आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रसिक स्पेशल:खेलेगी और खिलेगी...

एका वर्षापूर्वीलेखक: आशिष पेंडसे
  • कॉपी लिंक

कोरोना संसर्गामुळे निराशेच्या खाईत लोटलेल्या अखिल विश्वाला टोकियो ऑलिम्पिकने जगण्याची नवीन उमेद दिली आहे. हॉकीच्या चक दे इंडियापासून इतरही अनेक भारतीय क्रीडापटूंनी टोकियो ऑलिम्पिकच्या मैदानात संस्मरणीय क्षण खेळले. भारतीय क्रीडा कामगिरीची चिकित्सा लवकरच सुरू होईल. ती होणे गरजेचे आहेच. पण, एक गोष्ट नक्की... भारतीय नारीशक्तीच्या विविधांगी आविष्काराने यंदाचे ऑलिम्पिक गाजवले. यापुढील काळात या क्रीडांगण‘रागिणी’ना केवळ तोंडदेखले कौतुक नव्हे, तर पायाभूत सुविधा, आर्थिक पाठबळ आणि मुख्य म्हणजे समाजमान्यता व प्रतिष्ठा देणे गरजेचे आहे.

अखिल विश्वातील क्रीडारसिकांवर मोहिनी टाकत टोकियो ऑलिम्पिकने इतिहास घडविला. कोरोना संसर्गाच्या जागतिक नैराश्याच्या पार्श्वभूमीवर जगण्याचा एक नवीन निर्धार, प्रेरणा आणि उमेद या ऑलिम्पिकने दिली. शक्तिमान, गतिमान आणि कीर्तीमान हा ऑलिम्पिक चळवळीचा गाभा संदेशच आहे मुळी. यंदाच्या ऑलिम्पिकइतका तो अखिल विश्वात भारून कधीच राहिला नसेल! नेहमीप्रमाणेच ऑलिम्पिकचे वेध लागल्यानंतर भारतामध्ये क्रीडाप्रेमाचे दर चार वर्षांनी येणारे भरते आलो. टीव्ही आणि सध्याच्या जमान्यातील सोशल मीडियाच्या माध्यमातून तिरंगा फडकावित प्रसिद्धीच्या कॅम्पेन सुरू झाल्या.

ऑलिम्पिकमध्ये सहभागी होत असलेल्या क्रीडापटूंना टॅग करून शुभेच्छांचे संदेश झळकले. आपणच जणू क्रीडाविश्वाचे कसे तारणहार आहोत, असा आव आणून अनेक मंडळी ऑलिम्पिकज्वराने ग्रासली गेली. भूछत्र्यांप्रमाणे क्रीडातज्ज्ञ आणि क्रीडाप्रेमी उगवले आणि व्हॉट्सअप युनिव्हर्सिटी गजबजून गेली! अशाच धामधुमीत मध्यंतरी सोशल मीडियावर एक मेसेज फिरत होता – पुरुषांचे ऑलिम्पिक कधी सुरू होणार आहे?! वरकरणी बहुतांश जणांनी तो हसण्यावारी नेला. पण, त्यामध्ये फार मोठा गर्भित आशय दडला होता. ऑलिम्पिकमध्ये सहभागी झालेल्या इतर देशांसाठी तेवढ्या आर्ततेने नसेल कदाचित, पण भारतासाठी मात्र तो मेसेज खूपच अंतर्मुख करावयास लावणारा होता.

कारण? अहो, भारताच्या ऑलिम्पिक सफरीमध्ये केंद्रस्थानी होत्या त्या महिला खेळाडू! पहिल्याच दिवशी मीराबाई चानूने चंदेरी प्रारंभ केला. विश्वविजेती बॉक्सर मेरी कोम, पदकविजेती बॉक्सर लव्हलीन, बॅडमिंटनची सुपर सिंधू, टेबलटेनिसमध्ये मनिका बात्रा, तिरंदाजीत दीपिका कुमारी, शूटिंगमध्ये मनू भाकरसह आपली मराठमोळी राही सरनोबत, कुस्तीपटू विनेश फोगाट... आणि हो चक दे इंडिया चित्रपट प्रत्यक्षात अनुभविण्याची संधी देणारा आख्खा महिला हॉकी संघ! अशा एक ना अनेक महिला खेळाडूंनी आश्वासक प्रारंभ केला होता. त्यापैकी किती जणींना पदक मिळविणे शक्य झाले? किती जणींनी सुमार कामगिरी केली? किती जणींनी आपली सर्वोत्तम कामगिरी दिली, अशा अनेक विषयांवर ऑलिम्पिकचे सूप वाजल्यानंतर चिकित्सा होईल. ती होणेदेखील गरजेचे आहे. पण, सर्वांत महत्वाचे म्हणजे, भारतीय महिला क्रीडापटूंचा भारताच्या दृष्टीने यंदाच्या ऑलिम्पिकवर नक्कीच बोलबाला राहिला.

