आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सायबरभान:पडद्याआडचे आंदोलक

रवि आमले8 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

‘केनेडी स्पेस सेंटर’ हे ‘नासा’चे सर्वात मोठे अवकाश केंद्र. त्या दिवशी तेथे ‘नासा’च्या शास्त्रज्ञांची, तंत्रज्ञांची मोठी धावपळ सुरू होती. आणखी २४ तासांनी तेथून ‘गॅलिलिओ’ या अवकाश यानाचे प्रक्षेपण करण्यात येणार होते. तो मुहूर्त त्यांना चुकवायचा नव्हता. त्याच वेळी या केंद्राबाहेर, मुख्य प्रवेशद्वारावर मोठी गडबड सुरू होती. जोरदार निदर्शने सुरू होती तेथे. उड्डाणावर बंदी घालावी, अशी त्यांची मागणी होती. त्यांचा विरोध अवकाश यानाला नव्हे, तर अणुऊर्जेवर चालणाऱ्या अवकाश यानाला होता. सुमारे साडेतीन वर्षांपूर्वीची ‘चॅलेंजर’ अवकाशयान दुर्घटना त्यांच्यासमोर होती. उड्डाण होताच अवघ्या ७३ सेकंदांत त्या यानाचा चक्काचूर झाला होता. त्यात सात अवकाशयात्रींना प्राण गमवावे लागले होते. तसेच काही या अणुऊर्जेवर चालणाऱ्या ‘गॅलिलिओ’बाबत झाले तर? हे भय अनेकांच्या मनात होते. त्याविरोधात काही अण्वस्त्रविरोधक न्यायालयातही गेले होते. पण, न्यायालयाने त्यांना उडवून लावले. परिणामी ते अधिकच आक्रमक झाले होते. केनेडी अवकाश केंद्रात हे सुरू असताना तिकडे ‘नासा’च्या गोदार्द स्पेस फ्लाइट सेंटरमध्ये काही वेगळेच घडत होते... १६ ऑक्टो १९८९ ची ती सकाळ. रविवारची सुटी संपवून ‘नासा’चे एक शास्त्रज्ञ नेहमीप्रमाणे कार्यालयात आले. त्यांनी संगणक सुरू केला. त्याचा पडदा उजळला खरा; पण तेथे नेहमीचा सिस्टिम बॅनर नव्हता. तेथे होता एक संदेश - ‘वर्म्स अगेन्स्ट न्यूक्लिअर किलर्स - वँक’. त्याखाली एक सूचना दिलेली होती - ‘तुमची सिस्टिम वँक्ड् करण्यात आली आहे.’ वँक्ड् हा नवाच शब्द. पण, त्याचा अर्थ स्पष्ट होता. तो संगणक हॅक करण्यात आला होता. केवळ तोच नव्हे, तर ‘नासा’च्या जगभरातील कार्यालयांमधले अनेक संगणक हॅक करण्यात आले होते. हे सारे संगणक ‘नासा’च्या ‘स्पेस फिजिक्स ॲनालिसिस नेटवर्क’ने जोडलेले होते. हे इंटरनेटसारखेच जाळे. फक्त त्यात ‘नासा’चे संशोधक, वैज्ञानिक, काही संशोधन संस्था, तसेच अमेरिकेचे ऊर्जा मंत्रालय यांचेच संगणकच जोडलेले असत. ते सारे हॅक करण्यात आले होते. त्या संदेशाखाली आणखी एक ओळ होती - ‘तुम्ही शांतिकाळाच्या बाता करता आणि मग युद्धाची तयारी करता.’ ही ऑस्ट्रेलियातील एका मिडनाइट ऑइल नामक बँडच्या एका गाण्यातील ओळ. ‘नासा’च्या संगणकांच्या पडद्यांवर हा संदेश झळकला आणि पुढच्याच क्षणी त्या वँकवर्मने उत्पात माजवण्यास सुरुवात केली. संगणकाच्या पडद्यावर एकेका फाइलचे नाव येई आणि ती डिलीट होई. आपले काम असे पुसून टाकण्यात येत असल्याचे पाहून सारेच हतबुद्ध झाले होते, घाबरले होते. काय करावे, कुणास काही कळत नव्हते. काहींनी तो वर्म पुढे जाऊ नये म्हणून आपल्या संगणकाचा अवघा स्मृतिकोशच डिलीट करून टाकला. तो त्यांना मोठा शहाणपणाचा निर्णय वाटला. पण, ती चूक होती. कारण तो वँक वर्म वरवर घातक दिसत असला, तो फाइल्स डिलीट करीत आहे असे दिसत असले, तरी प्रत्यक्षात तसे काहीही होत नव्हते. हॅकर्सने केलेली फसवणूक होती ती. त्या फाइल्स आत सुरक्षित होत्या. ज्यांनी घाबरून संगणकाची हार्डड्राइव्हच पुसून टाकली, त्यांचे मात्र नुकसान झाले. स्वतःच्याच हाताने त्यांनी स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारून घेतली... हा वर्म हल्ला झाल्यानंतर ‘नासा’ आणि ऊर्जा मंत्रालयातील संगणकतज्ज्ञांनी काही तासांतच त्यावर तोडगा शोधून काढला. त्यांनी काय केले, तर सगळेच संगणक वँकबाधित झालेत, असे भासवणारा प्रोग्राम लिहून तो संगणकांत सोडला. दिसायला विचित्र; परंतु परिणामकारक अशी ती गोष्ट होती. वँकचा कोड तपासताना त्यांच्या लक्षात आले होते, की त्यात एक छोटीशी फट आहे. एखाद्या संगणकावर वँक वर्मने आधीच हल्ला केला असेल, तर तेथे पुन्हा घुसण्याची आवश्यकता नाही, असे आदेश वँक वर्मच्या प्रोग्राममध्ये देऊन ठेवलेले आहेत. ‘नासा’च्या संगणकतज्ज्ञांनी मोठ्या चलाखीने त्या आदेशाचाच वापर केला. पण, त्याने सगळेच संगणक काही वर्ममुक्त होऊ शकले नव्हते. कारण तोवर हॅकर्सने वँकची दुसरी सुधारित आवृत्तीही त्या सिस्टिममध्ये घुसवली होती. त्यावर नंतर फ्रान्सच्या ‘नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ न्यूक्लिअर अँड पार्टिकल फिजिक्स’मधील एका संगणकतज्ज्ञाने मात केली. काही आठवड्यांत ‘नासा’चे आंतरजाल वँकमुक्त झाले.

