आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Opinion
  • Appeasement Has Failed, But We Must Not Go To The Other Extreme | Article By Makrand Paranjape

चर्चा:तुष्टीकरण अयशस्वी झाले, परंतु आपण दुसऱ्या टोकाकडे जाऊ नये

औरंगाबाद13 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

अलीकडील वर्षांत हिंदू-मुस्लिम संबंधांमध्ये एका पर्यायी चर्चेचा उदय झालेला आपण पाहिला आहे. डाव्या-उदारमतवाद्यांच्या तुष्टीकरणाच्या राजकारणाने देशाचे मोठे नुकसान केले आहे यात शंका नाही, पण आता आपण दुसऱ्या टोकाकडे तर जात नाही ना? वास्तवात किंवा सोशल मीडियावर आपण हिंदुत्वाच्या आक्रमकतेबद्दल खूप मवाळ तर होत नाही ना? अशा आक्रमकतेला योग्य ठरवण्याची आणि त्याचे समर्थन करण्याची चूक आपण करू नये.

चला, सत्याचा सामना करूया : तुष्टीकरण, अल्पसंख्याकांचे संरक्षण आणि भेदभावाचे राजकारण ही जवळपास सर्वच गैर-भाजप पक्षांची प्रथा आहे. निवडणूक जिंकण्यासाठी त्यांनी याखेरीज अन्य कोणत्याही सूत्राचा विचार केला नसल्याचे दिसते. दुसरीकडे भाजप सुशासनाबद्दल बोलतो, परंतु देशाला एकत्र बांधणारा बहुसंख्यवादाचा पुरस्कारही करतो. हिंदुत्वाच्या राजकारणाला इकडे नवी ऊर्जा मिळाली आहे. आझमगढसारख्या मुस्लिमबहुल प्रदेशात का होईना, हिंदू मतांच्या एकत्रीकरणावर त्याचे यश अवलंबून आहे. आतापर्यंत तरी हे धोरण प्रभावी ठरले. इतर पक्षांचा जात, धर्म, प्रदेश, भाषा, वंश या आधारावर देशाची फाळणी करण्यास विरोध नसेल, तर भाजपने हिंदूंना मोठ्या राजकीय जडणघडणीत सामावून घेण्याचा प्रयत्न का करू नये?

परंतु, चिंताजनक बाब म्हणजे वाढती आक्रमकता आणि त्याला मिळत असलेला पाठिंबा. भारत मुस्लिम तुष्टीकरणाच्या एका टोकापासून हिंदूंचे वर्चस्व असलेल्या दुसऱ्या टोकाकडे जात आहे. तुष्टीकरणाला आव्हान देण्यासाठी हे योग्य धोरण आहे का? तुम्हाला इथे राहायला आवडत नसेल तर पाकिस्तानात जा, असे आक्रमकपणे सांगितले तरी भारतातील मुस्लिम कुठेही जात नाहीत, हे स्वीकारावे लागेल. यामुळे मुस्लिमांमध्ये परकेपणा आणि संतापाची भावनाच निर्माण होईल. तथापि, मी दीर्घ काळापासून सांगतो त्याप्रमाणे भारतीय हिंदू आणि मुस्लिम यांच्यात नवे सामाजिक अनुबंध निर्माण व्हावेत, याची गरज आहे. प्रश्न असा आहे की, त्या करारातील मजकूर काय असेल? माझ्या मते, हा नवा सामाजिक करार मुस्लिमांशी गैरवर्तन करण्यावर आणि भूतकाळातील चुकांसाठी त्यांच्याकडून माफी मागण्यावर अवलंबून नसावा, जसे आज घडत आहे. तसेच मुस्लिम काळाच्या मागे पडले आहेत आणि यापुढे त्यांच्यात सुधारणा होऊ शकत नाही, या कल्पनेवरही आधारित असू नये. ते देशाशी एकनिष्ठ नाहीत, असे मानणे आणखी वाईट होईल. अशा प्रकारचे द्वेष आणि अविश्वासाचे वातावरण देशाचे नुकसान तर करेलच, पण दीर्घकाळात ते हिंदूंसाठीही घातक ठरेल.

भारतात बहुसंख्यांची सत्ता असेल आणि इथे त्यांचेच चालेल, हे खरे आहे, कारण लोकसंख्यक वर्चस्व असलेल्या लोकशाहीमध्ये असेच घडते. भाजपने विकासाची आश्वासने पूर्ण केली आणि भ्रष्टाचारापासून दूर राहिला तर हिंदूंच्या सुदृढीकरणाचे राजकारण भविष्यातही फळ देत राहील. पण, आपण धार्मिक बहुसंख्यकवाद स्वीकारून त्याचा वापर करून कोणत्याही एका समाजात दहशत माजवण्यास सुरुवात केली तर ते देशासाठी अत्यंत घातक ठरेल. आपण हे सुनिश्चित केले पाहिजे की, आपण कोणत्याही समुदायाला आश्रय देणार नाही किंवा दुर्लक्ष करणार नाही, सर्व नागरिकांशी समान आणि न्याय्यपणे वागेल असे एक न्याय्य सरकार तयार केले पाहिजे. तुष्टीकरण संपले पाहिजे, परंतु गैरवर्तनाने त्याची जागा घेऊ नये. ते ना संविधानाला अनुसरून असेल ना सनातन धर्माला. (ही लेखकाची वैयक्तिक मते आहेत.) मकरंद परांजपे लेखक, विचारवंत, जेएनयूमध्ये प्राध्यापक

बातम्या आणखी आहेत...