आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रसिक स्पेशल:आदित्य पर्व : वहिवाट अन् बिकट वाट

अशोक अडसूळ6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

शिवनेनेने आदित्य ठाकरेंच्या नेतृत्वात आगामी लोकसभा निवडणुका लढवण्याचे ठरवले आहे. पण, इतरांच्या तुलनेत अगदी लवकर आणि सहज मंत्रिपदी आलेल्या आदित्य यांची पुढची वाटचाल मात्र तितकी सोपी नाही. वरवर सरळ वाटणाऱ्या त्यांच्या वाटेवर अनेक वळणे, खाचखळगे अन् दृश्य - अदृश्य आडवाटा येणार आहेत. उघड- छुप्या विरोधकांचा ‘सामना’ करताना नि पक्षातील जुन्या-नव्या पिढीला सांधताना त्यांच्या नेतृत्वाचा कस लागेल. पण, उद्याच्या प्रागतिक महाराष्ट्राचे राजकीय ‘पर्यावरण’ आदित्य यांच्याशी नक्कीच जोडलेले असेल. तशा हाका सध्या ऐकू येताहेत.

ऑक्टोबर २०१२.. दसरा मेळाव्यात भावुक स्वरात शिवसेनाप्रमुख बाळासाहेब म्हणाले होते, ‘उद्धव आणि आदित्यला मी तुमच्या हवाली करतो आहे. त्यांची काळजी घ्या.’ त्या वेळी युवा सेनेचे अध्यक्ष असलेले आदित्य २२ वर्षांचे होते. आता ते राज्याचे कॅबिनेट मंत्री आहेत. २०२४ च्या लोकसभा निवडणुका शिवसेना देशभर लढवणार आहे आणि त्या आज ३२ वर्षांच्या असलेल्या आदित्य यांच्याच नेतृत्वाखाली लढल्या जाणार आहेत. अलीकडे आदित्य अधिक सक्रिय झाल्याचे दिसते आहे. माध्यमांना सामोरे जाताहेत, वादावर मते नोंदवताहेत. राज्यात दौरे करताहेत. बैठका, भेटीगाठीही वाढल्या आहेत. आदित्य यांचे अचानक सक्रिय होणे आणि उद्धव यांचे आजारपण याचा काहीएक संदर्भ आहे. आदित्यच्या रूपाने ठाकरे घराण्याची तिसरी पिढी पक्षाची धुरा हाती घेत आहे.

