आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

ग्रंथार्थ:वादळाच्या शिलेदारांची ओळख

अरविंद सुरवाडेएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

‘परिवर्त परिवार नासिक’ या प्रकाशन संस्थेने प्रा. गंगाधर अहिरे यांचा ‘वादळाचे शिलेदार’ हा लेखसंग्रह नुकताच प्रकाशित केला आहे. लेखक प्रा. गंगाधर अहिरे हे आंबेडकरी चळवळीतील कृतीशील असे कार्यकर्ते, विद्रोही कवी आणि अभ्यासू अकादमीक व्यक्तिमत्व असल्याने त्यांनी केलेल्या वाचनातून, अभ्यासातून, चळवळीतील प्रत्यक्ष सहभागातून, सूक्ष्म अशा निरीक्षणातून काही महत्वाच्या व्यातींची चित्रणे त्यांनी मनोज्ञपणे या ग्रंथात शब्दबद्ध केलेली आहेत.

व्यक्तिचित्रण हा मराठीतील तसा अलीकडचा म्हणजे विसाव्या शतकातील तिसऱ्या दशकापासून लिहिला जात असलेला वाङ्मय प्रकार आहे. पाश्चात्य संस्कृतीबरोबर वाङ्मयीन दृष्ट्या आदानप्रदान होण्यातून भारतीय साहित्याचे पूर्वीचे असलेले साचेबंद पारमार्थिक स्वरूप लोप पावून मराठी वाङ्मय व्यक्तीनिष्ठ होत गेले. पाश्चात्य संस्कृतीबरोबर झालेल्या आदानप्रदानातून भारतीय सामाजजीवन सुद्धा ढवळून निघत राहिले, लेखकांच्या अनुभवविश्वात, जाणिवांत अमुलाग्र बदल होत गेला, या नवीन अनुभवांना, नव्या जाणिवांना आविष्कृत करण्यासाठी साहित्यिक आपापली अविष्कार पद्धतीही बदलवत गेलेत. त्यामुळे या सर्व घडामोडींमधून विविध वाङ्मय प्रकार उदयाला आलेत. लघुनिबंध, लघुकथा, प्रवासवर्णने, विनोदी लेखन याबरोबरच व्यक्तिचित्रणे सुद्धा लिहिली जाऊ लागली. हे सगळं आठवण्याचं कारण म्हणजे, नुकताच हाती आलेला प्रा. गंगाधर अहिरे यांचा ‘वादळाचे शिलेदार’ हा व्यक्तिचित्रणांचा संग्रह होय.

‘परिवर्त परिवार नासिक’ या प्रकाशन संस्थेने प्रकाशित केलेल्या या संग्रहात एकूण अठ्ठेचाळीस वादळी व्यक्तिमत्त्वांची ओळख लेखकाने वाचकांना करून दिलेली आहे. लेखक प्रा. गंगाधर अहिरे हे आंबेडकरी चळवळीतील कृतीशील असे कार्यकर्ते, विद्रोही कवी आणि अभ्यासू अकादमीक व्यक्तिमत्व असल्याने त्यांनी केलेल्या वाचनातून, अभ्यासातून, चळवळीतील प्रत्यक्ष सहभागातून, सूक्ष्म अशा निरीक्षणातून त्यांच्यावर ज्या काही सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय व्यक्तीमत्वांचा प्रभाव पडला, त्यांच्या मनावर ज्या अनेक व्यक्तीमत्वांचा ठसा उमटला त्यातील काही महत्वाच्या व्यातींची चित्रणे त्यांनी मनोज्ञपणे या ग्रंथात शब्दबद्ध केलेली आहेत.

या ग्रंथात लेखकाने न्या. रानडे, पं. रमाबाई, महर्षी शिंदे, मिस म्युरियल लेस्टर, महापंडित राहुल सांकृत्यायन, आचार्य म. वा दोंदे, श्रीधरपंत टिळक, भाई माधवराव बागल, नानासाहेब परुळेकर, पतितपावनदास, मातोश्री रमाई, माईसाहेब आंबेडकर, भदंत आनंद कौशल्यायन, डॉ. एलिनार झेलिएट, डॉ. गेल ऑमवेट इ. अठ्ठेचाळीस व्यक्तींची व्यक्तिचित्रे शब्दबद्ध केलेली आहेत. ही व्यक्तिचित्रे रेखाटताना त्या व्यक्तींच्या व्यक्तिमत्वाचा काही एक ठसा लेखकाच्या मनावर उमटलेला आहे. काही व्यक्तिमत्वे ही वाचनातून लेखकाला उमगलेली आहेत तर कुसुमाग्रज, महाकवी वामनदादा कर्डक, बाबुराव बागूल, डॉ. मो. स. गोसावी, वसंत मून, राजा ढाले, नामदेव ढसाळ, अविनाश डोळस, रमेश शिंदे, अरुण काळे, भुजंग मेश्राम यासारख्यांचा प्रत्यक्ष सहवास त्यांना लाभलेला असल्याने लेखकाने ह्या व्यक्तींच्या व्यक्तिमत्वाचा त्याच्या मनावर उमटलेला ठसा कसा आहे? हे त्यांच्या सहवासातून जे जाणवले ते अभिव्यक्त करण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्यामुळे त्या त्या विशिष्ट व्यक्तींची मोठी सुरेख व्यक्तिचित्रे या ग्रंथात आकाराला आलेली आहेत.

