आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या ‘लोक माझे सांगाती...’ या राजकीय आत्मकथनाच्या सुधारित आवृत्तीचे मुंबईत नुकतेच प्रकाशन झाले. त्यात २०१५ नंतरच्या राज्यातील घडामोडींचा वादळी कालखंड चितारला आहे. यामध्ये विविध राजकीय पक्ष, संघटना आणि नेत्यांची जशी झाडाझडती घेतली आहे, तशी कल्याणकारी योजना तसेच सामाजिक -आर्थिक प्रश्नांविषयी चर्चाही केली आहे. या आत्मकथनाच्या अंतरंगाचे काही रंजक अन् वेधक अंश...
देशात सर्वत्र भाजप असल्याचं चित्र फसवं आहे. देशाचं वर्गीकरण तीन भागात होईल. पहिले, काही राज्यांत भाजप शक्तिशाली आहे. दुसरे, काही राज्यात भाजप सत्तेत आहे, पण संधी मिळाली तर लोक त्यांना दूर करतील. तिसऱ्या गटातील राज्यांनी भाजपला दूर ठेवलं आहे. नरेंद्र मोदी यांची सत्ता यावच्चंद्रदिवाकरौ मानली जाते, पण त्यात तथ्य नाही. बहुसंख्याकवादाचे राजकारण देशात यशस्वी होऊ शकते, पण काही काळच. इंदिरांच्या विरोधात सारा देश एकवटला होता. तसाच प्रकार मोदींबाबत होईल. म्हणून येता काळ राजकीय स्थित्यंतराचा असेल,”’ हे अनुमान आहे गेली ५६ वर्षे राजकारणात सक्रिय असलेल्या शरद पवार यांचे. ‘लोक माझे सांगाती...’ या राजकीय आत्मकथनाच्या सुधारित आवृत्तीत त्यांनी गेल्या सात-आठ वर्षांतील अनेक राजकीय आणि अन्य घडामोडींवर भाष्य केले आहे.
द्वेषमूलक राजकारणावर खडे बोल : या पुस्तकात पवार म्हणतात, ‘एमआयएम’चे नेते महाराष्ट्रात प्रक्षोभक भाषणे करत मुस्लिमांची कड घेतात. पण, राज्यातला मुस्लिम टोकाच्या गोष्टींचा स्वीकार करणारा नाही.’ एकीकडे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मोहन भागवत मुस्लिमांशी संवाद करतात तर दुसरीकडे, त्यांचाच भाजप मुस्लिमांविषयी द्वेषमूलक वक्तव्ये करतो, यावर बोट ठेवत मुस्लिम समाजातील तरुणांचे खासगी आणि सरकारी नोकऱ्यांतील स्थान अल्प असणे चिंताजनक असल्याचे ते नमूद करतात. २०१८ मध्ये फडणवीस सरकारच्या काळात कोरेगाव-भीमा येथे दंगल झाली. त्याला दलित विरुद्ध मराठा असे स्वरूप देण्याचा प्रयत्न झाला. इतकेच नाही, तर त्याच्या आडून बुद्धिजीवींना तुरुंगात डांबले. हे प्रकरण गंभीर आहे, हे भासवण्यासाठी तत्कालीन सरकारने एल्गार परिषदेतील मंडळींनी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हत्येचा कट रचल्याची आवई उठवली. त्यातून वंचितांचा, पर्यावरणवाद्यांचा, बुद्धिजीवींचा आवाज दाबण्यासाठी अर्बन नक्षल हे हत्यार परजले गेले, असा पवारांचा स्पष्ट आरोप आहे.
भाजपचे मनसुबे अन् ‘मविआ’ची जुळणी : ‘अवघा महाराष्ट्र माझा’ हे नवे प्रकरण या सुधारित आवृत्तीत समाविष्ट आहे. त्यामध्ये राज्यातील २०१९ च्या विधानसभा निवडणुकांतील घडामोडी रंजक पद्धतीने मांडल्या आहेत. ‘ईडी प्रकरण त्या निवडणुकांत माझ्यासाठी पथ्यकारक ठरले. ईडीमुळे भाजपचं भांडं फुटलं. मी ईडीला सामोरे गेलो. परिणामी, निवडणूक जिंकण्याच्या भाजपच्या तंत्राचं एक आयुध निरस्त झालं,’ असा दावा पवारांनी केला आहे. साताऱ्याची पावसातली सभा संपली अन् हा गड जिंकला अशी मनोमन खात्री पटली होती, त्याची आठवण त्यांनी दिली आहे. ‘महाविकास आघाडीच्या जुळणी’ची वाचनीय हकिकत सुधारित आवृत्तीत आहे. ‘२०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर शिवसेनेऐवजी आमच्याशी म्हणजे राष्ट्रवादीशी सरकार स्थापण्यात भाजपला रस होता. दोन्ही पक्षांच्या नेत्यांमध्ये तशी चर्चा झाली होती,’ असा गौप्यस्फोट पवारांनी केला आहे. ‘मुख्यमंत्रिपदावर दोघे हटून बसल्याने सत्तानाट्यात उतरण्याचा राष्ट्रवादीने निर्णय घेतला. तुम्ही मुख्यमंत्री व्हा, अशी आॅफर उद्धव ठाकरे यांना मी प्रथम दिली,’ असे पवारांनी स्पष्ट केले आहे.
