आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

गझलेच्या गावात:गझलेतील आरसा

बदीऊज्जमा बिराजदार (साबिर सोलापुरी)एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

फार जुन्याकाळापासून आरशानं माणसाच्या चेहऱ्यावरील आपलं स्थान अबाधित ठेवलंय. खोटं बोलणाऱ्या माणसांचे अनेक चेहरे असतात. माणसांचं जगच मुळी मुखवट्याचं. एक मुखवटा चढवून तो सतत निरनिराळ्या भूमिका वठवत राहातो. आरसा कधीच खोटं बोलत नाही. लुच्चेगिरी करत नाही. कोणाशी दुजाभाव करत नाही. आरसा पक्षपातीही नसतो. समोरच्या माणसाचं खरंखुरं रंगरूप तो दाखवतो. त्यात फेरफार नसतो. आरसा किती सुखावून जातो, दुखावून जातो, हे आरसा पाहाणाऱ्या व्यक्तीच्या चेहऱ्यावर अवलंबून असते. जसं ज्याचं रूप तशी त्याची प्रतिमा. यात आरशाचा सुतराम दोष नसतो.

आरसा कोणी पाहात नाही फारसा, असं चित्र पाहावयास नाही मिळत सहसा. आरसा नसलेलं एकही घर शोधून सापडणं कठीणच. राजमहालापासून अगदी झोपडपट्टीपर्यंत आरशाचा बोलबाला. राजा असो वा रंक आरसा सगळ्यांनाच जवळचा वाटत आलाय. आरशात स्वतःची छबी पाहाणं कुणाला बरं आवडणार नाही? फार जुन्याकाळापासून आरशानं माणसाच्या चेहऱ्यावरील आपलं स्थान अबाधित ठेवलंय. खोटं बोलणाऱ्या माणसांचे अनेक चेहरे असतात. माणसांचं जगच मुळी मुखवट्याचं. एक मुखवटा चढवून तो सतत निरनिराळ्या भूमिका वठवत राहातो. आरसा कधीच खोटं बोलत नाही. लुच्चेगिरी करत नाही. कोणाशी दुजाभाव करत नाही. आरसा पक्षपातीही नसतो. समोरच्या माणसाचं खरंखुरं रंगरूप तो दाखवतो. त्यात फेरफार नसतो. आरसा किती सुखावून जातो, दुखावून जातो, हे आरसा पाहाणाऱ्या व्यक्तीच्या चेहऱ्यावर अवलंबून असते. जसं ज्याचं रूप तशी त्याची प्रतिमा. यात आरशाचा सुतराम दोष नसतो.

तरुणींचं आरशाशी घट्ट नातं असतं. तरुणी त्या आरशाशी डोळ्यांनी बोलत असतात तेव्हा आरसा किती मोहरून जात असेल नाही का? प्रियेचा चेहराच आरसा होतो तेव्हा तिचा शोध कुठं अन् कसा घ्यायचा, याचं कोडं प्रियकरालाही सुटता सुटत नाही. आरसा नुसता तिचा सखाच नसतो तर तिचा चेहराही बनतो. मग हा चेहरा कुणाला ओळख देईनासा होतो. नशिबाच्या बाबतीत प्रियकरापेक्षाही आरसा थोर ठरतो. तिच्यावर आरशानं दावा केला तर त्यात त्याचा अपराध तो काय! प्रियकराची शोधयात्रा मात्र प्रश्नांकित होऊन जाते. 'आरशाचे दावे खरे' म्हणणाऱ्या सुरेश भटांच्या लेखणीतून हा शेर उतरतो.

शोधुनी मी तुला कुठे शोधू?

