आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आदरांजली:​​​​​​​विधीमंडळाचा वारकरी

एका वर्षापूर्वीलेखक: अशोक अडसूळ
  • कॉपी लिंक

शेतकरी कामगार पक्षाचे ज्येष्ठ नेते गणपतराव देशमुख यांचं शुक्रवारी रात्री निधन झालं. गणपतराव देशमुख यांच्या आयुष्यात अशा अनेक गोष्टी घडल्या ज्याच्या बातम्या झालेल्या नाहीत. गणपतराव काळाची पावले ओळखणारे व्यवहारी मार्क्सवादी होते. त्यांनी भाषणात डावा विचार, मार्क्सवाद उच्चारला नाही. पण राजकारण मात्र कष्टकऱ्यांसाठी, सबाल्टर्नसाठी केले.

सांगोला स्टेशन रोडवरच ते जुने घर. घराचा हाॅल म्हणजे कार्यालय. सकाळी 9 वाजता हसतमुख गणपतराव खुर्चीत स्थानापन्न होत. समोर सहायक असे. डाव्या बाजूला अभ्यागतांसाठी खुर्च्या. एक एक करत गणपतारावांकडे गाऱ्हाणे जाई. हा शिरस्ता गेली पाच दशके होता. 'बोला, मी तुम्हाला काय मदत करु, अशी सुरुवात होई. समोरच्याचे म्हणणे गणपतराव ऐकुन घेत. फारच वैतागलेली व्यक्ती असेल तर ग्लासभर पाणी देत. आपण मार्ग काढू...बघू... असे म्हणत गणपतराव धीर देत. संबंधितांना फोन लावला जाई. दुपारी १ पर्यंत हे असे चाले. कुणाचे अत्योंदयचे अनुदान रखडले, कुणाला श्रावळबाळ योजेनेचा लाभ नाही, अशा तक्रारी असत. कुणी आकडा टाकून वीज घेताना पकडलेला, दंड माफ करावा म्हणून आलेला असे. त्याला गणपतराव म्हणत, 'तुमचे काम नियमाला धरुन आहे का?' फारच गयावया केल्यावर वीज मंडळाच्या अधिकाऱ्याला फोन लावत आणि यांची वसुली टप्प्याटप्प्याने घ्या असे गणपतराव म्हणत. जिल्हा बँका अन पोलीस स्टेशनातली तडजोडीतून अनेक नेते जन्मले. गणपतरांवाचा पोलीस स्टेशनला क्वचितच फोन जाई. त्यांची सारी भीस्त सरकारी योजना राबवण्यावर होती. वर्षातून एकदा मतदारसंघातल्या प्रत्येक गावात ते जात. जुन्या कार्यकर्त्यांना शेजारी बसवत. अडचणी ऐकून घेत. आमदार दाराशी येतो, याचे लोकांना अप्रुप असे. अडलेल्या कामांसाठी सांगोल्याचा माणूस मंत्रालयात आलाय, असे चित्र दुर्मिळच. 'तुम्ही मुंबईला येऊ नका, रोजगार बुडवू नका', असे गणपतराव बजावत. १९६२ साली गणपतराव देशमुख शेकापचे प्रथम आमदार झाले. १९७२ आणि १९९५ चा अपवाद साेडला तर ते १० वेळा म्हणजे ५० वर्षे विधिमंडळात होते. मनोहर जोशी वगळता यशवंतराव चव्हाण ते देवेंद्र फडणवीस असे मुख्यमंत्री त्यांनी पाहिले आहेत. १९७८ मध्ये पुलोद सरकारात ते शेतीमंत्री तर १९९९ मध्ये पुरोगामी लोकशाही आघाडी सरकरात गणपतराव पणनमंत्री होते. मंत्री निवासात येणाऱ्या वर्तमानपत्रांच्या रद्दीचे पैसे ते सरकारला जमा करत. हे पैसे जमा करुन घेण्यासाठी सामान्य प्रशासन विभागाला नवा हेड करावा लागला. पुलोद सरकार बरखास्त झाले, तेव्हा ते सांगोल्यात होते, त्यांनी लाल दिव्याची गाडी अन सुरक्षा रक्षक लगेच मुंबईला पाठवून दिले होते. आमदार निवासात शेकडो हरकामे असतात. पण, गणपतराव बुट पाॅलीश करायला स्वत: घेऊन आलेले अनेकदा दिसले आहेत. ५० वर्षातली ७ वर्षे वगळली तर गणपतराव विरोधी बाकावर होते. मंत्रालय किंवा विधिमंडळात येताना त्यांच्याबरोबर एक सहाय्यक असे, तो सांगोला सूत गिरणीचा कर्मचारी असे. त्याला ते कायम अाहो, जाओ करत. मनोरा आमदार निवासात त्यांचा सरकारी ब्लाॅक होता. आमदार