा जास्त होईल. पण, अमेरिकेतील बँकिंग उद्योग आणि सरकार त्यांच्या चुकांमधून कधीच धडा घेत नाहीत.

बँकांची नवी पानगळ : अमेरिकेत जानेवारी २०२३ पासून सिलिकॉन व्हॅली, सिग्नेचर आणि फर्स्ट रिपब्लिक बँका बुडाल्या आहेत. फर्स्ट रिपब्लिक जेपी मॉर्गन चेसने विकत घेतली आहे. त्यांना मध्यम आकाराच्या बँका समजण्याची चूक करू नका. आकारानुसार १९३० च्या महामंदीनंतर बुडणाऱ्या या सर्वात मोठ्या बँका आहेत. या तीन बँकांची एकूण मालमत्ता ५३२ अब्ज डाॅलर आहे, जी २००८ मध्ये कोसळलेल्या २५ बँकांच्या एकूण मालमत्तेपेक्षा जास्त आहे. सिलिकॉन व्हॅली बँक कोसळल्यानंतर फेडरल रिझर्व्ह आणि फेडरल डिपॉझिट इन्शुरन्स कॉर्पोरेशनने २००८ च्या आर्थिक संकटाच्या काळापेक्षा जास्त संकटग्रस्त बँकांना आपत्कालीन कर्जे दिली, पण बँका बुडू लागल्या. सिलिकॉन व्हॅली आणि सिग्नेचर बँक कोसळल्याबद्दल फेडरल रिझर्व्ह आणि अमेरिकन अकाउंटेबिलिटी ऑफिस (जीएओ) च्या सनसनाटी अहवालावरून दिसून येते की, या बँकांकडे जोखीम संरक्षण प्रणालीच्या नावाखाली काहीही नव्हते. व्यवस्थापन मनमानी करत होते. विम्याच्या कक्षेबाहेर निधी उभारला जात होता. स्टार्टअप्स (सिलिकॉन व्हॅली) पासून क्रिप्टो (सिग्नेचर बँक) पर्यंत गुंतवणूक केली जात होती. अमेरिकन नियामकांच्या कनिष्ठ फळीने म्हटले होते की, व्यवस्थापन त्यांचे ऐकण्यास तयार नाही. गेल्या वर्षी मे महिन्यापर्यंत फेडरल रिझर्व्हला तिन्ही बँका अडचणीत आल्याचे समजले होते, परंतु काहीही केले नाही आणि पाहता पाहता बँकांची पडझड सुरू झाली. अमेरिकन नियामक इतके आत्मसंतुष्ट कसे झाले? खरे तर २००८ नंतर बँकांसाठी अतिशय कडक कायदा करण्यात आला होता.

ट्रम्प यांचा घातक वारसा : इतिहासापासून न शिकण्याची नवीनतम कथा २०१८ मध्ये म्हणजेच डोनाल्ड ट्रम्प यांच्या काळापासून सुरू होते. २००८ च्या बँकिंग संकटानंतर अमेरिकेने त्याच्या इतिहासातील सर्वात कठोर स्टॉक मार्केट आणि बँकिंग कायदे लागू केले (डोड फ्रँक बिल). बँकांसाठी अतिशय कडक ताणतणावाच्या चाचण्या निश्चित केल्या होत्या. सुरक्षेसाठी अधिक भांडवल वाचवण्याची अट होती. लेहमन संकटानंतर बँकांना या नियमांनी दहा वर्षे बांधून ठेवले होते. डोनाल्ड ट्रम्प आणि रिपब्लिकन पक्षाचा डोड फ्रँक कायद्याला विरोध होता. त्याला त्यांनी ‘आपत्ती’ म्हटले. या कायद्याच्या कठोरतेविरोधात बँकिंग उद्योग जोरदारपणे एकवटत होता. कायदा बदलण्याचे समर्थन करणाऱ्यांमध्ये सिलिकॉन व्हॅली बँकेचे सीईओ ग्रेग बेकर होते. हीच बँक सर्वात आधी बुडाली.

