आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पितृदिन विशेष:माझ्यातला ‘बाबा’ समृद्ध झाला

औरंगाबाद7 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

पत्नीच्या प्रसूतीवेळी लेबर रूममध्ये उपस्थित राहण्याची संधी हल्ली दवाखान्यांमधून िदली जाते. अर्थात, या संधीचं सोनं करून आपल्या बाळाशी पितृत्वाची ‘नाळ’ जोडू पाहणाऱ्यांची संख्या मात्र अत्यल्प. बाळाचं डायपर बदलण्यापासून ते बाळाला गोष्ट सांगत झोपवण्यापर्यंत जेव्हा बाबा बाळात सामील असतो, तेव्हा त्याचं बाबापण कसं अधिक समृद्ध होत जातं, याचा अनुभव सांगताहेत अविनाश...

‘तर असं करूया, आपण इथे सोमवारी सकाळी येऊया’ मी चकित झालो. विचारलं, “येत्या सोमवारी?’ माझा मोठा भाऊ स्त्रीरोगतज्ज्ञ आणि आमचा डॉक्टर. तो म्हणाला, ‘होय, शुगर असल्यामुळे नऊ महिने पूर्ण होण्याअगोदरच सिझर करायला लागेल.’ अर्थात, आम्हा दोघांना याची पूर्वकल्पना होतीच, पण असं वाटलं नव्हतं की ही वेळ आता इतक्या लवकर येईल. येत्या सोमवारी सिझर करायचंय ठरलंय आणि मला तर वाटलं अरे, मी अजून बाबा म्हणून तर पुरेसा तयारच नाहीये. खरंच कळलंच नाही आठ-साडेआठ महिने कसे सरले.

जरा वेळाने आम्ही हॉस्पिटलमधून बाहेर पडलो. हॉस्पिटलमध्ये डॉक्टरबरोबर झालेली चर्चा, सोनोग्राफीमधील निरीक्षण, सोमवारची तयारी आदी गोष्टींबद्दल मी आणि बायको बोलत बोलत घरी पोहोचलो. रात्री जेवण, त्यानंतरचं चालत फिरायला जाणं, गप्पाटप्पा हे सगळं आटोपून बायको बेडमध्ये माझा हात हातात पकडून झोपी गेली. सहजच वाटून गेलं की दमून आलेल्या बाळासारखी झोपलीय ही निरागस. झोपलेली माणसं बऱ्याचदा मला अपरंपार भोळी दिसतात. कदाचित दिवसभराचं जगण्याचं ओझं नकळत खाली ठेवून निश्चिंत श्रांत होऊन गेल्यागत होत असावा माणूस.

येणाऱ्या सोमवारी होणाऱ्या सिझरबद्दलचे विचार माझ्या मनात तरळत होते. भाऊ-वाहिनी गायनेकोलॉजिस्ट आणि रेडिओलॉजिस्ट असल्याने खरं तर काय होईल, कसं होईल याबद्दल फारशी काळजी वाटत नव्हती किंबहुना त्या आघाडीवर निश्चिंतीच होती. पण मला राहून राहून वाटत होतं की मी बाप होण्यास तयार झालोय का? गेल्या आठ महिन्यांमध्ये बायकोकडे बघतोय आणि मला जाणवतोय तिचा आई होण्याचा प्रवास. हा प्रवास केवळ शारीरिक नाहीये, तो तितकाच किंवा त्यापेक्षा अधिक मानसिक आहे. तिचा पोटातल्या बाळाशी सुरू झालेला व्यक्त-अव्यक्त संवाद मला जाणवत राहतो. मी मला माझ्याशीच चाचपून पाहतो. या आईबाबा होण्याच्या प्रवासात नक्कीच आम्ही दोघे सोबत आहोत, पण अजूनही माझ्यासाठी हे सगळं बायकोची गर्भारपणात काळजी घेणं याच्या अवतीभोवती फिरत राहातं. पण तिच्या पोटाशी कान देऊनही बाळाशी संवाद झालाय माझा हे मला अजूनही जाणवलं नाही. पण जाणवत राहते ती हुरहुर... बाळ येणार आहे, ते कसं असेल, ते कसं दिसेल असे कित्येक विचार आणि मग आपण बाबा म्हणून कसे असूत हा विचार रुंजी घालत राहतो अधनंमधनं. ही हुरहुर माझ्यातल्या बाबाला जन्म घालतेय का?