हे कुणाचे काम आहे, याचा तोवर शोध सुरू झाला होता. पण, आजवर तो शोध संपलेला नाही. हे ऑस्ट्रेलियातील हॅकर्सचे काम असावे आणि त्यात ज्युलिअन असांज यांचा हात असावा, अशी शंका अनेकांना होती. पण, ते सिद्ध झालेले नाही. असांज यांनीही त्याबाबत मौन बाळगले आहे. हल्ल्यामागे कोणाचा हात होता, हे अज्ञात असले, तरी त्यामागील हेतूंबाबत मात्र शंका नव्हती. ‘वर्म्स अगेन्स्ट न्यूक्लिअर किलर्स’ या शब्दांची आद्याक्षरे घेऊन तयार करण्यात आलेला तो वँक हा शब्द, संदेशातील ‘तुम्ही शांतिकाळाच्या बाता करता आणि मग युद्धाची तयारी करता.’ ही ओळ यातून ते अण्वस्त्रविरोधी आंदोलनाच्या सहानुभूतीदारांचे काम असल्याचे सरळच दिसत होते. ‘नासा’ आणि ऊर्जा मंत्रालयाचे संगणक काही काळासाठी निकामी करणे, ही त्यांची विरोधाची कृती होती. आजवर आंदोलनात ‘रास्ता रोको’, ‘धरणे’, ‘घेराव’, ‘संप’ असे मार्ग अनुसरण्यात येत असत. सरकारचे / संस्थेचे / कंपनीचे नाक दाबून तोंड उघडणे हा त्यांचा हेतू. आंदोलनाच्या या मार्गात आता या नव्या प्रकाराची भर पडली होती. जगाने आजवर कार्यकर्त्यांची सक्रियता - ॲक्टिव्हिझम - पाहिला होता. आता ते हॅकर्सची राजकीय वा सामाजिक कारणांनी प्रेरित होऊन केलेली हॅकिंगची कृती - हॅक्टिव्हिझम - पाहत होते. जगातील हॅक्टिव्हिझमची ही पहिली मोठी घटना म्हणता येईल.

आंदोलनाचा हा प्रकार गेल्या काही वर्षांत प्रस्थापित झाला आहे. ज्या ज्युलियन असांजचे नाव वँक वर्म हल्ल्यात घेतले जाते, तो आज जगातील एक मोठा हॅक्टिव्हिस्ट मानला जातो. सरकार जनतेपासून लपवून ठेवू इच्छित असलेली माहिती जगजाहीर करणारे त्याचे ‘विकिलीक्स’ हे संकेतस्थळ हा हॅकर्सच्या सक्रियतेचाच नमुना. काहींना त्यात सायबर- दहशतवाद दिसतो, काहींना देशद्रोह. तुम्ही सरकार / व्यवस्था यांचे लाभार्थी / समर्थक की लोकांच्या सार्वभौमत्वाचे आणि स्वातंत्र्याचे पाठीराखे आहात, यावर तो दृष्टिकोन अवलंबून असतो. रशिया-युक्रेन संघर्षात अनेक हॅकर्स गटांनी मॉस्को एक्स्चेंजवर, रशियाच्या सरकारी बँकेवर, वीज ग्रीडवर हल्ले केले होते. ‘स्क्वाड ३०३’ या पोलिश गटाने रशियाचा पोलादी सायबरपडदा टाळून थेट रशियन नागरिकांच्या मेलवर वा फोनवर युद्धाबाबतचा ‘योग्य’ मजकूर जाईल, अशी व्यवस्था केली होती. अशी अनेक उदाहरणे आहेत. पण, तरीही ती कमीच आहेत. हॅकिंगचा वापर लोकांच्या बाजूने करण्याऐवजी लोकांच्या विरोधातच मोठ्या प्रमाणावर केला जात आहे. त्यात वैयक्तिक हॅकर्स आहेतच. पण, आता तर सरकारांनीही अशा हॅकर्सच्या टोळ्या पाळलेल्या आहेत. त्यांचे हॅक्टिव्हिझम चालते ते लोकांविरोधात…

बातम्या आणखी आहेत...