आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराललित काही क्षण नुसताच तिच्याकडं बघत होता. निशाने नजरेनंच विचारलं, ‘काय झालं?’ तो काही बोलला नाही. दोघांनी कोल्ड्रिंक प्यायला सुरुवात केली. निशाला वाटत होतं की, कुठल्याही क्षणी ललित त्या बुडबुड्याचा आवाज करणार. पण, त्यानं तसं काही केलं नाही. तो एकटक तिच्याकडं बघत राहिला. बाटली अर्ध्यापेक्षा जास्त संपली. दोघे एकमेकांच्या डोळ्यात डोळे घालून बघत राहिले. विचार करत राहिले. पिंकी आयुष्यात आली नसती तर..?
राउंड गार्डन. नेहमीचं झाड. निशा आणि ललित येऊन बसले. झाडाखाली सावली असली, तरी उन्हाच्या झळा जाणवत होत्या. ललित नेहमीप्रमाणे सोबत कोल्ड्रिंक घेऊन आला होता. एक कोल्ड्रिंक आणि दोन स्ट्रॉ. खूप वेळ दोघं काहीच बोलले नाहीत. मग ललित म्हणाला, ‘कोल्ड्रिंक गरम होतंय..’ स्वतःच दाताने बाटलीचं झाकण उघडलं. दोन्ही स्ट्रॉ त्यात टाकले. बाटली दोघांच्या मध्ये ठेवली. खरं तर आजकाल टीन भेटतात, पण ललित नेहमी काचेची बाटली आणतो. काचेच्या बाटलीत दोन स्ट्रॉ टाकून कोक पिताना दोघं कितीतरी वेळ एकमेकाकडं बघत बसतात. मधेच ललित बाटलीत हवा फुंकतो. बुडबुडे आवाज करतात. निशा वैतागते. लाडात त्याला मारू लागते. ललित हसू लागतो. हे दर भेटीत होतच राहतं. आज होत नव्हतं. बाटली तशीच होती अजूनही. एक स्ट्रॉ सारखा घरंगळत होता. बाटलीतून पडू बघत होता. ललित पुन्हा पुन्हा त्याला बाटलीत नीटनेटका ठेवत होता. अजूनही निशा काहीच बोलत नव्हती. ललितसुद्धा तिला मुद्दाम काही प्रश्न विचारत नव्हता. निशा आणि ललित बसले होते, ते झाड गुलमोहराचं होतं. फार सावली नसली, तरी त्या लाल फुलांचं त्यांना फार कौतुक. खूप शांत वाटायचं त्या झाडाखाली. आणि श्रीमंत असल्यासारखं. परदेशात आहोत असं. गुलमोहराच्या रंगात ती जादू असते.
गरम वाफ यावी तशी वाऱ्याची झुळूक यायची एखादी. त्यापलीकडं फार आवाज नव्हते. ललित आणि निशासुद्धा शांत होते. ललित अधूनमधून स्ट्रॉ गोल गोल फिरवत होता बाटलीत. निशाने आंब्याचं एक पान हातात घेतलेलं होतं कधीचं. त्याचे पंचवीस तरी बारीक तुकडे केले होते एवढ्या वेळात. ललितने न राहवून विचारलं की, तुला नसेल प्यायचं तर राहू दे. निशाने त्याच्याकडं बघितलं फक्त. बळेच हसल्यासारखा चेहरा करून म्हणाली, ‘तू एकटाच पिणार आहेस?’ ललित काहीच उत्तर देऊ शकला नाही. ललित पुन्हा स्ट्रॉ गोल गोल फिरवत राहिला.
सहा महिन्यांपूर्वी निशा आणि ललित एका शेअर मार्केटच्या क्लासमध्ये भेटले. ललित एका कुरिअर कंपनीत कामाला होता. रोज उन्हातान्हात कुरिअर वाटून वैतागलेला. निशा एका डॉक्टरच्या दवाखान्यात रिसेप्शनला काम करायची. रोजचे आजारी लोक बघून, त्यांच्याशी बोलून चिडचिड व्हायची तिची. दोघांनाही पैशाची गरज होती. आयुष्य बदलायचं होतं. शेअर मार्केटचा एक खासगी क्लास होता. तिथं दोघांनी प्रवेश घेतला होता. फ्यूचर, ऑप्शन, कँडल असे शब्द कानावर पडत असताना दोघांना एकमेकांविषयी आकर्षण वाटू लागलं. दोघांनाही श्रीमंत व्हायचं होतं. दिवस दिवस गार्डनमध्ये बसून दोघं शेअर्सवर चर्चा करायचे. स्टॉक, कंपन्या अन् त्यांचे मालक, त्यांचा नफा-तोटा हेच विषय असायचे. हळूहळू दिवसाला दोन-चारशे रुपये मिळू लागले. पैसा येऊ लागला तशी दोघांनी नोकरी सोडली होती. मोबाइल घेऊन एकमेकांसमोर बसलेले असायचे. सकाळी नऊपासून दुपारी साडेतीनपर्यंत. बँक निफ्टी वर जातेय का खाली? निफ्टीचं काय होतंय? देशाच्या अर्थव्यवस्थेची सगळ्यात जास्त चिंता शेअर्समध्ये पैसे गुंतवलेल्या लोकांना असते. अर्थमंत्र्यापेक्षा जास्त गंभीर चेहऱ्याने हे लोक बोलत असतात. निशा आणि ललित त्यातलेच बनले होते. कधी पैसे यायचे, कधी पैसे जायचे. पण, दोघं सोबत असल्यामुळं त्याचं फार दु:ख वाटायचं नाही. दोघांनी श्रीमंत व्हायचं ठरवलं होतं. त्यामुळं निराश होऊन चालणार नव्हतं. कधी निशा त्याला वॉरेन बफेबद्दल सांगायची, कधी ललित तिला राकेश झुनझुनवालांबद्दल सांगायचा. मोठ्या उद्योगपतींचे कोट्स त्यांना पाठ होते. टाटा, अदानी, अंबानींबद्दल दोघे बोलायचे तेव्हा वाटायचं की, एवढी माहिती स्वतः अंबानी किंवा अदानींनासुद्धा नसेल कंपनीची.