राज ठाकरे शिवसेनेत असताना त्यांच्याकडे भारतीय विद्यार्थी सेनेची जबाबदारी होती. राज यांनी मनसे काढली. त्यानंतर शिवसेनेने विद्यार्थी सेनेच्या जागी युवा सेना स्थापली. २०१० च्या दसरा मेळाव्यात बाळासाहेबांनी युवा सेनेची घोषणा केली. नातू आदित्यकडे नव्या सेनेची जबाबदारी दिली. उद्धव ठाकरेंनी पक्षप्रमुख म्हणून धुरा सांभाळल्यानंतर खऱ्या अर्थाने राजकीय पटलावर आदित्यचा उदय झाला. उद्धव यांच्या हृदयावर २०१२ मध्ये शस्त्रक्रिया झाली. त्यांच्यावर शारीरिक मर्यादा आल्या. त्यामुळे आदित्य यांना तातडीने राजकारणात आणले गेले. आता आणखी एक पाऊल उचलले जात आहे. उद्धव यांच्या मणक्यावर शस्त्रक्रिया झाली. त्यांना यापुढे दगदग शक्य नाही म्हणूनच आदित्य यांच्या नेतृत्वात शिवसेना लोकसभा निवडणुकीसाठी सज्ज होते आहे. २०१० मध्ये रोहिंग्टन मिस्त्री यांच्या ‘सच अ लाँग जर्नी’ या पुस्तकाच्या प्रति जाळून आदित्य यांनी पहिले आंदोलन केले. या पुस्तकामुळे मराठी माणसाचा अपमान होत असल्याचा त्यांचा आरोप होता. अखेर हे पुस्तक अभ्यासक्रमातून हटवण्यात आले. शिवसेना हा रस्त्यावरचा पक्ष आहे. तो ड्रॉइंग रूममध्ये घडणारा नव्हे, तर मैदानात वाढणारा पक्ष आहे. मुंबईत ‘राडा’ हा शब्द शिवसेनेने आंदोलनातून प्रसवला. असे असले तरी आदित्य मात्र नेमस्त प्रवृत्तीचे आहेत. शिवसेना नेते हल्ली म्हणत असतात, ‘दमबाजीचा काळ गेला, आता विकासाचे दिवस आहेत.’ त्यामुळेच आदित्य यांची ‘विकासपुरुष’ अशी प्रतिमा बनवली जाते आहे. आदित्यनी मुंबईतले नाइट लाइफ जिवंत राहावे आणि रूफ टॉप हॉटेलना परवानगी मिळावी यासाठी आग्रह धरला. मुंबईतल्या राणीच्या बागेत पेंग्विन आणले. आरे जंगलातील मेट्रो कारशेडचा प्रश्न असो की खाडीतले मॅनग्रोव्हज वाचवण्याचा.. पर्यावरण जतन, संवर्धनासाठी सतत पुढाकार घेतला. मुंबईचे मध्यमवर्गीय, उच्च मध्यमवर्गीय शिवसेनेशी आजपर्यंत फटकून अन् तिला बिचकून होते. हा वर्ग सेनेचा कधीच मतदार नव्हता. आता मात्र आदित्य त्यांना भावतात. मुंबईच्या रहिवाशांना मालमत्ता कर माफ करण्याचा निर्णय तर सेनेचा षटकार ठरला. त्यासाठी आदित्य आग्रही असल्याचे उद्धव यांनीच सांगितले. चार वर्षांपासून आदित्यनी मुंबई महापालिकेत जातीने लक्ष घातले आहे. परिणामी पालिका ‘चालवणाऱ्या’ अनिल परब, अनिल देसाईंची छुट्टी झाली. मुंबई, ठाणे महापालिकेतील शिवसेनेचे ६० टक्के नगरसेवक पन्नाशीच्या पुढचे आहेत. सेनेचे बहुतांश लोकप्रतिनिधी तळातले आहेत. ते जनतेच्या दैनंदिन समस्या सोडवण्याला महत्त्व देणारे आहेत. आदित्य मात्र धोरणाला प्राधान्य देणारे, त्यावर काम करणारे नेते आहेत. मग तो हाॅटेल व्यवसायाला उद्योगाचा दर्जा देण्याचा प्रश्न असो वा समुद्रकिनारीचे शॅक्स धोरण असो.. सेनेतील अन्य नेते आणि आदित्य यांच्यातील ही दरी अडचणीची ठरणारी आहे. त्यासाठी महापालिका निवडणुकीत युवा सेनेच्या पदाधिकाऱ्यांना मोठ्या प्रमाणात उमेदवारी देण्याचे सध्या घाटत आहे. आजचे हे तरुण नगरसेवक उद्याचे आमदार असतील आणि हेच आदित्यचे बळ ठरतील असा ठाकरे कुटुंबीयांचा होरा आहे.