चेहऱ्यांचेच आरसे झाले

सुरेश भटानंतर गझलेच्या प्रांतात ज्यांचा आवर्जून उल्लेख करावा असे अफाट प्रतिभेचे धनी गझलकार इलाही जमादार यांचं नुकतंच निधन झालं, त्यांच्या जाण्यानं गझलेच्या आकाशातील एक तारा लुप्त झाला. माणसातील अपप्रवृत्तींना आरसा दाखवणाऱ्या कितीतरी गझला इलाही जमादार यांनी लिहिल्या आहेत. माणसाच्या बाबतीत आरशाचा अंदाज कधी खोटा नाही ठरू शकत. कारण माणसाच्या चेहऱ्यावरून त्याच्या अंतरंगाचा अंदाज यायला फारसा वेळ नाही लागत. माणसांच्या किती तऱ्हेच्या चेहऱ्यांचे रंग आरशानं न्याहाळलेले असतात. चेहरे वाचण्याचा दांडगा अनुभव त्याच्या गाठीशी असतो. प्रत्येक माणसाच्या स्वभावाचे, गुणधर्मांचे बारकावे त्याला ठाऊक असतात. आरशाचा अंदाज असो वा बोलणं. त्याला अनुभवाची चकाकी असते. आरसा बरं बोलण्यापेक्षा खरं बोलतो. खोट असते ती माणसाच्या चेहऱ्यातच. याला पुष्टी देणारा शेर इलाही जमादार असं लिहितात.

अंदाज आरशाचा वाटे खरा असावा

बहुतेक माणसाचा तो चेहरा असावा

अंधाची दुनियाच मुळी अंधकारमय असते. मग ते आरशाची कदर कशी करणार? आरशाविषयी त्यांना आपलेपणा वाटण्याचं प्रयोजनच काय? तथापि अशा अंधांच्या वस्तीतही ज्याला शब्दांचे आरसे विकण्याचं तंत्र अवगत होतं त्याला आपल्या मालाच्या खपाची चिंता कधीच नाही भेडसावत. तो बलदंड आत्मविश्वासाने प्रचंड भारलेला असतो. अंतराग्नी पेटता ठेवल्याशिवाय अंधारात उजेड नाही पेरता येत. भवताल अंधारलंय म्हणून तो गळून, पळून नाही जात. अरिष्टांवर मात करणं हाच त्याचा छंद, व्यवसाय होऊन जातो. बंद कोशातून बाहेर पडलं की व्यावसायिक चतुराई विकसित होत जाते. मनोहर रणपिसे यांच्या शेऱ्यातील प्रत्येक शब्द हेच सुचवत राहातो.

माल आपुला विकायचे मी तंत्र अनोखे विकसित केले

अंधांच्या वस्तीत आरसे शब्दांचे खपवित राहिलो!

आपल्याच चेहऱ्याची आपल्याला भीती वाटते तेव्हा आरसाच फोडून टाकावा असं वाटायला लागतं. अशा वाटण्याचीही गंमतच असते. आरसे फोडून चेहऱ्यावरील खोटेपणा, विद्रूपपणा झाकता थोडंच येतं. आपलाच चेहरा आपल्याला वाकुल्या दाखवत राहतो अनोळीखी होऊन. म्हणून मनाचा आरसा सतत स्वच्छ कसा ठेवता येईल, त्यावर धूळ साचणार नाही याकरिता आपण दक्ष राहायला हवं. हेच जगण्याचं सूत्र असतं. सत्याशी भांडून कुणाचा विजय झालाय? आरसा आपल्या पुढ्यात नेहमी सत्य ठेवत आलाय. ते स्वीकारण्याशिवाय गत्यंतर नसतं आरशाचा द्वेष करून नाही चालत. नाही तर दोष चेहऱ्यात अन् द्वेष आरशाचा. अशी सदानंद डबीर यांच्या शेरा सारखीच अवस्था होऊन जाते.

माझ्या चेहऱ्याला दचकून पाहिले मी

हे आरसे कितीदा फोडून पाहिले मी!