नवीन सहस्त्रकात महिलाशक्ती...
महिलाशक्तीची ऑलिम्पिक क्रीडांगणावरील मुहूर्तमेढ रोवली गेली ती नवीन सहस्त्रकाच्या प्रारंभी, सिडनी ऑलिम्पिकच्या निमित्ताने. तत्पूर्वी, सुवर्णकन्या पी. टी. उषासह अनेक महिला क्रीडापटूंनी आशियाई आणि राष्ट्रकुल मैदान गाजवले होतेच. १९८४ च्या अमेरिकेतील लॉस एंजिल्स ऑलिम्पिकमध्ये उषाचे ब्राँझपदक अवघ्या एक शतांश सेकंदाने हुकले होते. मात्र, वेटलिफ्टर कर्नाम मल्लेश्वरीच्या माध्यमातून सिडनी ऑलिम्पिकमध्ये भारतीय महिलेने पहिलेवहिले पदक पटकाविले आणि एका नवीन युगाचा प्रारंभ झाला. सिडनी ऑलिम्पिकमध्ये सहभागी झालेल्या भारतीय पथकामध्ये अवघ्या १९ महिला क्रीडापटू होत्या. त्यानंतर हा आकडा सातत्याने वाढत गेला आहे. विशेष म्हणजे, पूर्वी आपले लक्ष्य हे केवळ सहभाग नोंदविण्यापुरतेच मर्यादित होते. पण, आता मात्र पदकाचे दावेदार म्हणून आपण आश्वासक खेळ करीत आहोत. टोकियो ऑलिम्पिकसाठी आतापर्यंतच्या सर्वाधिक, म्हणजे ५६ महिला क्रीडापटू पात्र ठरल्या आणि भारताची शान उंचावली.

यंदाच्या ऑलिम्पिकमध्ये सहभागी झालेल्या भारतीय महिला क्रीडापटूंचा विविधांगी आविष्कार सुखावणारा आहे. त्यामुळे, क्रीडाक्षितिजावर भारतीय महिलांनी केलेल्या प्रगतीचा दाखलादेखील मिळत आहे. तिरंदाजीत एक, अथलेटिक्समध्ये नऊ, बॅडमिंटनमध्ये एक, बॉक्सिंगमध्ये चार, फेन्सिंगमध्ये भवानी देवी ही एक खेळाडू (या क्रीडाप्रकारात खेळणारी ती पहिलीच भारतीय महिला ठरली आहे), गोल्फमध्ये एक खेळाडू, जिम्नॅस्टिक्समध्ये एक, हॉकी संघाच्या माध्यमातून १९, ज्युडो-सेलिंगमध्ये प्रत्येकी एक, शूटिंगमध्ये सात, टेबलटेनिस आणि टेनिसमध्ये प्रत्येकी दोन, कुस्तीमध्ये चार आणि वेटलिफ्टिंग व स्विमिंगमध्ये प्रत्येक एका भारतीय महिलेने यंदाच्या ऑलिम्पिकसाठी पात्र ठरण्याची कामगिरी केली. कोरोना संसर्गामुळे अनेक स्पर्धा रद्द झाल्याने साईना नेहवालसह अनेक भारतीय महिला क्रीडापटूंना टोकियोचे तिकिट मिळविता आले आकडा आणखी वाढला असता. राष्ट्रीय खेळ हॉकीपासून कुस्तीसारख्या अस्सल भारतीय मातीमधील खेळापासून ते गोल्फसारख्या उच्चभ्रूंच्या खेळामध्ये भारतीय महिला क्रीडापटू ऑलिम्पिक स्तरावर मैदान गाजवित आहेत, हे दृश्य खूपच सुखावणारे ठरले.