कसे शमवले अजितदादांचे बंड? : ‘अजितने भाजपबरोबर जात पहाटे सरकार स्थापले, त्यास काँग्रेस कारणीभूत होती. आघाडीच्या चर्चेत अधिक वेळ जात होता, ती संधी साधून भाजप, केंद्र सरकार आणि राजभवन यांनी रडीचा डाव खेळला. अजितने आमदारांच्या सह्यांच्या पत्राचा गैरवापर केला. सर्वोच्च न्यायालयाने बहुमत चाचणीला वेळ दिला असता, तर आमदारांच्या घोडेबाजाराला ऊत आला असता. अजितला विधिमंडळ पक्षनेतेपदावरून दूर केल्याने त्याच्या गटाला योग्य तो संदेश गेला. परिणामी, ते बंड औटघटकेचे ठरले. दिलगिरी व्यक्त केल्याने अजितला उपमुख्यमंत्री करण्याचा निर्णय घेतला,’ अशी कथा पवारांनी सांगितली आहे.
शिवसेना अन् उद्धव यांची झाडाझडती : शिवसेना आणि उद्धव ठाकरे यांची या आत्मकथेत एका अर्थाने झाडाझडती घेतली आहे. ‘शिवसेनेने कितीही जोरकस भूमिका घेतली, तरी त्यांचा वैचारिक पाया भक्कम नाही. आणीबाणीमध्ये शिवसेनेने इंदिरांना पाठिंबा दिला होता. उद्धवना शारीरिक समस्यांमुळे काही मर्यादा होत्या. त्यांच्या औषधांच्या आणि डाॅक्टरांच्या वेळा पाहून आमच्या भेटी ठरवल्या जात होत्या. मुख्यमंत्री असताना दोनदा मंत्रालयात जाणे आमच्या पचनी पडणारे नव्हते. बाळासाहेबांच्यासमवेत संवादात जी सहजता होती, ती उद्धव यांच्याशी बोलताना नव्हती,’ असा अनुभव पवारांनी नमूद केला आहे. ‘शिवसेनेत एकनाथ शिंदे यांचे बंड झाले, त्या वेळी सत्ता राखण्यासाठी वेगाने हालचाली झाल्या नाहीत. सरकार अडचणीत असताना उद्धव यांनी माघार घेतली. अनुभव नसल्याने हे सर्व घडले, तरी ते टाळता आले असते. उद्धव कोरोनाकाळात प्रशासनाच्या संपर्कात होते, पण व्हिडिओ काॅन्फरन्सिंगच्या माध्यमातून होते. उद्धव यांना मुख्यमंत्री केल्याने सेनेत वादळ उठेल, याची कल्पना नव्हती. ते वादळ शमवण्यात शिवसेना नेतृत्व कमी पडले. तसेच मुंबई महाराष्ट्रपासून तोडण्याचे दिल्लीत कुणाच्याही मनात नाही,’ या शब्दांत पवारांनी शिवसेना आणि उद्धव यांच्याविषयी भाष्य केले आहे.
कारकीर्दीचे दस्तऐवजीकरण, पण किती विश्वासार्ह? : राजहंस प्रकाशनाने प्रसिद्ध केलेला हा ग्रंथ ४२८ पानांचा आहे. सुधारित आवृत्तीमध्ये तीन नवी प्रकरणे आहेत. मुळात आत्मचरित्र हे साहित्य आहे. आत्मकथा लिहू नये, असा साहित्यिकांचा सांगावा असतो. त्यात पवारांचे ‘होय’ म्हणजे ‘नाही’ आणि ‘नाही’ म्हणजे ‘होय’ असते. त्यामुळे त्यांच्या या कथनावर किती विश्वास ठेवायचा, हासुद्धा मोठा प्रश्न आहे. शरद पवार महाराष्ट्राच्या राजकारणातील दंतकथा बनून राहिले आहेत. या आत्मकथनाच्या निमित्ताने ५६ वर्षांच्या त्यांच्या राजकीय कारकीर्दीचे दस्तऐवजीकरण झाले, हे महत्त्वाचे. महाराष्ट्राच्या इतिहासात डोकावणाऱ्यांना ‘लोक माझे सांगाती...’चा धांडोळा घ्यावा लागेल. पहिली आवृत्ती २०१५ मध्ये आली, तेव्हा इतका गवगवा झाला नव्हता. महाविकास आघाडीची जुळणी, या नव्या प्रकरणाने हा ग्रंथ स्फोटक ठरला.
पवारांच्या भूमिकेविषयी नेहमी चर्चा झडतात. पवारांना शोधू गेल्यास सात आंधळे आणि एक हत्ती अशी अनेकांची अडचण होते. या आत्मकथनामुळे ती काही अंशी दूर झाली आहे. पवार थोडे तरी हाती लागू शकतात, हे त्यातून सूचित होते. या ग्रंथात देशातल्या समकालीन अनेक घटनांविषयी नवी माहिती मिळते. पवारांची कन्या सुप्रिया सुळे यांची प्रस्तावना वाचनीय आहे. बाबा अन् आजोबा म्हणून पवार कसे हळवे आहेत, हे त्यातून उमगते. पवारांचे राजकारणातील मंत्र जागोजागी सापडतात. ‘जसं समोर येईल तसं आयुष्य स्वीकारा,’ हा त्यातला एक मंत्र आहे. आयुष्य हे शांत, खोल, क्षमाशील अन् प्रवाही आहे, असा पवारांचा सिद्धांत आहे. ही आत्मकथा त्याबरहुकूम आहे.
अशोक अडसूळ
adsul.ashok @gmail.com
संपर्क : ९३४००६१८४५
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.