व्यक्तिचित्रणात्मक प्रकारच्या लिखाणात व्यक्तिचित्रांचा विषय झालेल्या व्यक्तीचे ज्ञात चरित्र, तिचे मार्मिक निरीक्षण, तिच्या प्रत्यक्ष सहवासामुळे लेखकाला आलेले बहुविध अनुभव आणि काही प्रमाणात लेखकाने सांगोवांगीने ऐकलेली आणि वाचलेली त्या व्यक्तीविषयीची माहिती या आणि अशाच स्वरूपाच्या सामग्रीच्या आधारे लेखक त्या व्यक्तीच्या व्यक्तिमत्वाची, तिच्या कर्तुत्वाची, त्या व्यक्तीने पार पाडलेल्या भूमिकेची एक संगती लावण्याचा; त्या व्यक्तीच्या व्यक्तिमत्वाचे लेखकाला झालेले, आकळलेले मर्म प्रकट करण्याचा प्रयत्न करतो. प्रा. गंगाधर अहिरे यांनी अशाच प्रकारे या ग्रंथातील वादळाच्या शिलेदारांबद्दल लिहिलेले आहे. भारताच्या सामाजिक, सांस्कृतिक, वाङ्मयीन जडणघडणीत एक नेता म्हणून, एक पुढारी म्हणून, एक संशोधक म्हणून, एक लेखक, एक कलावंत म्हणून, त्या त्या व्यक्तीच्या संदर्भात लेखकाच्या मनावर ज्या भावनिक, वैचारिक स्वरूपाच्या प्रतिक्रियांचे तरंग उमटलेले होते त्या व्यक्तिगत प्रतिक्रीयांच्या तरंगांचेच नव्हे तर सामूहिकरीत्या उमटलेल्या प्रतिक्रियांचे प्रतिबिंबही या लिखाणात पडलेले दिसते. लेखकाने आपली सारी प्रज्ञा पणाला लावून या ग्रंथातील व्यक्तिमत्वाचा शोध घेण्याचा प्रयत्न केलेला आहे.

प्रस्तुत ग्रंथात समाविष्ट व्यक्ती ह्या देशातील, जगातील सार्वजनिक जीवनात मान्यता, प्रतिष्ठा लाभलेल्या आहेत. प्रा. गंगाधर अहिरे यांनी ग्रंथातील वर्ण्यविषय असलेल्या व्यक्तींचे सर्वसाधारण गुण तसेच त्यांचे अनोखेपण, निराळेपण, सामान्यातील असामान्यत्व आणि असामान्यातील सामान्यत्व याचे विहंगम दर्शन घडवलेले आहे. प्रा. गंगाधर अहिरे यांनी या ग्रंथातील व्यक्तिचित्रांचा विषय झालेल्या सर्वच व्यक्तींच्या व्यक्तिमत्वातील विविध पैलूंवर प्रकाशझोत टाकलेला आहे. त्या-त्या व्यक्तीचे बालपण, शिक्षण, बाह्यरूप, तिचा स्वभाव, तिचे अभ्यास विषय, तिचे कार्यक्षेत्र, आणि त्यात मिळवलेले प्राविण्य, तिची उपजत प्रज्ञा, तिच्या अविष्काराचे स्वरूप, तिच्या व्यक्तिमत्वाचा आकळणारा आणि न आकळणारा भाग, तिच्या आयुष्यातील लक्षणीय घटना, तिच्या व्यक्तिमत्वाचा तोल सांभाळणारे किंवा बिघडवणारे प्रसंग-घटना, तिचा इतर व्यक्तीकडे आणि इतर व्यक्तींचा तिच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन आणि त्यामुळे अस्तित्वात आलेले परस्पर संबंध, तिचा एकूणच जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन आणि विशिष्ट जीवनमूल्यांवर असणारी तिची निष्ठा, या उषा हस्तक यांनी आपल्या ‘मराठीतील आत्मचरीत्रपर लेखन’ या ग्रंथात अधोरेखित केलेल्या व्यक्तिचित्रणाच्या मुलभूत तत्वांची पुरेपूर अनुभूती हा ग्रंथ वाचताना येते.