आदित्य नम्र आहेत, उच्चशिक्षित आहेत. समोरच्याचे ऐकून घेऊन उत्तर देतात. ज्येष्ठांना नम्रतेने वागवतात. त्यामुळे हा प्रशासनातील अधिकाऱ्यांचाही आवडता नेता ठरला आहे. गेली २० वर्षे उद्धव मुंबई महापालिकेचा कारभार पाहतात. मुंबई पालिकेत पाच आयएएस अधिकारी, २८ सहायक आयुक्त आहेत. उद्धव यांची त्यांच्याशी खाशी सलगी नव्हती, पण आदित्य यांची मात्र तशी ती आहे. ठाकरे कुटुंबीयांना सरकार चालवण्याचा काय अनुभव? असे आजपर्यंत म्हटले जात होते. तो भ्रम खोटा ठरवण्याच्या दिशेने आदित्यची पावले पडत आहेत. एकीकडे विकासाचा चेहरा घेऊन आदित्य पुढे जाऊ इच्छितात, दुसऱ्या बाजूला हिंदुत्वाचे जोखड त्यांच्या मानेवर आहे. त्यांना भूमिपुत्रांच्या भल्याच्या गोष्टी करायच्या आहेत, मराठी कार्ड वापरत राहायचे आहे आणि त्याबराेबरच मुंबईत ५० टक्के असलेल्या हिंदी तसेच गुजराती भाषिकांनाही जोडायचे आहे. हा मोठा पेच आहे आणि तो सोडवताना आदित्यच्या नेतृत्वाचा कस लागणार आहे. आदित्य यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेने सहा महिन्यांपूर्वी दीव- दमणमध्ये लोकसभा पोटनिवडणुकीत विजय मिळवला. गोवा विधानसभा निवडणुकीतही ते सक्रिय आहेत. गोव्यात किमान तीन जागा सेनेला मिळण्याचा अंदाज आहे. तसे झाल्यास काँग्रेससोबत सत्ता स्थापन करण्याचे त्यांचे मनसुबे आहेत. लवकरच आदित्य अखिलेश यादवांना भेटण्यासाठी लखनऊला जात आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार, काँग्रेसचे विधिमंडळ नेते बाळासाहेब थोरात यांच्याशी त्यांचे छान ट्युनिंग आहे. एकेकाळी व्हॅलंेटाइन डेला विरोध करणाऱ्या सेनेचा हा युवराज आता पुरोगाम्यांचा ताईत बनतो आहे.

