आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मधुरिमा स्‍पेशल:धाडस केलं म्हणून.

औरंगाबाद3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

..

आत्तापर्यंत मी ७६७ पॅराशूट जंप केल्या. त्यापैकी सर्वात जास्त १३ हजार ५०० फुटांवरून आणि त्यातील काही १८ हजार तर एक ३० हजार ५०० फुटांवरून केली आहे. महिलांनी कोणत्याही क्षेत्रात मागे न राहता आत्मविश्वासपूर्वक जीवनात वाटचाल करून आपल्या कार्याचा ठसा उमटवला पाहिजे, असे मला वाटते. -- शीतल महाजन

मी भारतीय प्रोफेशनल स्कायडायव्हर / पॅराशूट जंपर आहे. २००४ पासून स्कायडायव्हिंग (पॅराशूट जम्पिंग) या खेळात जागतिक स्पर्धेत आणि जागतिक विक्रमामध्ये देशाचे प्रतिनिधित्व करतेय. मी एका सर्वसामान्य कुटुंबातली आहे. मी आत्तापर्यंत एकूण १९ राष्ट्रीय आणि ७ जागतिक विक्रम केलेे आहेत. माझ्या कामगिरीची दाखल घेत मला पद्मश्रीने सन्मानित केले गेले. जगाच्या सातही खंडांवर पॅराशूटच्या साहाय्याने उडी मारणारी मी जगातील पहिली महिला ठरले आहे. फेडरेशन ऑफ एरोनॉटिकल इंटरनॅशनल या हवेतील खेळातील संस्थेने “सबिहा गोकसेन’ हे गोल्ड मेडल देऊन मला सन्मानित केले आहे हे मेडल मिळवणारी मी पहिली भारतीय महिला ठरले आहे.

पुण्यातील फर्ग्युसन महाविद्यालयात बीएस्सीचे शिक्षण घेताना, १८ एप्रिल २००४ रोजी मी पृथ्वीच्या वरच्या टोकावर, उत्तर ध्रुवावर, जेथे कुठेही जमीन नाही अशा ठिकाणी समुद्रावर तरंगणाऱ्या बर्फाच्या तुकड्यावर उणे ३७ डिग्री सेल्सियसमध्ये २४०० फुटांवरून हेलिकॉप्टरमधून आयुष्यातली पहिली पॅराशूट जंप कुठलाही सराव न करता मारली व अशी उडी मारणारी जगातील एकमेव मुलगी ठरले आहे. त्यानंतर १५ डिसेंबर २००६ रोजी पृथ्वीच्या खालच्या टोकावर दक्षिण ध्रुवावर कुठलाही सराव न करता उणे ३८ डिग्री सेल्सियसमध्ये ११ हजार ६०० फुटांवरून आयुष्यातली पहिली एक्सेलरेटेड फ्री फॉल जंप घेत अशा प्रकारची पॅराशूट जंप करणारी मी जगातील पहिली महिला ठरले. तसेच दोन्ही उत्तर ध्रुव व दक्षिण ध्रुवावर कुठलाही सराव न करता उडी मारणारी मी जगातील सर्वात लहान वयाची मुलगी ठरले. लग्नानंतर महिलांच्या आयुष्यात अनेक गोष्टी बदलत असतात. त्यातच मी पतीसोबत फिनलंडमध्ये राहावयास गेल्याने स्कायडायव्हिंग पुढे सुरू ठेवण्यासाठी मला मदत मिळाली. जुळी मुले झाल्यानंतर खेळ पुढे सुरू ठेवण्यासाठी विविध अडचणी आल्या. परंतु त्यावर मात करत मी स्कायडायव्हिंग खेळ पुढे सुरू ठेवला. स्पेनमध्ये १९ सप्टेंबर २०१० रोजी परदेशी भूमीवर १३ हजार फुटांवरून पक्ष्यासारखा विंग सूट ( बर्डम्यान सूट) घालून जंप करणारी मी पहिली भारतीय महिला ठरले. त्यानंतर पुढील वर्षीच अमेरिका येथे अॅरिझोनामध्ये समुद्रसपाटीपासून सर्वाधिक उंचीवरून म्हणजेच ५८०० फुटांवरून, हॉट एअर बलूनमधून जास्तीत जास्त उंचीवरून पॅराशूट जंप करणारी मी पहिली भारतीय सामान्य नागरिक महिला ठरले.

मे २०१७ मध्ये कॅलिफोर्निया यूएसएमध्ये ३० हजार ५०० फुटांवरून हॅलो जंप (हाय अल्टिट्युड लो ओपनिंग जंप) करणारी पहिली भारतीय नागरिक महिला ठरले. १२ फेब्रुवारी २०१८ रोजी थायलंडमध्ये १३ हजार फुटांवरून भारतीय महिलेची ओळख साडी घालून स्कायडायव्हिंग करणारी पहिली भारतीय महिला ठरले. विविध प्रकारच्या विमानांतून जगातील सातही खंडांतील विविध ठिकाणांवर जसे की उत्तर ध्रुव (आर्क्टिक) आणि दक्षिण ध्रुव (अंटार्क्टिका) आणि भारत व फिनलंड, अमेरिका, स्पेन, ऑस्ट्रेलिया, युरोप, साऊथ आफ्रिका, साऊथ अमेरिका येथे पॅराशूट जंप केलेल्या आहेत. महिलांनी कोणत्याही क्षेत्रात मागे न राहता आत्मविश्वासपूर्वक जीवनात वाटचाल करून आपल्या कार्याचा ठसा उमटवला पाहिजे, असे मला वाटते.

बातम्या आणखी आहेत...