क्रीडाशक्तीचा महिलाविष्कार...
१९९० च्या दशकानंतर ग्लोबलायझेशन आणि टीव्ही वाहिन्यांच्या माध्यमातून जगभरात विविध क्षेत्रांत काय घडामोडी होत आहेत, याचे दर्शन आपल्याला घडू लागले. भारतीय महिलांनी क्रीडांगणासह अनेकविध क्षेत्रांना यशस्वी गवसणी घातली आहे. कोणत्याही क्षेत्रात भारतीय महिला मागे नाहीत, असे आपण कायमच अभिमानाने सांगतो. अंतराळात झेप घेण्यापासून शास्त्रज्ञ, प्रशासक, समाजकारण, कला-संस्कृती अशा अनेकविध क्षेत्रांसह क्रीडांगणावर भारतीय महिलांची प्रेरणादायी कामगिरी अभिमानास्पद आहे. सुवर्णकन्या पी. टी. उषाचा मगाशी उल्लेख केलाच. पण, क्रीडांगणावरील ही महिला चळवळीने नवीन सहस्त्रकात भरारी घेतली ती टेनिसपटू सानिया मिर्झामुळे. कुमार विम्बल्डन स्पर्धा जिंकून तिने केवळ इतिहासच घडविला नाही, तर असंख्य मुलींना खेळाकडे आकर्षित केले. त्यानंतर साईना नेहवालच्या माध्यमातून नवीन सहस्त्रकात नवी प्रेरणा मिळाली. टीम इंडियाप्रमाणेच महिला क्रिकेट संघाचीदेखील धूम सुरू होती. विश्वविक्रमी मिथाली राज हिच्याप्रमाणे लेडी कपिल देव ठरलेली झुलान गोस्वामीच्या यॉर्करचा धडाका सुरू होता. अनेक खेळांमध्ये महिलाशक्ती बहरत होती. मल्लेश्वरीने दाखविलेली पायवाट आता एक्स्प्रेस वे बनली होती. जगज्जेती मेरी कोम, सिंधू, मनू भाकर आदींच्या माध्यमातून क्रीडांगणावरील पदकांच्या भारतीय महिला प्रबळ दावेदार ठरत होत्या. क्रीडांगणावरील या यशोगाथेला आशियाई स्पर्धा, राष्ट्रकुल स्पर्धा आणि ऑलिम्पिक स्पर्धांच्या वेळी भरपूरच झळाली प्राप्त होते.

समाजमनावर सकारात्मक परिणाम
भारतीय महिलांचे क्रीडांगणावरील यश हे केवळ एका पदकापुरतेच मर्यादित नाही. समाजमनावर त्यामुळे मोठे, सकारात्मक बदल घडविण्यात त्यांचे मोलाचे योगदान झाले आहे. यंदाच्या ऑलिम्पिकमध्ये सहभागी झालेल्या क्रीडापटूंच्या कहाण्या ऐकल्या तर अभिमानाने ऊर भरून येण्याबरोबरच शरमेने मान खालीदेखील जाईल, असे वास्तव प्रकाशात येते. कुणी घरच्या गरिबीला कंटाळून, दोन वेळचे चांगले खाणे मिळेल, म्हणून खेळांच्या माध्यमातून राष्ट्रीय शिबिरामध्ये दाखल झाले आहे. कुणी, बालविवाह टाळण्यासाठी खेळांचा आसरा घेत आहे. कुणी, मोलमजुरी करीत असलेल्या आपल्या पालकांचा सहारा बनण्यासाठी खेळाच्या माध्यमातून प्रगती साधण्यासाठी धडपडत आहे, तर कुणी समाजात पाचवीला पूजलेली अवहेलना दूर करण्यासाठी क्रीडांगणावर दुर्गावतार धारण करीत आहे.