२०१७ मध्ये रँडल क्वार्ल्स यांना फेडरल रिझर्व्हमध्ये बँकिंग पर्यवेक्षणाचे उपाध्यक्ष म्हणून नियुक्त केले गेले तेव्हा ट्रम्प यांचा बँकिंग नियामकांचे दात-नखे उपटण्याचा प्रकल्प सुरू झाला. क्वार्ल्स हे खासगी फंड मॅनेजर आहेत. २०२१ मध्ये सत्ताबदल झाल्यानंतर त्यांनी राजीनामा दिला. फेडरल रिझर्व्हमध्ये अशा प्रकारची ही पहिलीच नियुक्ती होती. तज्ज्ञांचा विश्वास होता की, ट्रम्प प्रशासनाला फेड रिझर्व्ह अध्यक्षांचे अधिकार कमी करायचे आहेत. २०१८ मध्ये ट्रम्प प्रशासनाने डॉड फ्रँक कायद्यातील बदलांना मंजुरी दिली. जोखीम मूल्यांकनासाठी बँकांच्या व्यवसाय मर्यादा वाढवण्यात आल्या. तोपर्यंत ५० अब्ज डाॅलर आकाराच्या बँकांना ‘अयशस्वी होण्यासाठी खूप मोठे’ मानले जात होते. त्या बुडण्याची भीती होती. त्यांच्यावर कठोर नवे नियम लादण्यात आले. ट्रम्प यांच्या दुरुस्तीने ही मर्यादा २५० अब्ज डाॅलर इतकी वाढवली. बदलामुळे डझनभर मध्यम आकाराच्या बँकांना तणाव चाचणी व जोखीम संरक्षण नियमांपासून सूट देण्यात आली. यानंतर अमेरिकेच्या बँकांनी जोखीम वाढवली. सिलिकॉन व्हॅली व सिग्नेचर बँकेच्या एकूण ठेवींपैकी ८० टक्के रक्कम विहित विमा नियमांच्या कक्षेबाहेर होती. संकटकाळात बँकेतून ठेवी काढू नयेत म्हणून या बँकांनी पुरेसे भांडवल उभे केले नव्हते. फर्स्ट रिपब्लिक बँक वाचवण्यासाठी ११ मोठ्या बँकांनी ३० अब्ज डाॅलर जमा केले, पण बँक बुडाली व जेपी मॉर्गनला विकली गेली.

अस्वस्थता विनाकारण नाही : भीती वाढली, कारण अमेरिकन काँग्रेस आणि सिनेटच्या सध्याच्या अंकगणितानुसार बायडेन प्रशासनाला जुना डॉड फ्रँक कायदा परत आणणे कठीण होईल. रिपब्लिकन कोणत्याही बदलाला विरोध करतील. आता सरकार आजारी बँका मोठ्या बँकांच्या गळ्यात बांधत आहे, पण फर्स्ट रिपब्लिकसारख्या किती बँका वाचणार? आता पॅकवेस्ट, पॅसिफिक वेस्टर्न व वेस्टर्न अलायन्स बँकाही अडचणीत आल्या आहेत. सिलिकॉन व्हॅली बँक संकटानंतर पॅकवेस्टचा शेअर जवळपास ९०% घसरला आहे. इतर अमेरिकन मध्यम आकाराच्या बँका झिआॅन बँकाॅर्प, कमर्शिया व फर्स्ट होरायझनचे शेअर्स घसरत आहेत. वादळ नुकतेच सुरू झाले आहे. अमेरिका पुन्हा एकदा सिद्ध करत आहे की, आपण इतिहासातून फक्त एकच गोष्ट शिकतो की आपण इतिहासातून काहीच शिकलो नाही.

(ही लेखकाची वैयक्तिक मते आहेत.)
अंशुमान तिवारी
मनी-९ चे संपादक
anshuman.tiwari@tv9.com