माणसाचं जगणं ही फार गुंतागुंतीची गोष्ट आहे. माणसाला नक्की हवं तरी काय असतं. हे त्यालाही उमगलेलं नाही. तो सदैव निनावी असोशीनं धावत सुटलेला असतो. या धावपळीत तो अंतर्बाह्य मग्न असतो. धुंद चांदण्यांनी लगडलेलं आकाश, वातावरणातील प्रसन्नता त्याला नाही पावत. चेहऱ्यावरून उदासीच्या खुणा घेऊनच तो किंवा ती वावरत असते. हे असं का घडतं याचं अचूक निदान नाही सापडत. पण भांबावलेल्या चेहऱ्याची हर तऱ्हा आरसा जाणून असतो. आरशाकडे प्रत्येक चेहऱ्याच्या प्रश्नाचं उत्तर असतं. म्हणून सुरेशकुमार वैराळकर सल्ला देतात.

प्रसन्न आसमंत, का उदास तू

विचार हाच प्रश्न आरशास तू

पुष्कळ वेळा होतं असं की, आपला चेहरा खरा की खोटा? याचा पत्ताच आपल्याला नाही लागत. आपण काही भास मनाशी घट्ट कवटाळून धरतो. याचा वास्तवाशी खरंच संबंध असतो का? माणूस एकांतात खरा असतो. अशा एकांतात तो आरशात डोळे घालून उभा असतो. तेव्हा आरसाच चेहऱ्याला उघडानागडा करतो. मुखवटा पडतो गळून. आपलाच चेहरा आपल्याला वेगळा भासू लागतो. वास्तवाचं भान येतं. ही आरशाची जादुचं म्हणायची जी दीपक करंदीकर यांनी त्यांच्या शेरातून दाखवलीय.

काय ही जादू असावी? कोणता हा आरसा

वेगळा भासे मला हा चेहरा माझा कसा?

माणसं जगात सर्वत्र सारखीच! जगभरातल्या असंख्य चेहऱ्यांशी आरशाची बांधीलकी असते. आरसा कुठल्याच चेहऱ्याला झिडकारत नाही. त्याची छबी दाखविण्याचं काम आरसा अव्याहतपणे करत आलाय. स्वतःचं प्रतिबिंब पाहून 'आरशामध्ये माझ्या जागी कोण बरे हा', असा प्रश्न चेहऱ्याला पडला तरी आरशाला त्याची किंचितही पर्वा नसते. अखेर तो आरसाच. आरशाचं हे वैश्विक रूप म. भा. चव्हाण यांनी शेरातून प्रकट केलंय.

पाहिजे तुला जसा तसाच मी

रे, जगा अखेर आरसाच मी!

तमाम चेहऱ्यांचे रंग आपल्याआत साठवून ठेवणाऱ्या आरशाचंही जगणं असतं. सोसणं असतं त्याची सल किती चेहरे जाणून घेतात? आरशाचा लखलखीतपणा सगळ्यांना दिसतो. पण आरशाचं रंगविहीन होणं कुणालाच नाही दिसत. कित्येक बंद, जुनाट खोल्यातून पारा उडालेले आरसे अडगळीत आंधळे होऊन पडून असतात. त्याकडं कोणत्याच चेहऱ्याचं लक्ष नाही जात. प्रत्येकाला त्याचं रूप दाखविणारा आरसाच आपला मूळ रंग हरवून बसतो तेव्हा त्याची पराकोटीची परवड होत राहाते. 'सोसतो हा कसा आरसाही' हा प्रश्न चेहऱ्यांना पडत नाही हे आरशाचं खरं दुखणं असतं. पारा उडालेल्या आरशावर प्रफुल्ल कुलकर्णी यांचा शेर प्रकाशझोत टाकतो.

चोची किती भुकेल्या, चारा कुठे मिळेना

का बंद आरशांना पारा कुठे मिळेना?

आरसा आपल्या चौकटीत राहून स्वप्नांचं चांदणं कसं पाहातो. त्याचं मोहरणं, भाळणं म्हणजे चेहऱ्यांना सांभाळणं असतं. त्याचंही जगणं असतं पारा उडून गेल्यानंतर उपेक्षेच्या खाईत झुरणं, सोसणं असतच. या साऱ्याचा गझलकारांनी आपापल्या दृष्टीनं उहापोह केलाय.

sabirsolapuri@gmail.com

बातम्या आणखी आहेत...