पुन्हा एकदा वाफेसारखी वाऱ्याची झुळूक आली. निशाने बाटली उचलली. पुन्हा एकदा एक स्ट्रॉ कलंडला. ललितने त्याला सावरत बाटली हातात धरली. दोघांचा चेहरा समोरासमोर होता. दोघे डोळ्यात डोळे घालून बघत होते. स्ट्रॉ ओठात घट्ट धरून ठेवलेले होते. ललित काही क्षण नुसताच तिच्याकडं बघत होता. निशाने नजरेनंच विचारलं, ‘काय झालं?’ तो काही बोलला नाही. दोघांनी कोल्ड्रिंक प्यायला सुरुवात केली. निशाला वाटत होतं की, कुठल्याही क्षणी ललित त्या बुडबुड्याचा आवाज करणार. पण, त्यानं तसं काही केलं नाही. तो एकटक तिच्याकडं बघत राहिला. बाटली अर्ध्यापेक्षा जास्त संपली. दोघे एकमेकांच्या डोळ्यात डोळे घालून बघत राहिले. विचार करत राहिले. पिंकी आयुष्यात आली नसती तर..?
ललितने पाच लाख रुपये पर्सनल लोन काढलं होतं पिंकीच्या सांगण्यावरून. निशाने तिची सोन्याची चेन, आईच्या सोन्याच्या बांगड्या आणि वडिलांची अंगठी गहाण ठेवली होती. दोन लाख रुपये मिळाले होते. सगळे पैसे त्यांनी पिंकीच्या सांगण्यावरून बँक निफ्टी वर जाणार म्हणून गुंतवले होते. पिंकी नावाची एक अनोळखी तरुणी. सोशल मीडियावर ओळखीची झाली. थोडेफार पैसे घेऊन शेअर मार्केटच्या टिप देणारी पिंकी. तिच्या आत्मविश्वासावर आणि मार्केटच्या ज्ञानावर ललित आणि निशाला प्रचंड विश्वास होता. सोशल मीडियावर पिंकीचे महागड्या गाड्या आणि बंगल्याचे फोटो त्यांनी बघितले होते. दोघांनी मिळून गुंतवले एकदाच सात लाख रुपये. ही सव्वानऊची गोष्ट. दुपारी साडेबारा वाजता त्याचे अकरा लाख झाले. सात लाखाचे अकरा लाख. दोघांना वेड लागायचं बाकी होतं. दरम्यान ललितने केरळला जाण्यासाठी ऑनलाइन तिकीट काढलं. प्रिंट काढली. आणि अचानक एक वाजायच्या आसपास बँक निफ्टीने यू टर्न घेतला. दुपारी दोन वाजेपर्यंत सात लाखांचे दोन लाख रुपये झाले होते. ही गोष्ट बुधवारची. दोघांनी दुसऱ्या दिवसापर्यंत वाट बघायची ठरवली. दुसरा दिवस आणखी वाईट निघाला. सात लाख रुपयांची किंमत अक्षरशः शून्य झाली होती.
एकाच बाटलीत दोन स्ट्रॉ घेऊन कोक पिणारे ललित आणि निशा. एकाच वेळी खूप गोष्टींचा विचार करत होते. एरवी अर्धा तास एकाच बाटलीत कोक पीत बसले असते. आज त्यांनी दोन मिनिटांत बाटली संपवली. आणि आपली श्रीमंत होण्याची गोष्टसुद्धा! म्हणून ते विषारी औषध कितीतरी वेळ स्ट्रॉने गोल गोल फिरवत मिक्स करत होता ललित. दोघांना खात्री होती, हे औषध पिंकीसारखा विश्वासघात करणार नाही.
डोईवरचा गुलमोहर शांत होता. खरं तर तोही फसवा. गुलमोहराचा दिखावा एवढा की मन मोहून जावं! पण, उपयोग पाहिला तर काहीच नाही...
अरविंद जगताप
jarvindas30 @gmail.com
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.