प्रा. गंगाधर अहिरे यांनी या ग्रंथात मिस् म्युरियल लेस्टर, मरियिम मकिबा यासारखी लोकांना माहित नसलेल्या व्यक्तिमत्वांची जशी ओळख करून दिलेली आहे तशी गणपत दादा मोरे, पुंजाजी जाधव, कॉ. पुंजाजी गोवर्धने, गो. ह. देशपांडे, गीताबाई गायकवाड, परीट गुरुजी, नाजाबाई सोनावणे, कॅप्टन भीमराव साळुंखे, रामचंद्र सोनावणे अशी वेगळ्या वाटेवरची व्यक्तिमत्वे सुद्धा चित्रित केलेली आहेत. वसंत मून, एम. जी. वाघ, प्रकाश जाधव यांसारख्या ध्येय्यासक्त साहित्यिकांपासून ते रमेश शिंदे यांच्या सारख्या आंबेडकरी चळवळीतील अभ्यास साधनांच्या संग्राहकापर्यंत आणि विठाबाई भाऊ मांग यांचेपासून ते शाहीर केरुजी घेगडे, भीमराव कर्डक, वामनदादा कर्डक यांसारख्या लोककलावंतांपर्यंतची व्यक्तीचित्रे या ग्रंथात वाचायला मिळतात. ही सगळी व्यक्तिचित्रे वाचताना वाचकाला त्याला माहिती असलेल्या अनेक घटनांचे, माहितीचे पुनर्स्मरण होत राहते. लेखकाने दिलेल्या नवीन माहितीमुळे वाचकाच्या ज्ञानात भर पडण्याला जशी मदत होते तशी वाचकाची जिज्ञासा जागृत करण्यासही मदत होते. लेखकाने रेखाटलेल्या व्यक्तिचित्राशिवाय त्या-त्या व्यक्तींबद्दल अधिक जाणून घेण्याची वाचकाला जिज्ञासा निर्माण होणे हे या ग्रंथाचे सगळ्यात मोठे यश ठरेल. ग्रंथात समाविष्ट असलेल्या ह्या सगळ्या व्यक्तिमत्वांना लेखकाने ‘शिलेदार’ अशी सार्थ उपमा दिलेली आहे तर त्यांनी केलेल्या झंझावाती कार्याला ‘वादळ’ म्हणून संबोधलेले आहे. साक्षेपी विचारवंत डॉ. रावसाहेब कसबे यांनी मलपृष्ठावर म्हटल्याप्रमाणे वर्ण, वर्ग, जाती आणि सांस्कृतिक संघर्षाच्या वादळांनी वेढलेल्या इतिहासातील अज्ञातांना उजेडात आणण्याचे काम संशोधकांना करावे लागते. प्रा. अहिरे यांनी हे काम परिश्रमपूर्वक केलेले आहे.

प्रत्येक लेखाच्या सुरुवातीला त्या-त्या व्यक्तींची संजय उन्हवणे आणि श्याम जाधव यांनी रेखाटलेली सुरेख रेखाचित्रं देऊन लेखाची सुरुवात केलेली आहे, त्यामुळे ग्रंथाच्या सौंदर्यात अधिकची भर पडलेली आहे. सुप्रसिद्ध चित्रकार श्रीधर अंभोरे यांचे वादळवाऱ्याच्या पार्श्वभूमीवरील शिलालेख असलेले आशयगर्भ मुखपृष्ठ आणि बुद्धभुषण साळवे यांच्या सुलेखानाने ग्रंथाच्या सौंदर्यात अधिकच भर पडलेली आहे.

प्रा. गंगाधर अहिरे यांच्यातील कार्यकर्तेपण, त्यांच्यातील काव्यसंवेदन लक्षात घेतले तर ज्यांनी-ज्यांनी समाजपरिवर्तनासाठी आणि माणुसकीच्या प्रस्थापनेसाठी आपली हयात खर्ची घातली, त्या-त्या व्यक्तिमत्वाचा शोध घेण्याच्या उर्मीतून हा ग्रंथ आकाराला आलेला आहे. अशाप्रकारच्या ज्याही लिखाणात व्यक्तीच्या माणूसपणाचा अर्थपूर्ण शोध आणि वेध घेतलेला असतो ते लिखाण जाणत्या वाचकांना प्रभावित करीत असते, प्रेरणादायी ठरत असते. वादळाचे शिलेदार हा ग्रंथ असाच वाचकांना प्रभावित करणारा आणि प्रेरणादायी ठरणारा आहे.

वादळाचे शिलेदार

लेखक- प्रा. गंगाधर अहिरे

प्रकाशक- परिवर्त परिवार, नाशिक,

मूल्य रु. ३००/-

satdhamma@gmail.com

बातम्या आणखी आहेत...