इकडे शिवसेनेत पहिल्या फळीच्या नेत्यांची उणीव आहे. एकनाथ शिंदे यांच्यासारख्या बाहुबली नेत्यांचा प्रभाव आपापल्या बालेकिल्ल्यातच आहे. सेनेची ही प्रचलित रचना आदित्य यांना बदलावी लागणार आहे. जुन्या व युवा नेत्यांमध्ये मध्यममार्ग शोधणे आणि त्यांना एकत्र सांधणे हे आव्हान आहे. राष्ट्रवादीसारख्या आपल्याकडे सहकारी संस्था का नाहीत, असा प्रश्न उद्धव यांनी उपस्थित केला होता. पक्षविस्तार करण्याबरोबरच त्या दृष्टीनेही संस्थात्मक बांधणी आदित्यना करावी लागेल. आदित्य यांचे वर्तुळ प्रामुख्याने मुंबईकेंद्री आहे. या वर्तुळाचा परीघ विस्तारण्यासाठी उत्तर प्रदेश आणि गोवा विधानसभेच्या निवडणुकांमध्ये युवा सेनेच्या पदाधिकाऱ्यांवर जबाबदारी दिली गेली. आदित्य यांच्या राजकीय भवितव्याकडे पाहताना लहान भाऊ तेजसचाही विचार होऊ शकतो. सध्या तेजस जंगलात रमला आहे. पण शिवसेना हा संपूर्ण ठाकरे कुटुंबीयांचा पक्ष असतो. त्यामुळे आज ना उद्या तेजसला संघटनेत आणले जाईल आणि त्या वेळी सेनेचा नवा अध्याय सुरू होईल. पुन्हा भाऊबंदकी होणार नाही हे आदित्य यांनाच पाहावे लागेल. भविष्यातील पक्षविस्तारात उद्धव यांची भूमिका मर्यादित होऊ शकते. पक्षविस्तार करताना ग्रामीण भागात शिवसेनेचा राष्ट्रवादीशी संघर्ष अटळ आहे. अजित पवार यांच्यासारख्या चतुर आणि धडाडीच्या नेत्याशी आदित्यचा सामना आहे. दुसरीकडे, संजय राऊतांच्या अलीकडच्या पवित्र्यामुळे भाजप-सेनेमध्ये मोठी पाचर बसली आहे. त्यामुळे पुढची काही वर्षे तरी या दोन्ही पक्षांत हाडवैर राहील. भाजपशी पंगा तर घ्यायचा; पण हिंदुत्वही जपायचे. हे कसे जमवायचे? मुंबई महापालिका शिवसेनेचे गंडस्थळ आहे. पालिकेचा अर्थसंकल्प ३६ हजार कोटींचा होता, जीएसटीनंतर तो २६ हजार कोटींवर आला. स्थायी समितीत येणारी टेंडर्स ‘मातोश्री’वर निश्चित होत असल्याचा आरोप होतो. सेनेला मुंबई पालिकेतून रसद मिळते हे उघड आहे. या स्थितीत एप्रिलमध्ये होणाऱ्या निवडणुकीत भाजपने पालिका जिंकली तर मग पुढे काय? पक्ष म्हणून सेना चालवायची कशी? असे प्रश्न उभे राहू शकतात. शिवसेनेत ‘खोका’ संस्कृती आहे आणि त्यामुळे ज्यांचा वकूब नाही अशांनाही मोठी पदे मिळतात, असा आरोप होत असतो. असे असताना आदित्य प्रागतिक, विकासाभिमुख पक्षसंघटनेचा चेहरा बनत असतील तर या ‘मातोश्री कल्चर’चे काय? बरे, सेनेच्या नेत्यांकडे साखर कारखाने, सूतगिरण्या, शिक्षण संस्था, सहकारी बँका यांचाही अभाव आहे. मग सत्ता नसेल तेव्हा कार्यकर्ते टिकून कसे राहणार? सेनेचा राज्याबाहेर केवळ दीव-दमणमध्ये खासदार आहे. कितीही वल्गना केल्या तरी हा पक्ष प्रादेशिक आहे, राहील. अस्मितेचे राजकारण हा प्रादेशिक पक्षाचा स्थायीभाव असतो. सेनेकडे आज मुद्दे नाहीत, प्रश्न नाहीत, लढेही नाहीत. शिवसेना ही मुळात राजकीय बंडखोरी होती. गेल्या २० वर्षांत सेना राजकीय पक्ष म्हणून प्रस्थापित झाली, पण पुढे काय? नजीकच्या भविष्यात आदित्यच्या कारकीर्दीत दोन-तीन ़ ट्विस्ट येऊ शकतात. एक म्हणजे, त्यांचा विवाह कोणत्या घराण्यातल्या मुलीशी होतो. दुसरा, एप्रिलच्या निवडणुकांत मुंबई महापालिका सेनेच्या हाती राहणार काय आणि तिसरा म्हणजे, येत्या काही दिवसांत राज्यात राष्ट्रपती राजवट लागते काय?

आदित्य यांच्या वरवर सरळ वाटणाऱ्या वाटेवर अनेक वळणे, खाचखळगे अन् दृश्य - अदृश्य आडवाटा येणार आहेत. उघड-छुप्या विरोधकांचा ‘सामना’ करताना आणि पक्षातील जुन्या-नव्या पिढीला सांधताना त्यांच्या नेतृत्वाचा कस लागेल. शरद पवारांच्या नंतर कोण, असा प्रश्न राज्यात वारंवार विचारला जातो. आदित्य महाराष्ट्राबाहेर जातील याची शक्यता कमीच आहे. पण, मृदू स्वभावाचा, सौम्य प्रकृतीचा हा ‘ठाकरे’ नव्या पिढीच्या मुंबईवर राज्य करेल. त्याबरोबरच पवारांसारख्या अपेक्षा ठेवता येतील, असा राज्याचा नेताही होऊ शकेल. उद्याच्या प्रागतिक महाराष्ट्राचे राजकीय ‘पर्यावरण’ आदित्य यांच्याशी नक्कीच जोडलेले असेल. तशा हाका सध्या ऐकू येताहेत.

अशोक अडसूळ
adsul.ashok @gmail.com
संपर्क : 9340061845

बातम्या आणखी आहेत...