निवास म्हणजे मतदारसंघाची धर्मशाळा. पण गणपतरावांनी आपल्या खाेलीची चावी कधी कुणाला दिली नाही. कुणाची मागण्याची हिम्मतही झाली नाही. मुंबईत आले की नरिमन पाॅइंटच्या शेकाप कार्यालयात आवर्जून चक्कर मारत. महिनोनमहिने आळसावलेल्या त्या कार्यालयात आबा आले की चैतन्य येई. कार्यालयात त्यांची काही डिमांड नसे. बीपीटीत गोदी कामगार असलेल्या एखाद्याला वेळ दिलेली असे नाहीतर एन. डी. पाटील किंवा भाई जयंत पाटील यांची भेट ठरलेली असे. पक्षाच्या चिटणीस मंडळाच्या बैठकीत आबांचा दरारा असे. शेकाप अन साखर कारखानदारी यांचे विळ्याभोपळ्याचे सख्य. पण, गणपतराव साखर कारखानदारीचे महत्व ओळखून होते. साखर कारखानदारीविरोधातले ठराव ते हाणून पाडत. वाद सोडवण्याची त्यांची खास पद्धत होती. दोन्ही पक्षकारांना समोर बसवत. 'आता तुम्ही बोला, हे बोलताना तुम्ही बोलायचे नाही', असे ते बजावत. शेकाप कार्यालयातला कर्मचारी म्हणून अनेकदा त्यांच्या पत्राचे डिक्टेशन मी घेत असे. विधिमंडळाने दिलेल्या लेटरहेडवर ते थेट मजकूर सांगत. स्वत: दुरुस्ती करत आणि संबंधितांकडे पाठवत. मंत्रालयातली फाईल हलत नाही, हलवावी लागते, असे गमतीने म्हटले जाते. गणपतरावांच्या पत्रात ती ताकत होती. अधिवेशनकाळात अनेक मंत्री, आमदार मिडिया स्टँडजवळ घुटमळत राहतात. गणपतराव समोरुन जात पण कधी पाहतही नसत. विधानसभेत त्यांचे भाषण मुद्देसूद अन संयत असे. त्यात विखार किंवा व्यक्तीगत टिका नसे. त्यांचे तारांकीत प्रश्न राज्यस्तरीय व धोरणांशी संबधीत असत. बहुतेक गटनेते आपल्या सहकाऱ्यांचा वेळ स्वत: बोलण्यासाठी वापरतात. गणपतराव त्याला अपवाद होते. पेणचे धैर्यशील पाटील किंवा पनवेलचे प्रशांत ठाकूर या शेकपच्या तरुण आमदारांना ते बोलण्याची संधी देत. विधानसभेत एखाद्या प्रश्नावर अनेक सदस्य बोलण्यासाठी उठत. अध्यक्षांनी 'आबासाहेब बोलतायत' म्हणण्याचा अवकाश, अगदी मंत्र्यांसकट सर्व सदस्य चुपचाप खाली बसत. सभागृहातील ज्येष्ठ या नात्याने नव्या सदस्यांच्या शपथविधीला प्रोटेम स्पिकर पद त्यांनी स्वीकारण्याचे बंद केले होते. अनेक आमदार विधिमंडळात दुपारचे जेवण मंत्र्यांकडे घेतात. गणपतराव मात्र कायम शेकापच्या कार्यालयात जेवताना दिसत. दाेन-चार वर्षांनी आमदारांचे मानधन व सुविधांत वाढ केली जाते. अशा प्रस्तावाला गणपतरावांनी अनेकदा विरोध केलेला आहे. एकदा गणपतराव विधानसभेच्या लाॅबीत प्रवेश करत होते. तितक्यात मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण लवाजम्यासह त्यांच्या कार्यालयात जात होते. पृथ्वीराज थांबले व त्यांनी गणपतरावांना जाऊ दिले. गणपतराव नमस्कार, चमत्कार न करता शांतपणे गेले. अर्थसंकल्पीय अधिवेशनात विभागाची वार्षिक अंदाजपत्रके, अहवाल, व जिल्हा योजनांची पुस्तके असतात. ती घेताना गणपतरावांचा सहाय्यक हमखास दिसे. गणपतराव योजनांचा अभ्यास बारकाईने करत. म्हणून महाराष्ट्र सरकारने ७०,००० कोटी रुपये सिंचन कामांवर खर्च केले मात्र त्याने सिंचन क्षेत्र फक्त ०.