आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराभारत सरकारने “आजादी का अमृत महोत्सव’ आणि “फिट इंडिया’ या कार्यक्रमांतर्गत भारतातील वेगवेगळ्या शहरातील, वेगवेगळ्या राज्यांतील ७५ महिला व पुरुषांना या आगळ्यावेगळ्या बाईक रॅली या उपक्रमासाठी निवडले होते. त्यात माझी वुमन एम्पॉवरमेंट अंतर्गत निवड करण्यात आली होती. २१००० किलोमीटरचा नाशिक ते दिल्ली, त्यानंतर दिल्ली ते संपूर्ण भारत, नंतर पुन्हा दिल्ली आणि मग परत नाशिक हा पल्ला मी माझ्या रॉयल एनफिल्ड मीटीयॉर 350 या बाईकवर पूर्ण केला. २ सप्टेंबर रोजी या ऐतिहासिक प्रवासाची माझी सुरुवात मी, मुलं आणि पती व परिवार यांना नाशिकमध्ये निरोप घेऊन केली. ६ सप्टेंबर रोजी आम्ही दिल्ली येथे पोहोचलो. ९ सप्टेंबर रोजी मेजर ध्यानचंद स्टेडियम दिल्ली इथे देशाचे गृहमंत्री माननीय अमित शहाजींनी आमच्या फ्रिडम मोटो रॅलीला हिरवा झेंडा दाखवला. तिथून चंदीगड-अमृतसर-लेह-लदाख-उत्तराखंड-उत्तरप्रदेश-बिहार-सिक्कीम-आसाम-अरुणाचल प्रदेश-नागालँड-मणिपूर-मिझोरम-त्रिपुरा-मेघालया-वेस्ट बेंगाल-झारखंड-ओडिसा-आंध्र प्रदेश-तामिळनाडू-केरळ-कर्नाटक-महाराष्ट्र-मध्य प्रदेश-गुजरात-राजस्थान पुन्हा दिल्ली असा संपूर्ण भारताचा प्रवास करत २४ नोव्हेंबर २०२२ ला दिल्ली इथल्या नेहरू स्टेडियममध्ये आमच्या प्रवासाची सांगता झाली. सलग ७५ दिवस संपूर्ण भारत आणि इतक्या मोठ्या प्रमाणावर बायकर्स हा एक रोमांचक अनुभव होता. हा प्रवास अतिशय खडतर होता. ऊन, वारा, पाऊस, थंडी आणि अतिशय थंडी अशा या सर्व प्रकारच्या वातावरणात हा प्रवास पार पडला. भारत सरकारतर्फे स्पोर्ट्स “ऑथॉरिटी ऑफ इंडिया’ आणि “फिट इंडिया’ यांच्या संयुक्त विद्यमाने या रायडर्सचे प्रत्येक राज्यात जल्लोषाने स्वागत केले गेले. महाराष्ट्रामधून ९ पुरुष व नाशिकमधून एका आणि पुण्यामधून एका महिलेचा समावेश करण्यात आला होता. या सर्व अकरा रायडर्सनी संपूर्ण प्रवास ७५ दिवसांत पार पाडला. या दरम्यान लेहच्या आर्मी कॅम्पमध्ये आमच्या ग्रुपमधील कोलकात्याचे सहकारी तरुण विश्वास यांचा हृदयविकाराच्या झटक्याने अकस्मात मृत्यू झाला. ही घटना खूप दु:खद होती. मात्र, या सहकाऱ्याचे हेल्मेट बाइकला अडकवून आम्ही आमचा उर्वरित प्रवास पूर्ण केला. खरे तर हा प्रवास पूर्ण करणे हीच आमच्यातर्फे तरुण यांना श्रद्धांजली होती. या दरम्यान एक स्त्री म्हणून, एक आई म्हणून मला स्वाभाविकपणे कुटुंबाची आठवण येत होती. विशेषत: दसरा दिवाळी तर मुलांच्या आठवणीने मन भरून आलं. त्यावेळी अश्रूंना वाट मोकळी करून देण्याव्यतिरिक्त कोणताही मार्ग माझ्यापुढे नव्हता. वेळोवेळी मुलांना व्हिडिओ कॉल करून त्यांच्याशी गप्पा मारत होते. या सर्व प्रवासात माझ्या पतीने माझी खंबीरपणाने साथ दिली आणि अर्थातच माझ्या सासू-सासऱ्यांनी मी नसताना माझ्या मुलांची अतिशय प्रेमाने देखरेख केली. येणाऱ्या नवीन पिढीसाठी विशेषत: महिलांसाठी पुष्कळ संधी उपलब्ध असतात, परंतु संधीचा योग्य फायदा घेता आला पाहिजे. स्वतःवर आणि स्वतःच्या स्वप्नांवर विश्वास ठेवता आला पाहिजे. पाहिलेली स्वप्नं पूर्ण करण्यासाठी धडपड करण्याची, कष्ट करण्याची, त्याग करण्याची मनाची तयारी केली पाहिजे. प्रत्येक स्त्री कोणतेही आव्हान पेलण्यास सक्षम असते याची जाणीव करून देण्यासाठी मी हा छोटासा प्रयत्न केला. माझ्या या प्रयत्नांमुळे माझ्यात आलेला आत्मविश्वास माझ्यासारख्या आणखी गृहिणींना सक्षम बनवू शकेल. स्वत:च्या स्वप्नांवर विश्वास ठेवायला आणि ती स्वप्नं पूर्ण करण्यासाठी धडपड करायला शिकवू शकेल अशी आशा करते... जय हिंद जय महाराष्ट्र..!
दीपिका दुसाने {संपर्क : 7972479858
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.