आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विचार:आपल्याला परिस्थितीचं भान आहे..?

औरंगाबाद20 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

आजच फेसबुकवरती एक आभार प्रकटीकरणाची पोस्ट वाचली. अगदी वाचल्याबरोबर मन क्षणभर सैरभैर झालं. अपघातात मरण पावलेल्या व्यक्तीच्या भावाने आभार व्यक्त केलेली ती पोस्ट होती. घटनेच्या अगदी दुसऱ्याच दिवशी भली मोठी पोस्ट लिहून, सांत्वन केलेल्या लोकांचे लगेच आभार मानण्याची का ही वेळ होती? अत्यंत वेदनादायी प्रसंगात सोशल मीडियावरती असणारं हे प्रकटीकरण कशाचं द्योतक म्हणावं ? अतीव दुःखातही अशा सोशल मीडियाचा मोह आपल्याला सुटत नसावा का ? काळ बदलत चालला म्हणजे माणुसकीचं, भावनांचं बाजारीकरण चालू झालं का?

कोणत्या गोष्टीचे सामाजिकीकरण करावे आणि कोणते नाही याची मूल्ये जपण्याची जबाबदारी आपली आहे. वेदनादायी घटनांचे उथळ प्रदर्शन केले जाते तेव्हा त्या मानसिकतेचा विचार करावासा वाटतो. अलीकडे कोणतेही दुःख असेल वा आनंदाचा क्षण असेल, ते व्यक्तीच्या सहवासापेक्षा वेगवेगळ्या पोस्टमधून त्याचं प्रदर्शन करण्यात धन्यता मानली जाते. आपुलकी, प्रेम, जवळीक यापेक्षा पोस्टला किती कमेंट आल्या, किती लाइक्स मिळाले हे तपासलं जातं. हे सारं क्षणिक असूनही सगळ्यांना भुरळ पाडणारं आहे. ही अचंबित करणारी गोष्ट आहे आणि तितकीच खेदजनकही...

आपल्या म्हाताऱ्या आईसोबत घेतलेल्या सेल्फीत आपण तिला दिलेल्या वेळेचा हिशोब का ठेवू पाहतो? जिच्याशी बोलण्यास वेळ नाही, पण “हॅपी मदर्स डे’ पुन्हा एका क्लिकमध्ये बंदिस्त करतो. एका दिवसाचे मातृप्रेम किती योग्य ? अख्खं आयुष्य आपल्यासाठी झिजलेल्या त्या देहाला आपली सोबत गरजेची आहे. पण आपण मात्र नात्याला बेगडीपणाने सुशोभित करण्यात धन्यता मानतोय. कुठे थांबावं एवढं कळण्याइतपत शहाणपण आपल्यात असणंदेखील तेवढंच महत्त्वाचं नव्हे का ? जन्मलेल्या बाळालाही आपण आपल्या मनोरंजनाचं साधन का करू पाहतोय ? त्याला हवं आहे ते ममत्व, फोटोसेशनची क्रेझ तर आपली आहे. ती आपली कमकुवत बाजू नव्हे का ? एवढेच नव्हे तर कितीतरी क्रूर घटनादेखील एखादा बघ्या चवीने तर पाहतोच; पण तीच घटना पुन्हा सर्वांसाठी सार्वजनिक करतो. हे कितपत योग्य ? अनेक अशा गोष्टी आहेत की ते सोशल मीडियावर अपलोड होत राहतात आणि एका लाइकसाठी, एका कमेंटसाठी वाट पाहत आपले दिवस सरतात. पण आयुष्य एवढ्यावर चालतं का ? जगण्याची मूल्ये फार वेगळी आहेत. व्यक्ती हा बौद्धिक प्राणी तर आहेच, त्याचप्रमाणे तरल भावनांचे तरंग त्याच्यात अविरतपणे वाहतात. गरज आहे ती फक्त परिस्थितीची जाण असणं. सगळेच असे वागतात म्हणून आपले वर्तन नसावेच. अाधुनिकीकरण म्हणत म्हणत अंधानुकरण नक्कीच नसावं, असंच वाटतं.

प्रा. डॉ. अनिता मुदकण्णा संपर्क : 9970948873

बातम्या आणखी आहेत...