सोमवारची सकाळ. सात वाजून तीस मिनिटं झालीय. आवश्यक त्या तपासण्या करत स्ट्रेचरवरून बायकोला ऑपरेशन थिएटरमध्ये हलवलं. आम्ही ठरवलं होतं बाळ जन्म घेताना ऑपरेशन थिएटरमध्ये मी पण सोबत थांबणार तिच्यासोबत. माझी बहीणदेखील सोबत होती. ऑपरेशन थिएटरच्या बाजूच्या रूममध्ये आम्हाला वरतून घालायला गाऊन, स्लीपर्स, मास्क देण्यात आला. आम्ही ओटीमध्ये प्रवेश केला. टेबलवर बायकोला झोपवण्यात आलं होतं. डॉक्टर आणि नर्सचा चमू भोवताली होता. मी तिच्यापाशी गेलो. तिच्या डोक्यावरून हात फिरवला. नजरेनेच एकमेकांशी बोललो. तिथेच दोन पावलं मागं येऊन थांबलो. भूलतज्ज्ञ बायकोशी बोलत तिला काही समजून सांगत होत्या. काही कळायच्या आत ऑपरेशन - सिझरला सुरुवात झाली होती. आता मात्र हे सारं मी अक्षरश: श्वास रोखून व प्राण डोळ्याशी आणून बघत होतो. भाऊ आणि त्याची टीम सहजतेने काम करत होती. माझ्या मनात एकाच वेळी काय काय दाटून आलं होतं... भीती, उत्सुकता, काळजी. मला एकही क्षण चुकवायचा नव्हता. असं वाटत होतं की एका मोठ्या अद्भुत क्षणाचे आपण साक्षीदार होत आहोत. त्या साऱ्या प्रक्रियेशी एकरूप तन्मय झालो होतो मी. वाटलं की मी एकवटलो आहे त्याभोवती. त्याच क्षणी कुणीतरी म्हटलं - बेबी गर्ल! इवलासा जीव मी त्याच्या हातात पाहिला. चांदीचा मुलामा असलेला चिंब चिंब ओला ओला, डोक्यावर काळेशार केसं चापूनचोपून बसवलेला तो जीव डोळे मिट्ट बंद करून, मुठी बंद करून आला होता. मी हेलावलो. बाजूला उभ्या असलेल्या बहिणीचा हात मी घट्ट पकडला. अगदी घट्ट.

माझ्या डोळ्यातून घळाघळा अश्रू वाहू लागले. आईला पहिल्यांदा पान्हा फुटताना असंच वाटत असेल का? मला वाटतं माझा जन्म झालाय. बाबा म्हणून. काही वेळानं तो इवलासा जीव माझ्या हातात आला. तिचा पहिला स्पर्श, तिचा गंध, तिचं ते रडू माझ्या आत आत साठवत गेलो मी. वाटलं माझ्या बाबा होण्याला या क्षणाची अनंत काळापासून प्रतीक्षा होती. खरं तर आपला म्हणून आलेला जीव या जगात येण्याची ती प्रथम प्रतिक्रिया होती, पण बाबा होण्याच्या प्रवासाची ती एक केवळ सुरुवात होती. मला वाटतं आई लवकर होता येईल, बाबा होण्यासाठी कदाचित वेळ लागेल. बाबा म्हणजे हवं ते सामान आणून देणारा, हॉस्पिटलचं बिल भरणारा, गाडी चालवणारा इतकाच असेल तर सामाजिकदृष्ट्या तो बाबा असेल, पण बाळाचा बाबा व्हायला अजून वेळ लागेल त्याला. माझ्या उघड्या छातीशी माझं बाळ तोंड खुपसून झोपलं तेव्हा मला मी अधिक बाबा झाल्यासारखं वाटलं. पहिल्या काही दिवसांमध्ये आईशी बिलगून असलेलं बाळ बघून क्षणभर मला आपल्याला स्तन असावे असंही वाटलं. पण मग लक्ष्यात आलं की, मी खूप गप्पा मारू शकतो बाळाशी, जितका मी बाळाच्या दैनंदिन कामात सहभागी होतोय तितका मी अधिक बाबा होत जातो. बाळाचं डायपर बदलण्यापासून ते तिला गोष्ट सांगत झोपण्यापर्यंत जेव्हा बाबा बाळात सामील असतो तेव्हा त्याचं बाबापण अधिक समृद्ध होत जातं. माझ्या बाळासोबत घालवत असलेले मायेचे, रडण्याचे, हसण्याचे, गाणी म्हणण्याचे, मस्ती घालण्याचे अगणित क्षण माझ्या खोल खोल उतरत जातात. मला अधिकाधिक बाबा म्हणून घडवत राहतात.

अविनाश रावते संपर्क : ९८२३६१४१९०

बातम्या आणखी आहेत...