मध्यंतरी आमच्या संस्थेने, खेलेगी तो खिलेगी, हा प्रकल्प राबविला होता. फुटबॉलच्या माध्यमातून केवळ खेळच नव्हे, तर आरोग्य, सकस आहार, महिलांच्या शारीरिक समस्या इथपासून स्वसंरक्षणाचे धडे देण्याचा प्रयत्न या प्रकल्पाच्या माध्यमातून करण्यात आला. ऑस्ट्रेलियन सरकारच्या सहाय्याने फुटबॉलच्याच माध्यमातून स्वच्छता आणि आरोग्य या आघाडीवरदेखील एक प्रकल्प कोची-बेंगळुरूसह मुंबईत सुरू आहे. अशा प्रकल्पांचे मुलींच्या सर्वांगीण विकासाकरिता खूप फायदे होत आहेत. तसेच, खेळ आणि शिक्षण यांची सांगड घालून मुलींसाठी अनेक उपक्रम राबविण्यात येत आहेत. सांगण्याचे तात्पर्य हेच, की ऑलिम्पिकच्या क्षितिजावर भारतीय महिला चमकत आहेतच. पण, खेळांच्या माध्यमातून सामाजिक-आर्थिक, आरोग्यविषयीचा संदेश पोचवित मुली-महिलांचे भवितव्य सुरक्षित करण्यासाठी सक्रियरीत्या प्रयत्न होत आहेत. त्यांना समाजाच्या विविध घटकांकडून खूप सकारात्मक प्रतिसाद मिळतो आहे, हेदेखील इथे आवर्जून सांगावेसे वाटते. वाईटातून चांगल्याचा प्रारंभ होतो, असे म्हणतात.

भारतीय महिला क्रीडापटूंचा आतापर्यंतचा पल्ला अशाच काहीशा काटेरी मार्गावरून गेला आहे. आता मात्र समाजात त्याचे सकारात्मक पडसाद उमटत आहेत. अगदी कोणत्या उत्पादनाच्या जाहिरातीमध्ये हाती चेंडू घेतलेली छोटी मुलगी दाखविण्यात येते. तर, कोणत्या सामाजिक-धार्मिक कार्यक्रमामध्ये आपल्या परिसर-मोहल्ल्यामध्ये महिला क्रीडापटूला आवर्जून प्रमुख पाहुणी म्हणून बोलाविण्यात येते. शाळांमधूनदेखील मुलींना खेळण्यासाठी प्रोत्साहित केले जात आहे. नवीन सहस्रकात जन्मलेल्या मिलेनियम किड्सवर हा क्रीडासंस्कार घडविण्यासाठी आधुनिक भारतामधील पालकत्वाच्या पुढारलेल्या आयडियादेखील कमाल करीत आहेत. त्यामुळेच, नवीन पिढीतील नवीन पालकांनादेखील विशेष धन्यवाद देणे गरजेचे आहे.

वृथा स्त्रीवादाला आवर घालण्याची गरज
आधुनिक भारतामध्ये प्रत्येक क्षेत्रात महिला पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून अग्रेसर आहेत, अशी वाक्ये सभा, समारंभ आणि वाद-विवादामध्ये फेकली, की टाळ्या मिळणे हे नक्कीच. पण, ही मानके पुरुषांनीच का निश्चित करायची? तसेच, कोणत्या आघाडीवर स्त्रियांनी जायचे आणि कोणत्या नाही, याचा निर्णय पुरुषांनीच का घ्यायचा? निर्णयप्रक्रियेचे स्वातंत्र्य महिलांना का दिले जात नाही?... अशा अनेकविध मुद्द्यांच्या चर्चा घडतच राहतात आणि यापुढेही राहतील. मात्र, क्रीडा क्षेत्रापुरते तरी अशा प्रकारच्या वृथा स्त्रीवादी किंवा स्त्रीमुक्तीच्या विचाराला आवर घालावा, अशी नम्र विनंती या निमित्ताने करावीशी वाटते. ती लढाई समाजाच्या इतर आघाड्यांवर सुरूच राहू देत. पण, क्रीडांगणावर असा स्त्री-पुरुष समानता-विषमता असा वाद कृपया उफाळून काढू नये. एक तर बहुतांश खेळांसाठीचे पुरुष आणि महिला यांच्यासाठीचे नियम, निकष भिन्न आहेत. महिलांच्या शारीरिक आणि नैसर्गिक क्षमता लक्षात घेऊन अत्यंत शास्त्रीय पद्धतीने त्याचे नियोजन करण्यात येते. तसेच, पुरुष आणि महिलांच्या स्पर्धादेखील स्वतंत्रपणे भरविण्यात येतात. त्यामुळे, त्यामध्ये कोणताही वाद नाही. म्हणूनच, आतापर्यंत पुरुष आणि महिला क्रीडांगणावर सुरू असलेला गुण्यागोविंदाचा संवाद यापुढेही असाच सुरू राहू देत, हा एक अनाहूत सल्ला.