१% ने वाढले हे २०१०-११ च्या आर्थिक पाहणीतील नोंदीचे उद् गाते गणपतरावच होत. अधिवेशनकाळात विधिमंडळाच्या पाचव्या मजल्यावरच्या ग्रंथालयात गणपतरावांचा वावर असे. तसेच ते फोर्टातल्या पीपल्स बुक हाऊसमध्ये दिसत. कायदेमंडळात काम करत असताना गणपतरावांनी मतदारसंघावरची मांड ढिली होऊ दिली नाही. सांगाेला मतदारसंघात धनगर अन मराठा मतदार सम आहेत. गणपतराव धनगर आहेत, हे अलिकडे अलिकडे सार्वत्रिक झाले. कारण आडनाव देशमुख आणि गाव पेनूर. त्याच्यामुळे जात कळण्याचा प्रश्न नव्हता. गणपतरावांनी जिल्हा परिषद, सूत गिरणी अध्यक्ष, पंचायत समिती सभापती अशी मतदारसंघातील इतर पदे जाणिवपूर्वक मराठा नेत्यांच्या हाती दिलेली दिसतात. अलिकडे सांगोला शहरातील समतोल साधण्यासाठी माळी समाजाच्या नेत्यांची वर्णी लावलेली दिसते. गणपतराव काळाची पावले ओळखणारे व्यवहारी मार्क्सवादी होते. त्यांनी भाषणात डावा विचार, मार्क्सवाद उच्चारला नाही. पण राजकारण मात्र कष्टकऱ्यांसाठी, सबाल्टर्नसाठी केले. १९९० नंतर त्यांनी मतदारसंघात रोजगारांवर लक्ष दिले. सांगोला शेतकरी सहकारी सूतगिरणी स्थापन केली. महिलांसाठी स्वतंत्र सूतगिरणी काढली. शिक्षणाची सोय व्हावी म्हणून शैक्षणिक संस्था स्थापन केली. ठिबकवर डाळींब लागवडीला प्रोत्साहन दिले. एक पीक घेणारा शेतकरी तग धरु शकत नाही, असे ते म्हणत. म्हणून त्यांनी जिल्हा दूध संघामार्फत गाई घेऊन दिल्या. सहकाराच्या मर्यादा ओळखून त्यांनी पुण्या-मुंबईत गेलेल्या सांगोल्याच्या उद्योजकांना परत आणले. सरकारी भूखंड दिले अन रोजगाराला चालना दिली. वाद टाळण्याकडे गणपतरावांचा कल असे. त्यांनी सांगोला सोडून सोलापूर जिल्ह्याच्या विकासात कधी हस्तक्षेप केला नाही. तसेच अकलुजचे माेहिते पाटील काय किंवा करमाळ्याचे जगताप काय, यांना सांगोल्यात फिरकू दिले नाही. 'काँग्रेस-राष्ट्रवादी सरकारच्या काळात व्यक्ती भ्रष्टाचारी होते, फडणवीस यांच्या काळात सरकारच भ्रष्टाचारी आहे', असे ते म्हणाले होते. पुरोगामी विचार नष्ट झालेला नाही, प्रभाव कमी झाला आहे, असे त्यांचे सांगणे असे. गणपतरावांवर आरोप होते. सांगोल्याचा पाण्याचा प्रश्न कुठे सुटला, जिल्ह्यात शेकाप वाढू दिला नाही, धनगर आंदोलनाचे त्यांना देणेघेणे नव्हते, शरद पवार यांच्या कलाने राजकारण केले इत्यादी.... पण, त्यांच्यावर टिका करणाऱ्यात विखार नसे. अलिकडे राजकराणाचा बाज बदलला, तसे गणपतराव बदलले. त्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये लाॅटरीवाले, वाळु कंत्राटदार दिसू लागले. पण, गणपतरावांनी त्यांच्या अवैध कामांना कधी संरक्षण दिले नाही. १९९९ ची विधानसभा लढवावी, असा कार्यकर्त्यांचा आग्रह होता. तेव्हा ते म्हणाले, 'मी ९१ वर्षाचा आहे, आता त्या पदाला न्याय देऊ शकणार नाही. ते पद घेणे माझ्या तत्वात बसत नाही.' तुम्हाला मुख्यमंत्रीपदाची आॅफर होती... सत्ताधारी पक्षात गेला असता तर तहयात मंत्री असता, अशी त्यांना पृच्छा होई. त्यांचे उत्तर असे, 'वारकरी पंढरीला चालत का जातो? त्याचे विठ्ठलाकडे मागणे नसते. त्याची श्रद्धा असते. तसेच माझे आहे. कष्टकऱ्यांचे प्रश्न सुटतील अशी माझी श्रद्धा आहे.' निवडणुक म्हणजे जात, पैसा, गुंडगिरी, ठेकेदारी अशी समजूत झालेल्या काळात गणपतराच्या सांगोला माॅडेलने सर्व गृहितके मोडीत काढत लाल बावट्याचा गड ५ दशके अभेद्य ठेवला. संपर्क - ९३४००६१८४५ adsul.ashok@gmail.com

बातम्या आणखी आहेत...