... अजून बराच पल्ला गाठायचाय
क्रीडांगणावर महिलांसाठी उत्साहवर्धक वातावरण नक्कीच आहे. पण, अजूनही आपल्याला बराच पल्ला गाठायचा आहे. सगळ्यात महत्वाचे म्हणजे, क्रीडाविश्वातील भारतीय महिलांसाठी स्वतंत्रपणे निर्णयप्रक्रिया राबविणे गरजेचे आहे. जेंडर बजेटसारखे उपक्रम महिला क्रीडाक्षेत्रासाठी राबविण्याची गरज आहे. पुरुषांच्या अपार मेहनत, खडतर परिश्रम आणि राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय स्तरावर प्राप्त केलेल्या लौकिक-यशाला सलामच आहे. पण, पुरुषांपेक्षा महिलांच्या क्रीडा क्षेत्रासाठी स्वतंत्र विचारप्रक्रियेची गरज आहे, हे लक्षात घेणे आवश्यक आहे. वुमेन इन स्पोर्ट्स – अशा आशयाच्या अनेक चळवळी देशात उभ्या राहात आहेत. त्याला सामाजिक-क्रीडा क्षेत्रामधील संस्था-संघटनांबरोबरच कॉर्पोरेट विश्वातूनही सकारात्मक प्रतिसाद मिळतो आहे. टोकियो ऑलिम्पिकमधील भारतीय महिलांची भरारी हा केवळ एक अपघात नाही. तो पिढ्यान् पिढ्या सुरू असलेल्या संघर्षाचा परिपाक आहे. महिला खेळाडूंचा आविष्कार हा त्यांचा जणू स्वातंत्र्यसंग्रामच असतो.

जाचक बंधने, समाजव्यवस्था, रुढी-परंपरा यांच्या विरोधात पुकारलेले ते जणू बंडच असते. त्याचप्रमाणे, स्वत्वाचा शोध घेत समाजामध्ये आपले स्वतःचे एक स्वतंत्र अस्तित्व शोधण्यासाठी, ते ठसविण्यासाठीचादेखील तो एक लढा असतो. त्यामुळेच, तेवढ्याच व्यापक संवेदनांच्या त्या अधिकारी आहेत. ऑलिम्पिकच्या आघाडीवरील या महिला भरारीचे कौतुक करावे तेवढे कमीच आहे. पण, केवळ शाब्दिक कौतुक, चार-दोन सत्कार-समारंभ, नोकरीची संधी एवढ्यापुरतेच या महिला खेळाडूंसाठीची आपली संवेदना मर्यादित ठेवून चालणार नाही. महिला क्रीडाविश्वाच्या विकासाकरीता पायाभूत सुविधा, आर्थिक पाठबळ आणि मुख्य म्हणजे महिला खेळाडूंना प्रतिष्ठा व समाजमान्यता देणे गरजेचे आहे. टोकियो ऑलिम्पिकच्या निमित्ताने महिला क्रीडाविश्वाकडे पाहण्याचा दृष्टिकोन याच संवेदना जागृत करीत बदलेल, अशी आशा. तसे झाल्यासच टोकियो ऑलिम्पिकमध्ये सहभागी झालेल्या प्रत्येक भारतीय महिला क्रीडापटू, त्यांचे कुटुंबीय आणि त्यांना पाठिंबा देत असलेल्या घटकांचे परिश्रम, त्याग सत्कारणी लागतील.

आशिष पेंडसे
ashpen6@gmail.com
(लेखक हे क्रीडापत्रकार असून व्हिव्हा फुटबॉल मासिकाचे संपादक आहेत)

बातम्या आणखी आहेत...